बौद्ध धम्मात पूजाविधीचे स्थान
बौद्ध धम्मात पूजाविधीचे स्थान
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली नागपूर येथे आणि त्यानंतर चंद्रपूर येथे आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि भारतात नव्याने धम्मचक्र गतिमान केले. या धम्मदीक्षेमुळे आजघडीला संपूर्ण महाराष्ट्रात, तसेच लगतच्या मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तेलंगाना, कर्नाटक राज्यात आणि उत्तरप्रदेश राज्यातही धर्मांतरित बौद्ध धम्मीय लोकांची मोठी संख्या आहे. मात्र या धर्मांतरित बौद्ध लोकांची एकसमान अशी बौद्ध संस्कृती, पूजाविधी सार्वत्रिकरित्या अद्याप रुजलेली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी *बौद्ध पूजा पाठ* या नावाची एक पुस्तिका २४ फेब्रुवारी १९५६ रोजी प्रकाशित केली. (BAWS खंड १६ पृष्ठ ७२३-७४३). यामध्ये त्यांनी नित्य पूजाविधीसाठी म्हटल्या जाणाऱ्या गाथा त्यांच्या मराठी अर्थासहित प्रकाशित केल्या आहेत. या मालिकेतील *’बौद्ध संस्कार पाठ’* नावाचे दुसरे पुस्तक प्रसिद्ध केले जाईल असेही त्यांनी त्या पुस्तिकेच्या प्रस्तावनेत नमूद केले आहे. *हे संस्कार विधी व पूजापाठ श्रीलंकेतील बौद्ध पूजा पद्धतीवर आधारित आहेत हे स्वतः बाबासाहेबांनी नमूद केले आहे.* मात्र अजुनही बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेल्या पूजा पाठाप्रमाणे महाराष्ट्रात व इतरत्र सर्वत्र सारखेपणाने पूजाविधी केले जात नाहीत. काही बौद्धाचार्य आणि भिख्खू यांनी त्यात *भीमस्तोत्र, भीम सरणं* यासारख्या अनावश्यक बाबींची भर घातली आहे. दुसरीकडे काही बौद्ध कार्यकर्ते/भिक्खू/ बौद्धाचार्य हे बौद्ध पूजाविधी करण्याची काहीही आवश्यकता नाही, हे सर्व थोतांड आहे. परित्राण पाठ करणे म्हणजे सत्यनारायणाची पूजा करण्यासारखेच आहे, अशी टोकाची भूमिका घेताना दिसतात. यामुळे बौद्धांमध्ये, बौद्ध म्हणून जो एकजिनसीपणा व बंधुभाव निर्माण व्हावयास पाहिजे, एकसमान संस्कृती व पूजाविधी रुजायला पाहिजे ती अद्याप रुजू शकलेली नाही. या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरप्रणित बौद्ध धम्मात पूजाविधीचे स्थान आणि त्यात सारखेपणा असण्याची आवश्यकता यावर विचारमंथन होणे आवश्यक आहे.
*बौद्ध पूजा परंपरांचा उगम बुद्धाच्या हयातीतच*
*बौद्ध धम्माचा मुख्य सिद्धांत चार आर्यसत्ये, आर्य अष्टांगिक मार्ग, प्रतित्य समुत्पाद (अवलंबित उद्भव) अनित्यतावाद (आरंभ-विकास-लय) हे आहेत.* हे सिद्धांत सामान्य लोकांना आत्मसात करण्यासाठी कठीण आणि त्यांच्या स्वतःच्या धार्मिक जीवनात लागू करण्यासाठी उच्च आदर्शवत असे आहेत. यामुळे सामान्य लोकांमध्ये धम्माविषयी असलेली भक्ती आणि त्याचवेळी त्यांच्या भावनिक गरजा पूर्ण करण्यासाठी एखाद्या सोप्या आचरण प्रणालीची / सामुदायिकरित्या केल्या जाऊ शकणाऱ्या कृतीची आवश्यकता होती. ज्याद्वारे ते धम्माने त्यांच्यापुढे ठेवलेल्या आदर्शांवर श्रद्धा व्यक्त करू शकतील आणि या आदर्शांना त्यांच्या दैनंदिन जीवनात आत्मसात करू शकतील. बुद्धाने यातील काही बाबींचा उपदेश त्यांच्या हयातीतच केलेला दिसतो. (पूजनीय, महनीय व्यक्तींची पूजा केली पाहिजे- महामंगल सुत्त, वज्जी लोक त्यांच्या चैत्याची व पूजास्थानाची नियमित पूजा करतात, धम्माला मान देतात तोपर्यंत त्यांची अधोगती होणार नाही- महापरिनिब्बाण सुत्त, आजारपण, मृत्यू या काळात पठन करण्यासाठी बुद्धाने गीरीमानंद सुत्त, परित्त सुत्त इत्यादी सुत्तांचा उपदेश केला आहे. *श्रद्धावान उपासकाने, बुद्धाचा जेथे जन्म झाला, ज्या ठिकाणी बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली, ज्या ठिकाणी बुद्धाने पहिला उपदेश केला आणि ज्या ठिकाणी बुद्धाचे परिनिब्बाण झाले त्या चार ठिकाणांना आपल्या हयातीत एकदातरी भेट द्यावी असे ‘बुद्धा’ने महापरिनिब्बाण सुत्तात म्हंटले आहे.