मैत्री करा, पण सावधानता बाळगून
मैत्री करा, पण सावधानता बाळगून
मैत्री…….मैत्री अशांशी करावी की जे मैत्री करण्याच्या लायक आहेत. विनाकारण, स्वार्थासाठी कुणाशीही मैत्री करु नये. अशी मैत्री केल्यास त्या मैत्रीतून आपल्यावर संकट ओढवू शकते किंवा आपण अशा मैत्रीतून स्वतःवर संकट ओढवून घेवू शकतो. याबाबतीत एक गोष्ट आहे. ती गोष्ट हंस आणि कावळ्याची आहे.
या कथेत हंस आणि कावळ्याची दाट मैत्री होती. हंस चांगल्या स्वभावाचा व प्रवृत्तीचा. त्यातच कावळा दृष्ट प्रवृत्तीचा. कावळ्याचा दृष्ट स्वभाव बदलविण्यासाठी हंसानं बराच प्रयत्न केला. परंतू कावळ्याचा स्वभाव काही बदलला नाही. एकदा असेच जेवण करण्यासाठी दोघंही मित्र गेले. त्यातच कावळ्याला एक प्रेत दिसलं. ते प्रेत त्या शेतक-याच्या शेळीच्या पिल्लाचं होतं. अचानक ती मरण पावली होती. ते शेतक-यालाही माहित नव्हतं. परंतू ते प्रेत खाण्याची सवय असलेला कावळा ते प्रेत खाण्यासाठी खाली उतरला. त्यावेळी हंसानं त्याला बरंच समजावलं. परंतू तो काही ऐकला नाही. शेवटी ते दोघंही खाली उतरले.
कावळा हूूशार होता. तो त्या शेळीच्या पिल्लाचे मांस खात होता. त्यावेळी अचानक त्या शेतक-याचे लक्ष त्या शेळीच्या पिल्लाचे मांस खाणा-या कावळ्याकडे गेले. त्याच्याच बाजूला हा हंसही बसला होता. जो मांस खात नव्हता. परंतू शेतक-याला वाटलं की या दोघांनीही टोचून टोचूून माझ्या शेळीचे पिल्लू मारलेले आहे आणि आता मांस खात बसलेले आहेत. तेव्हा त्यानं एक काठी आणली व त्या काठीनं दोघांनाही मारण्याचा प्रयत्न केला. त्यात हुशार कावळा उडून गेला. त्यानं आपला मित्र असलेल्या हंसाचा विचार केला नाही. परंतू हंस उडू शकला नाही. त्यातच त्याचा जीव गेला.
अशी मैत्री………ती दृष्ट कावळ्याशी असल्यानं दृष्ट कावळा वाचला आणि चांगल्या स्वभावाचा हंस मरण पावला.
आज काळच तसा आहे. दृष्ट स्वभावाची माणसं चोहीकडे आहेत. त्यातच अशी दृष्ट प्रवृत्तीची माणसं टिकत आहेत, राजकारणात आणि सर्वच गोष्टीत अगदी काावळ्यासारखी आणि चांगली हंसासारख्या स्वभावाची माणसं मरत आहेत. त्यांना पद, प्रतिष्ठा सन्मानही मिळत नाही. त्यांच्यातील चांगल्या गुणांची कधीच प्रसंशा होत नाही. परंतू हे कालचक्र आहे. या कालचक्रात वेळ अशी येते की ती माणसं हंसासारखी मरत नाहीत. तर ती तरुन जातात आणि मरतात ती कावळ्यासारखी माणसं. अगदी दुर्गतीनं. त्यांना माहित असतं की माझी दुर्गती होणार आहे या माणसाशी मैत्री करुन. तरीही ते मैत्री तोडत नाहीत. कारण तेव्हा वेळ बरीच निघून गेलेली असते आणि मजबुरीनं राहावं लागतं त्यांना मैत्री शाबूत ठेवण्यासाठी. अशावेळी भरपूर नुकसान होत असतं. परंतू ते नुकसानही सहन करतात. याबाबतीतही एक कथा आहे. कथा जुनी आहे.
