कबीर: एक विद्रोही संत
कबीर: एक विद्रोही संत
अनेक वर्षापासून इथल्या ओबिसी – मराठा, बहुजनांच्या मनात असलेल्या चमत्कार व अंधश्रद्धेच्या मरगळाला बाहेर काढण्याचे काम आपल्या प्रगत विचाराने व कृतीने अनेक समाज सुधारकांनी आणि साधु – संतांनी केले आहे आणि आजही ते सातत्याने सुरू आहे. भारतात मध्ययुगीन काळात सामजिक सुधारणेचा पाया हा संतांनी घातलेला आहे. उत्तर भारतात ती ‘भक्ती चळवळ’ म्हणून, महाराष्ट्र व दक्षिण भारतात ‘वारकरी चळवळ’ , बसवेश्र्वरांची लिंगायत चळवळ म्हणजे संत रोहिदास, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, चक्रधर, बसवेश्वर, गुरुनानक, एकनाथ महाराज, संत कबीर, संत गुरुनानक, तुकाराम महाराज ते आधुनिक युगात गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज यांनी समाज सुधारणेचे कार्य आपल्या वाणीतून व कृतीतून केले आहे. या संत मालिकेतील एक नाव म्हणजे कबीर. ज्याने जात – पात व कोणताही धर्म न पाहता. वाईट म्हणून जे – जे असेल, मानवतेला काळीमा फासणारे जे असेल, लोकांची लूट करणारे जे असेल, जे अज्ञान व अंधश्रद्धा असेल त्यावर आपल्या कृतीतून व वाणीतून प्रहार केलेले आहे. अशा सुधारणावादी विद्रोही संताला डॉ. बाबसाहेब आंबेडकरांनी आपले गुरू मानले होते. या गुरू संत कबिराची आज जयंती..
आपण शालेय जीवनात विज्ञान विषयात सजीव – निर्जीवा संदर्भात अभ्यास करतो. दगड हा निर्जीव असल्याचे मान्य केले आहे. तो अचल आहे, त्याच्यात जीव नाही, तो कोणाला काही देत नाही, हे अभ्यासले असून सुद्धा, आपल्या जिवनात मात्र त्याच दगडाचे पुजन करुन जो अपल्याला काही देवू शकत नाही त्याला आपण नवस करतो. परंतु ज्यांच्यावर आपली उपजीविका त्यांना मात्र दूर ठेवतो. अशा लोकांना जागृत करण्यासंदर्भात कबीर म्हणतात…..,
*”दुनिया कितनी बावरी जो पत्थर पूजा जाए|*
*घर की चकिया कोई न पूजे, जिसका पिसा खाये|”*
पुढे तर कबीर म्हणतात की, जर दगडाची पूजा केल्याने ईश्वर मिळत असेल तर मी लहान दगड कशाला पुजत बसणार? त्यापेक्षा मोठा दगड म्हणजे पहाडाचीच पूजा करणार.
*”पत्थर पूजे हरी मिले, मै तो पुजू पहाड |”* माणसाची सेवा करण्यापेक्षा दगड – धोंड्यांची पूजा करण्यात धन्यता मानणाऱ्यांना संत कबीर अशा पद्धतीने त्यांच्या दोह्यातून हल्ला करतात.
कबिराच्या काळात बहुजन समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी होते. नव्हें त्याला शिक्षणाच्या – ज्ञानाच्या प्रवाहापासून दुरच ठेवण्यात आले होते. सनातनी – पुरोहित जे सांगतील त्याची कोणतीही चिकित्सा न करता तो स्वीकारत असे. पुरोहित वर्गाने जे कर्मकांड सांगितले ते तो मुकाट्याने करत असे. प्रश्न विचारणाऱ्याला, तर्क करणाऱ्याला वैकुंठ गमनाचा रस्ता दाखविल्या जात असे. परंतु वर्तमानात आम्ही विज्ञान युगात आणि राजकिय दृष्ट्या लोकशाही शासन व्यवस्थेत शिक्षणच नव्हे तर उच्च शिक्षित होऊन सुद्धा आम्ही चालत आलेल्या प्रथा – परंपरा चिकित्सा न करता जसेच्या तसे स्वीकारत आहोत. म्हणून पाचशे वर्षानंतरही कबिराला आठवावे लागते. कारण कबीर म्हणाले होते……,
*” माटी का एक नाग बनाके, पूजे लोग लुगाया |*
*जिंदा नाग जब घर में निकले, ले लाठी धमकाया ||*
एकीकडे देवाचा अवतार म्हणून मातीच्या नागाची पुजा करतो आणि दुसरीकडे जिवंत नाग दिसला की त्याला मारल्या शिवाय ठेवत नाही.
