संपादकीय

काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह : एका ऐतिहासिक सत्याचे अधोरेखन*

*काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह : एका ऐतिहासिक सत्याचे अधोरेखन*
————————————-
*- डॉ. अनमोल शेंडे*

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या हक्क, अधिकार आणि अस्मितेसाठी अनेक आंदोलने केलीत. त्यामध्ये २० मार्च १९२७ रोजी महाड येथील सार्वजनिक चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना प्राशन करता यावे यासाठी केलेला सत्याग्रह होता. २५ डिसेंबर १९२७ रोजी हिंदू धर्मातील भेदभाव आणि शोषणाला समर्थन देणाऱ्या तसेच स्त्रियांना गुलामीत ढकलणाऱ्या मनुस्मृती दहनाचा सत्याग्रह होता. अमरावती येथील प्राचीन अंबादेवी मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली २६ जून १९२७ रोजी केलेला सत्याग्रह होता. तर २ मार्च १९३० ला अस्पृश्यांना नाशिक येथील काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून केलेला सत्याग्रह होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले हे सर्वच सत्याग्रह एका विशिष्ट भूमिकेतून आकारास आलेले होते. परंपरेने ग्रासलेल्या भारतीय मनोवृत्तीचे दर्शन घडविणारे हे सर्व सत्याग्रह होतेच; किंबहूना न्याय आणि अन्याय याची स्पष्ट सीमारेषा अधोरेखित करणारेही हे सत्याग्रह होते.
अस्पृश्य समाज हा हिंदू समाजाचा एक भाग मानला जात असला तरी असंख्य सोयी- सवलतींपासून आणि अनेक हक्क-अधिकारांपासून या समाजाला वंचित ठेवल्या गेले. सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक अशा अनेक क्षेत्रांतर्गत येणाऱ्या लाभापासून अस्पृश्य समाजाला मुद्दामहून दूर ठेवल्या गेले. जगाच्या पाठीवर गोऱ्यांनी निग्रोंवर अनन्वित अन्याय- अत्याचार केलेत. माणूस म्हणून त्यांचे हक्क-अधिकार हिरावून घेतलेत. माणूसकीलाच शिशारी यावी अशी गुलामगिरी निग्रोंच्या वाट्याला आली. भारतीय समाजामध्येही चातुर्वर्ण्यव्यवस्थेने गुलामगिरीचे प्रदर्शन मोठ्या दिमाखदार पध्दतीने केले. गुलामगिरीच्या पिंजऱ्यातून अस्पृश्य समाज बाहेर येऊ नये म्हणून अनेक क्लृप्त्या लढविल्या. अशा या गुलामगिरीला संपूर्ण ताकदीनिशी आग लावण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषाने केले. गुलामगिरीच्या दुष्ट व्यवस्थेत वर्षानुवर्षांपासून खितपत पडलेल्या अस्पृश्य समाजाला बाहेर आणण्याचे महत्कार्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्यासाठी त्यांना फार मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी जे लढे उभारलेत, त्यामध्ये नाशिक येथील काळाराम मंदीर प्रवेश लढ्याचा उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल. भेदाभेदावर अखंड विश्वास ठेवणाऱ्या हिंदूंना जाग यावी, इंग्रजांनाही या विषमतेचे दर्शन व्हावे आणि अस्पृश्य म्हणून गणल्या गेलेल्या शोषितांच्या हक्क-अधिकाराचे जाहिर प्रदर्शन करावे या हेतूपोटी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हा लढा उभारला. या लढ्याची सुरूवात बाबासाहेबांनी २ मार्च १९३० ला केली आणि तब्बल पुढील पाच वर्षे हा लढा चालला. बाबासाहेबांच्या काही अनुयायांना ही जाणीव झाली की, काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळत नाही, काळाराम मंदीर प्रवेशापासून अस्पृश्यांना रोखले जाते. त्यामुळे १९२९ साली नाशिक येथील बाबाासाहेबांच्या अनुयायांनी बाबासाहेबांना विनंती केली की, आपण हा लढा उभारला पाहिजे आणि या लढ्याचे नेतृत्व बाबासाहेबांनी स्वत: करावे. खरे तर सुरूवातीला या लढ्याचे नेतृत्व करण्यासाठी बाबासाहेबांनी नापसंती दर्शविली. कारण मंदीर प्रवेशाचा सत्याग्रह करण्यापेक्षा राजकीय हक्क मिळवण्याकडे बाबासाहेबांचा अधिक कल होता. परंतू अनुयायांचा आग्रह पाहून बाबासाहेबांनी या लढ्याचे नेतृत्व करण्यासाठी सकारात्मकता दर्शविली.
