भागवत साहेब, जाती प्रथेचे निर्मुलन करण्यासाठी पुढाकार घेणार का ?

भागवत साहेब, जाती प्रथेचे निर्मुलन करण्यासाठी पुढाकार घेणार का ?
विश्व हिंदू परिषदेचे सरसंघचालक मोहन भागवत हे नेहमीच काही ना काही वक्तव्ये करुन धार्मिक ध्रुविकरण, संभ्रमित अन् भावनिक बनविण्याचे प्रयत्न करत असतात. शेवटी अजेंड्याकडे वाटचाल करताना त्याची त्यांना गरज असणारच. मध्यंतरी उच्च नीचता, जातीयता देवांनी निर्माण केली नसून, पंडितांनी आपल्या स्वार्थासाठी केल्याचे वक्तव्य त्यांनी रविंद्र नाट्य मंदिर येथे रोहिदास समाज पंचायत संघ आणि वसुधा चॅरिटेबल ट्रस्टच्या विद्यमाने आयोजित संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त बोलतांना केले. गेल्या काही वर्षातील सरसंघचालक मोहन भागवत यांची वक्तव्य पाहिली तर, त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. उदा. ब्राम्हण हा जन्माने नव्हे तर कर्माने होत असतो. हे सर्वच धर्मशास्त्रात नमूद असले तरी मधल्या काळात चातुवर्ण्य व्यवस्थेची चौकट घट्ट झाली आणि आपल्याकडून माणसाला मान खाली घालायला लावणारे कृत्य घडले. त्यामुळे आता आपल्याला त्याचे पापक्षालन केल्याशिवाय गत्यंतर नाही. हिंदू मुसलमानांचा डि.एन.ए. एकच आहे. कलम ३७० रद्द करुनही काश्मिर प्रश्न सुटलेला नाही. संविधानाप्रमाणे सर्वांनी वागावे, संविधान विचारपुर्वक तयार केले आहे. संविधानात व्यक्तिला मोठं मानले आहे, धर्माला नाही. आरएसएस ही वर्चस्ववादी संघटना नसून, एक लोकशाहीवादी संघटना आहे. व्यवस्था जाचक होतात, काटेरी बनतात, हळूहळू त्यांच्या रुढी बनतात. अशी भागवत यांची संभ्रमित करणारी अनेक गोंजारणारी वक्तव्य पाहिली की, आरएसएसला नक्की काय अभिप्रेत आहे असा प्रश्न उपस्थित होतो. खरच, तुम्ही परिवर्तनवादी आहात का ? कारण, तुम्ही जी वक्तव्य करतात त्याच्या परस्पर विरोधी वातावरण अन् घटना देशात घडत असतात. नुकतेच त्यांनी शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य म्हणजे हिंदू राष्ट्र असे भावनिक सोयीचे वक्तव्य केल आहे.
भागवत साहेब, तुमच्यासाठी सर्व समान आहेत, कोणतीच जात किंवा धर्म नाही असे ईश्वराने सांगितले असे तुम्ही वक्तव्य करत आहात तर, विषमता, जातीयता, निर्दयता, उच्चनिचता, अन्याय अत्याचार अशा अनेक भ्रामक गोष्टींचे प्रतिक असलेल्या कुप्रसिद्ध मनुस्मृती ग्रंथाचे जाहिर दहन करण्यासाठी तुम्ही पुढाकार घेणार का ? उपेक्षित समाजावर वर्षानुवर्षे अन्याय अत्याचार झाले त्याबद्दल पापक्षालन करुन, भविष्यात त्यांच्याशी रोटी बेटीचे व्यवहार करणार का ? कारण, तुमच्या वृत्तीत अन् कृतीत भेद असायला नको. आपल्या भारत देशात अनेक जाती, धर्म, रुढी, परंपरा, पंथ, वर्ण व्यवस्था, विषमता अशी विभिन्न परिस्थिती असतांना देखील संविधानाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता अन् न्याय या संविधानिक तत्वांवर देशाची एकता, अखंडता आणि राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे महान, अनमोल कार्य केले, सर्वांना समान हक्क अन् अधिकार मिळाले. ज्या संविधानामुळे आपला देश अखंड, सार्वभौमत्व आहे त्याचं घटने विरोधात, तिच घटना बदलण्यासाठी कोण प्रयत्नशील आहे याचंही कधी तरी स्पष्टीकरण करा. माजी सरसंघचालक श्री. गोळवलकर गुरुजींच्या ‘बंच ऑफ थॉट्स’ (विचारधन) ग्रंथात सामावलेली ध्येय धोरणे किंवा ती विचारधारा तरी तुम्हाला मान्य आहेत का ? कारण, गोळवलकर गुरुजींना संविधानातील राजकीय, आर्थिक, सामाजिक समतेचे तत्व आणि व्यक्तीची प्रतिष्ठा राखणारी एकता मान्य नाही. म्हणजे, तुमची अन् इतर सरसंघचालकांची धोरणे परस्पर विरोधी, दिशाभूल करणारी आहेत का ? की तुमचा अजेंडा साध्य करण्यासाठी अशी वक्तव्य केली जात आहेत ? आरएसएसची भूमिका बदलत असेल तर, ती देशाच्या दृष्टीने खरच सकारात्मक बाब आहे. पण जाती, धर्मापुरते मर्यादित न राहता महागाई, सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण, वाढती बेरोजगारी, अंधश्रद्धा, अन्याय अत्याचार, जातीयता, महापुरुषांची बदनामी अशा गंभीर प्रश्नांवर मौनव्रत धारण न करता, संघाने भाष्य करायला पाहिजे. ओटात एक अन् पोटात एक अशी दुटप्पी विश्वासघातकी विचारधारा नको.
