स्वराज्याच्या उभारणीत मा जिजाउंचे योगदान..
स्वराज्याच्या उभारणीत मा जिजाउंचे योगदान
डॉ.अशोक राणा
९३२५५१४२७७
भारतातील प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटावा असे उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या केवळ स्मरणाने आपली छाती मूठभर उंच होते. विशेषतः मराठी माणसाला त्यांच्या चरित्र-चिंतनाने जे स्फूरण चढते, त्याला मात्र तोड नाही. मराठी अस्मितेचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज,असे आपण मानतो.परंतु,केवळ मराठी म्हणजे महाराष्ट्राच्याच नव्हे, तर सबंध भारताच्या अस्मितेचे प्रतीक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहायला हवे. कारण की,सभोवताली परकीय आक्रमकांच्या अन्यायी राजवटी विस्तारत चालल्या असताना अनेक शूर,पराक्रमी लढाऊ जमातीतील राजे-महाराजे लाचारी पत्करून कसे-बसे तग धरून बसले होते,तेव्हा छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हिंदवी म्हणजे हिंदुस्तानचे. त्याचा अर्थ केवळ हिंदूंचे नव्हे,तर येथे राहणाऱ्या साऱ्या जाती-धर्माचे स्वतंत्र राज्य होय. अशा स्वराज्याची संकल्पना सर्वप्रथम शहाजीराजांच्या मनात स्फूरण पावली. त्यांनी आपल्या परीने तिला मूर्त रूप देण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आले नाही. आपल्या हयातीत ते शक्य होणार नाही या वास्तवाची जाणीव होऊन त्यांनी या संकल्पनेचे बीजारोपण मातोश्री जिजाउंच्या मनात केले. जिजामातेने या संकल्पनेला अंकुरित केले व शिवबाच्या रूपाने स्वराज्याची संकल्पना साकार केली. म्हणून खऱ्या अर्थाने त्या स्वराज्य संकल्पिका ठरतात. त्याचप्रमाणे सबंध राष्ट्राला ज्यांच्याबद्दल अतीव आदर वाटावा अशा राष्ट्रमाताही.
अतिशय प्रतिकूल अवस्थेत त्यांनी स्वराज्याचे स्वप्न जोजविले.या स्वप्नाला शिवरायांनी मूर्त रूप दिले. स्वराज्याचे संरक्षण करण्याकरिता मा जिजाउंनी प्रसंगी हाती शस्त्रही घेतले,तसेच राज्यकारभाराची धुराही समर्थपणे सांभाळली. हे सारे सामर्थ्य त्यांच्यामध्ये कोठून आले ? एक स्त्री असूनही स्त्रीत्वाच्या मर्यादा त्यांना का पडल्या नाहीत? उलट तेच त्यांचे सामर्थ्य कसे बनले ? स्वराज्याच्या उभारणीत आवश्यक असा मुत्सद्दीपणा त्यांनी कसा अंगी बाणला ? त्यासाठी आवश्यक असे धाडस त्यांच्यात कसे निर्माण झाले ? मातृत्वाच्या भावनेतून त्यांनी
आपल्या प्रजेवर मायेची पाखर कशी घातली ? असे प्रश्न आपणास सहज पडू शकतात. या साऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधणे म्हणजे राष्ट्रमाता जिजाउंच्या चरित्राचे अवगाहन करणे होय. त्यासाठी त्यांच्या पूर्व पीठिकेचा परामर्श घेऊ या.
जिजाऊंची पूर्व पीठिका
जिजाउंचा जन्म १२ जानेवारी १५९८ गुरुवार रोजी सिंदखेड या गावी झाला. आजच्या बुलडाणा जिल्ह्यातील एक तालुक्याचे गाव म्हणून या गावाची ओळख आहे. जिजामातेची जन्मभूमी या नात्याने येथील राजे लखुजी जाधव रावांच्या वाड्याला आगळे-वेगळे महत्त्व आहे. लखुजी जाधव यांना या गावाची जहागिरी मिळाल्यानंतर त्यांनी या वाड्याची उभारणी केली. त्यापूर्वी या परिसरात अनेक ऐतिहासिक वस्तू उभारल्या गेल्या होत्या, त्यापैकी एक “पुतळा बारव” ही चालुक्यकालीन पाय-विहीर होय. येथील बाराव्या शतकातील निलकंठेश्वराच्या देवालयाचा जिर्णोद्धार इ.स.१५५७ मध्ये राजे लखुजी जाधवराव यांनी केला होता, असा उल्लेख या मंदिरावरील शिलालेखात आढळतो.
