संशोधन

सत्यशोधक लहुजी साळवे आणि महात्मा जोतीराव फुले : एक शोध

सत्यशोधक लहुजी साळवे आणि महात्मा जोतीराव फुले : एक शोध
—————————————
– डॉ. मारोती द. कसाब
मो. ९८२२६१६८५३
भारतातील चातुर्वर्ण्य व्यवस्थेने अस्पृश्य ठरविलेल्या महाराष्ट्रातील महार, मांग, ढोर, चांभार या जात समूहांचे उद्धारक म्हणून महात्मा फुले यांना ओळखले जाते. महात्मा फुले यांच्या आधी अशाप्रकारे अस्पृश्यांचा कळवळा घेऊन कुणी त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात काम केल्याचे आढळून येत नाही. म्हणूनच अस्पृश्य जातीत जन्मलेले महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा गौतम बुद्ध, महात्मा कबीर यांच्या सोबतच महात्मा जोतीराव फुले यांनाही गुरु मानले होते. बाबासाहेबांनी महात्मा फुले यांना गुरुस्थानी मानून, महात्मा फुले यांनी अस्पृश्यांच्या उद्धारार्थ केलेल्या कार्याचा गौरवच केलेला दिसून येतो. त्यांच्याप्रतीची कृतज्ञता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.
आपल्या संपूर्ण हयातीत महात्मा फुले यांनी स्त्री शूद्रांसह अस्पृश्यांना केंद्रस्थानी मानून त्यांच्या उद्धाराची चळवळ अत्यंत डोळसपणे चालविली. महात्मा फुले यांनी अनेक ग्रंथांचा अभ्यास करून भारतातील अस्पृश्यतेची पाळेमुळे शोधून काढली. ‘अस्पृश्यांची कैफियत’ त्यांनी जगापुढे मांडली. गुलामगिरी, सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक, ब्राह्मणांचे कसब आणि अखंड आदि काव्य लेखनातून महात्मा फुले यांनी अस्पृश्य हे मूळचे अस्पृश्य नसून ते या देशाचे स्वामी आहेत, मालक आहेत, मूळ रहिवासी आहेत हे परोपरीने इतिहासाचे दाखले देऊन, संदर्भ देऊन सिद्ध केले आहे. इ. स. १८६९ साली प्रकाशित झालेले आपले ‘ ब्राह्मणांचे कसब ‘ हे पुस्तक महात्मा फुले यांनी ‘महाराष्ट्र देशांतील कुणबी, माळी, मांग, महार यांस परम प्रीतीने नजर’ केले आहे. ( म. फुले समग्र वाङ्मय’, पृ. ८६)
महात्मा फुले यांना गुलामगिरीची प्रचंड चीड होती. गुलामगिरी नष्ट करण्यासाठी त्यांनी आपल्या जीवाचे रान केले. ‘गुलामगिरी’ या आपल्या पुस्तकाच्या सुरुवातीलाच त्यांनी अर्पण पत्रिका लिहिली असून हे पुस्तक त्यांनी ‘ युनायटेड स्टेट्स मधील ज्या सदाचारी लोकांनी गुलामांना मुक्त करण्याच्या कामात निरपेक्ष व परोपकार बुद्धी दाखविली त्यांच्या सन्मानार्थ नजर केले आहे. ‘ ( ‘म. फुले समग्र वाङ्मय’, पृ.‌११५)
महात्मा फुले यांचे घर पुण्यात ज्या पेठेत होते, त्यांच्या बाजूलाच मीठ गंज , वेताळ पेठ ही मांग महारांची वस्ती होती. महात्मा फुले यांनी बालपणीच मांग महार यांचे दुःख जवळून पाहिले होते. त्या काळात पुण्यात पेशवाईचे नियम अत्यंत कठोर होते. मांग महारांना दिवसा पुण्यात फिरता येत नसे. एखादा मांग महार रस्त्यावर आलाच ; तर त्याला गळ्यात गाडगे आणि कमरेला झाडू बांधून यावे लागे. अन्न पाण्यावाचून अनेक मांग महार पाय खोरून मरत असत. त्यांना कोणी पाणीही प्यायला देत नसे. हे पाहून बाल जोतीचे मन तळमळत असे. त्यांचे सुरुवातीचे मित्र ब्राम्हण जात वर्गातून आलेले होते. अशाच एका ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या वरातीत ‘ तू माळी, शूद्र असून आमच्या वरातीत का आला? ‘ असे म्हणत जोतीरावांचा वरातीतील लोकांनी अपमान केला .
