चित्रपट

चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पनाकथेपलीकडचा चित्रपट – चित्रपट कलेचा रसास्वाद

चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना
कथेपलीकडचा चित्रपट – चित्रपट कलेचा रसास्वाद
-सुहास किर्लोस्कर

समाज व्यवस्थेत आणि शिक्षण व्यवस्थेत अनेक विरोधाभास आहेत. दहा व्यक्तींचे फोन नंबर लक्षात ठेवणेही अलीकडे अनेक युवकांना, प्रौढ व्यक्तींना शक्य नसते परंतु शिकवलेले सगळे लक्षात ठेवण्याची अपेक्षा लहान मुलांकडून केली जाते. एकूणच आताची व्यवस्था लहान मुला-मुलींना कशा प्रकारे त्रास देते, त्यांच्या मानसिकतेचा विचार कसा करत नाही याबद्दल अमोल गुप्ते यांना अनेक प्रश्न पडले. प्रत्येक मुल भाषा-विज्ञान-गणित-समाजशास्त्र अशा विषयात प्राविण्य मिळवू शकत नाही. काही मुलांमध्ये कलाविषयक कौशल्य असू शकते. डिसलेक्सीयाप्रमाणे अन्य कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांमध्येही काही विशेष गुण असतात. त्या गुणांची पारख करून त्यानुसार संगोपन करणारी आणि त्या मुलांची आवड ओळखून तशा पद्धतीने शिक्षण देणारी व्यवस्था समाज आणि पालकांमध्ये नसल्याचे अमोल गुप्ते यांना जाणवले. समोरच्या बाजूने फेकलेला चेंडू आपल्यापर्यंत किती वेळेत कुठे पोहोचेल याची आडाखे काही मुलांना बांधता येत नाहीत. त्यांना डावे-उजवे अशा दिशा पटकन कळत नाहीत, काही मुलांना काळ-काम-वेगाची गणिते सोडवता येत नाहीत. दहा वर्षे अशा शेकडो मुलांचे निरीक्षण करून त्यांच्याशी संवाद साधल्यावर अमोल गुप्ते यांनी ‘ईशान अवस्थी’ पटकथेमधून साकारला. प्रत्येक लहान मुल अनोखे असते, त्या प्रत्येकामध्ये काही विशेष गुण असतात. त्यामुळे प्रत्येक लहान मुलाचे संगोपन वेगळ्या पद्धतीने करण्याची गरज आहे, ही ‘तारे जमीन पर’ चित्रपटाची थीम आहे. हा चित्रपट डिसलेक्सीयाबद्दल नाही, हे अमोल गुप्ते आवर्जून सांगतात. चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना आपण समजतो ती वेगळीच असते आणि अपेक्षित असते ती वेगळीच असू शकते म्हणूनच चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना (theme) काय आहे हे समजून घेणे गरजेचे असते.