लखुजी जाधवराव यांच्याकडे सिंदखेडची जहागिरी एका नाट्यमय घटनेतून आली. ते येथे येण्यापूर्वी सिंदखेडच्या काझी घराण्याला इ.स.१४५० च्या सुमारास सिंदखेड परगणा जहागीर म्हणून मिळाला होता.तो साधारणपणे १०० वर्षे त्या घराण्याकडे होता. सोळाव्या शतकात सिंदखेडची देशमुखी मुळे घराण्याकडे होती. त्यांचा गुमास्ता रविराव ढोणे याने ती आपल्या घशात घालण्याच्या हेतूने मुळे घराण्याची कत्तल केली. त्याच्या तावडीतून वाचलेली मुळे घराण्याच्या पुरुषाची स्त्री यमुनाबाई त्यावेळी गरोदर होती. त्यावेळी लखुजी जाधवराव हे पैठण परगण्यातील “ लासनेर “ या गावी छावणी करून राहत होते. ते निजामशहाच्या पदरी पंचहजारी मनसबदार होते. मेहेकर सरकारमधील सिंदखेड परगणा त्यांच्या जहागिरीच्या अंमलाखाली येत होता. त्यामुळे रविरावाच्या पुंडाईमुळे कत्तलीत मारल्या गेलेल्या मुळे देशमुखाची पत्नी यमुनाबाई आपली तक्रार घेऊन लखुजी जाधवरावांकडे गेली व म्हणाली, “ तुम्ही राजे आहात.माझा सूड घेऊन रविराव ढोन्या मारून (ते) वतन तुम्ही घ्यावे.मी आपले संतोषाने देते. माझे पोटी गर्भ आहे. याजला भटपणाची वृत्ती द्यावी व उपाधेपण तुम्ही आपले घ्यावे.”
यमुनाबाईच्या या तक्रारीची दखल घेऊन लखुजी व त्यांचे बंधू भूतजी ऊर्फ जगदेवराव यांनी गुप्तपणे रविराव ढोणे याची माहिती काढली. त्याचा बंदोबस्त करण्याकरिता त्यांनी पुरेशा सैन्यानिशी त्याच्यावर हल्ला केला. त्यात रविराव मारला गेला. त्यामुळे सिंदखेड परिसरातील लोकांना अतिशय आनंद झाला. ठरल्याप्रमाणे यमुनाबाईच्या घराण्याला भिक्षुकी मिळाली. ई.स. १५७३ मधील या घटनेने लखुजीकडे सिंदखेडची देशमुखी आली. सिंदखेडकर जाधव घराण्याचा प्रारंभ त्यातून झाला. जिजाउंच्या जन्माने त्याचे खऱ्या अर्थाने सोने झाले. सिंदखेड येथे लखुजीराजांची समाधी आहे. तीवरील शिलालेखात त्यांच्या कुटुंबाविषयी माहिती दिलेली आहे. त्यानुसार त्यांच्या वडिलांचे नाव विठोजी व आईचे नाव ठाकराई असे होते. लखुजींना म्हाळसाबाई,यमुनाबाई,भागीरथीबाई या तीन स्त्रिया होत्या. फलटणच्या वनगोजी नाईक निंबाळकर यांनी लखुजींचा पराक्रम पाहून आपली बहीण म्हाळसाबाई ऊर्फ गिरजाबाई त्यांना दिली. त्याचप्रमाणे मालोजी व विठोजी या भोसले कुळातील पराक्रमी वीरांच्या आजच्या कोल्हापुरातील रंकाळा तलावावरील युद्धातील पराक्रमाने भारावून आपली मुलगी दीपा मालोजीला देवून त्याला आपला जावाई करून घेतले होते. याच मालोजीचा सुपुत्र शहाजी याच्याशी जिजाउंचा विवाह झाला. भोसले आणि जाधव या दोन्ही तोलामोलाच्या घराण्यांना जोडण्याचे मोलाचे कार्य जिजाउंनी केले. ते करताना त्यांना अनेक बऱ्या-वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागले.
