संतानी पीएचड्या केल्या नव्हत्या पण प्रत्येक संतावर लोकांनी पीएचड्या केल्यात

॥शिक्षणनामा॥३॥
संत आणि पीएचड्या
संतानी पीएचड्या केल्या नव्हत्या. पण प्रत्येक संतावर लोकांनी पीएचड्या केल्यात. किंबहुना, संत हा जसा व्याख्यात्यांच्या व्याख्यानाचा, अतिशय आवडीचा विषय आहे, तसाच तो पीएचडी करणाऱ्यांचाही, अत्यंत पसंतीचा विषय आहे.
संतांच्या एका ओवीवर अथवा एका अभंगावरही पीएचडी करता येईल, इतके ते संपृक्त आहेत. पण पीएचडी करुनही तशी एक ओवी वा अभंग मात्र लिहीता येणार नाही. कारण #पीएचडी_करुन_पंत_होता_येतं_संत_होता_येत_नसतं.
कोणत्याही शाळेची पायरी न चढता संतांनी केलेलं कालातीत साहित्यसृजन थक्क करणारं आहे. तर केजी ते पीजी असे शिक्षणाचे इमल्यावर इमले रचूनही, संतासारखं साहित्यसृजन घडू नये, हे आश्चर्याचं दुसरं टोक भोवळ आणणारं आहे. आमच्या शिक्षणाच्या यत्तांपुढील ते ठसठशीत प्रश्नचिन्ह आहे.
लोकशिक्षणाच्या विशाल व भक्कम पायावर संतांच्या ज्ञानाची इमारत उभी होती. त्यामुळे त्यांचं साहित्य दर्जेदार व कालजयी होतं. म्हणूनच तर तुकोबा शिवरायांना म्हणाले, ‘आम्हा घरी शब्दांचीच रत्ने!’ या रत्नभांडारामुळेच संतांना आभूषणांसाठी कधी सोनाराच्या दुकानाची पायरी चढावी लागली नाही.
आमच्या पदव्यांचे इमले स्वउन्नतीच्या संकुचित पायावर उभे आहेत. त्या पायावर शब्दांरत्नांचं भांडार कसं उभं राहणार? मग ती उणीव आभूषणांनी भरुन काढण्यासाठी, आमच्या पायांना सोनारांच्या दुकानाची पायरी चढावी लागली, तर नवल काय!
संत हे आमच्या आचरणाचे वस्तुपाठ नव्हे, तर उपजीविकेची साधनं बनली आहेत. संतांमुळे नुसती भाकरीच नव्हे, तर भाकरीवर प्रतिष्ठाही मोफत मिळते. त्यासाठी हा लळा! ‘गाळा’ आहे तर लळा आहे.
लोकांनी पीएचडी करु नये असा याचा अर्थ नाही. पीएचडी जरुर करावी. पण आपल्याला जो विषय भावतो वा अस्वस्थ करतो त्यावर पीएचडी करावी. नेमून दिलेल्या विषयांवर नव्हे! कवी कवितासुद्धा त्याच्या हृदयाला भिडणाऱ्या नि मेंदूला मुंग्या आणणाऱ्या विषयावर करतो.
ज्या वंचित, दुर्लक्षित समाजघटकांवर पीएचडी केली, त्यांच्या दारातही आपल्या पीएचडीची प्रकाश किरणं पोहचली पाहिजेत. आजोबा, मुलगा, नातू अशा तीन पीढ्यांनी वंचितांवर पीएचड्या करायच्या, नि वंचिताच्या पिढ्यानपिढ्या मात्र त्यांच्या पीएचडीसाठी, वंचितच राहायच्या असतील, तर अशा पीएचड्या काय कामाच्या!
आपण ज्या विषयावर पीएचडी करतो, त्या विषयात आपण मौलिक भर घालून त्याला अधिकचे परिमाण प्राप्त करुन दिले पाहिजे. पीएचडीचा प्रबंध विद्यापीठाच्या अभिलेखागारात धूळखात पडण्यासाठी नव्हे, तर अनेकांच्या मेंदूवरची धूळ झटकणारा असला पाहिजे.
संताच्या साहित्यावर दृष्टिक्षेप टाकल्यावर ध्यानात येतं की, प्रत्येकाने मांडलेला विचार ही त्यांची स्वतःची अनुभूती आहे. साहित्यचौर्य वा कॉपी पेस्ट नाही. रुढार्थाने संतांनी पीएचड्या केल्या नसल्या तरी, त्याच्या जीवनस्पर्षी साहित्याने जनमनाला दिलेली दिशा व मध्ययुगाच्या नैराश्यवादी परिस्थितीत स्वतः पुढे येऊन केलेलं सामाजिक नेतृत्व, हे त्यांचं कार्य पीएचडीपेक्षाही मोठे आहे.