वरातीत अपमान झाल्यापासून जोतीरावांनी शरीर सामर्थ्यवान बनविण्यासाठी शारीरिक शिक्षण घ्यायचे ठरवले. त्या काळात पुण्यात लहुजी वस्ताद साळवे ( जन्म- इ.स. १७९४) यांचे तालीम, आखाडे प्रसिद्ध होते. वेताळ पेठेतील लहुजींच्या घराजवळ असलेल्या तालमीत जोतीराव हे त्यांचे मित्र सदाशिव बल्लाळ गोवंडे यांच्या सोबत सामील झाले. यासंदर्भात धनंजय कीर लिहितात, ‘ जोती व गोवंडे हे उत्साही, महत्त्वाकांक्षी आणि उद्योगी तरुण होते. शिवाजी आणि वाॉशिंग्टन यांची चरित्रे त्यांनी अभ्यासली होती.
भावी काळातील कष्टमय जीवन प्रवासासाठी आणि स्वतःच्या महान ध्येयसिद्धीसाठी आपले शारीरिक सामर्थ्य तितकेच कणखर आणि खणखणीत असणे आवश्यक आहे, हे जाणून ते विविध प्रकारचे मर्दानी खेळ खेळत. तलवार, दांडपट्टा व निशानेबाजी यात ते चांगलेच तरबेज झाले. लहुजी बुवा मांग हे अस्पृश्य समाजातील गृहस्थ या दोघांचे या क्षेत्रातील गुरुजी होते. सैनिकी शिक्षणाचे लहुजी हे एक आदर्श गुरुजी होते. त्यांच्या तालमीत जोतीने शिक्षणात इतकी मोठी प्रगती केली की, तो जेव्हा दांडपट्टा फिरवी, तेव्हा त्याचे कौशल्य पाहण्यास लोकांची झुंबड उडत असे. एक उत्कृष्ट व्यायाम पटू म्हणून जोतीची पुण्यात ख्याती झाली होती. लहुजी बुवा हे तडफदार व देशाभिमानी असे व्यक्तिमत्त्व. तरूणांचे एक कळकळीचे मार्गदर्शक होते’ ( कीर, पृष्ठ क्रमांक – १६)
महात्मा फुले यांचे मूळ घराणे सातारा जिल्ह्यातील कटगुण येथील होते. त्यांचे आधीचे आडनाव ‘गोऱ्हे’ असे होते. ते वतनदार चौगुले होते. त्यांनी भरपूर संपत्ती जमा केल्यामुळे गावातील कुलकर्ण्यांशी त्यांचे वाकडे आले. मनुस्मृतीच्या नियमानुसार पेशवाईमध्ये शूद्रांना संपत्ती जमा करण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळे झालेल्या भांडणात एका कुलकर्ण्यांची मान तलवारीने छाटून जोतीरावांचे पणजोबा गाव सोडून पुण्याजवळच्या खानवडी येथे राहायला आले. (पाटील, पृष्ठ क्रमांक- १७)
महात्मा जोतिराव फुले यांचा जन्म इ.स.१८२७ साली झाला. ते अवघे नऊ महिन्यांचे असताना आई चिमणाबाईंचे निधन झाले. पुण्यात इंग्रजी मिशनऱ्यांनी सुरू केलेल्या शाळेत वडील गोविंदरावांनी जोतीरावांना घातले. मात्र ” तुमच्या मुलांना शाळेत बसवून तुमचे उद्योग धंदे बुडवावे, असा इंग्रज सरकारचा डाव आहे. तुम्ही आपले उद्योग धंदे सोडून मुलांना शाळेत घालू नका. या मुलाला शाळेत घालून ऐदी बनविण्यापेक्षा बागेत काम करावयास शिकवा; म्हणजे हा तुमचे व कुटुंबाचे पुढे उत्तम पोषण करील” अशी त्या भोळ्या व सरळ मनाच्या गृहस्थाची समजूत घालण्यात आल्यामुळे गोविंदरावांनी जोतीला शाळेतून काढून बागेचे कामात घातले.’ ( पाटील, पृष्ठ क्रमांक- १९) गोविंदरावांच्या बागे शेजारी राहणाऱ्या गफार बेग मुन्शी आणि मिस्टर लिजीट साहेबांनी जोतीराव व गोविंदराव या दोघांनाही शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले. त्यामुळे पुन्हा जोतीराव शाळेत जाऊ लागले. त्यांच्या सोबत त्यांचे मित्र सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर व सखाराम यशवंत परांजपे हे ही होते. शाळेतील अभ्यासाबरोबरच ते शारीरिक शिक्षण घेण्याकडे ही वळले. महात्मा फुले यांचे आद्य चरित्रकार पंढरीनाथ सीताराम पाटील यांच्या मते जोतीरावांनी इ. स. १८४१ मध्ये मुन्शी गफार बेग आणि मिस्टर लिजीट साहेबांच्या सांगण्यावरून दुसऱ्यांदा शाळेत प्रवेश घेतला आणि त्याच वर्षी ते आपल्या तिन्ही मित्रांसमवेत लहुजींच्या तालमीत दाखल झाले. जोतीराव पहिल्यांदा शिष्य म्हणून लहुजींना भेटले तेव्हा ते १४ वर्षांचे होते; तर लहुजींचे वय तेव्हा ४७ वर्षे होते. पंढरीनाथ पाटील पुढे लिहितात ,” त्यावेळी पुण्यांत लहुजी बुवा या नांवाचा एक मांग जातीचा गृहस्थ या कामीं मोठा नामांकित व तरबेज असा होता. त्याचे जवळ ही मंडळी दांडपट्टा, ढाल-तलवार, गोळीबार वगैरे कामें शिकली.” ( पाटील पृष्ठ क्रमांक- २१) लहुजी साळवे यांचे घराणे क्रांतिकारकांचे होते. त्यांना शुरविरांची परंपरा लावलली होती. इंग्रजांशी लढताना लहुजींचे वडील राघोजी हे शहीद झालेले होते. लहुजींनी आजन्म अविवाहित राहून समाज क्रांती करण्याचे ठरविले होते.
लहुजींची तालीम किंवा व्यायाम शाळा हा नुसता पैलवानांचा आखाडा नव्हता; तर त्याठिकाणी देश प्रेमाने भारावलेले सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, सखाराम यशवंत परांजपे आणि जोतीरावांसारखे विद्यार्थी हे दररोज सकाळ संध्याकाळी एकत्र येत असत. लहुजी बाबा त्यांना छत्रपती शिवरायांच्या आणि त्यांच्या मावळ्यांनी गाजवलेल्या पराक्रमाच्या कथा सांगत असत. कारण लहुजींच्या घराण्याला छत्रपती शिवाजी राजांनी स्वतः ‘ राऊत ‘ ही पदवी सन्मानपूर्वक बहाल केलेली होती. लहुजींचे पूर्वज शिवरायांच्या किल्ल्याचे संरक्षक होते. स्वराज्याच्या स्थापनेत त्यांनी आपला पराक्रम गाजवलेला होता. लहुजी आपल्या पठ्ठ्यांमध्ये देश प्रेमाबरोबरच स्वाभिमान आणि सामाजिक जाणीव निर्माण करीत होते. त्यामुळे शारीरिक शिक्षणाबरोबरच गुरुवर्य लहुजी बाबांकडून जोतीरावांसह सर्व विद्यार्थ्यांना व्यावहारिक, सामाजिक ज्ञानही मिळत असे.