आजही आम्ही अशा दुहेरी विचारधारेत जगत आहोत. आपण काय करत आहोत, हे अपणालाच माहीत नाही.
सामान्य जनतेचा असा समज आहे की, तीर्थक्षेत्रे पुण्यभूमी आहेत. तिथे गेल्यानंतर पुण्य प्राप्त होते, परंतु तीर्थक्षेत्रांत तिथे चालणाऱ्या व्यवहारीक गोष्टींचा आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा हे तीर्थक्षेत्र मोठी बाजारपेठा आहेत असे लक्षात येते. श्रद्धेच्या नावाखाली सामान्य लोकांची फसवणूक होत असते. यासंदर्भात कबीर म्हणतात…..
*”तीरथ गये तीन जना, चीत खोटा मन चोर|*
*एकौ पाप न काटियॉ, लाए मन दस और ||”*
म्हणजे तीन लोक आपल्या पापक्षालनासाठी तीर्थक्षेत्रला गेले परंतु त्यांचे पापक्षालन झाले नाही. उलट त्यांच्यात दहापट पापी मनाची भर पडली.
अनेकांचा असा समज आहे की, तीर्थक्षेत्रातील पाण्यात अंघोळ केल्याने किंवा तीर्थक्षेत्रातील नदीत स्नान केल्याने आपले पाप धुवून निघतात किंवा आपल्याला पुण्य प्राप्त होतो. ही धारणा किती चुकीची आहे, हे पटवून देताना ते म्हणतात…
*”जल कै मंजन जो गति होई, मीना नीत ही नहावै|*
*जैसे मीना तेरा नरा, फिरी फिरी जोमी आवै||”* म्हणजे तीर्थक्षेत्रातील पवित्र पाण्यात अंघोळ केल्याने पाप मुक्ती होते असा समज ज्यांचा आहे, त्यांना खरंतर वास्तवाची जाणीव नाही. कारण त्याच पाण्यात अनेक जलचर, मासे असतात, मग त्यांची कधीच मुक्ती झालेली नाही. त्याच पाण्याने माणसाची मुक्ती कशी बरं होईल?
देवाला नैवेद्य दाखवण्याच्या संदर्भात गाडगेबाबाने तर प्रचंड टीका केलेली आहे. देव नैवेद्याचा भुकेलेला नसतो तर तो भावाचा भुकेलेला असतो, असं ते म्हणाले. गाडगेबाबा त्यांच्या कीर्तनात जे दाखले देत ते बहुतांश संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील आणि संत कबीराच्या दोह्यातील असत. त्याचाच एक पुरावा म्हणजे संत कबीर सुद्धा म्हणाले की, देवाला नैवेद्याची गरज नसते, तर देवाच्या नैवेद्याच्या नावावर पुजाऱ्याचं पोट भरत असते. नैवेद्य हा पुजाऱ्यांच्या लबाडीचा प्रकार आहे या संदर्भात संत कबीर म्हणतात….,
*”लाडू लावन लापसी, पूजा चढै अपार |*
*पूजी पुजारा ले गया, दे मूर्ति कै मुही छारा ||”*
म्हणजे जो पुजारी देवाच्या मूर्तीला नैवेद्य दाखवून स्वतःच खातो, खऱ्या अर्थाने तो देवाचा भक्त असू शकत नाही. असे करून तो लोकांची फसवणूक करीत असतो.
सामान्य लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन, पुरोहितांनी स्वर्ग – नरकाची भीती दाखवून त्यांची लूट केलेली आहे. लोकांची फसवणूक करत असतात. या संदर्भात सावध करताना संत कबीर म्हणतात….
