सामाजिक

अशा निर्घृण प्रकारांना कधी निर्बंध बसणार आहे?

…अशा निर्घृण प्रकारांना कधी निर्बंध बसणार आहे?

१४ एप्रिल २०२३ रोजी नांदेड जिल्ह्यातील बोंढार गावामध्ये सवर्ण समाजाचा विरोध असतांनाही थाटामाटात जयंती साजरी केल्याचा राग मनात ठेवून, सवर्ण समाजाच्या गावगुंडांनी १ जून २०२३ रोजी निष्पाप अक्षय भालेरावची भोसकून निर्घृण हत्या केली. यापुर्वीही बौद्ध वस्तीवर हल्ले झाले असून, २०१६ मध्ये विहाराचीही तोडफोड करण्यात आली होती, तसेच भीम जयंती साजरी करु दिली जात नव्हती. आधुनिक अखंड भारताचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जगभरात जल्लोषात जयंती साजरी होत असतांना, नांदेड जिल्ह्यातील बोंढार गावामध्ये जयंतीला विरोध करणाऱ्या दळभद्री लोकांवर इतकी वर्षे कारवाई का झाली नाही ? महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या अशा निंदनीय घटना खरंच तुम्हाला अभिमानास्पद आहेत का ?

काही वर्षापुर्वी नागपूरच्या अरविंद बनसोडच्या निर्घृण हत्येनंतर, पिंपरी चिंचवड येथे विराज जगताप या २० वर्षीय तरुणाला अमानुषपणे मारहाण करुन हत्या करण्यात आली तर साळापुरी, ता. पुर्णा, जि. परभणी व जळगांव येथे बौद्ध तरुणांवर सामुहिक जीवघेणा हल्ला करण्यात आला. माणसे मारण्या इतपत यांच्यात धाडस कसे निर्माण होते त्यातच आश्चर्य वाटते. असा राजरोसपणे हिंसाचार करतांना यांना कायद्याचा धाक अन् कायदाच नसल्यासारखी परिस्थिती का वाटते ? अशा घटना बघून महाराष्ट्रात जी काही प्रबोधन करणारी मंडळी आहेत त्यांनी बौद्ध वस्त्यांमध्ये प्रबोधन करण्यापेक्षा, आपल्या समाजात प्रबोधन करावे असे त्यांना वाटत नाही का ? आज आंबेडकरी समाजाला नव्हे तर, त्यांनाच खरी प्रबोधन अन् मानसिक परिवर्तनाची नितांत गरज आहे.

गेली अनेक वर्षे राजरोसपणे वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या पातळ्यांवर राज्यात भयानक, अमानुष अन्याय अत्याचार आंबेडकरी समाजासह, उपेक्षित समाजावर निर्दयपणे होत आहेत. खैरलांजी भोतमांगे वंश संहार प्रकरण, सोनई, नितीन आगे, स्वप्निल सोनावणे, जवखेडा, मोबाईल रिंगटोन, जयंती मिरवणूकांवर दगडफेक, मिरवणूकीतून जयंतीवर दगडफेक, भीमाकोरेगांव हिंसाचार अशा अनेक अन्याय अत्याचारांने क्रौर्याचे कळस कोणत्या मानसिकतेतून गाठले आहेत ? महापुरुषांनाही सोडले जात नाही. यांना हिंसाचार घडवण्यासाठी, माणसे मारण्यासाठी प्रमाणपत्र तर देण्यात आलेली नाहीत ना ? मग, सातत्याने असे अन्याय अत्याचार का अन् कशासाठी घडतात ? समाजा समाजामध्ये एवढी टोकाची द्वेषाची भावना का ? अन्याय अत्याचारांने आंबेडकरी समाज नेहमीच भरडला जात आहे. अन्याय अत्याचाराबाबत आंबेडकरी समाज, संघटना नेहमीच आक्रोश करीत असतात. त्यांनी केलेली निवेदने, सत्यशोधन अहवाल हे अरण्यरुदनचं ठरते. प्रसार माध्यमातून त्याची दखल घेतली जात नाही अन् प्रशासन व्यवस्था तपास सुरु आहे या सबबीखाली वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम करते.