काळाराम मंदिराच्या या लढ्यात सुमारे एक हजार लोकांनी आपली नावे नोंदवली. नाशिक जिल्ह्यातील महारांचा संघही स्थापन करण्यात आला. पुरूषांबरोबर स्त्रियाही या लढ्यात अग्रेसर होत्या. भाऊराव गायकवाड, अमृतराव रणखांबे, पतित पावन दास, शंकरदास बुवा यांचा या लढ्यात प्रमुख सहभाग होता. हे दलितांचे प्रतिनिधी म्हणून लढ्यात सहभागी झाले होते. गंगाधरराव सहस्त्रबुध्दे, बाळासाहेब खेर, डी.व्ही.प्रधान, देवराव नाईक, स्वामी आनंद बाळकृष्ण, जनार्दन मराठे ही सर्व दलितेतर मंडळी बाबासाहेबांना सहकार्य करण्यासाठी तत्पर होती. ३ मार्च १९३० रोजी बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली सुमारे ३०० लोकांचे पथक काळाराम मंदिराजवळ मिरवणूकीने आले. हा लढा मंदीर व्यवस्थापनाला पूर्वसूचना देऊन शिस्तबध्द पध्दतीने लढला गेला. शांततेने पुकारलेल्या या लढ्यात सहभागी लोकांना जर मंदीर प्रवेश नाकारला तर सत्याग्रह करण्याचा इशाराही मंदीर व्यवस्थापक समितीला देण्यात आला. सत्याग्रही मंदिराजवळ पोचताच पुजाऱ्यांनी देवळाचे दरवाजे बंद केले. जिल्हाधिकाऱ्यांनी तसा आदेश पुजाऱ्यांना दिला होता. प्रत्येक वर्षी रामनवमीला रथयात्रेत रथ ओढून नेण्याच्या प्रक्रियेत सवर्णांबरोबर दलितही सहभागी होत असत. तशी परंपरा वर्षानुवर्षांपासून चालत आलेली होती. परंतू यावेळेला नियोजन आखून आणि दलितांना डावलून सनातन्यांनी रथ व विमान आधीच ओढून नेण्यास प्रारंभ केला. अस्पृश्यांना डिवचण्याचा हा सारा प्रकार होता.
सनातन्यांनी रथ व विमान आधीच ओढून नेल्यामुळे आणि अस्पृश्यांना बाजुला केल्यामुळे अस्पृश्य मंडळी रथाच्या मागे धावायला लागली. परंतु सवर्णांना हे आवडले नाही. अस्पृश्य मंडळींना या प्रक्रियेत सामिल करून घ्यायचेच नाही हा त्यांचा इरादा पक्का होता. त्यामुळे सवर्णांनी अस्पृश्य मंडळींना दगडाने मारणे सुरू केले. या दगडांच्या वर्षावात महार जसे जखमी झाले तसे काही सवर्णही जखमी झाले. या घटनेने डॉ.बाबासाहेब आंबेडकर कमालीचे व्यथित झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई येथे जाऊन गृहमंत्री अर्नेस्ट हॉटसन यांची भेट घेतली परंतु बाबासाहेबांच्या भेटीची त्यांनी फारशी दखल घेतली नाही. त्यामुळे २५ मे १९३० रोजी बाबासाहेबांनी सत्याग्रह तहकुब करण्याचा अनिच्छेने का होईना पण निर्णय घेतला. परंतु ही तात्पुरतीच प्रक्रिया होती, कारण काळाराम मंदीर प्रवेशाबाबत अस्पृश्य बांधव अधून-मधून जनजागृती करीत होतेच ! सभा भरवणे, जनजागृती करणे, प्रचार करणे या कार्यात सत्याग्रहींनी कुठेच खंड पडू दिला नाही. शिवाय मंदीर प्रवेश चळवळ परत सुरू करावी हा विचार बाबासाहेबांच्या डोक्यात अधून-मधून येतच होता. त्यासाठी ते १४ मार्च १९३१ ला नाशिकला गेले. आणि ही चळवळ परत सुरू