“आदी टिकली लाव ,मगच तुझ्याशी बोलतो” भिडेवर काहीतरी निर्बंध घाला हो…
आदी टिकली लाव, मगचं तुझ्याशी बोलतो’ असं एका वृत्त वाहिनीच्या महिला पत्रकाराशी वादग्रस्त वक्तव्य करणारे संभाजी भिडे महिलांचा किती सन्मान, आदर करतात हे दिसून येते. प्रतिक्रिया देणं न देण हा भिडेंचा अधिकार असला तरी, टिकली लावणे न लावणे हा त्या महिला पत्रकाराला संविधानांने दिलेला अधिकार आहे हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे होत. त्यामुळे, मध्यंतरीच्या काळातील काही वक्तव्ये पाहता, २१ व्या शतकातील सर्वात बिनडोक, भंपक माणूस म्हणून, भीमा कोरेगांव दंगलीचे आरोप असलेले सुत्रधार संभाजी भिडेंची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होऊ शकते. उदा. मनु हा जगातील पहिला कायदे पंडित, बाबासाहेबांनी मनुस्मृतीचा अभ्यास करुन संविधान लिहिले, बाबासाहेबांनी मनुचे कौतुक केले, छत्रपती शिवाजी महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची भेट, मनुचा पुतळा राजस्थान विधान भवनाबाहेर आहे अशा स्वरुपाची संदर्भहीन वायफळ वक्तव्ये त्यांनी एका वृत्त वाहिनीवर केली होती त्यानंतर आता बुध्द काही उपयोगाचा नाही असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. सतत काही तरी वादग्रस्त वक्तव्ये करुन समाजा समाजामध्ये वादंग निर्माण करण्याचे प्रयत्न करणाऱ्या बिनडोक समाजद्रोही माणसाला बुध्द काय समजणार ? कोरोनाच्या जागतिक महामारीत कोरोनामुळे मरणारी माणसं जगण्याच्या लायकीची नव्हती, मुळात कोरोना हा रोगचं नाही तर फक्त मानसिक रोग असल्याचे वक्तव्य केल होते पण, नंतर तेच भिडे तब्बेत बिघडल्याने महाड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले होते.
विषमता, जातीयता, निर्दयता, उचनिचता, अन्याय अत्याचार अशा अनेक भ्रामक गोष्टींचे प्रतिक असलेल्या कुप्रसिद्ध मनुस्मृतीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड क्रांतीभूमीत मूठमाती दिली, तिचे जाहीर दहन केले. संविधान सभेतील बाबासाहेबांची भाषणे आणि चर्चा खंड १ ते १२ मध्ये उपलब्ध असतांना बाबासाहेबांनी मनुस्मृतीचा अभ्यास करुन संविधान लिहिले, तिचे कौतुक केले अशी बिनडोक वक्तव्ये एका वृत्त वाहिनीवर करणे निश्चितचं खोडसाळ, बकवास आणि निषेधार्य आहेत. स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता ही मानवी मुल्ये ज्या मनुस्मृतीत नाहीत तिचे समर्थन बाबासाहेब का करतील हे भिडेनी प्रथम लक्षात घेतल पाहिजे. आणि मनुचा पुतळा राजस्थान विधान भवनाबाहेर नसून, राजस्थान न्यायालयासमोर २८ जून १९८९ रोजी बसविण्यात आला असून, तो हटविण्याची मागणी सातत्याने होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा कार्यकाळ पाहता त्यांची भेट कशी शक्य आहे ? यावरुन संभाजी भिडेंना किती ज्ञान आणि अभ्यास आहे हे लक्षात येऊ शकते. तरी सुध्दा काही लोक त्यांना पुज्यनीय का समजतात तेच कळत नाही.
अमेरिका दौर्यावर असतांना, भारतांने जगाला बुध्द दिला असे वक्तव्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदीनी केले होते. त्या वक्तव्याच्या अनुषंगाने संभाजी भिडेंनी भारतांने जगाला बुध्द दिला असला तरी, बुध्द काही उपयोगाचा नाही असे वादग्रस्त वक्तव्य केले. दहशतवादांने सर्व जगाला ग्रासले असून, त्यामुळे मानव जातीसमोर एक आव्हानचं उभे ठाकले आहे. अशा वेळी जगाला युद्धाची नव्हे तर बुध्दाची गरज आहे, बुध्दाचा मार्गचं जगाला तारु शकतो. २५०० वर्षापुर्वी तथागत गौतम बुध्दांनी जगाला अहिंसेचा अनमोल संदेश दिला. म्हणूनच संपूर्ण जगात बुध्दाला ‘लाईट ऑफ एशिया’ म्हणतात, भारत भूमीला बुध्दाची भूमी म्हटले जाते, निसंशय बुध्द जगाचा प्रकाश आहे असेही म्हटले जाते. जगात अनेक देशात बौद्ध धम्म मोठ्या प्रमाणात जोपासला जातो. त्यामुळे बुध्द धम्माचा भारतात उदय झाला ही भारतासाठी मोठी अभिमानाची गोष्ट असतांना, संभाजी भिडेसारखा भंपक, बिनडोक माणूस बुध्द काही उपयोगाचा नाही असे बेताल वक्तव्य करतो हे किती शहाणपणाचं आहे ?
– मिलिंद कांबळे चिंचवलकर*