जिजाऊंवरील बिकट प्रसंग
जिजाउंचे सासरे मालोजी भोसले हे निजामशाहीतील एक मातब्बर सरदार होते. त्यांचा जन्म ई.स.१५७० मध्ये वेरूळ येथे झाला. आपला बंधू विठोजीसह ते अहमदनगरच्या निजामशाहीत रुजू झाले. त्यांना निजामाने पुणे व सुपे परगण्याची जहागिरी ई.स.१६०५ मध्ये दिली होती. निजामाकडून आदिलशाहीविरुद्ध लढताना ई.स. १६०६ मध्ये इंदापूरच्या लढाईत त्यांना वीरमरण आले. त्यांची पहिली पत्नी उमाबाई हिच्यापासून त्यांना शहाजी व शरीफजी ही दोन मुले झालीत. अहमदनगर येथील शहा-शरीफ या सुफी संतांच्या नावावरून ही नावे ठेवली गेली होती. यावरून त्याकाळी हिंदू-मुस्लीम एकोप्याने राहात असत हे स्पष्ट होते. शहाजींचा जन्म १८ मार्च १५९४ रोजी झाला व त्यांचा विवाह ई.स.१६१०-११च्या सुमारास झाला. त्यांच्या व जिजाउच्या विवाहाविषयी बखरकारांनी लिहिलेल्या हकीकती गैरसमज वाढविणाऱ्या आहेत. त्यांना कोणताही ऐतिहासिक आधार नाही. त्याच बरोबर जाधव आणि भोसले कुळ यांमधील वैमनस्याच्या कहाण्याही कपोलकल्पित आहेत. परंतु काही घटनांमुळे त्यांच्यात काही काळ दुरावा निर्माण झाला होता असे दिसून येते. त्यापैकी एक खंडागळे हत्ती प्रकरण होय.
निजामशाही दरबारातील खंडागळे नावाच्या एका सरदाराचा हत्ती दरबार संपल्यावर बाहेर निघाला असताना बिथरला. वाटेत येईल त्याला तो आपल्या पायाखाली तुडवू लागला. त्याला अडविण्याच्या हेतूने लखुजींचे पुत्र दत्ताजी यांनी हत्तीवर तलवारीने प्रहार केला. त्यामुळे त्याची सोंड कापली गेली. ते पाहून खंडागळे मध्ये पडला. त्याच्या मदतीला मालोजींचे बंधू विठोजी यांची संभाजी व खेळोजी ही मुले धावून आलीत. त्यामुळे दत्ताजीने आपला मोर्चा संभाजीकडे वळविला. शहाजींनी हे पाहिले तेव्हा आपल्या चुलत भावाला वाचविण्याकरिता त्यांनी तलवार उपसली. या धामधुमीत संभाजीकडून दत्ताजी मारला गेला. हे पुढे गेलेल्या लखुजींना कळल्यावर त्यांनी आडवे आलेल्या शहाजींवर वार केला.त्यामुळे त्यांच्या दंडावर खोल जखम होऊन ते बेशुद्ध पडले.त्यानंतर लखुजींनी संभाजीवर हल्ला करून त्याला ठार मारले. या घटनेने सारीकडे हल्लकल्लोळ माजला. दोन गटातील या मारामारीत निजामशहा पडला व त्याने ते भांडण सोडविले. या घटनेमुळे संतापलेल्या लखुजींनी निजामशाही सोडून मोगलांची नोकरी पत्करली. मोगलांनी त्यांना २४००० स्वरांची मनसब आणि १५००० घोडेस्वारांचा सरंजाम दिला.या प्रकरणात जाधव आणि भोसले कुटुंबातील दोन जीव नाहक बळी गेलेत. त्याचा परिणाम जिजाउंच्या मनावर खोलवर झाला. जिजाऊ आणि शहाजी यांच्यामध्ये वितुष्ट आल्याच्या अफवा त्यामुळे पसरल्या असणार. त्यातून बखरकारांनी आपल्या कल्पनेचे मनोरे चढविलेत. प्रत्यक्षात मात्र तसे काही नव्हते. जिजाउंच्या आयुष्यातील सर्वात मोठी धक्कादायक घटना म्हणजे त्यांच्या भावांसकट वडिलांचा कपटाने झालेला खून होय.
