बहुजन नायक कांशीरामजी !
बहुजन नायक कांशीरामजी !
आंबेडकरी चळवळीतील एक गतिमान व प्रगल्भ नेतृत्व बहुजन नायक मा.कांशीरामजी यांचा आज १५ मार्च रोजी जन्म दिवस.त्यांच्या पावण स्मृतीला विनम्र अभिवादन करताना,आम्हाला त्यांच्या चळवळीसाठीचा देशभरातील झंझावात आणि त्यासाठी दिलेली स्वतःची आहुती.आणि आपल्या सारखे निर्माण केलेले आहुतीवान…..अशा सर्व बाबींचे स्मरण होते.
काय तो त्यांचा झंझावात….सारेच स्त्री-पुरुष कार्यकर्तोंना एका निश्चित ध्येयाने झपाटून टाकले होते.ते स्वयंपूर्ण होते.म्हणून त्यात उर्जा होती,गती होती.त्या गतीने नैराश्यातील दलित, वंचित,शोषित बहुजन समाजात राजसत्तेचा पुर्नविश्वास जागवला आणि बघा भारताच्या सामाजिक, राजकीय वातावरणाला आपल्या अंगा-खांद्यावर घेत त्याला एका नव्या दिशेने वळते केले.ती दिशा होती फुले-शाहु-आंबेडकरांना अभिप्रेत नवसमाज रचनेची,नव राष्ट्र निर्मितीची.त्यासाठी मा.कांशीरामजी झपाटल्यासारखे गतिशील झाले होते.आणि आपल्या बरोबर सर्वांना गतिशील केले होते.काय ही किमया ! डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मृतप्राय मनुष्य जाती घटकात जीव ओतून त्यांना व्यवस्थे विरुद्ध बंडखोर म्हणून ठामपणे उभे केले होते.त्याला नंतर शिताफीने मोडून काढण्याचे अमानवीय कृत्य सत्ता, संपत्तीच्या जोरावर नेहरू-गांधी घराण्यासह संघ परिवार आणि त्यांचा पैठणी सरदार यशवंतराव चव्हाण पिलावळीने केले.रिपब्लिकन पक्ष मोडून काढला खरा पण आंबेडकरी समाजाला ते वाकवू शकले नाही.समाज वाघिणीचे दूध प्यारेला होता.तो कधी दलित पॅंथर,मॉस मुव्हमेंटच्या नावाने तर कधी दलित मुक्ती सेनेच्या रुपाने या सर्व प्रस्थापित समाज व्यवस्थेवर गुरगुरत होता.कधी रस्त्यावर येवून निकराने झगडत होता.तर कधी शब्द शस्त्राने वार करीत आपल्या लोकांना जागवत होता.असे असले तरी त्यातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत लक्ष्य गाठणे असंभव होते.कारण दलित पॅंथर,दलित मुक्ती सेना या संघटनांचा संघर्ष जाती अस्मितेचा होता.दलित आणि त्यातही आंबेडकरी समाजा भोवती होता. तो आपल्या स्वतःच्या जाती पर्यंत सीमित करणारा होता.आंबेडकरी समाज स्वत:त स्व-मग्न राहत असेल तर त्याचा फारसा काही परिणामकारक फरक प्रस्थापित सामाजिक व राजकीय व्यवस्थेवर पडणारा नव्हता.उलट आंबेडकरी समाजाला, हिंदू व त्यांच्या देव- धर्माची टवाळकी करतो म्हणून एकटे पाडल्या गेले होते.त्यातून आंबेडकरी समाजावर अन्याय,अत्याचाराचे सत्र अधिकच वाढले होते.हे संघी व कांग्रेसी राजकीय व्यवस्थेला ही पाहिजे होते.ते मात्र नाकळत पण जोशात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार व चळवळीच्या अगदी विपरीत होते.डॉ.बाबासाहेबांचे विचार व चळवळ होशावर अधिष्ठीत होती.तिचे लक्ष्य एक व्यक्ती- एक मूल्य गाठत देशाला प्रबुद्ध राष्ट्र म्हणून घडवून आणायचे होते.ते काही एका मूठभर जातीच्या आधारावर घडवून आणणे अशक्य होते.हे मा.कांशीरामजी यांनी हेरले.व अगोदर स्वतः पुढे येवून त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे पुनर्गठन कसे होईल ? या विचाराने कामाला लागले.पण सत्तेच्या मोहात आकंठ बुडालेल्या कांग्रेस छाप नेत्यांना कांशीरामजींची दृष्टी कशी कळणार ?
