आजची तरुणाई आणि छत्रपती शिवाजी महाराज!
*आजची तरुणाई आणि छत्रपती शिवाजी महाराज!*
(भिमराव परघरमोल)
आजकाल सोशल मीडियामुळे तरुणाई भटकटल्याचे आरोप मोठ्या प्रमाणात होताना दिसतात. त्यामध्ये काही प्रमाणात सत्यता असेलही. परंतु त्यामागील मूलभूत कारणमीमांसा कोणती, हे सांगायला कोणीही तयार नाही. त्याची कारणमीमांसा करू गेलो असता असे लक्षात येईल की, त्याला कारणीभूत अनेक गोष्टीपैकी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या तरुणांसमोर आदर्श कोणाचा आहे? आजची तरुणाई नट-नट्या, खेळाडू, नेते अभिनेते मॉडेल यांना आदर्श मानतात. परंतु त्यांचा पडद्यावरील अभिनय आणि प्रत्यक्ष जीवन यामध्ये खूप मोठे महदंतर असते. त्यामुळे सुजान किंवा जागृत नागरिक घडने तथा आदर्श समाज व्यवस्था अस्तित्वात येणे शक्य नाही. ते शक्य करायचे असेल तर तरुणाईने महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवाला पाहिजे. तसे ढोबळ मानाने निरीक्षण केले असता, तरुणांपैकी काही वर्गासमोरचे आदर्श, हे छत्रपती शिवाजी महाराज असल्याचे आपल्या लक्षात येते. परंतु त्यांचा आदर्श मात्र तोकडा दिसून येतो. काही त्यांच्यासारखी केशभूषा, वेशभूषा तथा भाळी चंद्रकोर धारण करताना दिसतात. तर काही त्यांचा जयजयकार करण्यातच धन्यता मानतात.
महापुरुषांना जीवनात आदर्श मानायचे असेल, तर त्यांच्या वरपांगी व्यक्तिमत्वाचे अनुकरण न करता त्यांचे अंतर्बाह्य व्यक्तिमत्व समजून घेऊन त्यांच्या विचारांचा आदर्श घेणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांच्या जीवनाचा अभ्यास करावा लागेल. तेव्हा त्यांचा त्याग, समर्पण, कष्ट, त्यांची विचारधारा, त्यांची वागणूक, त्यांचे विविध पैलूयुक्त व्यक्तिमत्व लक्षात येईल.
तरुणाईने छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानले तर, निश्चितच निकोप तथा आदर्श समाजव्यवस्था निर्माण झाल्यावाचून राहणार नाही. कारण त्यांनी कधीही
*आयत्या पिठावर रेघोट्या ओढल्या नाही.*
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रभूमी ही मोगलशाही, आदिलशाही, निजामशाही अशा विविध सत्तांच्या ताब्यात असताना राज्य स्थापन करणे सोपे नव्हते किंवा ते नसतेही. त्यांची चाकरी करण्यामध्ये अनेक मराठा सरदार आपली हयात खर्ची घालत होते. त्यांच्याकडून सरदारकी, जहागीरी किंवा सरंजामी मिळवून त्यातच ते जीवनाचे सार्थक मानत होते. राज्य स्थापण्याचा साधा विचारही त्यांच्या मनाला शिवत नव्हता. तो शिवला होता फक्त शहाजीराजांच्या मनाला. परंतु तो प्रयत्नांती यशस्वी न झाल्यामुळे शिवाजी महाराजांना आयते राज्य किंवा सिंहासन मिळाले नाही. आदिलशहाकडून मिळालेल्या वडिलांच्या जहागिरीची (पुणे परगणा) व्यवस्था पाहतांना, विविध सत्तांच्या सत्तापिपासू वृत्तीमुळे उध्वस्त झालेली गावे, लढायांचा वीट आलेली रयत सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये परागंदा होऊन, एनकेन मार्गाने आपली दिनचर्या व निर्वाह व्यतीत करत होती. शिवाजी महाराजांनी जिजामातेच्या आज्ञेने तथा मार्गदर्शनाने त्यांचे कौलनामे घेऊन त्यांच्या जिवित्वासह उदरभरण्याचे आश्वासन देऊन त्यांना परतून वस्ती करण्यास पाचारण केले.