निजामशाहीच्या रक्षणाकरिता मोगलांशी लढताना भातवडीच्या लढाईत ३१ ऑक्टोबर १६२४ रोजी शहाजींचे धाकटे बंधू शरीफजी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर लखुजी मोगलाई सोडून निजामशाहीत आलेत. दि.२५ जुलै १६२९ रोजी नारळी पौर्णिमेच्या दिवशी निजामशाहाने लखुजींना भेटीला बोलविले. त्यानुसार लखुजी आपल्या अचलोजी,राघोजी व बहादूरजी या पराक्रमी पुत्रांसह दौलताबादच्या किल्ल्यात गेलेत. त्यावेळी त्यांच्यासोबत पत्नी म्हाळसाबाई,भाऊ जगदेवराव ऊर्फ भूतजी आणि भाचा यशवंतराव हेही होते. किल्ल्याच्या पायथ्याशी साऱ्या कुटुंबाचा मुक्काम होता. पत्नीला,भावाला व बहादुरजीला तेथे ठेवून लखुजी आपल्या मुलांसह मुजऱ्यासाठी दरबारात गेलेत. निजामशहाला मुजरा केल्यानंतरही त्याने त्याची दखल न घेता तो उठून गेला. तेवढ्यात फर्राद्खान,सफदरखान आणि मोतीखान यांनी अचानकपणे त्यांच्यावर हल्ला केला. लखुजी आणि त्यांच्या मुलांनी आकस्मिकपणे आलेल्या या संकटाचा सामना केला,पण त्यात त्यांना यश आले नाही. भरदिवसा दरबारात त्यांची कत्तल केली गेली. खाली कुतलखानाच्या हौदाजवळ मुक्कामी असलेल्या म्हाळसाबाई,जगदेवराव आणि बहादूरजी यांनी तातडीने धावत जाऊन सिंदखेड गाठले. पित्याच्या व बंधूंच्या अशा भीषण शेवटामुळे शोकाकुल झालेल्या जिजाउंना गरोदर असल्यामुळे सिंदखेडला जाता आले नाही. १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरीवर शिवबा जन्माला आले,ते त्यांच्या साऱ्या वेदनांना दूर करणारे ठरले. स्वराज्य स्थापनेचे त्यांचे स्वप्न शिवरायांनी पूर्ण केले. परंतु त्यापूर्वी शहाजींनीही स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न केला होता.