* अशा अनेक बाबी सांगता येतील.) भिक्खू संघात प्रवेश देण्याचे जे नियम आहेत, त्यातील महत्त्वाचे नियम असे आहेत की, प्रवेशिताने *बुद्ध, धम्म आणि संघ* या त्रिरत्नांना शरण आले पाहिजे. असे त्याने तीन वेळा सरणगमन केले पाहिजे. *दुःखमुक्तीचा मार्ग दाखविणारा बुद्ध हाच सर्वश्रेष्ठ गुरु/मार्गदर्शक आहे. दुःखमुक्तीसाठी धम्म हाच सर्वोत्तम मार्ग आहे आणि संघ हाच सर्वश्रेष्ठ शरणस्थान आहे.* हे मान्य केले पाहिजे. त्याने अष्टशीलांचे कसोशीने पालन करण्याची शपथ घेतली पाहिजे. त्याने संघाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले पाहिजे, असे हे नियम विनय पिटकात संग्रहित केले आहेत. पुढे सर्व बौद्ध जगतात हे नियम प्रत्येक बौद्ध मठात, विहारात परंपरेने पाळले जाऊ लागले. त्यास पूजाविधीचे स्वरूप प्राप्त झाले.
बौद्ध धम्मातील पूजाविधी बुद्धाच्या महापरिनिब्बाणानंतर हळूहळू विकसित झाले. यानंतर धम्म ज्या देशात पसरला त्या प्रत्येक देशात तेथील मूळ जनधर्माची संस्कृती व बौद्ध धम्माचा तात्त्विक पाया यांचा संयोग होऊन बौद्ध संस्कृती, पूजाविधी, धार्मिक समारंभ, सण-उत्सव, प्रतीके निर्मिती, पूजास्थानाची निर्मिती यांचा विकास झाला. *बुद्धाने त्यांच्या शिकवणुकीत बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नांवर अविचल श्रद्धा असणे हे महान शिष्याचे लक्षण असल्याचे अनेक सुत्तातून स्पष्ट केले आहे.* पुढेपुढे या श्रद्धेचे रुपांतर अतीव भक्तीमध्ये झाले. मात्र, बौद्ध धम्मामध्ये भक्तीचा अर्थ देवाच्या इच्छेच्या अधीन होणे किंवा एखाद्या बाह्य तारणकर्त्याच्या अधीन होणे असा होत नाही, तर दु:खापासून मुक्तीचा मार्ग दाखवणार्या शिक्षकाच्या/गुरूच्या प्रति प्रेम आणि आपुलकीची उत्कट भावना *((सद्धमत्ता, पेमामत्ता))* निर्माण होणे अशी आहे. अशी वृत्ती संबंधित उपासक/ परिव्राजक/ भिक्खू यास निब्बाण प्राप्तीच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडथळ्यांना पार करून गुरुच्या शिकवणुकीचे निष्ठेने पालन करण्याची प्रेरणा देते. हे अनुभव बुद्धाच्या हयातीतच भिक्खू तसेच भिक्खुणींनी रचलेल्या थेरगाथा आणि थेरीगाथा मधील अनेक गाथांमध्ये व्यक्त झाले आहेत.
*पूजाविधी धम्माचा अविभाज्य भाग*
कोणत्याही धर्माचे पूजाविधी आणि धार्मिक समारंभ संबंधित धर्मवृत्ती दर्शविणाऱ्या बाह्य कृती असतात. या कृती जोपर्यंत धर्माच्या प्रति अंतर्मुख करणाऱ्या आणि चिंतनशील क्रियाना पूरक असतात, त्यातून मूळ धर्मतत्त्वाची जोपासना करण्याचा उद्देश असतो, अशी कृती, विधी, पूजा एखाद्या लाभाची अपेक्षा ठेऊन केली जाणारी तर्कहीन कृती नसते, तोपर्यंत अशा कृतींना संबंधित धर्माच्या तत्त्वांशी विसंगत कृती ठरविता येणार नाही. बौद्ध धम्म आचरण करणाऱ्या देशांमध्ये तेथील पंथानुसार अनेकविध पूजाविधी आणि धार्मिक समारंभ प्रचलित आहेत. त्यातील सर्वांचेच सरसकट समर्थन करता येणार नाही.