जातीय विकृत मानसिकतेतून पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात सातत्याने हिंसाचार घडत आहेत. एवढी टोकाची भूमिका घेण्याइतपत यांची जातीय अस्मिता, पोकळ अहंकार इतक्या पराकोटीचा धारदार बनल्यांने सामाजिक प्रतिष्ठा उफाळून येत असतील तर, डॉक्टर, वकिल, इंजिनिअर, राजकीय नेते व इतर प्रतिष्ठीत, उच्च क्षेत्रात कार्यरत असलेल्या काही समाज घटकातील मंडळी जेव्हा आंतरजातीय विवाह करतात तेव्हा त्यांच्या जातीय सामाजिक प्रतिष्ठा, अस्मिता, अहंकार कधी उफाळून येत नाहीत. अशा सुशिक्षित, परिवर्तनवादी, पुरोगामी कुटुंबांना जातीय सामाजिक प्रतिष्ठा, अस्मिता, अहंकार नसतो का ? तेव्हा तुम्हाला जात, धर्म दिसत नाही का ? हिंसक, रानटी होण्याइतपत सामाजिक प्रतिष्ठा पाशवी होणार असेल तर, तीला शूद्र, विकृत, रानटी जातीय मानसिकताच म्हटली पाहिजे. अशा खोट्या, ग्रासलेल्या सामाजिक प्रतिष्ठेचा शेवट काय होतो ? तरी सुध्दा सामाजिक प्रतिष्ठा नव्हे तर, जातीय मानसिक विकृतीपायी हे लोक रानटी का बनतात ? अमेरिकेत वर्णभेदावरुन झालेल्या काळ्या व्यक्तीच्या हत्येच्या निषेधार्थ गोर्‍या लोकांनीही रस्त्यावर येऊन आंदोलन केले अन् आपल्याकडे आरोपीच्याच समर्थनार्थ, त्याला वाचविण्यासाठी एकत्र येतात. (?) याला न्याय, माणूसकी म्हणता येईल का ? रक्त पेढीमध्ये रक्ताची विभागणी जाती, धर्मानुसार केली जात नाही पण, अत्यावश्यक वेळी ते रक्त चालतेचं ना तुम्हांला ? मग तुम्हाला जातीचा एवढा माज का ?

जातिव्यवस्थेवर जेवढी चर्चा झाली तेवढी जाती निर्मुंलनावर चर्चा झाली नाही. कारण, जातीयता ही मानसिकता बनली असून भविष्यात त्याचे उघड उघड भयानक दुष्परिणाम दिसून येणार आहेत. व्यसनमुक्ती, हगणदारीमुक्त गांव अभियानाबरोबरच, शासन आणि सर्व राजकीय पक्ष जातीयतेचे निर्मुंलन करण्यासाठी जातमुक्त गांव अभियान का राबवत नाहीत ? अस्पृश्यता निवारणार्थ आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून अर्थसहाय्य दिले जात असले तरी आंतरजातीय विवाह करणार्‍यांच्या संरक्षणासाठी विशेष तरतूद करण्यात आलेली नाही. म्हणूनचं ऑनर किलिंग या गोंडस नावांने हत्याकांड घडतात. राजकीय नेते व राजकीय पक्षांकडे सकारात्मक दृष्टीकोन अन् इच्छाशक्तीचा अभाव असल्यानेचं जातीयता नष्ट न होता, राजकीय सोयीसाठी जोपासली जाते. ते ज्या समाज घटकामध्ये जातात तिथे त्यांची भूमिका नेहमीच वेगळी वेगळी असते. जातीपातींच्या जीवघेण्या चक्रव्यूहाला छेद न देता, त्यांनी नेहमीचं मौन बाळगले आहे. तसेच, काही राजकीय पक्षांचे मागासवर्गीय सेल सुध्दा आहेत. पण, त्यांनी अशा प्रकरणी कधी तोंड उघडले नाही. अन् स्वतःला पुरोगामी, परिवर्तनवादी समजणारे जाती निर्मुंलनाच्या लढ्यात, अन्याय अत्याचाराच्या लढ्यात मौन बाळगून निष्क्रिय राहिले. त्यांच्या कधी भूमिका अथवा प्रतिक्रिया कधीच स्पष्ट होत नाहीत.

*- मिलिंद कांबळे चिंचवलकर*

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button