शहाजींची स्वराज्य स्थापनेची पूर्वतयारी
शहाजी राजे निजामशाही,आदिलशाही व मोगलाई या तीनही पातशाह्यांच्या पदरी एक शूर सरदार व मुत्सद्दी राजकारणी म्हणून चाकरी करीत होते. अशा चाकरीमध्ये किती काळ राहायचे ? त्यापेक्षा आपले स्वतंत्र राज्य निर्माण का करू नये,असा विचार त्यांच्या मनात आला . आपल्या सासऱ्याच्या मदतीने त्यांनी निजामशाहिचे मोगलाई पासून संरक्षण केले होते, पण त्यांचाच घात निजामशहाने केला. त्यामुळे संतापून शहाजींनी निजामशाही सोडून मोगलांची नोकरी पत्करली,पण तेथेही त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाली. त्यामुळे ते परत निजामशाहीत परतले. त्यावेळी निजामशाहीची स्थिती बिकट होती. तिला सावरण्याच्या त्यांच्या प्रयत्नात आदिलशाही सरदारांनी सुरुवातीला त्यांना मदत केली. पण आपण निजामशाहिला वाचवू शकत नाही,हे लक्षात आल्यावर त्यांनी ती बुडविण्याकरिता मोगलांना मदत केली. आदिलशाही सुलतान मुहम्मद याने मोगल सेनापती महाबतखान याच्याशी संगनमत करून शहाजीविरुद्ध फळी उभारली. शहाजींनी या पार्श्वभूमीवर निजामशाही वारसदाराला अहमदनगरच्या पेमगिरी किल्ल्यावर नेऊन सुलतान बनविले. “मुर्तजा दरबारला भितो” असे कारण सांगून त्याला आपल्या मांडीवर बसवून ते स्वतः तख्तावर बसून राज्य चालवीत असत. शहाजींच्या कृतीमागील हेतू ध्यानात आलेल्या मोगल व विजापूरकरांनी एकत्र येवून पेमगिरीवर स्वारी केली. शहाजींनी अशाही स्थितीत त्याला सुरक्षितपणे कोकणातील माहुली किल्ल्यावर आणून ठेवले. त्यामुळे मोगल व आदिलशाही फौजांनी माहुली किल्ल्याला वेढा दिला. शेवटी त्यांना त्यांच्याशी तह करावा लागला. त्यानुसार शहाजींना त्यांच्या पुणे-सुपे प्रांतातील जहागिरीपासून दूर कर्नाटकात आदिलशाही सरदार म्हणून जावे लागले. तेथे त्यांनी ई.स.१६२६ मध्ये मोहित्यांच्या तुकाबाईशी विवाह केला. तिच्यापासून शहाजींना ई.स.१६३१ मध्ये एकोजी ऊर्फ व्यंकोजी हा मुलगा झाला. ई.स. १६२३ मध्ये त्यांना संभाजी हा मुलगा जिजाउंपासून झाला होता. तो सतत आपल्या वडिलांसोबत मोहिमांमध्ये सक्रीय असे. त्याला मोगलांची मनसबदारी मिळाली होती.
पुणे-सुपे प्रांताची जहागिरी संभाळण्याकरिता शहाजींनी जिजाउंच्या सोबत बाळ शिवबाला पाठविले ते खेडे-बारे या सुरक्षित गावी. शिवरायांच्या वास्तव्यामुळे या गावाला पुढे खेड-शिवापूर या नावाने ओळखले गेले. तेथील कुलकर्ण्याचा मावस चुलता महादेव भट महाभास याने बाळ शिवबास अक्षर ओळख करवून दिली. ई.स.१६४१ मध्ये जिजाऊ शिवबासह बंगळूरला आल्यात,त्यावेळी शिवबाचे वय अकरा वर्षांचे होते. तेथील मुक्कामात शहाजीराजांच्या शास्त्री पंडितांनी त्यांना शिक्षण दिले. त्यात युद्धकौशल्यापासून राजकारणाचे ज्ञान तसेच लढाईचे डावपेच या सर्वांचा समावेश होता. शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे आपल्या अनुभवाचा लाभ करवून देत शिवबाचे विविध क्षेत्रातील प्रशिक्षणही करवून देत असत. वयाच्या बारा वर्षांपर्यंत सर्व बाबतीत तयारी झाल्यानंतर शहाजीराजांनी बंगरूळवरून शिवबाची रवानगी पुण्याला केली,तेव्हा त्यांच्यासोबत स्वतंत्र ध्वज,शिवमुद्रा,पेशवा,अनुभवी माणसे,काही सैन्य व पुरेशी संपत्तीही पाठविली होती. एका परीने स्वराज्याची पूर्व तयारीच त्यांनी करवून दिली होती. आपले स्वराज्याचे स्वप्न शिवरायांकडून पूर्ण होऊ शकेल याविषयी त्यांना विश्वास वाटत होता. स्वराज्याची मूळ संकल्पना अशा रीतीने शहाजींनी मांडून तिचे बीजारोपण जिजाउंच्या मनात केले. त्या बरहुकूम जिजाउंनी शिवरायांना घडविले.त्यामुळे शिवरायांच्या खऱ्या गुरु त्याच होत. पुणे परिसरातील थोर संत तुकाराम महाराज यांच्या कीर्तनातून तयार झालेले पाईक हेच शिवरायांच्या स्वराज्याचे शिलेदार बनलेत.त्याच प्रमाणे जिजाउंच्या माहेरच्या माणसांनीही या कार्यात त्यांना मोलाची मदत केली.
