भारत जोडो यात्रेला संभाजी ब्रिगेडचे समर्थन का ?

भारत जोडो यात्रेला संभाजी ब्रिगेडचे समर्थन का ?
✍🏻 प्रेमकुमार बोके
राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा सध्या महाराष्ट्रातून मार्गक्रमण करीत आहे.या पदयात्रेला देशभरातून जबरदस्त प्रचंड प्रतिसाद मिळत असून अनेक सामाजिक, सांस्कृतिक,शैक्षणिक संघटना,संस्था व समाजसेवी वर्गाचे भारत जोडो यात्रेला समर्थन आहे.त्याचबरोबर देशातील विविध क्षेत्रात काम करणारे विद्वान,विचारवंत, साहित्यिक,वैज्ञानिक,लेखक,पत्रकार,कलाकार,प्रबोधनकार,शेतकरी,छोटे व्यापारी,विद्यार्थी,महिला वर्ग आणि विख्यात सामाजिक कार्यकर्ते यांनी सुद्धा राहुल गांधी यांच्या पदयात्रेला पाठिंबा दर्शवून अनेक जण प्रत्यक्षपणे या यात्रेत सहभागी सुद्धा झालेले आहेत.कारण ही यात्रा कोण्या एका पक्षाची नसून ती भारताला मानवतावादी विचाराने जोडणाऱ्या एका व्यापक व विशाल उद्देशाने प्रेरित होऊन निघालेली यात्रा आहे.त्यामुळे राहुल गांधी हे जरी काँग्रेसचे नेते असले तरीसुद्धा देशातील सध्याची भीषण परिस्थिती, जातीयता,धर्मांधता,महागाई,बेरोजगारी,सरकारी यंत्रणांचा गैरवापर या सगळ्या गोष्टींच्या अतिरेकामुळे भारताचे सुजाण नागरिक म्हणून देशाला वाचविण्यासाठी या प्रक्रियेत सहभागी होणे आपले कर्तव्य ठरते.याच पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडने सुद्धा राहुल गांधींच्या पदयात्रेला पाठिंबा दिलेला असून नांदेडमध्ये प्रवेश केल्याबरोबर संभाजी ब्रिगेडचे नेते संकेत पाटील यांच्या नेतृत्वात संभाजी ब्रिगेडच्या समर्थनाचे पत्र राहुल गांधी यांना भेटून देण्यात आले व त्यांच्याशी चर्चा करण्यात आली.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॕड.मनोज आखरे आणि महासचिव सौरभ खेडेकर यांच्या सुचनेनुसार महाराष्ट्रातील संभाजी ब्रिगेडच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या यात्रेला सहकार्य आणि पाठिंबा देण्याचे ठरविले आहे. जिथे शक्य होईल त्या ठिकाणी ब्रिगेडचे कार्यकर्ते प्रत्यक्षपणे या यात्रेत सहभागी होत आहे.प्रदेशाध्यक्ष अॕड.मनोज आखरे हे या पदयात्रेत स्वतः सहभागी होणार असून, महासचिव सौरभ खेडेकर हे सुद्धा अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रदेश कार्याध्यक्ष डाॕ.गजानन पारधी,विभागीय अध्यक्ष गजानन भोयर,बुलडाणा जिल्हाध्यक्ष योगेश पाटील,अकोला जिल्हाध्यक्ष इंजि.शंतनू हिंगणे,महानगर अध्यक्ष योगेश ढोरे व अनेक पदाधिकाऱ्यांसोबत या यात्रेमध्ये सहभागी होणार आहे.त्यामुळे संभाजी ब्रिगेडचा या यात्रेमध्ये उत्स्फूर्त सहभाग राहणार असून भारत जोडण्याच्या प्रक्रियेमध्ये आपले सुद्धा योगदान असले पाहिजे या उदात्त हेतूने संभाजी ब्रिगेडने राहुल गांधी यांना सहकार्य करण्याचे ठरविले आहे.कारण संभाजी ब्रिगेड ही माणसे जोडणाऱ्या विचारांची पेरणी करणारी एक वैचारीक,सामाजिक व लढाऊ संघटना आहे.मागील पंचवीस वर्षापासून संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रामध्ये सामाजिक एकता,एकात्मता,अखंडता तसेच जातीय व धार्मिक सलोखा राखण्याचे व विषमतेवर प्रहार करण्याचे काम यशस्वीपणे करीत आहे.भारतीय संविधान व लोकशाहीवर संभाजी ब्रिगेडचा विश्वास आहे.सर्वसामान्य माणसांचे जीवनमरणाचे प्रश्न घेवून संभाजी ब्रिगेड सातत्याने रस्त्यावर उतरुन संघर्ष करीत असते.संघटनेचे अनेक व्याख्याते,साहित्यिक,लेखक,प्रबोधनकार या सर्वांच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडने मागील पंचवीस वर्षांत महाराष्ट्रामधे सामाजिक व धार्मिक सौख्य राखण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची भूमिका निभावली असून महाराष्ट्रातील जातीय आणि धार्मिक दंगली थांबवण्यामध्ये संभाजी ब्रिगेडची अत्यंत महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे.