रिपब्लिकन नेत्यांची सत्ता, संपत्तीच्या मोहात आंबेडकरी विचार दृष्टीच हरवून गेली होती.त्यांचा नांद त्यागून कांशीरामजी हे आपल्या पुण्यातील काही मोजक्या सहकाऱ्यांच्या जोरावर ,’ आपला पैसा,आपली बुध्दी व आपली चळवळ ‘ या सूत्रातून कामाला लागले.नोकरीचा त्याग केला.आई-वडिलांना पत्र लिहून स्पष्ट सांगितले,मी आता तुमचा नाही.मी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा बंदा आहे.त्यांच्या विचाराच्या ध्येयपूर्तीसाठी स्वतःला अर्पण केले आहे.तेथून हा झंझावात जोराने सुरू होतो.आणि अवघ्या तीस वर्षांत संपूर्ण देश व्यापून बहुजन समाज उभा करतो.ही अफलातून किमया डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर घडवून आणली ती मा.कांशीरामजींनी ! ते कार्यकर्त्यांपुढे जोश भरताना नेहमी म्हणायचे,’ दिल में सही तमन्ना हो तो रास्ते निकल आते है,वह तमन्ना न हो तो बहाने बनकर आते है ‘ कांशीरामजींनी आंबेडकरी समाजातील नवशिक्षीत व जेमतेम सरकारी नोकरीवर लागलेल्या कुटुंबाच्या उमेदीच्या लोकांकडून पैसे काढले.त्यांना चळवळीत राबविले.ही अफलातून किमया होती.
या अस्मिता व अस्तित्वाच्या फुले-आंबेडकरी झंझावाताला जेथून सुरुवात झाली,त्या महाराष्ट्रातून त्याला थोपवून नाउमेद करण्याचा प्रयत्न सत्ताधारी काँग्रेस व पवारी टोळीने पडद्या आडून चालविला.त्यासाठी चेहरे आंबेडकरी समाजातीलच उभे केले.त्यात रिपब्लिकन नेते तर होतेच शिवाय पुरस्कार प्राप्तीस व काही वसीलेबाजीसाठी हपापलेले साहित्यिक,विचारवंत देखील होते.त्यांना कदाचित ठावूक नसावे, झंझावात कधी थांबत नसते.तो गतिशील असते.त्यातील नायक पुरुष कांशीरामजी तर डोक्याला कफन बांधून उतरले होते.’ मरणे किंवा मारणे ‘ हाच बाणा त्यांच्या पुढे पर्याय होता.महाराष्ट्रात चळवळीतील कांग्रेसी हस्तकां कडून कांशीरामजींची बदनामी,लोकांत दिशाभूल जोरात चालवली जात होती.त्यात यश मिळत नाही हे कांग्रेसी पवार टोळीच्या लक्षात येतात ,त्यांनी शेवटचा उपाय म्हणून १९९७ मध्ये रिपब्लिकन गटांचे ऐक्य घडवून महाराष्ट्रातून चार खासदार निवडून आणले.पक्षाचे ऐक्य झाले,त्याला राजकीय यश मिळाले.त्यामुळे महाराष्ट्रात आपले काम फारसे राहिले नाही.हे अर्धसत्य स्वीकारत कांशीरामजी उत्तर भारतात गेले.आणि तेथे कांग्रेस पक्षाला संपवण्याचा ध्यास घेतला.आणि त्यात यशस्वी पण झाले.कांशीरामजी एक गोष्ट आपल्या जाहीर भाषणातून नेहमी म्हणायचे, यशवंतराव चव्हाण सोबत दादासाहेब गायकवाड यांनी लोकसभा निवडणुकी साठी कांग्रेस -रिपब्लिकन पक्ष युती केली होती.यात समझोता असा होता, रिपब्लिकन पक्षाच्या वाट्याला लोकसभेची केवळ एक जागा देण्यात आली होती.ज्या पक्षाचे लोकसभेत ९ खासदार निवडून आले होते,त्या पक्षाला कांग्रेसने एक जागा देवून अस्तित्वापुढे प्रश्न उपस्थित केला होता.हा संदर्भ घेत , आंबेडकरी जनतेला भानावर आणण्यासाठी ते संतापून म्हणायचे, आंबेडकर एक जगह लडेंगा और गांधी बाकी सब….हा प्रकार ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा , त्यांच्या तालमीतील लेफ्टनंटनी केलेला घोर अपमान मानायचे.