करण्याबाबत कार्यकर्त्यांसमोर सुतोवाच केले. ५ नोव्हेंबर १९३१ रोजी ५ हजार अस्पृश्यांची मिरवणूक काळाराम मंदिराच्या दिशेने शांततेने काढण्यात आली. दलितांना जर प्रवेश मिळत नसेल तर सवर्णांनाही मंदीर प्रवेश मिळू नये यासाठी दलितांनी मंदिराभोवती पहारा दिला. परंतु पुजाऱ्यांनी आपल्या घरातून सवर्णांना प्रवेश दिला आणि दलित बांधव चिडले. आपल्यालाही प्रवेश मिळावा म्हणून दलितांनी पुजाऱ्यांच्या दरवाज्यातून मंदिरात प्रवेश करण्यासाठी जबरदस्तीने प्रयत्न केला. सवर्णांच्या आणि पुजाऱ्यांच्या बाजुने कायदे असल्यामुळे पोलीसांनी सत्याचा आग्रह धरणाऱ्या दलित बांधवांनाच ताब्यात घेतले. ४ जानेवारी १९३२ ला दिडशे दलित सत्याग्रही जेव्हा मंदिराजवळ आले तेव्हा सनातन्यांनी या दलित सत्याग्रहींवर पुन्हा दगडांचा मारा केला. त्यांना हुसकावून लावले. १५ एप्रिल १९३२ रोजी अस्पृश्यांनी रामनवमीच्या दिवशी काळाराम मंदिरात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. या वेळेला १४ महिला व १४ पुरूषांना अटक केली गेली. इतकेच नाही तर तीन महिन्यांची शिक्षाही सुनावण्यात आली.
काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह हा न्याय-अन्यायाची स्पष्ट सीमारेषा प्रदर्शित करीत असल्यामुळे हा लढा अविरत सुरू ठेवावा, असे अस्पृश्य बांधवांना सारखे वाटत होते. सवर्णांनी मंदिरात प्रवेश करायचे आणि आपल्याला मात्र काळाराम मंदिर प्रवेशाची अनुमती असू नये ही परंपरा अस्पृश्य बांधवांना अन्यायकारक वाटत होती. न्याय-अन्यायाचे हे तर्कशास्त्र बाबासाहेब चांगल्या पध्दतीने समजले होते. त्यामुळे त्यांनी अस्पृश्य बांधवांच्या या भूमिकेचे समर्थन तर केलेच; शिवाय या सत्याग्रहाचे नेतृत्वदेखील त्यांनी आपल्या शिरावर घेतले. काळाराम मंदीर प्रवेशाच्या भूमिकेवर सनातनी संतप्त झाले असले तरी तोडीस तोड देण्यासाठी अस्पृश्य बांधव जराही मागे हटले नाही. जेव्हा- जेव्हा आवश्यकता वाटली तेव्हा-तेव्हा अस्पृश्यांनी सनातन्यांच्या या निच वृत्तीला कडाडून विरोध केला. जशास तसे उत्तर दिले. २४ मार्च १९३४ रोजी रामनवमीला काळाराम मंदिर प्रवेशाची ही चळवळ पुन्हा जोमाने सुरू करावी असा विचार बापुसाहेब राजभोज यांच्या मनात आला. भाऊराव गायकवाड यांच्या सोबत त्यांनी चर्चा केली. भाऊराव गायकवाड यांनी या संदर्भात बाबासाहेबांना पत्र पाठवले. परंतु यावेळेला मात्र बाबासाहेब काळाराम मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहाची चळवळ पुन्हा हाती घ्यावी या विचारात नव्हते. कारण हा सत्याग्रह मार्च १९३० ते ऑक्टोबर १९३५ एवढ्या दिर्घकाळपर्यंत लढला गेला. हा लढा इथेच थांबवण्यामागे बाबासाहेबांच्या काही स्पष्ट भूमिका होत्या. अस्पृश्यांच्या भल्यासाठीचे काही निश्चित धोरणे होती.
