जागतिकीकरण आणि आंबेडकरवादी साहित्य
जागतिकीकरण आणि आंबेडकरवादी साहित्य
“शोषण विहीन मानवाचा विश्व समाज हे आंबेडकरवादी साहित्याचे ध्येय आहे. पुन्हा देवाच्या नावाने कुण्या धर्माच्या नावाने ,आदर्श समाज निर्माण होणे शक्य नाही. असे प्रयत्न हे शोषण विहीन मानवाच्या विश्व समाजाच्या निर्मितीमध्ये केवळ अडथळे ठरू शकतात. जागतिक पातळीवरही भांडवली जागतिकीकरणाची बाजू घेणारे लोक आणि भांडवली जागतिकीकरणारा विरोध करणारे लोक आता एका सुरात बोलायला लागले आहेत. समाजवादाच्या आश्र्याला दुनियेला जावेच लागेल. भांडवली जागतिकीकरणाची एकच एक जागतिक बाजारपेठ जगातील प्रादेशिक संस्कृती आणि त्याच्या बाजारपेठा मान्य करणार नाहीत. या दृष्टीने जगात काही घडामोडी घडू लागल्या आहेत आणि या घडामोडीचा परिणाम असा होईल की या संस्कृती आणि त्याचा प्रादेशिक बाजारपेठा भांडवली जागतिकीकरणाची दादागिरी मान्य करणार नाहीत. जागतिककरणाला या प्रक्रियेतून नमाज समाजवादी चेहरा प्राप्त होईल आणि जगाच्या जगण्याला एक पूर्ण नवा पर्याय प्राप्त होईल. हे आमुलाग्र परिवर्तन आंबेडकरवादी साहित्यला अभिप्रेत आहे.”
डॉ.यशवंत मनोहर
जागतिकीकरण ही संकल्पना जशी अर्थव्यवस्थेची निगडित आहे. तसेच ती साहित्यसाठीही निगडित आहे. आपण जेव्हा जगाच्या वेशीवर आपल्या देशाचे नेतृत्व करतो तेव्हा तिथे फक्त अर्थालाच किंमत नसते, तर आपल्या देशाच्या सर्वांगीण विकास होत आहे का हा सुद्धा असतो.
देशाच्या सामाजिक ,शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, विकासाबरोबर साहित्याचा विकास कसा होतो यावर चिंतन केले जाते .माणसातील माणूसकीचाही विचार यामध्ये असतो. पण भांडवलदारी जागतिकीकरणात फक्त आणि फक्त आर्थिक प्रगतीला जेव्हा उच्च स्थान दिल्या जाते तेव्हा ती प्रगती विनाशाकडे घेऊन जाते.
वर्तमान जागतिकरण हे भयग्रस्त व आणि गंभीर वळण घेत पुढे येत आहे. जगात आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्रांतीने तसेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने मानव जवळ आला आहे. पण तो खरच मनाने आला आहे का..? हा प्रश्न साहित्यिकांनी उपस्थित करायला हवा. आजही जगातील ८५ % जनता उपाशी ,दुःखी ,अज्ञानी ,अन्याय व अत्याचारी ,गुलाम अशा स्वरूपात जीवन जगत आहे. त्यांच्या जीवनाला जो आयाम हवा होता तो मिळत नाही. तर भांडवलदारी व्यवस्था व देशातील सरकारे सामान्य मानवाचे शोषण करत आहेत. या शोषणाचे प्रतिबिंब आपल्या साहित्याच्या विषयी व्हायला हवा. पण आजच्या साहित्यिकात त्यांच्या अभाव दिसून येतो.
आज काही साहित्यिक सरकारचे प्रचारक आहेत. तर काही संस्कृतीचे गुलाम आहेत. वर्तमान व्यवस्था माणसाचे माणूसपण नागवत असताना आजचा कवी व लेखक स्वतःच्या काल्पनिक जगातून बाहेर यायला तयार नाही .
युक्रेन , रशिया, चीनची मक्तेदारी, भारतातील असंविधानिक राजकीय व्यवस्था, स्त्रीवर अन्याय ,बालकांचे शोषण, मुलींची विटंबना ,भारतातील जातीयता, धार्मिक भेदाभेद अशा घटना आपल्या लेखक व कवी यांनी लेखनाचा विषय बनवून सरकारला प्रश्न विचारायला हवे. परंतु आज काही लेखक व कवी सरकारचे मांडलिकत्व पत्करलेले आहेत .ते सरकारने सांगितलेले शब्द कसा श्रेष्ठ आहे हेच लिहिण्यात मश्गुल आहेत.