माहेरच्या माणसांचे योगदान
ई.स.१६३३ मध्ये बाळ शिवाजींसह जिजाऊ सिंदखेडला माहेरी गेल्या होत्या,तेव्हा त्यांचे कोड-कौतुक आजी म्हाळसाबाईने पुरविले होते. दोन वर्षे जिजाऊ शिवबासह माहेरी राहिल्यानंतर पुण्यास जहागिरी सांभाळण्यासाठी आल्यात. त्यावेळी त्यांच्यासोबत आई म्हाळसाबाई,अचलोजीची विधवा पत्नी व तिचा मुलगा सृजनसिंह ऊर्फ संताजी जाधव हे होते. म्हाळसाबाई आपल्या मृत्युपर्यंत म्हणजे ई.स.१६४० पर्यंत जिजाउंसोबत पुण्याला होत्या. जिजाउंच्या माहेरची इतर मंडळीही त्यांच्यासोबतच राहत असत. संताजी जाधव याने शहाजींना युद्धात मदत केली होती,तशीच त्याचा मुलगा शम्भूसिंह ऊर्फ संभाजी याने शिवरायांना स्वराज्याच्या निर्मितीत साह्य केले होते. पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडे यांच्या सोबत लढताना त्याला वीर मरण आले होते. सिंदखेडकर जाधव घराण्यातील माणसाने स्वराज्याच्या उभारणीत मदत करणाऱ्यांमध्ये कामी आलेला हा पहिला पराक्रमी पुरुष होता. त्याचा मुलगा धनाजी जाधव हा पुढे मराठा राज्याचा सरसेनापती झाला. मोगल सैन्यामध्ये त्याची फारच दहशत होती. यावरून स्वराज्याच्या उभारणीत जिजाउंच्या माहेरच्या माणसांचे योगदान मोठे होते हे दिसून येते. त्यामुळे शिवपुत्र संभाजींच्या हृदयद्रावक शेवटानंतर पंचवीस वर्षे स्वराज्याच्या संरक्षणात व्यग्र राहिलेल्या संताजी घोरपडे सोबत धनाजी जाधव खांद्याला खांदा लावून कार्यरत होता. या ऐतिहासिक पुराव्यांवरून स्वराज्याच्या निर्मितीला त्यांचा विरोध होता हे उत्तरकालीन बखरकारांनी केलेले वर्णन चुकीचे आहे हे स्पष्ट होते. जिजाउंना माहेरच्या माणसांची मदत क्षणोक्षणी झाल्यामुळेच त्यांनी स्वराज्याची धुरा समर्थपणे पेलली.
जिजामातेचा स्वराज्यातील सहभाग
शिवरायांच्या द्वारे स्वराज्याचे स्वप्न साकार करू पाहणाऱ्या शहाजींना मृत्यू आला,तो कर्नाटकातील होद्देगिरीच्या अरण्यात शिकार करण्याच्या आवेगात रानवेलीच्या जाळ्यात घोड्याचा पाय अडकल्याने ते दूर फेकले गेले त्यामुळे. त्यावेळी जिजाऊ रायगडावर आणि शिवबा सुरतेच्या स्वारीवरून परत येत होते. रायगडावर पोहोचल्यावर त्यांना ५ फेब्रुवारी १६६४ रोजी महाराज गेल्याची बातमी कळली. यावेळी जिजाउंची स्थिती कशी असेल याची कल्पनाच केलेली बरी. शिवरायांच्या आयुष्यातील अनेक संकटांशी सामना करीत धीर देणाऱ्या त्या मातेला धीर देण्याची पाळी शिवरायांवर आली. अफजलखान प्रकरणात आपण जिवंत वाचून परत येणे शक्य नाही याची जाणीव शिवरायांना होती. त्यावेळी जिजाउंनी स्वराज्याचा कारभार सांभाळला होता. पन्हाळगडाच्या वेढ्याच्या वेळी मातोश्री जिजाउंनी हाती तलवार घेऊन म्हटले होते की,” आता शिवावाचून एक क्षणही राहणे अशक्य आहे. मी स्वतः सैन्य घेऊन जाते आणि सिद्दी जौहरचा निकाल लावते. पन्हाळगडावर अडकलेल्या शिवबाला सोडविण्यासाठी मी तो वेढा फोडते.” त्यांच्या या निर्धारापासून नेताजी पालकर याने त्यांना परावृत्त केले. पण या निमित्ताने त्यांच्या वीरवृत्तीचे व करारीपणाचे दर्शन साऱ्यांनाच घडले. त्यातून स्फूर्ती घेतलेल्या मावळ्यांनी शिवरायांना विशालगडावर सुखरूप पोहोचविले.