यावरुन ते भयंकर संतापून उठायचे.त्यांची मनाच्या मनात कांग्रेसचा सूड उगविण्याची भावना अनावर झाली होती.आणि ती संधी त्यांनी जुडवून आणली.तेव्हा केंद्रात कांग्रेसचे पी.व्ही.नरसिंहराव यांचे सरकार होते.त्या काळात उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणुका घोषित झाल्यात.या प्रदेशात कांग्रेस पक्षाची स्थिती मोठी दुबळी झाली होती.त्याला बसपा सोबत समझोता केल्या शिवाय पर्याय नव्हता.त्याच्या बोलणी साठी नरसिंहराव यांनी शरद पवारांना कांशीरामजी कडे पाठविले.ते दिल्लीतील रकाबगंज येथील बसपाच्या कार्यालयात पोहचले.कांशीरामजी आत होते.केंद्रीय संरक्षण मंत्री असलेले शरद पवार यांना,त्यांनी ( कांशीरामजी ) कार्यालयाच्या आगंतूकांसाठी असलेल्या ठिकाणी बसून वाट बघण्याचे कळविले.तास-दीड तास झाला.कांशीरामजी ,पवारांना काही बोलवायला तयार झाले नाही.या माणसाने महाराष्ट्रात आमच्या लोकांना असेच तासोंनितास वाट बघायला लावले आहे.त्याला असेच बसू द्या.शेवटी पवार तसेच जाण्याच्या बेतात असताना ,आतून कांशीरामजींचा निरोप आला.त्यांच्या समक्ष पवारांनी भेट व चर्चेचे नियोजन कथन केले.ऐकल्यानंतर कांशीराम म्हणाले,निवडणूक समझोत्यावर तुम्ही निर्णय घेणार की तुमचा पक्षाध्यक्ष नरसिंहराव ? असा प्रश्न करताच , पवार उत्तरले नरसिंहराव निर्णय घेणार.असे सांगतात कांशीराम म्हणाले,मग तुमच्याशी कशाला चर्चा ? पवार निघाले.नंतर ही बोलणी नरसिंहराव यांच्याशी झाली.तेथे ठरले,गांधींची कांग्रेस फक्त शंभर तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा बसपा हा तीनशेच्या पार सर्व जागा लढवेल.हे जाहीर सभेतून कांशीरामजी आवर्जून सांगत, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमानाचा सूड मी असा उगविला,हे कथन करायचे.
कांशीराम जी कट्टर आंबेडकरी होते.त्यांना त्यांच्या विचारांची दूरदृष्टी आली होती.म्हणून त्यांनी १५ विरुद्ध ८५ ही प्रस्थापित विरुद्ध बहुजन समाज अशी संकल्पना मांडून अनुसूचित जाती, जमाती व ओबीसी सह धार्मिक अल्पसंख्याकांना जोडण्याचा प्रयत्न केला.त्यांच्या जाती तोडून बंधुभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ओबीसींसाठी असलेल्या मंडल आयोगाच्या अंमलबजावणी साठी देशभर फिरून ओबीसीत जनजागृती चालविली.आणि केंद्र सरकारला मंडल आयोग लागू करण्यास बाध्य केले. त्याला यश मिळाल्याने त्यांचा बहुजन समाज पक्ष अल्पावधीत देशातील मान्यता प्राप्त तिसरी राजकीय शक्ती म्हणून उदयास आली.तिचे अस्तित्व आज मायावतींनी चाचपडायला लावले आहे.ही आंबेडकरी चळवळीची शोकांतिका म्हणता येईल.तरी चळवळीत व्यक्ती जात-येत असतात.पण चळवळीचे तसे नसते.तिला वैचारिक आधारावर जीवंत ठेवणारे लोक समूह लागतात.तो समूह साबूत आहे.त्यामुळे आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची राजकीय चळवळ दुबळी जाणवत असली तरी ती आचार- विचाराने समृध्द आहे.ते काही आचार-विचार कांग्रेस,भाजपचे नाहीत.ते तर वाळूच्या ढिगाऱ्यावर उभ्या आहेत.त्याला एक लाथ मारण्यासाठी मा.कांशीरामजी हवा आहे……
-मिलिंद फुलझेले