आफ्रिका देशातील गुलाम व्यवस्था, अमेरिकेतील गौरवर्णीय लोकांची दहशत, भारतातील बहुसंख्यकाचा बडेजाव, अशा अनेक घटना आपल्याला या जागतिकीकरणात पाहायला मिळतात.
नुकताच भारत देशातील अडाणी ग्रुपने केलेले आर्थिक गैरव्यवहार त्यामुळे भारत देशातील सामान्य जनतेचे अतोनात नुकसान झाले आहे. सरकार व भांडवलदार यांच्या फायद्यामध्ये देश रसातळाला चालला आहे. यावर भारतीय साहित्यिक एकही अक्षर लिहायला तयार नाहीत.
देशातील पत्रकारिता शेवटची घटका मोजत आहे. लोकशाहीचे खांब दिवसेंदिवस शतग्रस्त होत आहेत. अशा काळोखमय व दहशतवादी वातावरणात जागतिकीकरणात आंबेडकरवादी साहित्य हे आपली क्रांतीध्वजा घेऊन जगाला नव्या आव्हानालचा मुकाबला करण्याची प्रेरणा देत आहे .
आंबेडकरवादी साहित्य माणसाच्या माणुसकीचा नवा आकृतीबंध आहे. वर्तमानातील वास्तविक जाणीवांचा उद्रेक आपल्या कवितेतून व लेखनातून प्रस्तुत करत आहे. आंबेडकरवादी साहित्य जीवनाचे तत्त्वज्ञान विशद करणारे साहित्य आहे.त्यांच्या कक्षा मर्यादित केल्या जात नाही. कथा, कादंबरी, प्रवासवर्णने ,कविता, आत्मचरित्र, गझल, चित्रपट, लघु चित्रपट, शाहिरी , कव्वाली अशा विविध प्रकारातून समाजातील आक्रोश, दुःख, वेदना ,आनंद, भावना, नकार यांची अभिव्यक्त करत आहेत.
आंबेडकरवादी साहित्य हे वैश्विकतेची नाते जोडते. अन्याय कुठेही घडो त्यांचा प्रतिकार करणे हाच आंबेडकरवादी साहित्याचा मुभारंभ आहे. आंबेडकरवादी साहित्य हे समतेचे साहित्य आहे. धम्मतत्त्वज्ञानाच्या विचारातून स्फुरलेले क्रांतीतत्व आहे .आज काही मंडळी आंबेडकरी साहित्याला एकसुरी म्हणत असले तरी आंबेडकरवादी साहित्य भारताला व जगाला दिशा दाखवणारे क्रांतिकारी साहित्य आहे. हे आपण समजून घेतले पाहिजे. कारण या साहित्याचा विषय देव, दानव ,धर्म , असा न राहता समतामूलक समाज निर्माण करणारा परिवर्तनशील विषय असतो.
भारतीय संविधानाच्या मूल्याचा खरा पुरस्कार करणारे हे साहित्य मानवी अंतरंगातील सत्यनिष्ठता जोपासणारे प्रगल्भ साहित्य आहे .आंबेडकरवाद हा जीवनाच्या मुळाशी जाणारा विचार गर्भ आहे. वेदना ,विद्रोह ,नकार हा या साहित्याचा पाया आहे. कलात्मकतेला आव्हान देणारा जीवनवाद आहे. आंबेडकरवादी कवीने जगाच्या पार्श्वभूमीवर आपली अमिट मुद्रा कोरली आहे .डॉ. यशवंत मनोहर, दीपककुमार खोब्रागडे ,उत्तम कांबळे, अरुण काळे ,लहू कानडे, भुजंग मेश्राम, संदीप गायकवाड, प्रज्ञा पवार, संजीव खांडेकर, किरण गुरव, हेमंत दिवटे ,संजय गोडघाटे, लोकनाथ यशवंत, प्रब्रह्मानंद मडावी ,प्रकाश राठोड, मनोहर नाईक, प्रकाश खरात,प्रसेनजीत गायकवाड, अशा कवी व लेखकांनी आपले शब्द जगाच्या बदलासाठी लिहिले आहेत. त्यांच्या कवितेत व लेखनात वास्तव विचारांची मांडणी केली आहे. लहू कानडे एका कवितेत म्हणतात की,
उमजून असा हा भुलभुलैया
नेट – इंटरनेटच्या मुखातील
विश्वदर्शक मायावी
नेमके निवडून घ्या ज्ञान ..
