सामाजिक स्वास्थ्यासाठी चित्रपटाची नितांत आवश्यकता : पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली काळे
सामाजिक स्वास्थ्यासाठी चित्रपटाची नितांत आवश्यकता -पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली काळे
अक्षर मानव आणि सोलापूर विद्यापीठातर्फे चित्रपट वितरण कार्यशाळेस शुभारंभ
सोलापूर : प्रतिनिधी
समाजात गुन्हेगारी वाढत आहे. पोलिस म्हणून आम्ही यावर प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न करत असतोच. मात्र चित्रपट हे सामाजिक प्रबोधन करतात. त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी चित्रपट माध्यमाची नितांत आवश्यकता आहे. अक्षर मानव आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने ही चित्रपट वितरण कार्यशाळा आयोजित करून या प्रक्रियेला गती दिली आहे, असे प्रतिपादन पोलिस उपायुक्त डॉ. दिपाली काळे यांनी केले.
अक्षर मानव चित्रपट विभाग आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय चित्रपट वितरण कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. दिपाली काळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिध्द साहित्यिक राजन खान होते. विद्यापीठाचे प्र – कुलगुरू प्रा. डॉ. गौतम कांबळे यांची विशेष उपस्थिती होती. अक्षर मानव चित्रपट विभागाचे अध्यक्ष प्रवीण जावळे, अक्षर मानव वितरण विभागाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद काळे, मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांचीही उपस्थिती होती.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठाच्या सामाजिक शास्त्रे संकुल सभागृहात ही दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
अक्षर मानव संस्थेचे अध्यक्ष राजन खान अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, बुद्ध, चार्वाकांचे विचार पुढे नेण्याचे काम अक्षर मानव ही संस्था करत आहे. हल्ली हृदयापासून संवाद होत नाही. मानवातील संवाद वाढायला हवा. माणूस म्हणून एकत्र येऊ. काहीतरी नवे करू. राज्यशासन जसे चालते तसे समाजाचे काम समाजाकडून चालावे. अख्या जगाचे दर्शन घडविण्याची आणि बिघडवण्याची ताकद चित्रपटात असते. समाजाला पुढे घेऊन जाणारे, समाज घडविणारे चित्रपट पुढे यावेत यासाठी आम्ही काम करत आहोत. चित्रपट क्षेत्रात लॉबिंग चालते. त्यांच्या नादाला आम्ही लागणार नाही.आम्ही आमची नवी व्यवस्था निर्माण करू.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र- कुलगुरू प्रा. डॉ. गौतम कांबळे म्हणाले की, अक्षर मानव या संस्थेने विद्यापीठाच्या सहकार्याने घेतलेली कार्यशाळा महत्त्वाची आहे. अनेकांच्या डोक्यात विविध संकल्पना असतात मात्र त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी अशा कार्यशाळेची उपयुक्तता आहे. या कार्यशाळेचा विद्यार्थ्याना चांगला फायदा होईल. विद्यापीठातील मास कम्युनिकेशन विभागाच्या टिव्ही आणि रेडीओ स्टुडिओमुळे शॉर्टफिल्म आणि डॉक्युमेंट्री बनविण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या आव्हानात्मक क्षेत्रात टिकून राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी अशा कार्यशाळांचे नितांत आवश्यकता आहे.
दुपारच्या सत्रात अजय फुटाणे (चित्रपट वितरक), ॲड. किरण रोंगे पाटील, राजन खान, सागर वंजारी यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक डॉ. औदुंबर मस्के यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे, श्री. नागेश खराडे यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. अंबादास भासके यांनी मानले. ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी प्रवीण सोनवणे, रवी गजधाने, अमोल वाघमारे, पवन भालेदार, डॉ. बाळासाहेब मागाडे, ऋषीकेश मंडलिक आदी परिश्रम घेत आहेत.