महाभारताचं युद्ध आपण ऐकलं. कथा महाभारतातील आहे. दुर्योधन आणि कर्ण एकमेकांचे चांगले मित्र. दोघंही एकमेकांवर जिवापाड प्रेम करीत होते. त्यातच एकमेकांसाठी झटत होते. एकमेकांना मदत करीत होते.
महाभारताचं युद्ध होणार होतं. त्यात कर्णालाही माहित होतं की आपण या युद्धात मरणार आहोत. आपलंही नुकसान होणार आहे. त्यातच आपल्या परिवाराचंही. आपला परिवारही उघड्यावर पडणार आहे. तरीही त्यानं दुर्योधनाशी असलेली मैत्री तोडली नाही. त्यातच युद्धादरम्यान अगदी दुर्गतीनं कर्ण मारला गेला.
महत्वाचं म्हणजे मैत्री ही चांगल्या लोकांशी करावी. मैत्री करतांना विचार करावा की आपलं पाऊल बरोबर तर आहे ना. वेडंवाकडं तर आहे ना. मैत्रीत सत्याची कास असावी. मैत्री जीवाला जीव देणारी असावी. कर्णानं केली तशी. परंतू मैत्री स्वार्थासाठी संपणारी नसावी. स्वार्थासाठी कुणीही मैत्री तोडून जावू नये कावळ्यासारखे. तर कर्णासारखे प्राण त्यागावे. मग ती मैत्री चांगल्या व्यक्तीशी असो वा नसो.
आज लोकं मैत्री करतात कर्णासारखी. परंतू जेव्हा कर्णासारखे प्राण देण्याची वेळ येते. तेव्हा ते कर्णासारखे वागत नाहीत. तर कावळ्यासारखे उठून पळतात. मग साहजीकच हंसासारख्या माणसाला नाईलाजानं मरण पत्करावं लागतं.
अलीकडे स्वार्थ तर एवढा वाढलेला आहे की अशा स्वार्थपिडीत काळात लोकं मैत्री तर करतात. परंतू आपली वेळ निघून गेली की त्या मैत्रीचा रंग बदलतो. ती मग सरड्यासारखी वागायला लागतात वेळी अवेळी. त्यावेळी ते मागील सर्व दिवस विसरतात की माझ्यावर मागील काळात काय घडलं होतं? मला कोणी मदत केली? माझा खरा मित्र कोण? ते सगळं विसरुन ते वेगळ्याच भावनेनं वागत असतात. त्यातच अशा स्वार्थपूर्ण वागण्यानं कधी त्यांचा फायदा होतो तर कधी नुकसानही.
विशेष सांगायचं म्हणजे अशा आपल्या वागण्यानं आपला फायदा जरी होत असेल तरी प्रत्यक्ष सृष्टी आपलं वागणं पाहात असते. ज्याला आपण विधाता वा परमेश्वर म्हणतो. तो न्याय करतो. तो असा न्याय करतो की आपले सगळे बरोबर असतांनाही असं काही घडतं की आपल्याला सावरायला वेळंही मिळत नाही. मग कर्णासारखीच आपली दुर्गती होते.
महत्वाचं सांगायचं म्हणजे मैत्री अशी करा की ज्या मैत्रीतून काही अर्थ जरी निघत नसेल तरी चालेल. परंतू मैत्री चांगल्या लोकांशी करावी. परंतू चांगल्या लोकांशी मैत्री करतांना त्यांचा हंसासारखा जीव घेवू नये. त्यासाठी आपले विचारही चांगलेच ठेवावेत म्हणजे झालं. कारण तुमचे विचार जर त्या चांगल्या स्वभावाच्या माणसासारखे असतील तर तुम्हाला फलदायी फळ मिळेल आणि तुमचे विचार चांगले नसतील तर तुम्हीही त्या चांगल्या माणसांना बुडवाल आणि तुम्हीही बुडाल. तेव्हा मैत्री करतांना थोडा तरी विचार करावा म्हणजे झालं.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०