धर्मनिरपेक्ष म्हणून भारताची जगात ओळख असतांनाही तसेच भारतीय राज्यघटनेच्या कलम २८ (१) मध्ये, राज्याच्या पैशातून चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही अशी स्पष्ट नोंद असतांनाही प्राथमिक शाळांमध्ये बालवयातच मुलांवर विशिष्ट धर्माचे शिक्षण लादण्याचे व उपक्रम संपन्न होत आहेत. जातीय विषमता नष्ट करण्याकरीता प्राथमिक शाळांमध्ये बालवयातच मुलांवर स्त्री पुरुष समानता, सर्व धर्म समभाव, महापुरुषांचे कार्य, वैज्ञानिक, व्यक्तीमत्व विकास, स्पर्धा परिक्षा, स्वातंत्र्य, समता, बंधुता तसेच सर्वसमावेशक उपयुक्त शिक्षणाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याऐवजी बालवयातच पाठ्यपुस्तकांव्दारे शाळांमध्ये मुलांवर विशिष्ट धर्माचे संस्कार लादले जाणार असतील, काही संघटनांच्या माध्यमातून मुलांना धार्मिक शिक्षण आणि शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार असेल तर ? काही राजकीय पक्षात मागासवर्गीय सेल निर्माण केले जात असतील, जाती – जातींमध्ये समन्वय, संवाद घडविण्याऐवजी, जातीय दरी नष्ट करण्याऐवजी, काही संघटनांच्या माध्यमातून अनुचित प्रकार घडवून, जातीय तेढ निर्माण करुन त्याचा राजकीय फायदा घेतला जात असेल तर, राजकीय पक्षांनी सामाजिक ऐक्यासाठी प्रयत्न करुन काय निष्पन्न होणार आहे का ? पाठ्यपुस्तकात नुसता समानतेचा धडा असून उपयोगनाही तर, त्यातून जातीयतेचे निर्मुंलन कसे होईल ह्यासाठीही प्रयत्नशील असायला नको का ?
आपला भारत देश धर्मनिरपेक्ष असतांना एका विशिष्ट धर्माच्या नियंत्रणामुळे देशात सुसंवाद कसा राखला जाणार ? त्यामुळे, धर्मनिरपेक्ष भारत देशाला हिंदू राष्ट्र म्हणविण्याचा अट्टाहास तुम्ही सोडला पाहिजे. तसेच हिंदुस्थान शब्द प्रयोगही करुन चालणार नाही. कारण, संविधानात हिंदुस्थान शब्दाचा वापर कुठेही करण्यात आला नाही आहे. त्यामुळे, भारत अन् इंडिया या शब्दांचा वापर निष्ठेने करण्यासाठी आपण जाहीर आवाहन करणार का ? छत्रपती शिवाजी महाराज कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नव्हते, महाराजांच्या सैन्यात सर्व जाती धर्माचे लोक मावळे म्हणूनच सेवेत कार्यरत होते. महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करुन, त्यांना मावळेपण दिलं आणि रयतेचं स्वराज्य निर्माण केलं. भागवत साहेब, जाती धर्माच्या नावाखाली देशात जी विचारधारा निर्माण होत आहे ती देशाला घातक आहे. गोळवलकर गुरुजींनी तर संविधानावर कठोर शब्दात टिका केली आहे. माजी सरसंघचालक श्री. के. एस. सुदर्शन यांनी १२ मार्च २००० रोजी भारतीय संविधान मोडीत काढा असे वक्तव्य होते ते १३ मार्च २००० रोजी स्टेट्समन दैनिकात प्रसिद्ध झाले होते. विविध जाती, धर्माच्या भारत देशात विशिष्ट एका धर्माचे नियंत्रण राहिले तर, भविष्यात आपल्या देशाचा पाकिस्तान, अफगाणिस्तान व्हायला किती वेळ लागणार आहे ? संघ विचारांवर अंकुश ठेवत नाही तर, धर्मनिरपेक्ष भारत देशात एका विशिष्ट धर्माचे विचार लादण्याचा तुमचा अट्टाहास का ? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोकशाही प्रधान संघटना आहे तर, तुम्हाला भारतीय संविधान मान्य आहे का ? तिरंग्याबद्दल एवढा आदर होता तर, संघाच्या मुख्यालयावर तिरंगा ध्वज फडकावयाला एवढी वर्षे का लागली ? काही तरी, गोष्टी डोळ्यासमोर ठेवून तुम्ही सोयीची वक्तव्य करणार असाल तर ते देशाच्या दृष्टीने योग्य नाही. त्याची चिकित्सा झाली पाहिजे अन् जाती धर्माच्या राजकारणाला निर्बंध घातले गेले पाहिजेत. भविष्यातील भारताच्या दृष्टीने अनेक प्रश्न निर्माण होत असतील तर, त्याचे विवेचन होणे गरजेचे आहे. कारण, आपल्या धर्मनिरपेक्ष भारत देशाच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे, जाती पाती अन् धर्माच्या चौकटीतून बाहेर यायला पाहिजे. जाती, धर्म, प्रांतापेक्षा स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय तसेच देशाची एकात्मता, अखंडता, धर्मनिरपेक्षता व आम्ही भारतीय, आम्ही भारतीय लोक हीच आपली ओळख अन् राष्ट्रीयत्व निर्माण झाले पाहिजे. देशातील सामाजिक सलोखा, देशाची एकता, एकात्मता जोपासली जाऊन, धर्मनिरपेक्ष ही आपली जागतिक ओळख जपली पाहिजे.
*- मिलिंद कांबळे, चिंचवलकर*