‘कराटे किड’ चित्रपटाची कथा कराटे शिकणाऱ्या मुलाची आणि शिकवणाऱ्या कोचची असली तरीही कोणत्याही शिक्षणामधून आपण माणूस म्हणून जगताना आपला सर्वांगीण विकास कसा साधू शकतो, ही त्या चित्रपटाची थीम आहे. (पटकथा – ख्रिस्तोफर मर्फी, रॉबर्ट केमेन, दिग्दर्शक – हराल्ड झ्वार्ट). “There is no such thing as bad students, only bad teachers.”, “Being still and doing nothing are two very different things.”, “Win or lose, doesn’t matter. Fight hard. Earn respect.” अशा संवादामधून चित्रपटाची थीम समजते. चित्रपटातून आपण काय शिकलात या प्रश्नाचे उत्तर म्हणजे चित्रपटाची थीम नव्हे, किंबहुना चित्रपटाच्या कथेमधून प्रेक्षकांनी काही शिकायलाच हवे असा चित्रपटकर्त्यांचा उद्देश नसतोच.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ ही ‘पुष्पक’ चित्रपटाची थीम कावळ्याच्या गोष्टीप्रमाणे हाफ चहाचा ग्लास घरातील नट-बोल्ट-नाणी टाकून फुल करणे, नोटांच्या हव्यासात बुटाखाली फुलांचा झालेला चुराडा, रस्त्यावरच्या भिकाऱ्याच्या पोत्याखाली असलेल्या नोटा घेण्यासाठी लोकांची झुंबड, अशा अनेक प्रसंगामधून सांगितली आहे. पटकथा लिहिताना पात्रांची रचना अशा पद्धतीने केली जाते की त्यामधील थीम संवादरूपाने सांगता येईल. टॉम शुल्मन यांनी आनंददायी शिक्षण कसे असावे याविषयी भाष्य करताना ‘डेड पोएट सोसायटी’ चित्रपटात जॉन कीटिंग (रॉबिन विल्यम्स) साठी तसे प्रसंग लिहिले. कॉलेजमधल्या विद्यार्थ्याना टेबलावर उभे राहून वर्ग न्याहाळण्यास सांगणारे प्रोफेसर जॉन आयुष्याकडे वेगवेगळ्या कोनातून बघण्याची दृष्टी देताना आपल्या विद्यार्थ्याना म्हणतात “Medicine, law, business, engineering, these are all noble pursuits, and necessary to sustain life. But poetry, beauty, romance, love, these are what we stay alive for.” परंपरा, अनुशासन यावर भर देणाऱ्या चाकोरीबद्ध शिक्षणामुळे विद्यार्थी अनेक अनुभवाना मुकतात आणि त्यांच्यामध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याची क्षमता लोप पावते अशी पटकथालेखक टॉम शुल्मन यांची धारणा होती. शिक्षणाच्या चौकटीबाहेर शिकण्यासारखे बरेच काही आहे त्यामुळे पुस्तकी शिक्षणाला क्लास-रूम बाहेर घेऊन जाणे आणि प्रत्यक्ष अनुभवाची जोड देणे आवश्यक आहे असे त्याना वाटल्यामुळे प्रोफेसर जॉन हे पात्र आकाराला आले. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ चित्रपट तीन मित्र अनेक दिवसांनी एका रोड ट्रीपवर गेले ज्यामुळे त्यांचे आयुष्य बदलले याबद्दल आहे असे वाटू शकते परंतु चित्रपटाची थीम ‘डेड पोएट सोसायटी’ प्रमाणेच carpe diem – seize the day – ‘भविष्याची काळजी करण्यापेक्षा वर्तमानामध्ये जगा आणि त्या क्षणाचा आनंद घ्या’ हीच आहे.

‘बँड बाजा बारात’ या चित्रपटाची थीम म्हणजेच कथानकाचा गाभा हा Event Management आहे, ज्याला प्रेम कथेची फोडणी आहे. भारतीय प्रेक्षकाना चित्रपटगृहात आणण्यासाठी प्रेमकथा गरजेची असू शकेल परंतु त्या चित्रपटाचा आत्मा बिझिनेस कसा करावा हा आहे. अशा चित्रपटात जगण्याची/काही मिळवण्याची प्रेरणा म्हणून प्रेम दाखवले जाते कारण चित्रपट तयार करणे हाच एक बिझिनेस आहे. मनिष शर्मा यांनी दिल्लीमध्ये लग्न समारंभाचे आयोजन करणाऱ्या बिट्टू आणि श्रुती या युवक आणि युवतीची कथा लिहिली होती. लग्न समारंभ आयोजित करणाऱ्या दिल्लीतील बिझिनेसचा अभ्यास कथा-लेखक मनिष शर्मा यांनी केला होता. त्या कथेवर पटकथा लिहिताना दोघांना महत्वाकांक्षी दाखवताना एकमेकांचे प्रेम दाखवल्यास करीयरपेक्षा प्रेमकथा प्रामुख्याने दाखवली जाईल, जे परिणामकारक ठरणार नाही असे हबीब फैझल याना वाटले. त्यामुळे ‘शादी मुबारक’ या इव्हेंट मनेजमेंट कंपनीमधील दोघांचे वेगवेगळे स्वभाव दाखवण्यात आले. बिट्टू शर्मा (रणवीर सिंग) दिल्ली युनिव्हर्सिटीमधला युवक आहे, ज्याला अभ्यास करण्याची इच्छा नाही, दिवसभर मित्रांबरोबर मस्ती करणारा ‘आवारा’. त्याला स्वतःच्या करीयरची चिंता नसते. कॉलेजच्या शेवटच्या वर्षात घरी जाऊन शेती करण्यापेक्षा नाईलाज म्हणून तो श्रुतीबरोबर भागीदारीत बिझिनेस सुरु करण्याचा विचार करतो. श्रुती (अनुष्का शर्मा) अत्यंत महत्वाकांक्षी युवती आहे जिला लग्नापेक्षा स्वतःचे करीयर करण्याची इच्छा आहे. पुढील पाच वर्षात तिला स्वतःला सिद्ध करायचे आहे, स्वतःच्या पायावर उभे रहायचे आहे. ती म्हणते, ‘मेरे पास लव्ह के लिये टाईम नही है|” भावनिक संबंधापेक्षा उत्तम बिझिनेस करण्याची महत्वाकांक्षा महत्वाची ठरली, बिझिनेस कसा करावा यासंदर्भात दोघांच्या वेगळ्या पद्धती पटकथेत लिहिल्यामुळे त्यांचे मतभेदही अधोरेखित करण्यात आले. त्या दोघांनी एकाच विचाराने बिझिनेस सुरु केला असता आणि त्यांचे प्रेम जमले असते तर पुढे चित्रपट रंगतदार झाला नसता. विषयाला विचारांची बैठक आणि त्यामधील संघर्ष असल्याशिवाय चित्रपट पकड घेत नाही.