लहुजींच्या तालमीत देश- काल- परिस्थितीवर गुरु-शिष्यांच्या प्रदीर्घ चर्चा होत असत. देशासाठी युवकांनी काय केले पाहिजे ? कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिले पाहिजे ? देशातील युवकांना कशा प्रकारचे शिक्षण मिळाले पाहिजे ? आणि देशावरचे इंग्रजी संकट कसे हटवले पाहिजे ? अस्पृश्यांची आणि स्त्रियांची दुःखद स्थिती कशी बदलली पाहिजे ? असे एक ना अनेक प्रश्न त्या ठिकाणी चर्चेला येत. त्याचबरोबर आधी इंग्रजांना घालवायचे की आधी देशात सामाजिक समता निर्माण होण्यासाठी सुधारणा घडवून आणायच्या ? यावरही तिथे विचार विनिमय होत असे. लहुजी आणि जोतिबांचे असे तर्कशुद्ध संवाद होत असत आणि त्यातूनच जोतीरावांनी आपल्या सामाजिक क्रांतीची सुरुवात करण्यासाठी स्त्री शूद्रातिशूद्रांसाठी शिक्षणाची चळवळ उभारण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला.
लहुजी आणि जोतीराव यांचे नाते केवळ तात्कालिक व्यायाम गुरु आणि शिष्य म्हणून नव्हते; तर लहुजींचे जोतीरावांवर पुत्रवत प्रेम होते. आणि जोतीरावही लहुजींचा प्रत्येक सल्ला शिरसावंद्य मानत असत. अंमलात आणत असत. इ. स. १८४१ ते १८४७ पर्यंत जोतीराव आपल्या गुरुजींच्या तालमीत सातत्याने जात असत. स्त्री शूद्रातिशूद्रांसाठी, अस्पृश्यांच्या मुलींसाठी शाळा सुरू करण्याच्या जोतीराव फुले यांच्या क्रांतिकारी निर्णयामागे लहुजी बाबा साळवे यांचा भक्कम पाठिंबा होता. ही शाळा स्थापन करण्यापूर्वी पुण्यात जोतीरावांनी जी पहिली जाहीर सभा घेतली, त्या सभेचे अध्यक्षस्थान त्यांनी आपले गुरु लहुजी बाबा साळवे यांना दिले होते. सत्यशोधक विचारवंत फुलवंताबाई झोडगे लिहितात-
” विद्यार्थीदशेतच जोतिबाचा मित्र गोतावळा बराच वाढला होता. गोवंडे, जोशी इत्यादी मित्रांबरोबर तो आपल्या पुढील कार्यासंबंधी बोलत असे व त्यांचा सल्ला घेत असे. वस्ताद लहुजी मांग, खंडू रामोशी हे तर जोतिबाला देव माणूस समजत असत. मात्र असे असले तरी जोतिबा फुले त्यांना शारीरिक खेळाचे गुरु मानीत होते. तारीख २५ डिसेंबर १८४७ रोजी फुले वाड्याच्या समोर असलेल्या मैदानात झालेली जंगी सभा पुण्यातच नव्हे तर साऱ्या महाराष्ट्रात दुमदुमून राहिली. या सभेचे अध्यक्षस्थान लहुजी मांग यांनी भुषविले होते; तर प्रमुख वक्ते जोतीराव फुले हे होते.”
( झोडगे फुलवंताबाई, ‘ सावित्रीबाई फुले: काल आणि कर्तृत्व’, पृष्ठ क्रमांक- ५५)
गुरुवर्य लहुजी साळवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेनंतर लगेचच जोतीरावांनी पुण्यात भिडे यांच्या वाड्यामध्ये १४ जानेवारी १८४८ रोजी अस्पृश्य आणि शूद्रातिशूद्रांसह सर्व जाती धर्माच्या मुलींसाठी भारतातील पहिली शाळा काढली. या शाळेत शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले आणि फातिमा बीबी शेख यांची नियुक्ती केली. अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी महात्मा फुले यांनी जी शिक्षण मंडळी स्थापन केली, तिचे नाव ‘ महार मांग इत्यादी लोकांस विद्या शिकविण्याकरिता मंडळी’ असे होते. या संस्थेचे अध्यक्ष सदाशिव बल्लाळ गोवंडे तर सचिव मोरो विठ्ठल वाळवेकर असून, जोतीराव फुले हे फक्त सभासद होते. ( ‘म. फुले समग्र वाङ्मय’ , पृष्ठ क्रमांक- ६१२ ) त्या काळातील जोतीराव फुले किंवा लहुजी साळवे ही माणसं नावासाठी काम करत नव्हती; तर कामासाठी काम करत होती हे लक्षात येते. म्हणूनच कागदपत्रांमध्ये लहुजींचे उल्लेख फारच तुरळक ठिकाणी सापडतात.