काळाराम मंदिर प्रवेश करण्यामागे बाबासाहेबांची दूरदृष्टी उभी होती. ईश्वर वा मोक्ष या संकल्पना तर बाबासाहेबांना अत्यंत खुळचट वाटत होत्या. उच्चवर्णीयांनी स्वत:चे उखळ पांढरे करण्याकरीता असंख्य भाकडकथा निर्माण केल्यामुळे देव आणि देवळे बाबासाहेबांच्या परिवर्तनवादी मनाने केव्हाच निकालात काढले होते. हिंदू समाजाचे आपण समान घटक असू तर नाशिकच्या काळाराम मंदिरात आपल्याला का प्रवेश मिळू नये हा बाबासाहेबांचा खडा सवाल होता. हा सामाजिक समतेचा प्रश्न होता. हिंदू धर्मातील विषम परंपरेने याआधीही आपल्या अनेक पिढ्या गारद केल्या. यात देवाने कुठलीही ढवळाढवळ केली नाही. कारण विनाकारण उभा केलेला देव नावाचा हा निर्जीव बागुलबुवा काहीच करू शकत नाही याचा चांगला अभ्यास बाबासाहेबांनी केला होता. देव आणि धर्माच्या नावाने अस्पृश्यांचे शोषण करीत रहावे हाच एक अजेंडा घेऊन हजारो वर्षे वैदिक संस्कृतीने कुठलाही गुन्हा नसतांना अस्पृश्यांचे प्रचंड हाल केले. अस्पृश्यांना मंदिर प्रवेश करायचा ते केवळ स्पृश्यांच्या बरोबरीने आपला हक्क बजावता यावा म्हणून बाबासाहेबांनी ही चळवळ सुरू केली. त्यामुळेच ‘आज आपण मंदिर प्रवेश करणार आहोत, मंदिर प्रवेशाने तुमचा प्रश्न सुटेल असे मुळीच म्हणता येत नाही’ मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहाला आरंभ करतांना २ मार्च १९३० रोजी अशा पध्दतीने बाबासाहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती.
काळाराम मंदिरात अस्पृश्य बांधवांना प्रवेश नाकारणे हा या देशाचा काळाकुट्ट इतिहास आहे. शिवाय अस्पृश्यांनी मंदिर प्रवेश करू नये यासाठी हिंदूंनी ज्या क्लृप्त्या लढवल्या त्या अत्यंत घाणेरड्या होत्या. अस्पृश्यांच्या बाबतीत स्पृश्य हिंदूंच्या मनात कसे चौफेर विष दाटून आहे हेच या आंदोलनाने पुन्हा एकवार सिध्द केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर नावाचा महापुरूष नाशिक काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह का करतो ? हा सत्याग्रह करण्याची त्याला का गरज वाटते आहे ? हे हिंदूंनी जराही लक्षात घेतले नाही. अर्थात कुठल्याही परिस्थितीत बाबासाहेबांचे त्यांना ऐकायचेच नव्हते. खऱ्या-खोट्यांमधील फरक त्यांना जाणून घ्यायचाच नव्हता आणि समतेच्या मार्गातील अवरोध आणखी पक्के करायचे होते. समता-विषमतेची ही लढाई सुरू ठेवण्यातच त्यांना स्वारस्य होते. खरे तर या लढ्यासंदर्भात महात्मा गांधींची भूमिका निर्णायक ठरली असती. कारण महात्मा गांधींना मानणारा मोठा वर्ग या देशामध्ये होता. परंतु गांधीजींनी आपली भूमिका जाहीर केली नाही. बाबासाहेबांच्या लढ्यातील सहकारी भाऊराव गायकवाड यांनी गांधीजींना एक पत्र पाठविले आणि या पत्रातून काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहास पाठींबा देण्याची विनंती केली होती. परंतु ‘मंदिर प्रवेशाचा प्रश्न हाती घेण्याची ही योग्य वेळ नाही’ असे उत्तर गांधीजींनी दिले होते. गांधीजींना अस्पृश्यता मान्य नसली तरी चातुर्वर्ण्य व जातीव्यवस्थेच्या विरूध्द जाण्यास ते तयार नव्हते. वेद, गीता, स्मृतीही त्यांना पुज्यनीय वाटत. परंपरेला थेट छेद देणे गांधीजींच्या तत्वात बसणारे नव्हते. जुजबी आणि नाममात्र सुधारणा करण्यावरच त्यांचा अधिक कल होता. दलित वर्गाला मिळालेले राखीव हक्क गांधीजींना पसंत पडले नाही. हे हक्क रद्द करण्यासाठी त्यांनी २० सप्टेंबर १९३२ ला आमरण उपोषण सुरू केले. त्यासाठी त्यांनी प्राण पणाला लावले. परंतु अशी आक्रमक भूमिका बाबासाहेबांनी चालविलेल्या काळाराम मंदिर प्रवेश चळवळीबद्दल त्यांना घ्यावीशी वाटली नाही. अस्पृश्य बांधवांच्या मंदिर प्रवेशाला असलेल्या स्पृश्य हिंदूंच्या भूमिकेचा विरोध त्यांना करावासा वाटला नाही.