*बौद्ध पूजाविधीसाठी प्रतीके, साहित्य व त्यांचे सांकेतिक महत्त्व*
डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रणित बौद्ध धम्मामध्ये जे पूजाविधी करण्याचे बाबासाहेबांनी सांगितले आहेत ते थेरवादी परंपरा मानणाऱ्या श्रीलंकन बौद्ध पूजा पद्धतीवर आधारलेले आहेत. थेरवादी परंपरेत बुद्ध पूजा, धूप पूजा, सुगंधी पूजा किंवा पुष्प पूजा, दीप पूजा, आहार पूजा, परित्त किंवा परित्राण पूजा आदींचा प्रामुख्याने समावेश आहे. *बौद्ध पूजाविधीसाठी बुद्धरूप (बुद्धाची मूर्ती किंवा प्रतिमा) भीमरूप (डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती किंवा प्रतिमा), (तथागत बुद्ध तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बौद्धांचे सर्वोच्च मार्गदर्शक/गुरु म्हणून त्यांच्याप्रति आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी) आधी न वापरलेले नवीन असे तीन मीटर लांबीचे शुभ्र किंवा काषाय वस्त्र, (पूजाविधी समाप्त झाल्यानंतर भन्ते/बौद्धाचार्य यांना दान करता यावे यासाठी) मेणबत्ती (निष्कलंक प्रज्ञेचे प्रतीक), अगरबत्ती (सद्गुण आणि कीर्तीच्या वाहकाचे प्रतीक), शक्यतो लाल रंगाचा मातीचा नवीन कलश (अनित्य अशा शरीराचे व क्षणभंगुरतेचे प्रतीक), कलशामध्ये पाणी (जीवनाचे प्रतीक) विविध रंगांची फुले (अनित्यतेचे प्रतीक), पिंपळ पाने किंवा लहान कुंडीत लावलेले पिंपळाचे रोपटे (ज्ञान-प्रज्ञा याचे प्रतीक), तीन सूत्र असलेला पांढऱ्या रंगाचा कच्चा धागा (बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नाचे प्रतीक), या वस्तू ठेवल्या जाव्यात. त्रिरत्नाचे प्रतिक म्हणून एक टोक कलशात ठेवलेला त्रिसूत्री कच्चा धागा हातात घेऊन या त्रिरत्नाप्रति आजन्म निष्ठावान व श्रद्धावान राहण्याचा संकल्प करून एकाग्र चित्ताने गाथापठन केले पाहिजे. पाली गाथापठन करतांना त्या गाथांचा मराठी किंवा संबंधितांच्या मातृभाषेतून अनुवाद सुद्धा सांगितला पाहिजे.*
विविध पूजांसाठी व संस्कार ग्रहण विधींमध्ये म्हटल्या जाणाऱ्या गाथांमध्ये त्रिशरण पंचशील, बुद्ध वंदना, धम्म वंदना, संघ वंदना, चैत्य वंदना, बोधी वंदना, त्रिरत्न वंदना, जयमंगल अठ्ठगाथा, महामंगल सुत्त, धम्मपालन गाथा, मंगलमैत्री गाथा या प्रमुख गाथा आहेत. या गाथांमध्ये पापमुक्तीसाठी याचना, स्वर्गप्राप्ती, ईश्वर दर्शन, अनुकूल फलप्राप्ती इत्यादींसाठी याचना केलेली नाही. व्यक्तिगत इच्छा पूर्ण करण्यासाठी, इच्छित सिद्धी, दैवी शक्ती प्राप्त करण्यासाठी देवाला, गुरूला किंवा अन्य कोणत्या बाह्य शक्तीला आवाहन केलेले नाही किंवा साकडे घातलेले नाही. *बौद्ध पूजाविधींमध्ये म्हटल्या जाणाऱ्या गाथांमध्ये समस्त जीव, पशू, पक्षी, प्राणी सृष्टी यांच्यासहित संपूर्ण मानवांच्या कल्याणाची कामना केलेली आढळते. यातील बऱ्याचशा गाथांमधून एक आदर्श मार्गदाता शिक्षक म्हणून बुद्धांच्या महानतेचे आदरयुक्त स्मरण केले जाते.* बुद्धाने सांसारिक दु:खातून बाहेर पडणारा मार्ग मानवजातीला दाखविल्याबद्दल बुद्धांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जयमंगल अठ्ठगाथा पठन केली जाते. मनुष्य जीवनात कोणते आदर्श उत्तम आहेत याचे पुन्हा-पुन्हा स्मरण करण्यासाठी महामंगल सुत्ताचे पठन केले जाते. बौद्ध पूजाविधीमध्ये वापरले जाणारे साहित्य/प्रतीके आणि गाथा हे दोन्ही घटक एकत्रितपणे श्रद्धा, भक्ती आणि संकल्प यांची अभिव्यक्ती बनतात. बौद्ध संस्कार व पूजाविधी व्यक्तिगत चित्तशुद्धी आणि सामूहिक एकत्त्वाची भावना विकसित करण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहेत.
-सुनील खोबरागडे
मुंबई