संघर्ष हा बऱ्याच कथा- कादंबऱ्या- नाटक संहिता- चित्रपट पटकथांमधील नाट्याचा आत्मा असतो. ‘त्रिशूल’, ‘रॉकेटसिंग सेल्समन ऑफ द इयर’ सारख्या नाट्यांमध्ये दोन व्यक्तींमधला संघर्ष असतो तर काही पटकथा एकाच व्यक्तीच्या मनात सुरु असलेले मानसिक/वैचारिक द्वंद्व दाखवून आपल्याला अस्वस्थ करतात. उंच इमारतीसमोर लक्झरी कार पार्क करणाऱ्या माणसाला ख्रिस गार्डनर (विल्स स्मिथ) विचारतो, “तुम्ही करता काय?” म्हणजेच इतकी श्रीमंत माणसे सुखी होण्यासाठी काय करतात हा त्याला भेडसावणारा प्रश्न आहे. त्याला उत्तर देताना कारमधून उतरताना तो स्टॉक ब्रोकर असल्याचे सांगतो आणि त्यासाठी वेगळी पदवी घेण्याची आवश्यकता नसते, आकड्यांशी खेळ आणि माणसांशी मेळ जमवणे जमले पाहिजे, हे सुद्धा तो ख्रिसला सांगतो. त्या इमारतीमधून बाहेर पडणारी सर्व श्रीमंत माणसे सुखी आहेत असे ख्रिसला वाटत असते. मी असा सुखी कधी होणार, हा ख्रिसला पडलेला प्रश्न आहे आणि सुखी होण्यासाठी ख्रिसचा सुरु असलेला आटापिटा, सुखाचा शोध, मानसिक द्वंद्व हीच ‘इन परसूट ऑफ हॅपीनेस’ चित्रपटाची खासियत आहे. ‘भोसले’ चित्रपटात नायकाची (मनोज वाजपेयी) मनातल्या मनात होणारी घुसमट आपल्याला अस्वस्थ करते. (पटकथा-दिग्दर्शन – देवशिष माखीजा)