*रयत हिताला प्राधान्य*
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या परगण्यातील संपूर्ण शेती मोजून काढून, ती रयतेला कसण्यासाठी दिली. सुरवातीला त्यांच्याकडे भांडवल नसल्यामुळे औत-फाट्यासह त्यांना बि-बियान्यांचा पुरवठा केला. सुरुवातीची काही वर्ष कर सुद्धा कमीच ठेवला. जसे पिक तसा महसूल, या न्यायाने दुष्काळात महसुल माफ करून पिकलेच नाही तर देणार कोठून असा शिरस्ता सुरू केला. जंगली श्वापदांपासून शेतकऱ्यांचे तथा शेतीचे नुकसान थांबविण्यासाठी त्यांचा बंदोबस्त करणार्यांना बक्षिसे जाहीर केली. त्यासोबतच शेतकऱ्यांचे सर्वांगाने शोषण करणारे महालगी, महालगे, गावगन्ना, पाटील, कुलकर्णी, देशमुख, देशपांडे, जमीनदार, मिरासदार, इनामदार यांचा बंदोबस्त करून त्यांच्यावर बडदास्त बसवली. त्यामुळे थोरामोठ्यांना नाही तर लहान मुलांनाही स्वराज्याबद्दल आपुलकी निर्माण झाली.
एक दहा-बारा वर्षांचा मुलगा शेताच्या बांधावरून जाणार्या चार घोडेस्वारांना काय म्हणतो, याचे वर्णन एका कवीने केले आहे.
खबरदार जर टाच मारुनी जाल पुढेl
उडविन चिंधड्या राई राई एवढ्याl
एवढी मोठी हिंमत त्याच्यामध्ये कोठून आणि कशी आली असेल? त्याने महाराजांना पाहीलं नव्हतं, तरी स्वराज्याच्या संवर्धनात माझाही वाटा असावा, म्हणून निडर होऊन घोडेस्वरांमध्ये स्वतः शिवाजी महाराज असताना त्यांनाच तो दम देत होता. एवढी प्रत्येकामध्ये स्वराज्याबद्दलची आपुलकी का निर्माण झाली असेल? कारण शिवाजी महाराजांनी
*महिलांच्याही अब्रूची काळजी वाहिली*
तत्कालीन समयीं गावाची व्यवस्था पाहणारे बडे लोक हेच गावाचे सर्वेसर्वा असून त्यांच्या हातात गावाची संपूर्ण सत्ता असायची. त्यावेळी खेडी जवळपास स्वयंपूर्ण असल्यामुळे सत्तांतर झाले तरी सर्वसामान्य जनतेला फारसा काही फरक पडत नव्हता. गावचे प्रमुख मात्र लगेच आपली निष्ठा बदलणाऱ्या सत्तेच्या चरणी अर्पण करत होते. राजांना जोपर्यंत गावाकडून उत्पन्न मिळते तोपर्यंत ते कुठलाही हस्तक्षेप करत नव्हते. म्हणून गावचे प्रमुख किंवा व्यवस्थापक मात्र त्या गोष्टीचा गैरफायदा घेवून मनात येईल तसे वागायचे. प्रजेचा अतोनात छळ करायचे. शेतकऱ्यांकडून हवा तेवढा महसूल गोळा करायचा. नजरेस पडेल ती आणि आवडेल त्या महिलेला उचलून न्यायचे. कारण त्यावेळी त्यांच्या लेखी गोरगरीब शेतकरी शेतमजुरांच्या लेकी-सुनांच्या अब्रूला कवडीचीही किंमत नव्हती. अन्याय झाला तर तक्रार कोणाकडे करायची? केली तरी कुणी दखल घेत नाही. म्हणून लोक करतच नव्हते. अश्यावेळी शिवाजी महाराजांनी मात्र याविरुद्ध ठोस निर्णय घेऊन सर्वांवर जरब निर्माण केली.