अस्पृश्यांना शिक्षण देण्याच्या कामी आणि एकंदरीतच मुलींच्या शिक्षणासाठी तसेच महात्मा फुले यांच्या प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये लहुजी साळवे यांचा हिरीरीने सहभाग होता. आपल्या तालमीत तयार झालेले अनेक बहाद्दर पठ्ठे जोतीराव आणि सावित्रीमाईच्या संरक्षणासाठी लहुजींनी नेमलेले होते. सावित्रीबाईंना मिसेस फरारा मॅडम यांच्याकडे शिक्षक प्रशिक्षणासाठी अहमदनगर येथे घेऊन जाण्यासाठीही लहुजींनी मदत केली होती. पुण्यासारख्या सनातन्यांच्या राजधानीत अस्पृश्य आणि बहुजनांच्या मुलींसाठी शाळा स्थापन करणे, सावित्रीबाईंना शाळेत जाण्यासाठी संरक्षण देणे आणि या शाळांसाठी मुली गोळा करणे या कामी लहुजींनी दिलेले योगदान लक्षणीय होते. या संदर्भात स्वतः महात्मा फुले म्हणतात , ” अतिशुद्रांस शिकविण्यामुळे आमच्या जातवाल्यांस फार वाईट वाटले व प्रत्यक्ष माझ्या बापाने देखील मला घरांतून घालविले. तेव्हा निरुपायी होऊन आपल्या रक्षणाबद्दल काही काम केले पाहिजे असे प्राप्त झाले. आणि शाळाही बंद पडली. कारण कोणी जागा देईना व बांधावयास रुपये नव्हते व लोक आपली मुले पाठवावयास इच्छिनात. परंतु त्यावेळेस लहुजी बिन राघू राऊत मांग व रानबा महार यांनी शिकण्यापासून कसे लाभ आहेत, हे आपल्या जातवाल्यांस समजावून त्यांची खात्री केली व सदाशिव बल्लाळ गोवंडे यांनी शाळेसाठी जागा देऊन काही पाट्या दिल्या व दर महिन्याला दोन रुपये देऊ लागले. त्यामुळे ती शाळा पुन्हा बरीच चालू लागली आणि मुले फार जमली. ( ‘म. फुले समग्र वाङ्मय’ , पृष्ठ क्रमांक – ६११)
सत्यशोधक लहुजी साळवे आणि महात्मा फुले यांच्या संबंधाबाबत प्रसिद्ध विचारवंत गं. बा. सरदार लिहितात – , ” शिवछत्रपती आणि जॉर्ज वाॉशिंग्टन यांची चरित्रे वाचून जोतिबांच्या अंतःकरणात देशाभिमानाची भावना जागृत झाली होती. म्हणून त्यांनी वस्ताद लहुजी मांग यांच्या हाताखाली दांडपट्टा आणि गोळी निशाण मारण्याची विद्या शिकण्यास प्रारंभ केला .” ( सरदार, पृष्ठ क्रमांक – ५) जोतिबांच्या मनात मांग महारांविषयी कळवळा उत्पन्न होण्याचे अजून एक कारण म्हणजे त्यांची मावस बहीण सगुणाबाई. जोतीरावांनी मांग महार यांची सेवा करावी आणि फादर सारखे नाव कमवावे अशी त्यांची धारणा होती. आपले गुरू लहुजी साळवे यांच्या बद्दलचा आदर प्रत्यक्ष कृतीतून व्यक्त केला आहे. लहुजी साळवे यांची पुतणी मुक्ता साळवे हिला सावित्रीबाई आणि जोतीराव या दोघांनीही मन लावून शिकविले. तिने लिहिलेल्या ‘मांग महारांच्या दुःखाच्या निबंधाची’ दोघांनीही तारीफ केली. त्यांच्या शाळेला भेटी देणाऱ्या प्रत्येकाला हे दोघेही मुक्ताचा निबंध मोठ्या प्रेमाने दाखवत असत. अशा प्रकारच्या कृतींतून त्यांनी आपल्या गुरू बद्दलचा आदर भावना व्यक्त केलेला दिसून येतो. लहुजी साळवे यांचे धाकटे भाऊ गणू बिन राघोजी यांना