त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी जोडण्याचा,देशाला एकसंघ ठेवण्याचा आणि देशात एकात्मता राखण्याचा विषय येतो तेव्हा संभाजी ब्रिगेड सर्वात पुढे असते हे अनेकदा सिध्द झालेले आहे.तसेच संभाजी ब्रिगेड व उध्दवजी ठाकरे यांच्या शिवसेनेची काही दिवसांपूर्वी राजकीय युती झालेली आहे.त्यामुळे महाराष्ट्रात एक नवीन राजकीय समीकरण तयार झालेले आहे.या युतीच्या माध्यमातून महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व निवडणूकांमधे संभाजी ब्रिगेडचे शेकडो आक्रमक वक्ते शिवसेनेसोबत प्रचाराचा धुरळा उडवून महाराष्ट्राला नवीन पर्याय देणार आहे.तसेच शिवसेना ही महाविकास आघाडीत असल्यामुळे पर्यायाने संभाजी ब्रिगेड सुध्दा महाविकास आघाडीचा एक घटक आहे.त्यामुळे राहुल गांधी यांच्या काँग्रेस सोबतही आमचे नाते निर्माण झाले आहे.राहुल गांधी यांच्या परिवाराने देशासाठी मोठे बलिदान दिलेले आहे व त्यांनी सुरू केलेली यात्रा ही मने दुभंगलेल्या माणसांना पुन्हा एकमेकांच्या जवळ आणण्यासाठी केलेला एक प्रामाणिक प्रयत्न आहे.त्यामुळे आम्ही सुद्धा या यात्रेमध्ये सहभागी झालेलो आहे.कारण देश सध्या विचित्र परिस्थिती मधून वाटचाल करत आहे.सर्वसामान्य माणसाचे अधिकार जवळपास हिरावून घेतलेले असून सरकारच्या धोरणा विरोधात बोलणाऱ्यांना देशद्रोही,पाकिस्तान समर्थक, हिंदू विरोधी अशा प्रकारची बिरुदे लावून बदनाम करण्यात येत आहे.सरकारी धोरणांवर टीका करणाऱ्यांना डायरेक्ट तुरुंगात टाकणे सुरू आहे.सरकारी यंत्रणांचा पूर्णपणे गैरवापर सुरू असून सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी असणारे कायदे हे मुठभर लोकांसाठी वापरणे सुरू आहे.देशाची संपत्ती दोन-चार मोठ्या उद्योगपतींच्या ताब्यात देण्यात आली असून देश अराजकतेच्या काठावर उभा आहे.
अशावेळी देशाचे जागरूक नागरिक म्हणून तुमची आमची प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे.जात,धर्म,पंथ,पक्ष विसरून केवळ देशहीत डोळ्यासमोर ठेवून देश जोडण्याच्या कोणत्याही प्रक्रियेमधे आपले वैचारीक मतभेद बाजूला ठेवून आपण सहभागी झालो पाहिजे,याच राष्ट्रप्रेमी विचाराने संभाजी ब्रिगेडने भारत जोडो यात्रेमध्ये आपला सहभाग असणे हे काळाची गरज आहे हे ओळखून सुरुवातीपासूनच या यात्रेला पाठिंबा दर्शविला आहे.त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे राजकीय दृष्टिकोनातून न बघता देश हिताचा विचार करून देशात एकात्मता,शांतता,बंधूता,समता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे वाटचाल केली तर निश्चितच भारतामधील ही सध्याची भीषण परिस्थिती आपण बदलवू शकतो आणि देशाला प्रगतीच्या मार्गाने नेण्यासाठी आपलाही हातभार निश्चितपणे लागू शकतो.त्यासाठीच संभाजी ब्रिगेडने राहुल गांधी यांना साथ व समर्थन देण्याचे ठरवले आहे.प्रदेशाध्यक्ष अॕड.मनोज आखरे,महासचिव सौरभ खेडेकर आणि संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते आपापल्या परीने या यात्रेमध्ये सहभागी होऊन भारत जोडण्याच्या मोहिमेमध्ये राहुल गांधी यांच्या सोबत राहणार आहे.त्यामुळे आपण सर्वांनी सुद्धा गंभीरपणे विचार करून जोडणाऱ्यांच्या दिंडीचे वारकरी व्हावे ही विनंती.
प्रेमकुमार बोके
अंजनगाव सुर्जी
९५२७९१२७०६
१४ नोव्हेंबर २०२२