नामदेवांनी भागवत धर्माची पताका उत्तर भारतात नेली. हिंदीत अभंगरचना केली. पंजाबात राहून पंजाबी भाषेवर प्रभुत्व संपादन करुन पंजाबी भाषेतही काव्यरचना केली. त्यांच्या पदांचा शिखांच्या ‘गुरुग्रंथसाहेब’ या धर्मग्रंथात आदरपूर्वक समावेश करण्यात आला. नामदेवांची ही पीएचडीच नव्हती काय!
ज्ञानेश्वरी लिहील्यानंतर ज्ञानेश्वरांनी ती, त्यांचे गुरु नि थोरले बंधु निवृत्तीनाथांना अर्पण केली. ज्ञानदेवांच्या कार्याचं कौतुक करुन निवृतीनाथ ज्ञानदेवांना म्हणाले, ‘ज्ञानदेवा आपण ज्ञानेश्वरी लिहीली. मराठीत तिचा सुंदर अनुवाद केला. पण त्यात तुम्ही जे काही सांगितलं, ते सर्व भगवान श्रीकृष्णाचं आहे. तुमचं स्वत:चं त्यात काय आहे? आता असं काही लिहा, जे तुमचं स्वतःचं असेल.’ ज्ञानदेवांना ते पटलं. अनं त्यांनी ‘अमृतानुभव’ हा सुंदर ग्रंथ लिहीला. ही ज्ञानदेवांची पीएचडीच नव्हती काय!.
तुकोबांनी वेदपुराणांवर नुसती टिका केली नाही तर वेदाभ्यासही केला होता. म्हणूनच तर ते ‘वेदांचा अर्थ आम्हासी ठावे’, असं वैदिकांना चॅलेंज करु शकले. ही पीएचडीच नव्हती काय! तसेच आपल्या शिष्या बहिनाबाईं कुलकर्णींना त्यांनी अश्वघोषाच्या ‘वज्रसूचि’ नामक महान ग्रंथाचा मराठीत अनुवाद करायला सांगितला. हे कार्यही आपल्या शिष्येला पीएचडी करायला प्रवृत्त करणेच नव्हते काय!
कर्ते सुधारक क्रांतीसूर्य जोतिबांचं समग्र वाङ्मय, पीएचडीच्या योग्यतेचं नव्हतं काय? पण या महात्म्याने पीएचडी ऐवजी स्रीशूद्रांच्या कल्याणाकरीता देशोधडी पत्करली. त्यामुळेच आज अनेकांच्या हातात पीएचड्या शोभून दिसताहेत.
बुद्धकाळापासून ज्ञानाच्या विविध क्षेत्रात आपल्या तेजाने तळपणाऱ्या ज्ञानदीपांना, मध्ययुगात काजळी चढली अनं सर्वत्र अज्ञानरुपी अंधकाराचं साम्राज्य पसरलं. म्हणून मध्ययुगाला तमोयुग असे म्हणतात. या तमोयुगातच संतसुधारकांच्या मशालींचे महामोर्चे निघाले. म्हणूनच तमोयुगाच्या अंधाराचं जाळं फिटलं नि आधुनिक युगाचा सूर्योदय झाला.
आता भ्रष्टाचार, भेदभाव, अंधश्रद्धा, असहिष्णुता यांचं ग्रहण त्या सूर्याला लागलं आहे. लोकांच्या हातात डिग्र्यांची भेंडोळी व अंगावर आधुनिक पोषाख आहेत. पण त्यांची वाटचाल मात्र मध्ययुगाच्या दिशेने सुरु आहे. अंधकाराने समाजाला, देशाला पुन्हा ग्रासलं आहे. त्यासाठी पुन्हा आयुष्याच्या मशाली पेटवायची नितांत गरज आहे. पण मशाल पेटवणारी माणसं निर्माण करण्याची क्षमता, आमच्या शिक्षण पद्धतीत नाहीये. त्याअभावी #मशाली_पेटवायचा_जमाना_इतिहासजमा_झाला_आहे_आता_मेणबत्या_पेटवायचा_जमाना_आला_आहे.
शुक्रवार : – सुभाषचंद्र सोनार,
दि. ३.६.२०१६ : राजगुरुनगर.
(रिपोस्ट)
*******