औरंगजेबाच्या डावपेचामुळे आदिलशाही सरदार खवासखान दहा हजार सैन्यांसह महाराजांवर चाल करून येत आहे हे गुप्त हेरांनी सांगितल्यावर जिजाउंनी ही माहिती शिवबांना पत्र लिहून कळविली होती. बाजी घोरपडे हाही चाल करून येत आहे हे कळल्यावर जिजाउंनी शिवबाला पत्र लिहून कळविले होते. योग्य वेळी हे पत्र शिवरायांना मिळाल्यानंतर त्यांनी त्यांचा पाडाव केला. २८ ऑक्टोबर१६६४ रोजी ही घटना घडली व त्याची माहिती लगेच जिजाउंना त्यांनी कळविली. यावरून जिजाऊ सातत्याने स्वराज्यातील घडामोडींचा आढावा घेत असत हे दिसून येते.
आपल्या मातेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी शिवरायांनी जिजामातेची सुवर्णतुला ५ जानेवारी १६६५ रोजी महाबळेश्वर येथे केली. पुरंदरच्या वेढ्यात शिवरायांना मोगलांशी तह करावा लागला.त्यानुसार शिवरायांना आग्रा येथे औरंग्जेबाच्या दरबारात जावे लागले. त्यावेळी स्वराज्याचा संपूर्ण कारभार जिजाउंच्या हाती होता. त्यावेळी त्यांचे वय ६८ वर्षे होते. त्यापूर्वीही त्यांनी स्वराज्याच्या निवाड्यात कुठे अन्याय आढळला तर त्यात फेरफार केल्याचे पुरावे आढळतात. आपल्या रयतेवर अन्याय होऊ नये याची काळजी त्या सतत घेत असत.
मराठीतील पहिला पोवाडा गाणाऱ्या अज्ञानदासाचा जिजाउंनी भरघोस इनाम देवून गौरव केला होता. त्यांनी अनेक गुणी कलावंतांना आश्रय दिला होता. त्यातील एक उल्लेख महत्वाचा आहे. “मता”नावाची एक मुसलमान कलावंतीण होती. म्हातारपणामुळे तिच्या उदरनिर्वाहाची सोय नव्हती.जिजाउंच्या लक्षात ते आल्यावर त्यांनी तिला वेतन देण्याची व्यवस्था दरबारकडून लावून दिली होती. शिवाजी महाराजांनी मातोश्री जिजाउंच्या देखरेखीसाठी स्वराज्यामध्ये स्वतंत्र खातेच निर्माण केले होते.त्यांच्या संरक्षणासाठी पहाऱ्याचे शिपाई,पुराणिक ई. नेमले होते.आपल्या आईच्या सन्मानासाठी सर्व काही करण्याकरिता सदैव तत्पर असणाऱ्या शिवरायांचा राज्याभिषेक पाहून जिजामातेला आपल्या आयुष्याचे सार्थक झाल्याचे समाधान वाटले. ६जून १६७४ रोजी शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला आणि १७ जून १६७४ रोजी जिजाउंनी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथे आपला देह ठेवला. एका परिपूर्ण जीवनाची अशा रीतीने सांगता झाली.
_________________________________________________________________________
Ashokrana.2811@gmail.com