रांझ्याच्या वतनदार पाटलाने गरीब शेतकऱ्याच्या तरण्याताठ्या मुलीची अब्रू लुटली. म्हणून तिने आत्महत्या केली. संपूर्ण गाव हळहळला. तरीही कुटुंबासह सर्व गाव गुमान बसला. शिवाजी महाराजांच्या कानी वार्ता जाताच मुसक्या बांधून पाटलाला आणले. हातपाय तोडण्याची शिक्षा फर्मावली. फक्त फर्मावलीच नाही, तर त्या शिक्षेची अंमलबजावणीही केली.
१६७८ मध्ये बेलवाडीच्या किल्ल्याची किल्लेदारीन सावित्रीबाई देसाईने, सेनापती सकुजी गायकवाडांच्या हल्ल्याचा प्रतिकार करत सत्तावीस दिवस कडवी झुंज दिली. शेवटी सावित्रीबाईंना हार पत्करावी लागली. विजयाच्या उन्मादात सेनापतींनी तिच्यावर बलात्कार केला. ही बाब शिवाजी महाराजांना कळतात सकुजी गायकवाड हा सख्खा मेहुणा असतानाही, त्यांना डोळे काढण्याची शिक्षा देऊन कायमचे कैदेत ठेवले.
आबाजी सोनदेव कुलकर्णी याने बढती मिळावी म्हणून की काय, महाराजांना कल्ल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा नजराणा पेश केला. परंतु तिचा आदर सत्कार तथा चोळी-बांगडी करून तिला सन्मानाने परत पाठवले. असे एक ना अनेक किस्से समकालीन इतिहासकारांनी नोंदवून ठेवले आहेत. मुस्लिम इतिहासकार काफीखान लिहतो की,’ लढाईमध्ये कोणत्याही धर्माच्या स्त्रिया हाती आल्यास त्यांना तोशीस लागता कामा नये, त्यांना बटकीन बनवू नये ‘ अशी स्पष्ट आज्ञा शिवाजी महाराजांची होती. लढाईला जाताना कलावंतीण, तमाशगिरीन बटकीन इत्यादी महिलांना सोबत नेण्याची मुभा सैनिकांना मुळीच नव्हती त्यामुळेच तर
*लोक मरण्यासाठी तयार झाले*
काही लोकांनी शिवचरित्र हे अफजलखान, शाहिस्तेखान, दिलेरखान, औरंगजेबाच्या कैदेतून सुटका किंवा कथा, कादंबर्या, नाटकं, सिनेमांच्या माध्यमातून लोकांसमोर ठेवून थिटे करण्याचा प्रयत्न केला. परंतु स्मृतिषेश गोविंद पानसरे आपल्या ‘ शिवाजी कोण होता ‘ या पुस्तकात म्हणतात की, शिवाजीच्या राज्यासाठी लोक मरण्यासाठी तयार का झाले? याचे उत्तर ज्याला कळलं त्यालाच शिवचरित्र समजलं.
शिवाजी काशीद, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, सिद्धी वाहवह व इतर काही सरदार तथा सैनिक स्वराज्यासाठी हसत हसत शहीद झाले, तर अनेकांनी जीवावर बेतनारी कामगिरी बजावली.
शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात कधीही जातीयवाद किंवा धर्मवाद पाळला नाही. १६४८ मध्ये म्हणजे स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळातच निजामाकडील ७०० पठाणांची फौज त्यांना येऊन मिळाली. सर्व जाती धर्माच्या लोकांना त्यांनी पाटील, देशमुख, सरदार, किल्लेदार, आरमार प्रमुख, सेनाप्रमुख, सरनोबत, अंगरक्षक इत्यादी महत्त्वाच्या जागी नियुक्ती देऊन, अस्पृश्यता, जात, धर्म, स्त्रीयांची गुलामी इत्यादींना स्वराज्यातून हद्दपार केले.