या कवितेतून जागतिकीकरणाची विपरीत वळणाची सूचना इथे मांडली आहे .तर हेमंत दिवटे सार्वत्रिक बाजाराने माणसाची संवेदना कशी नागवली यावर भाष्य करताना ते लिहितात की,
मेगा शॉपिंग माॅलमध्ये शाप करताना
अति मायक्रो विचार येत राहतात
मी एक उंची कॅफे साबू आहे
की मी काटा चमचा आहे
की मी चौथ्था हॅक मधील किटकॅट आहे.
जागतिकीकरणाच्या रेखाट्याने साऱ्या व्यवस्था उध्वस्त करत असताना, आंबेडकरवादी विचार हा जागतिक पातळीवर आपले सत्य टिकवून ठेवण्यात यशस्वी होत आहे. आज जगात तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची मागणी वाढलेली आहे. लेखन व कवितासंग्रहाला मोठी मागणी होत आहे. वाचकाला अंतर्मुख करायला लावणारी साहित्य संपदा भारताच्या साहित्यिकाला नवी उभारी देत आहे .कवी संदीप गायकवाड आपल्या “ग्लोबलायझेशन” या कवितेत म्हणतात की ,
शहराचे माणूसपण विद्रुप होत आहे
रिलीजन, कास्ट व लँग्वेज यांचा
भेदाभेदाचे महासागर उधानत आहेत
नव्या दंगलजीवी विषाणूचे
नवे स्टेन्स बदलत आहेत
ग्लोबल तंत्रविद्येने नवभक्त
संप्रदायाचा उगम होत आहे
खोटे बोलणाऱ्या खोगीरभरतीची
चिवचिवाट पाहायला मिळत आहे
आपण सारे भारतीय लोक
ग्लोबलायझेशनच्या षडयंत्राला
जाणायच आहे
फसव्या कार्पोरेटच्या मायानगरीला
आंतरिक डायनामाइटने उडवायचं आहे
आपल्या इंडियाला वाचवायचा आहे
भारतीय डेमोक्रशीसाठी लढायचं आहे
( काळजात ठसठसणाऱ्या जखमांचा प्रदेश )
ही कविता वर्तमानातील मानवी मनातील भावनांचा आक्रोश व्यक्त करते. तर यशवंत मनोहर आपल्या “कवी उगवतो तेव्हा” या कवितेत लिहितात की,
कवीच असतो संविधान
दडपलेले आवाज मुक्त करणारे
तोच असतो पहिले औषधही
मेलेली माणसे जिवंत करणारे
कवीचे देतो स्वाभिमानाचे
मूल्यदंड हरलेल्या हातांमध्ये
दहशतीच्या कारखान्यालाही
पहिला हस्तक्षेप त्याचाच असतो..
( अग्नि परीक्षेचे वेळापत्र)
आंबेडकरी विचारांची मूल्यजाणीव संविधानाची बांधिलकी सांगणारी आहे. संविधान श्रेष्ठ व एकात्मतेच्या क्रांतीसापेक्ष अग्नीद्वार आहे. माणसाच्या जीवनाच्या सूर्यप्रकाश आहे .भारतीय संविधानाला जर आपण वजा केले तर आपली किंमत शून्य येते. म्हणून भारतीय संविधान भारतीय माणसाच्या उन्नतीचा महामेरू आहे. स्वातंत्र्य ,समता, बंधुभाव, न्याय या तत्त्वज्ञानाचा महासागर आहे .असीम अशा माणसाला असीमत्व निर्माण करून देणारा स्वातंत्र्यकोष आहे.
जागतिकीकरणात आज माणूस हवालदील होत आहे. जागतिकीकरणाने माणसाचे माणूस पण नागवले आहे .अति सौंदर्याच्या वापराने वास्तविक सौंदर्य नष्ट केले जात आहे .कवी उत्तम कांबळे हे “जागतिकीकरणात माझी कविता” यामध्ये म्हणतात की ,
सारं जग जवळ आलंय म्हणतात
पण माणसं माणसापासून
दूर धावत आहेत
रोबोटच्या गळ्यात
गळा घालताहेत
माणसाऐवजी कुत्र्यावर
कुत्र्याऐवजी यंत्रावर
विश्वास टाकताहेत
सगळ्यांचे खोके भरलेत
स्वतःच्याच स्वार्थात
जावं कुठं ,राहावं कुठं
खेड्यातली शहरात
मान कुणाच्या
खांद्यावर टाकावी
माणसाच्या की यंत्राच्या !