*”सरग लोग ना वाछीये, डरिये नरकनिवास |*
*हुंणा था सो ह्य रह्या, मनहू न की जै झुठी आस ||”* म्हणजे स्वर्गाची इच्छा करू नका आणि नरकाला घाबरूही नका. मृत्यू हा अटळ आहे. मृत्यू नंतर स्वर्ग प्राप्त होईल ही शुद्ध खोटी आशा आहे. मित्रांनो माणूस हा सर्वात जास्त स्वतःच्या मृत्यूला घाबरतो. दुसरीकडे त्याला स्वर्ग खूप चांगला वाटतो परंतु स्वर्ग प्राप्तीसाठी मृत्यू यावा लागतो आणि माणूस मृत्यूला घाबरतो. माणसाला अमरत्व कसे येईल यासाठी माणूस प्रयत्नरत आहे. माणसाला स्वर्ग आणि अमरत्व यापैकी एकच मिळू शकतो. दोन्ही शक्य नाही. तरीही दोन्हीच्या मागे लागून माणूस त्याचा मूर्खपणा सिद्ध करत आहे.
++ *दोन्ही धर्मांच्या वाईट रुढींवर प्रहार:-* त्यांनी फक्त हिंदू धर्मातीलच वाईट रुढी परंपरावर टीका केली नाही तर मुस्लिम धर्मातील वाईट व्रत वैकल्यावर सुद्धा हल्ला केलेला आहे. कबीर म्हणतात, *”हिंदू एकादशी करें चौबीसो, रोजा मुसलमाना |*
*ग्यारह मास कहो किन हारै एके महा न आना||”* म्हणजे हिंदू एकादशी करतात, मुसलमान रोजे करतात. हिंदू एकादशीला ईश्वराचा दिवस मानतात तर मुसलमान रोजाला अल्लाहचा दिवस मानतात. म्हणजे हिंदू – मुसलमानांच्या नुसार एकादशी आणि रोजाचा दिवस सोडला तर अन्य दिवस हे ईश्वराचे नसतात.
कबीराने मुस्लिम आणि हिंदू धर्मियांच्या जीर्ण कल्पनांवर टीका केली. त्याचबरोबर दोन्ही धर्मातील लोकांना सन्मार्ग सुद्धा दाखवलेला आहे. माणसाला वैचारिकरित्या शहाणा करणे हा कबीराचा ध्यास होता. म्हणून ते म्हणतात,
“हिंदू मुआ राम कहि,
मुसलमान खुदाई |
कहै कबीर सो जीवता,
जो दुहूं कै निकटि न जाई||”
म्हणजे हिंदू ‘राम – राम’ म्हणत मेले, तर मुसलमान ‘खुदा – खुदा’ म्हणत मेले. कबीर म्हणतात या दोघां जवळ जो गेला नाही, तोच खरा शहाणा माणूस होय. कबीराने हिंदू धर्मातील वाईट रुढीवर टीका केली. तरीसुद्धा त्यांना संत म्हणून मान्यता प्राप्त झाली. तसेच मुस्लिम धर्मावर टीका करून सुद्धा मुस्लिम लोक त्यांना ‘पीर’ समजू लागले. मित्रांनो कबीराच्या कार्याचे यश यातच आहे.
धर्माच्या नावाखाली आपआपसात भांडणाऱ्या हिंदु – मुस्लीम लोकांना भांडण थांबवून, सत्याचा स्वीकार करण्यास सांगताना म्हणतात,
*”हिन्दू कहें मोही राम पियारा, तुर्क कहें रहमान|*
*आपस में दोउ लड़ी मुए, मरम न कोउ जान”||*
म्हणजे हिंदू म्हणतो राम हाच ईश्वर आहे. तर मुसलमान म्हणतो अल्लाह हाच इश्वर. यावरून दोन्ही धर्मातील लोक आपापसात भांडण करत मरत आहेत. तरीही सत्य जाणण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही. आज सुद्धा दोन्ही धर्मातील सामान्य लोकांना धर्मांच्या नावावर भांडायला लावून, मरणाच्या टाळूवरील लोणी खात, उच्च वर्णीय व राज्यकर्ते सत्तेचा मलिदा चाखत आहेत.
मित्रांनो संत महापुरुष हे एका ग्रंथात, व्याख्यानात, कवितेत आणि पोवड्यात सामावणारे व्यक्तिमतत्व नाहीत. त्यांना जेवढ शोधत जाऊ तेवढे प्रतिदिन नवीन शिकवण देत असतात. कबिराच्या या जयंतीदिनी त्यांच्या त्यागाचा, ऐक्याचा, समतेचा, वैज्ञानिक विचाराचा, मानवतेचा स्वीर करून त्यांना अभिवादन करू या.
*अनिल भुसारी, तुमसर जि. भंडारा* 8999843978