या देशाच्या राजकीय प्रक्रियेत काँग्रेसचे फार मोठे स्थान होते. अनेक महत्वाचे विषय सहजरित्या मार्गी लावण्याची काँग्रेसमध्ये क्षमता होती. नाशिक येथील काळाराम मंदिर व पुण्याचा पर्वतीचा सत्याग्रह फार दिर्घकाळ म्हणजे १९३५ पर्यंत डॉ.आंबेडकरांनी चालविला होता. रंगा अय्यर यांनी १९३३ मध्ये केंद्रीय कायदेमंडळात मंदिर प्रवेश बिल सादर केले. हे बिल अत्यंत महत्वाचे होते. या बिलास काँग्रेसच्या सदस्यांनी प्रारंभी अनुकूलता दर्शविली. परंतु याच वेळेला नवीन निवडणूका घेण्याकरीता कायदेमंडळ बरखास्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यावेळेला लगेच कायदेमंडळातील काँग्रेस सदस्यांनी अस्पृश्यांच्या या महत्वपूर्ण मंदिर प्रवेश बिलास दिलेला पाठींबा काढून घेतला. खरे तर काँग्रेस सदस्यांची ही भूमिका हिंदू समाजाच्या बुरसटलेल्या मानसिकतेला बळकट करणारी तर होतीच; शिवाय समतेच्या लढ्यावर प्रश्नचिन्हही निर्माण करणारी होती. अस्पृश्यांनी चालविलेल्या या सामाजिक लढ्याला खो देणारी ही भूमिका होती. शेवटी नाईलाजास्तव रंगा अय्यर यांना हे बिल परत घ्यावे लागले.
काळाराम मंदिर प्रवेशाची चळवळ चालवितांना बाबासाहेबांची भूमिका हीच होती की, त्यानिमित्ताने सामाजिक समतेचा हक्क बजावता यावा. ही मानवतेची चळवळ आहे आणि ही चळवळ विरोधाकरीता विरोध करणारी नसून माणूसकीचे हक्क प्रस्थापित करू पाहणारी ही चळवळ आहे. ‘शेकडो वर्षे उच्चवर्णीय हिंदूंनी आम्हाला माणूसकीच्या हक्कांपासून दूर ठेवले तेच हिंदू आपल्याला माणूसकीचे अधिकार देण्यास तयार आहेत की नाही, हाच एक प्रश्न या मंदिर प्रवेश सत्याग्रहातून निर्माण होणार आहे. हिंदू मन खऱ्याखुऱ्या माणसाला माणूस मानायला तयार आहे की नाही हाच प्रश्न या सत्याग्रहातून दृष्टोत्पत्तीस येणार आहे. उच्चवर्णीय हिंदूंनी आम्हांला कुत्र्यामांजरांपेक्षाही हीन लेखले पण आतातरी तेच हिंदू आपल्यासारख्या माणसांना माणूस म्हणून किंमत देणार आहेत की नाही ? याच प्रश्नाचे उत्तर आपल्याला या सत्याग्रहातून मिळणार आहे.’ ही बाबासाहेबांची स्पष्ट भूमिका होती. कारण मंदिरातला दगड हा निर्जीव आहे. त्याचे दर्शन केल्याने, पूजा केल्याने हाती काही लागणार नाही. शिवाय त्यामुळे काही मूलभूत प्रश्न सुटण्यासही मदत होणार नाही, हे बाबासाहेबांना पक्के ठाऊक होते. या देवांनी आजपर्यंत कुणाचे काही भले केले नाही. केवळ हिंदूचे मतपरिवर्तन करणे आणि समानतेचा आवाज बुलंद करणे हा एकमेव उद्देश या मंदिर प्रवेश आंदोलनामागे बाबासाहेबांचा होता. सार्वजनिक स्थळांचा उपभोग घेणे ही काही कुणाची मालकी नसते. त्यावर सर्वांचाच समान अधिकार असतो. असे असतांनाही अस्पृश्य बांधवांनी चालविलेल्या या मंदिर प्रवेश चळवळीला प्रचंड विरोध केला गेला. सामाजिक न्यायाची भूमिका स्पष्टपणे झिडकारली गेली. बाबासाहेबांच्या या चळवळीला नामोहरम करण्यात जेवढी ताकद लावता येईल तेवढी ताकद स्पृश्य हिंदूंनी लावली. हा शुद्ध दुष्टपणा होता. अस्पृश्य लोकांना माणूस म्हणून नाकारण्याची ही विकृत मानसिकता होती. एका कवीने या संदर्भात फार मार्मिक टिप्पणी केली आहे. कवी म्हणतो,
‘एक पत्थर को छुना भी
हमारे लिए चोरी थी
ए कालाराम… क्या तुझे भी
जातीवाद की बिमारी थी ?
