श्रमाची प्रतिष्ठा स्थापित करणे गरजेचे
श्रमाची प्रतिष्ठा स्थापित करणे गरजेचे
ज्या श्रमातून भांडवल तयार होते ते कामगाराचे अतिरिक्त श्रम असते आणि श्रमातूनच भांडवल तयार होण्याची प्रक्रिया अव्याहत सुरू असते. पण भांडवलाची निर्मिती करणाऱ्या श्रमाला योग्य तो
मोबदला मिळत नाही म्हणून यात संघर्षही अंतर्भूत आहे. कामगार आणि भांडवल यांच्या वरील संबंधारून , कामगार दिनाचा इतिहास देखील गुंफलेला आहे, जो दरवर्षी 1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. मूलतः 1 मे दिवस 1886 मध्ये अमेरीका मधिल शिकागो, येथे 8 तास कामाच्या मागणीसाठी कामगार संतापाच्या अभूतपूर्व विद्रोहाचा उठावाचा परिणाम म्हणून साजरा करण्यात आला या मध्ये आठ कामगार नेत्यांना फाशी देण्यात आली. श्रमाची मानवी प्रतिष्ठा प्रस्थापित करण्यासाठी त्या हुतात्म्यांना 1 मे दिनानिमित्त आदरांजली अर्पण करून, भांडवलातून अवाजवी नफा कमावण्याच्या कारस्थानाविरुद्ध आपल्या एकजुटीचा आणि भविष्यातील संघर्षाचा संकल्प व्यक्त केला जातो. शोषणमुक्त समाज साकार करण्याच्या त्यांच्या संकल्पाचा ते पुनरुच्चार करतात.
1 मे दिन हा कामगार वर्गाच्या एकतेचा असा दिवस आहे की ज्यात धर्म, वर्णभेद, प्रदेश, जात, लिंग या अस्मितेला काही अर्थ नाही हा दिवस जो जगभरातील कामगार वर्गाला एका धाग्यात बांधतो आणि तो म्हणजे सर्व प्रकारच्या शोषणातून मानवी श्रमाची मुक्तता आणि श्रमाचा सन्मान पुनर्संचयित करण्याच्या दृढ संघर्षाच्या ऊर्जेचा अविष्कार म्हणजे कामगार दिन होय .
आज युरोपातील विकसित देशांसह सर्व उपखंडात प्रचंड नाराजी दिसून येते. कामगारांवरील संकटाचा भार वाढत असून , राहणीमानाचा खर्च आणि रोजगाराच्या घटत्या संधींमुळे परिस्थिती बिकट झाली आहे. रेल्वे,दळणवळण वाहतूक, बँका, विमान वाहतूक, ऊर्जा, आरोग्य, खाणकाम इत्यादी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांमध्ये खासगीकरणामुळे कामगार कपात मुळे व्यवस्थेत लादल्या जात असलेल्या कथित सुधारणा, संप आणि कामावर निलंबन इत्यादींच्या विरोधात आंदोलनात्मक कारवाई दिसून येते. भारतात खाजगीकरणामुळे मध्यमवर्गीय बँक कर्मचार्यांनाही राष्ट्रीय स्तरावर संप वगैरे करावे लागतात. कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करण्याच्या नादात, मूलभूत कामगार कायद्यांकडे दुर्लक्ष करून संसदेने कामगार संहिता लागू केल्या आहेत. या अंतर्गत आठ तास कामाचा दिवस, औद्योगिक सुरक्षा, किमान वेतन, समान कामासाठी समान वेतन , काढून टाकणे यासंबंधी सेवा सुरक्षा नियम या वैधानिक तरतुदी आता नाहीशा होत आहेत. गेल्या ५ एप्रिलला दिल्लीतील सर्व क्षेत्रातील कामगारांनी ज्या प्रकारे अभूतपूर्व एकजूट दाखवली, त्यावरून तीव्र होत चाललेल्या असंतोषालाच पुष्टी मिळते भारत अशा देशांमध्ये येतो जिथे आर्थिक विषमतेची दरी जगात सर्वात जास्त आहे.
जवळपास तीन दशकांच्या जागतिकीकरणाच्या जलद प्रक्रियेमुळे उत्पादन पद्धतीत बदल घडून आल्याने कामगार वर्गाला नवीन आव्हानांना सामोरे जावे लागले आहे. राष्ट्रीय सीमा तोडून उत्पादन प्रक्रियेने आता बहुराष्ट्रीय स्वरूप धारण केले आहे. एका देशातील कामगारांनी त्यांच्या न्याय्य प्रश्नांवर संघर्ष करून कॉर्पोरेट नफ्याच्या दराला आव्हान दिले, तर त्यांच्यासाठी उत्पादन दुसऱ्या देशात हलवण्याचा सोपा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर कामगार एकतेकडे वाटचाल करणे अधिक गरजेचे बनले आहे.
किंबहुना, आज जगाच्या सकल उत्पादनाचा फार मोठा भाग प्रत्यक्षात वित्त भांडवलाच्या मालकीचा आहे आणि तो वाढतच आहे. वित्त भांडवल त्याच्या चंचलतेसाठी कुप्रसिद्ध आहे, औद्योगिक किंवा बँक-आधारित भांडवलाऐवजी सट्टा आणि फ्युचर्स ट्रेडिंगच्या रूपात जगभरात नफा मिळवते. स्वस्त वेतन आणि कॉर्पोरेट फ्रेंडली गव्हर्नन्सच्या शोधात ती भांडवलदार कुठेही आपले स्थान बदलू शकते. नवउदारवादी व्यवस्था कॉर्पोरेटला पूर्णपणे सूट देते पण त्यात मजुरांसाठी उदारता दाखवत नाही. अशाप्रकारे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने संघटन आणि सामूहिक सौदेबाजीच्या संदर्भात मान्य केलेल्या कामगार अधिकारांच्या असंबद्धतेमुळे परिस्थिती आणखीनच वाढली आहे.
सेवा क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षेची स्थिती अशी आहे की, भारतात गेल्या पाच वर्षांत गटार साफ करताना एक हजारहून अधिक तरुणांचा मृत्यू झाला आहे. आजच्या युगात या मृत्यूंना धोरणकर्त्यांकडे काही उत्तर आहे का? हा एक महत्त्वाचा प्रश्न असून उत्पादन व्यवस्थेतील प्रचंड बदलांमुळे केवळ कामगार वर्गालाच नव्हे तर संपूर्ण समाजाला अशा नवीन आव्हानांना सामोरे जावे लागत आहे .
आज ज्या वर्गांनी रोजगार गमावला आहे, त्यात सर्वात जास्त महीला व युवकांचा समावेश आहे ग्रामीण भागातील बेरोजगारीची परिस्थिती गंभीर होत आहे. भूमिहीन घटकांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. लोकांचे किमान उत्पन्न वाढवल्याशिवाय आणि त्यांची क्रयशक्ती वाढवल्याशिवाय अर्थव्यवस्थेचे संकट सुटण्याची शक्यता नाही या साठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे
विकास परसराम मेश्राम मु+पो,झरपडा ता अर्जुनी मोरगाव जिल्हा गोदिया मोबाईल नंबर 7875592800