शिवाजी महाराजांनी लोकभाषेत म्हणजे मराठीमधून राज्यकारभार सुरू केला. स्वराज्यातील व्यापारउदीमास प्रोत्साहन दिले. इतर राज्यांमधून माल आयात केल्यास, त्यावर मोठ्या प्रमाणात कर आकारून, राज्यातील मालावरील कर कमी केला. काही राज्य, सत्ता तथा कंपन्यांसोबत केलेल्या कौलनाम्यात मानवी गुलामांच्या व्यापारावर प्रतिबंध घालत त्यांना सक्त ताकीद दिली की, ‘ मुस्लिम सत्तांमध्ये आपणास गुलामांच्या व्यापारास प्रतिबंध नसेल, परंतु माझ्या राज्यामध्ये हे चालावयाचे नाही.’
आज तरुणाईची जबाबदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यांनी लोकशाहीमध्ये शिवशाही (राजेशाही) समजून घेण्याची गरज निर्माण झाली आहे. काही लोक जर शिवाजी महाराजांच्या नावाचा सत्तेसाठी किंवा स्वार्थासाठी वापर करत असतील अथवा त्यांच्या नावाने अनुचित प्रकार किंवा घटना घडवून आणत असतील, तर त्यांची साथ-संगत देऊ नये किंवा शिवाजी महाराजांचे अनुयायी म्हणून त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे. आज लोकशाहीमध्ये शिवाजी महाराजांसारख्या प्रजाहितदक्ष प्रामाणिक राजाची गरज भासू लागली आहे. कारण देशात जाती धर्माच्या नावाखाली यादवी माजवण्याचा प्रयत्न होत आहे. बलात्कार करणाऱ्याच्या समर्थनात मोर्चे काढले जात आहेत. लोकांच्या आणि सरकारच्या मालकीचे सार्वजनिक तथा सरकारी उद्योग, संस्था, रेल्वे, विमान सेवा इत्यादी विकून त्यांचे खासगीकरण केले जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवशाहीचे ब्रीद होते की, ‘ सर्वास पोटास लावणे आहे.’ परंतु आज रोजगार हिसकवण्याकडे कल दिसतो आहे. संविधान विरोधी कायदे भराभर पारीत केल्यामुळे शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, अधिकारी, तथा कामकरी वर्ग चुहूबाजूने असंतुष्ट असल्याचे दिसत आहे. त्यांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज शेती आणि शेतकरी विरोधी कायदेकरून ते शेतकऱ्यांच्या समर्थनात असल्याचे भासविण्यात ऊर बडवला जात आहे. शिवाजी महाराजांच्या काळात लोकांची अशी धारणा होती की,’ लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे ‘ परंतु आज करोडों शेतकरी शेतमजुरांना संपवून, काही चार-दोन लोकांचं (भांडवलदार) भलं करण्याची प्रवृत्ती बळावली आहे. पूर्वी शिवाजी महाराजांचे लोककल्याणकारी राज्याचे म्हणजे शिवशाहीचे पेशवाईत रूपांतर केल्यामुळे ते पार रसातळाला गेले होते. आज त्यांचीच पिलावळ भारतीय लोकशाहीला हुकुमशाही मध्ये बदलून मनुस्मृतीचे राज्य निर्माण करू पाहते आहे. म्हणूनच तरुणाईने वेळीच सावध व्हावे, अन्यथा येणारा काळ माफ करणार नाही!………
भिमराव परघरमोल
व्याख्याता तथा अभ्यासक
फुले आंबेडकरी विचारधारा
तेल्हारा जि. अकोला
मो.९६०४०५६१०४