बात ना मजबुरी की थी
ना गद्दारी की थी
मेरे भीम तेरे चौखट पर आए
क्योंकी बात बराबरी की थी’
समानतेच्या दिशा संसुचन करण्यासाठी ही मंदिर प्रवेशाची लढाई असतांना हिंदूंनी मात्र कुठल्याही परिस्थितीत अस्पृश्यांना सामाजिक न्याय देण्याचे स्पष्टपणे नाकारले. एक चांगली लढाई मारण्याचे घोर पातक हिंदूंनी केले.
नाशिकचा काळाराम मंदिराचा सत्याग्रह डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत जाणीवपूर्वक थांबवला. कारण उच्चवर्णीय हिंदूंची माणूसकीच्या हक्कापासून दूर ठेवण्याची भूमिका बाबासाहेबांना समजली होती. या लढ्यात तब्बल ५ वर्षांचा कालावधी गेला. या काळात पैसे वाया गेलेत, कष्ट वाया गेलेत. दुसरे असे की, अनेक सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक प्रश्न बाबासाहेबांसमोर होते, जे अत्यंत मूलभूत नि महत्वाचे होते. या काळात हे प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी बाबासाहेब फारसा वेळ देऊ शकले नाही. या प्रश्नांच्या अस्वस्थेपोटी बाबासाहेबांनी या आंदोलनाला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला. ‘या प्रश्नांना आता सत्याग्रहाची भूमिका पसंत नाही, त्याची आता आवश्यकताही नाही. ते आंदोलन तहकूब करावे. एवढेच नव्हे तर सत्याग्रहाचा विचारच या प्रश्नांवर सर्वस्वी रद्द करावा’ असे स्पष्ट मत भाऊराव गायकवाड यांना पाठविलेल्या पत्रात बाबासाहेबांनी स्पष्टपणे नोंदवले.
नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेश आंदोलनाने बाबासाहेबांना पुरते निराश केले. या लढ्यात अनेक वाईट अनुभव बाबासाहेबांना आलेत. अस्पृश्यांना झिडकारण्याची, सामाजिक विषमता जोपासणारी हिंदू धर्माची मानसिकता बाबासाहेबांच्या लक्षात आली. हिंदू धर्म किती निगरगट्ट आहे, माणूसकीला कलंकित करणाऱ्या अनेक वाईट परंपरा त्यांना किती प्रिय आहेत हेही त्यांच्या लक्षात आले. आपल्या प्रामाणिक प्रयत्नांकडे हिंदू समाज कसे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करतो आणि या समाजातील विद्याविभूषित मनेही किती पूर्वग्रहदुषित आणि जातीयवादी, धर्माभिमानी आहेत हेही बाबासाहेबांना समजले. वरून सुधारणावादी वाटणारे आणि तसे भासवणारे किती ढोंगी, किती स्वार्थी नि किती पोकळ आहेत याचाही अंदाज या निमित्ताने बाबासाहेबांना घेता आला. हे सगळे वाईट अनुभव असल्यामुळे नंतरच्या काळात बाबासाहेब फार काळजीपूर्वक नियोजन करतांना दिसतात. रचनात्मक कार्याला विधायक वळण कसे देता येईल यासाठी प्रयत्न करतांना दिसतात. दुसरे असे की धर्मपरिवर्तन करण्याची आकांक्षा बाबासाहेबांच्या मनात याच आंदोलनामुळे निर्माण झाली. जो धर्म समान दर्जा देत नाही, ज्या धर्मात माणूसकीने वागविले जात नाही, त्या धर्मात राहणे योग्‍य नाही असा मनाचा निर्धारही याच आंदोलनामुळे निर्माण झाला. एक लक्षात घेतले पाहिजे की, मंदिर प्रवेशाचे आंदोलन करीत असतांना बाबासाहेब आजुबाजुच्या वास्तवाकडे फार बारकाईने लक्ष पुरवितात. कुठलाही विपरीत परिणाम न होता आपल्या चळवळीची गती अधिक तेज कशी होईल याची ते सतत काळजी वाहतांना दिसतात. नंतरच्या काळात दलित समाजामध्ये धर्मभोळेपणा, दैववाद वाढू नये यासाठी ते सतत मार्गदर्शन करतात. दलित समाजाचे ऐक्य अभंग रहावे याची ते काटेकोर काळजी घेतात. कारण दलित समाजातील ऐक्याच्या भरोशावरच अनेक महत्वाची कामे करता येऊ शकतात या निष्कर्षापर्यंत बाबासाहेब आले होते. नाशिकच्या सत्याग्रहातून एकीचे दर्शन घडले. दलित समाजाच्या आक्रमतेचा परिचय झाला. या सत्याग्रहाची वार्ता तर ‘लंडन टाईम्स’ मध्ये प्रकाशीत झाली होती. यावरून या सत्याग्रहाने किती व्यापक स्वरूप धारण केले होते याची साक्ष पटेल. बाबासाहेबांनी दलितांच्या उत्थानासाठी पुढे जी काही राजकीय गणिते मांडलीत आणि यशस्वी केलीत त्यामध्ये अशा अनेक आंदोलनांचा महत्वपूर्ण वाटा आहे.
आता काळ फार बदलला आहे. कुठल्याही मंदिर प्रवेशाची चळवळ आंबेडकरवादी समाज आपल्या हाती घेणार नाही. दलित समाजाच्या अजेंड्यातला हा विषय केव्हाचाच हद्दपार झाला आहे. परंतु आजही आंबेडकरवादी समाजाच्या अस्मितेचे असे अनेक विषय आहेत, जे विषय पुर्णत्वाला जावे यासाठी आंबेडकरवादी समाज अनेक आघाड्यांवरती लढतांना दिसतो, आंदोलन करतांना दिसतो. परंतु आजही आंबेडकरवादी समाजाच्या हक्क-अधिकाराकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जाते. दिवसेंदिवस जातीधर्माच्या अस्मिता टोकदार होतांना दिसतात. जातीधर्माच्या नावावर अनेक पातळ्यांवरून शोषण केले जाते. देश समृध्द व्हावा असे वाटत असेल तर समतेशिवाय पर्याय नाही. सर्वांना समान लेखल्याशिवाय, समान हक्क-अधिकाराची वाटणी केल्याशिवाय पर्याय नाही. बाबासाहेबांनी उभारलेले काळाराम मंदिर प्रवेशाचे आंदोलन याच बाबी अधोरेखित करणारे होते. खरे तर विषमतेची मुळे उध्वस्त करून देशाच्या उन्नतीचा निरभ्र नकाशा तयार करणारे हे आंदोलन होते. परंतु या सत्याग्रहामध्ये स्पृश्य हिंदूंची टोकाची विकृत मानसिकता समोर आली. कुठलाही गुन्हा नसतांना अस्पृश्य बांधवांचा नानाविध पध्दतीने छळ करण्यात आला. ही चूक इतिहासाने पुन्हा कधी करू नये. कारण एखादी चूकही समाजजीवन दूषित करण्यास आणि देशाला मागे नेण्यास पुरेशी असते. अनेक वर्षे त्यामुळे आपण मागे खेचले जात असतो.
*भ्रमणभाष : ९४०४१२०४०९*

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button