माणसांच्या दोन समूहांमधील संघर्ष पूर्वापार चालत आलेला आहे, ज्याचे प्रतिबिंब अनेक पटकथांमध्ये दिसते. गरीब-श्रीमंत यांच्यामधील संघर्ष दाखवून अनेक हिंदी चित्रपट यशस्वी झाले. पैसा मिळवणारे दुष्ट आणि पैसा नसलेले प्रामाणिक असे दाखवल्यामुळे चित्रपट हाउसफुल्ल झाले आणि संघर्ष दाखवणारे श्रीमंत झाले हा त्यातला विरोधाभास. दोन देशातील युद्ध वेगवेगळ्या पातळीवर दाखवणारे अनेक युद्धपट दोन समुहातील संघर्षाची कारणमीमांसा करतात, त्याचे दुष्परिणाम अधोरेखित करतात, त्यामुळे व्यक्ती आणि समूहाच्या मानसिकतेवर काय परिणाम झाले याचे विवेचन करतात. ‘लेटर्स फ्रॉम आयवो जिमा’ चित्रपटात यमशीता या जपानी पटकथा लेखकाने युद्धाकडे जपानच्या दृष्टीकोनातून बघितले आणि त्याचे दिग्दर्शन क्लिंट इस्टवूडने केले. दोन व्यक्तींच्या दृष्टीकोनातून युद्ध (१९१७), खेळाच्या दृष्टीकोनातून युद्ध (एस्केप टू व्हिक्टरी, लगान), युद्ध जिंकण्यासाठी केलेल्या विविध युक्त्या (ब्रिज ऑन द रिव्हर कॉय, व्हेअर ईगल्स डेअर), माघार घेतलेल्यांची कथा (डंकर्क), युद्धकाळात काही व्यक्तींचा चांगुलपणा (शिंडलर्स लिस्ट) असे असंख्य प्रकार समूहाच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दाखवले आहेत. एका समुहाअंतर्गत सुरु असलेला संघर्ष ‘चक दे इंडिया’, ‘कोच कार्टर’ समुहातील संघर्षाबरोबरच सर्वसमावेशक नेतृत्वकौशल्याबद्दलही प्रभावीपणे भाष्य करतात. ‘टू किल अ मॉकींग बर्ड’, ‘वन फ्लू ओव्हर कुकूज नेस्ट’, ‘बॉम्बे’, ‘मंथन’, ‘एरीन ब्रोकोवीच’ अशा चित्रपटामध्ये दाखवलेला एका व्यक्तीचा समाजाविरुद्ध लढा लोकप्रिय होता आणि अजूनही आहे. मनुष्याचा निसर्गाविरुद्ध लढा ‘लाईफ ऑफ पाय’, ‘द एज’, ‘कास्ट अवे’ अशा चित्रपटातून दाखवला आहे. ‘निसर्ग नियमाच्या विरुद्ध गेल्यामुळे आपले काय नुकसान होईल?’ (ज्युरासिक पार्क) असे आपल्याला नेहेमी पडणारे प्रश्नच चित्रपटांच्या थीम असतात परंतु चित्रपटाचा शेवट गोड (?) होऊन प्रेक्षकांची गर्दी वाढण्यासाठी माणसाचा विजय दाखवला जातो. माणूस विरुद्ध तंत्रज्ञान (२००१ अ स्पेस ओडिसी, अपोलो १३, हर ), माणूस विरुद्ध अमानवी शक्ती (द शायनिग, द एक्झॉर्सिस्ट) असा संघर्षही चित्रपट निर्माते-दिग्दर्शक-पटकथाकार आणि प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असतो.

पटकथा लिहिताना कला, सामाजिक भान आणि आर्थिक गणिते याचे संतुलन राखण्याची काळजी घेतली जाते. सलीम जावेद यांनी त्या काळाची अस्वस्थता लक्षात घेऊन बंडखोर नायक लिहिला. चित्रपटाच्या सुरुवातीलाच ‘तुम मुझे ढुंढ रहे हो और मै तुम्हारा यहां इंतजार कर रहा हुं” असे म्हणून सर्वावर विजय मिळवणारा विजय त्यांनी दिवारसाठी लिहिला. अन्यायाविरुद्ध पेटून उठलेला विजय ‘त्रिशूल’ चित्रपटात अॅम्ब्युलन्स घेऊन येतो आणि गुंडांना धडा शिकवतो. कोळसा खाण मालकाच्या अन्यायाविरोधात उभा राहणाऱ्या विजयमध्ये प्रेक्षकांनी स्वतःला बघितले, जरी त्या प्रेक्षकांनी कोळशाच्या खाणी बघितलेल्या नसल्या तरीही. कारण एकूणच समाजातील अस्वस्थता पटकथाकारांनी हेरली आणि आपण जे बंड करू शकत नाही ते करू शकणाऱ्या ‘विजय’च्या एन्ट्रीला प्रेक्षकांनी शिट्ट्या वाजवून त्याचे स्वागत केले. परंतु काला पत्थर चित्रपटातील विजयचा (अमिताभ) संघर्ष कोळसा खाण मालकांशी आहे की मंगल सिंग (शत्रुघ्न सिन्हा) या तुरुंगातून पळालेल्या कैद्याशी आहे यामध्ये पटकथेचा गोंधळ झाला आणि अनेक पात्रांची सरमिसळ केल्यामुळे चित्रपट फसला.

चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना, संघर्ष हे ठरल्यानंतर पटकथा लिहिताना पात्रांची रचना कशी केली जाते याबद्दल पुढील लेखात.

सुहास किर्लोस्कर
9422514910

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button