ग्रामरोजगार सेवक संघटना झरीजामणीद्वारे गटविकास अधिकारी यांना निवेदन
ग्रामरोजगार सेवक संघटना झरीजामणीद्वारे मा.गटविकास अधिकारी यांना निवेदन
एनएमएमएस कार्यप्रणालीत दुरुस्ती करून पूर्णवेळ व प्रति माह वेतनाची मागणी
सुनील शिरपुरे/झरीजामणी
राज्यातील सर्व ग्राम रोजगार सेवक मित्रांच्या सहकार्याने राज्यात एनएमएमएस द्वारे रोहयोच्या कामावरील मजुरांची हजेरी घेण्यास ग्राम रोजगार सेवकांनी विरोध दर्शवला आहे. कारण ग्राम रोजगार सेवक हा २००६ पासून पूर्णवेळ काम करत होता. परंतु अचानक शासनाच्या डोक्यात काय फरक पडला की, पूर्णवेळ काम करत असलेल्या ग्राम रोजगार सेवकांना २ मे २०११ साली अर्धवेळचा शासन निर्णय काढून ग्राम रोजगार सेवकांवर मोठा अन्याय केला. परत ८ मार्च २०२१ चा शासन निर्णय काढून आणखी दुसरा अन्याय केला. वारंवार शासन ग्राम रोजगार सेवकांवर अन्यायकारक निर्णय काढून ग्राम रोजगार सेवकांकडून जिओ टॅगींग, निवडणूक, जलदूत, अशाप्रकारे फुकटात कामे करून घेत आहेत आणि ग्राम रोजगार सेवक पुढील दिवस चांगले येतील या आशेने शासनाची लाचारी, गुलामगिरी पत्करत आहे. असे किती दिवस सहन करायचे? एवढेच नाही तर प्रत्येक ठिकाणी ग्राम रोजगार सेवकांचा वापर केला जावूनही पंचायत समिती, सरपंच व सचिवाकडून गैरफायदा घेतला जात आहे. या गोष्टीबद्दल त्यांना सरळ बोलल्यास त्यांच्या बॅक साईडला झोंबायला लागते. मग हे लोक ग्राम राजगार सेवकांच्या माथ्यावर राजकारणाचा ठपका लावतात. ग्राम पंचायतमध्ये कोण असते? राजकारणीच असते ना! मग, खरे राजकारण तेच लोक करतात. हे सर्व वरच्या लेवलवर माहित असूनसुद्धा शेवटी ग्राम रोजगार सेवकांनाच ब्लेम केल्या जाते. त्यामुळे हा अन्याय सहन करणे पुरे झाले. १ जाने.२०२३ पासून रोहयोच्या कामावरील मजुरांची हजेरी एनएमएमएस द्वारे घेण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने आदेश काढला. दिवसातून दोन वेळा कामावरील मजुरांची हजेरी घ्यावी. ग्रामरोजगार सेवक हा शासन निर्णय नुसार अर्धंवेळ आहे. अनेक ग्राम रोजगार सेवकांकडे मोबाईल नाही. असेल तर रिचार्ज कुठून करावा. एका कामावरून दुसऱ्या कामावर हजेरी घेण्यासाठी शेतातून किंवा जंगलाने हजेरी घेण्यास फिरावं लागते. हिंस्त्र प्राण्यांपासून धोका होऊ शकतो. म्हणून विमा कवच पाहिजे. या विषयावर शासनाने कधी विचार न करता ग्राम रोजगार सेवकांवर दडपणशाही करून काम करून घेत आहेत. याला आपणच जबाबदार आहोत. आपल संघटन मजबूत नाही. एक आवाज नाही. मित्रहो, आतातरी एक होऊन शासनाला धडा शिकवा. सर्व राज्यात आज सार्वजनिक कामावर हजेरी न घेण्याच्या निर्णयाचा अवलंब केला आहे. अनेक तालुक्यातील ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन सादर करत आहेत आणि काम बंद आंदोलन यशस्वी करत आहेत. आपणास सतत ४५ दिवस काम बंद आंदोलन चालू ठेवायचे आहे. मध्यंतरी कोणीही असहकार्याची भावना न ठेवता सहकार्य करावे. जोपर्यंत शासन झुकत नाही, तोपर्यंत ग्राम रोजगार सेवकांनी हार मानू नये ही विनंती करतो. अभी नहीं तो कभी नहीं. त्या अनुषंगाने मा.आयुक्त नरेगा व केंद्र शासनाच्या पत्रानुसार दि.१ जाने.२०२३ पासून एनएमएमएस द्वारे मजुराची हजेरी घेण्याचे सूचित केले असून या पद्धतीनुसार महाराष्ट्रातील सर्व ग्राम रोजगार सेवकांना कामावर पूर्णवेळ द्यावा लागतो. एक किंवा एकापेक्षा जास्त मजुर असेल तर प्रत्येक ग्राम रोजगार सेवकाला सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत हजेरी घेण्यासाठी व्यस्त राहावे लागते. त्यासाठी जोपर्यंत ग्राम रोजगार सेवकांना अर्धवेळ या शासन निर्णयात दुरुस्ती करून पूर्णवेळ काम व प्रति माह वेतन असा शासन निर्णय काढण्यात येत नाही, तोपर्यंत एनएमएमएस या पद्धतीनुसार महाराष्ट्रातील सर्व ग्राम रोजगार सेवक काम करण्यास तयार नाही. जर शासनाने तात्काळ सदर निवेदनावर धोरणात्मक निर्णय न घेतल्यास मुंबई मंत्रालय आझाद मैदान येथे ग्राम रोजगार सेवकांचा भविष्यात भव्य मोर्चा काढण्यात येईल. या आशयाचे निवेदन ग्राम रोजगार सेवक संघटना झरीजामणी कडून मा.गटविकास अधिकारी पंचायत समिती झरीजामणी यांना देण्यात आले.