माणसाचा घास ओढणाऱ्या यंत्राशी
मुकाबला कसा करायचा ?
कॅरीबॅग मधून
आता प्रश्न वाहून नेताहेत
इथले लोक
दुधाच्या पिशव्यांप्रमाणे
अश्रूंच्या पिशव्याही
फ्रिजमध्ये ठेवताहेत
इथले लोक
फ्लॅटमध्ये काळीज ठेवून
रस्त्यावर फिरताहेत
इथले लोक ….
जागतिकीकरणाचा प्रभाव कसा इथल्या माणसावर पडला आहे .याचे वास्तवगर्भ चित्र उत्तम कांबळे यांनी आपल्या अत्यंत परखडपणे केलेले आहे .
जागतिकीकरणाचा उन्नत रेडा देशात धुमाकूळ घालत असताना राजकीय व्यवस्था विकलांग केली जात आहे. जगातील आर्थिक व्यवस्था श्रीमंत व भांडवलदाराच्या हातात एकवटली आहे. भारत देशातील ९९% आर्थिक संपत्ती एक टक्के लोकांच्या हाती असल्याने, भारताची दारिद्र रेषेखाली गेलेल्या लोकांची यादी वाढली आहे. संविधानात्मक व्यवस्था आज मोडकळीस आणून फक्त आणि फक्त चंगळवादी व इव्हेंट प्रणालीच्या बोलबाला सुरू आहे .भारत गुलामीच्या चक्रव्यूहात पुरता फसला असताना देशातील माणूस क्रांती करणे ऐवजी गुलामीला कवटाळत आहेत. गुलामीचे जिणं त्याच्या अंगवळी पडत आहे . काही माणसे सोडली तर इथले शास्त्रज्ञ, प्रशासकीय व्यवस्था ,लेखक ,कवी, शिक्षक इत्यादी व्यवस्थेच्या विरोधात बोलायला तयार नाही. तर व्यवस्थेचे समर्थन करण्यात मशगुल आहेत. धर्मवादाच्या जहरी प्रचाराने भारतीय समाज व्यवस्था विषमतेच्या भयचक्रात जात आहे. अशा काळात फक्त आंबेडकरी, फुले व शाहू यांचे विचारच देशाला व जगाला तारू शकतात. म्हणून आंबेडकरवादी साहित्य आपले गटबाजीचे हेवेदावे सोडून समस्त जगातील मानवाच्या कल्याणासाठी आपली लेखणी पाजवायला हवी.कथा ,कादंबरी, कविता ,कव्वाली ,गझल चित्रपट, लघु चित्रपट अशा विविध माध्यमातून माणसाच्या जीवनावरच सूक्त रचावे. माणसाची गाणे गावी माणसाने.
माणसाला नागवे करणाऱ्या जागतिकीकरणाचा चेहरा उजागर करावा. भारतीय संविधानातील माणूस निर्माण करण्यासाठी पुढे यावे. हाच आंबेडकरवादी साहित्याचा मुख्य हेतू असावा असे वाटते .
अन्याय अत्याचारावर
पेटून उठा बांधवानो.
तळपती लेखणी घेऊन
इमले करा उध्वस्त बांधवांनो
जागतिकीकरणात माणसाला
जपा साऱ्या बांधवानो
आंबेडकरी विचारांची
मशाल प्रज्वलीत
करा बांधवांनो
संदीप गायकवाड
नागपूर
९६३७३५७४००
संदर्भ:
१)आंबेडकरवादी साहित्य, डॉ.यशवंत मनोहर यांचे लेख संपादक-दीपककुमार खोब्रागडे, पान.नं. १३०
२)अग्नीपरीक्षेचे वेळापत्रक-यशवंत मनोहर, पान. न.१३
३)यशवंत मनोहर गौरव ग्रंथ-बदलते विश्व आणि साहित्यापुढील आव्हाने संपादक-डॉ.प्रकाश राठोड ,डॉ.अक्रम पठाण पान.न.१२१,१२२
४)काळजात ठसठसणाऱ्या जखमांचा प्रदेश, कवी-संदीप गायकवाड पान.न.११३