शिक्षक म्हणून महात्मा फुले यांनी आपल्या शाळेमध्ये नेमणूक दिल्याचाही संदर्भ मिळतो. ( ‘महात्मा फुले समग्र वाङ्मय’, पृष्ठ क्रमांक – ६४०) शिवाय मुक्ता साळवे या विद्यार्थिनी बरोबरच धोंडी बिन हनुमंत मांग , विठू बिन पांडूजी मांग ( शाळा क्रमांक-१) , कोंडी बिन कल्लू मांग , महादू बिन कानू मांग, नामा बिन लिंबा मांग ( शाळा क्रमांक-३) इत्यादी विद्यार्थी हे महात्मा फुले यांच्या शाळेतील हुशार विद्यार्थी म्हणून गणले जात होते. ( ‘ म.फुले समग्र वाङ्मय’, पृष्ठ क्रमांक – ६५१) तसेच गुरू लहुजी साळवे यांच्या नात्यातील गणू शिवाजी मांग हे ही महात्मा फुले यांच्या शाळेतील एक हुशार अभ्यासू शिक्षक म्हणून कार्यरत होते. (‘ म. फुले समग्र वाङ्मय’, पृष्ठ क्रमांक -६५६) लहुजी साळवे यांनी जोतीरावांच्या भेटीनंतर पूर्णपणे सत्यशोधक जीवनपद्धती अंगीकारली. आपल्या सर्व शिष्यांना आणि नातेवाईकांना त्यांनी सत्यशोधक पद्धतीने जगण्याचा मार्ग दाखविला. लहुजींचे शिष्य म्हणून बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके आदींना बळोबळी उभे करण्यात येत असले तरी खऱ्या अर्थाने महात्मा जोतीराव फुले हेच लहुजी साळवे यांचे खरे अनुयायी, खरे शिष्य ठरतात, हेच पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे.
अशाप्रकारे व्यायामाचे गुरु ते जीवनातील मार्गदर्शक आणि संरक्षक म्हणून शेवटपर्यंत सत्यशोधक लहुजी साळवे यांनी महात्मा फुले यांना शैक्षणिक, सामाजिक कार्यामध्ये भरीव साथ दिलेली आहे. महात्मा फुले यांच्या निर्वाणा आधी नऊ वर्षे अगोदर लहुजी साळवे यांचे पुणे येथे १८८१ साली निधन झाले. पुण्यातील फुले वाड्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर उभी असलेली लहुजी साळवे यांची तालीम आजही या गुरु-शिष्यांच्या नात्याची प्रचिती देत उभी आहे.

संदर्भ ग्रंथ
————–
१. फडके य.दि. ( संपा.) , ‘ महात्मा फुले समग्र वाङ्मय’, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई -३२, सुधारीत पाचवी आवृत्ती- २८ नोव्हेंबर १९९१

२. माळी डॉ. मा.गो. ‘ सावित्रीबाई फुले: काल आणि कर्तृत्व’ , महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, दादर, मुंबई -१४, दुसरी आवृत्ती- जुलै २००६

३. नरके हरी ( संपा.), ‘ महात्मा फुले : साहित्य आणि चळवळ’, उद्धृत लेख- महात्मा फुले: जडणघडण – गं.बा. सरदार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि राजर्षी शाहू चरित्र- साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन, मुंबई- २१

४. कीर धनंजय, ‘महात्मा जोतीराव फुले’ , पाॅप्युलर प्रकाशन, प्रा. लि. ३५ सी, पं. मालवीय मार्ग, ताडदेव, मुंबई-३४, प्रथम आवृत्ती- १९६८

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of MPhil in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button