भारताची ‘प्रजासत्ताक’ वाटचाल आता ‘प्रचारसत्ताक’ बनतेय का?
*भारताची ‘प्रजासत्ताक’ वाटचाल आता ‘प्रचारसत्ताक’ बनतेय का?*
सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आज २६ जानेवारी. १९४९ मध्ये याच दिवशी भारतामध्ये लोकशाही गणराज्यांची स्थापना झाली. आजच्या दिवसापासून लोकांनी लोकांसाठी लोकांच्या मतांनी बनवलेली सत्ता अर्थात शासन प्रणालीची सुरुवात झालेली आहे. परंतु आजही सामान्य जनतेला आपल्या हक्काचं काय आहे, काय नाही यासंदर्भातली देखील जाणीव नाही. ग्रामपंचायतीपासून ते राष्ट्रपती निवडणुकीपर्यंत लोकांना अद्यापही राज्यघटनेच्या तरतुदीचा अभ्यास अद्याप झालेला नाही आणि त्यांना तसं माहिती नाही. जे शिक्षित असतील त्यांना त्या सर्व गोष्टी माहित आहेत, त्यापण कमी प्रमाणात आणि ठराविकच. परंतु खरच प्रजेची सत्ता आहे का?
आजची लोकांची सत्ता आहे ती प्रचाराची सत्ता आहे. तुम्ही जेवढे जास्त प्रमाणात प्रचार कराल, तेवढा तुमच्या नावाचा जयघोष होईल आणि तुमची सत्ता होईल असाच नवीन नियम सध्या निर्माण झालेला आहे, असं मला वाटतं, जनतेसाठी कोणती गोष्ट हिताची आहे किंवा त्याच्यासाठीची कोणती गरज महत्वाची आहे याचा विसरही कदाचित आजच्या राजकीय लोकांना आणि जनतेलादेखील नाही. ग्रामपंचायतीची कामे कोणकोणती असतात ही साधी माहिती सुद्धा अद्याप अनेकांना नसते. आमदाराकडे, खासदाराकडे, मुख्यमंत्र्यांकडे किंवा पालकमंत्र्याकडे कोणकोणत्या अधिकाराच्या किंवा सेवांच्या स्वरूपात मागणी करावी, हे सुद्धा जनतेला माहीत नाही, ही सर्वात मोठी आजच्या दिवशीची शोकांतिका आहे.
प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार करायचा, सोशल मीडियामध्ये प्रचार करायचा, जनतेमध्ये प्रचार करायचा, छोट्याशा नगरामध्ये, छोट्याशा गटांमध्ये, महानगराध्यक्ष, अध्यक्ष, शहराध्यक्ष, कोषाध्यक्ष अशा विविध पदाची निर्मिती करून तरुणांना त्यामध्ये गुंतवण्यात आलेला आहे. हा प्रचार फक्त राजकीय झालाय आणि तो राजकीय प्रचारच आज प्रचारसत्ता म्हणून उदयास येऊ लागलेला आहे. लवकरच यापासून आपण आपला बचाव केला नाही तर, येणाऱ्या काळात आपल्याला भारतामध्ये लोकांची लोकशाही होती, प्रजेची सत्ता होती या गोष्टीचा विसर पडेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकशाहीमुक्त भारत होण्याची भीती आज निर्माण झालेली आहे?
भारतात तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पण या नवतरुणांना रोजगार नाही हे वास्तव आपल्याला मान्य करावे लागणार आहे. सध्याची शिक्षणप्रणाली आणि भविष्यात येणारी शिक्षणप्रणाली हे विद्यार्थी हिताच्या संदर्भात कसे कार्य करेल हे जोपर्यंत त्याची अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत आपल्याला समजणार नाही. आज महागाई, बेरोजगारी या ज्या गोष्टी आहेत त्या सामान्य नागरिकांच्या आवाक्याच्या बाहेर गेल्याचे दिसत आहे. एखाद्या शासकीय योजनेचा लाभ ज्यावेळेस लाभार्थ्यांना दिला जातो, त्याचा प्रचार करूनच त्याचा लाभ दिला जातो, ही एक आपल्या देशात चाललेली शोकांतिका आहे. केंद्रशासन किंवा राज्यशासन यांच्यामार्फत सर्वसामान्य नागरिकांना मोफत धान्य देण्यात यावं, त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये तरतूद केलेली आहे. परंतु आपल्याकडे असा प्रचार केला जातो की आमच्यामुळे तुम्हाला मोफत धान्य मिळत आहे आणि ते आम्हीच करू शकू, अशा पद्धतीचा प्रचार सध्या मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय.
आज प्रजेची सत्ता आहे की नाही, याची सुद्धा आपल्याला पडताळणी करणे फार गरजेची गोष्ट आहे. जनता ही नेहमीच शांत होती आणि आहे. आपले हक्क काय आहेत? ते हक्क मिळवण्यासाठी सुद्धा आज कोणी धाडस करत नाही. कारण सगळ्या लोकांची मानसिकता ही आता स्वार्थी झालेली आहे. जोपर्यंत तुम्ही प्रचार करणार नाही तोपर्यंत जनता तुमच्याकडे लक्ष देणार नाही, अशी राजकीय लोकांची धारणा झालेली आहे. भारताची ‘प्रजासत्ताक’ वाटचाल ‘प्रचारसत्ताक’ बनण्यापासून आपणाला रोकायचे आहे. आज तरुणांपासून ते ज्येष्ठापर्यंत सर्वांनी याचा विचार करण्याची गरज आहे आणि असा विचार सर्वांना करावाच लागेल.
पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक-हार्दिक शुभेच्छा!
*प्रा. प्रीतम लोणेकर* 9860720646,
माध्यमशास्त्र संकुल,
स्वा.रा.ती.म विद्यापीठ, नांदेड.