ते गायीवर बोलतील पण मायीवर नाही…
ते गायीवर बोलतील पण मायीवर नाही…
✍️शिवश्री संतोषबादाडे
देशातील आदिवासी समाजाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या राष्ट्रपती मूर्मू यांनीही दोन आदिवासी महिलांवर झालेल्या अत्याचारावर मौन बाळगलंय निषेध सोडा शांततेचं अपिल ही करायला कोणी तयार नाही. सत्ता जेव्हा डोक्यात जाते तेव्हा ती आपलं परकं पाहत नाही. सत्तातुराला भय आणी लज्जा काहीच शिल्लक राहत नाही.. भारत या देशाच्या गौरवशाली इतिहासाला कलंकित करण्यासाठी सत्तेचा वापर होतो आहे. ज्या देशाला भारत माता म्हणतात त्याच देशातील महिलांवर अन्याय अत्याचार बलात्कार होत असताना या देशातील संवेदनाहीन सत्ताधारी या बाबतीत कुठलीच ठोस भूमिका घेत नाही हे वास्तव आहे मग ती घटना निर्भया उन्नावची असो की हाथरसची. दिल्लीतील महिला पहिलवान असो की मणिपुरची. कोणीही वाली नाही. आता तर देशाच्या राष्ट्रपती एक महिला आहे तरीही… स्त्री ना सनातनी असते ना पुरोगामी ती फक्त स्त्री असते.. समाजातील स्त्रीत्वाच्या मर्यादा आणि आदर सांभाळायला कुठल्याही जाती धर्माचा वंशभेदाचा विचारांचा पुरस्कार करणे महत्त्वाचा नसतो तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे ती एक स्त्री आहे आणि तिला दक्षिण्य देणे आवश्यकच आपल्या स्वभावाचा संस्काराचा भाग एवढाच विचार पुरेसा आहे.. ती न्यायासाठी कुठल्याही जाती धर्मात पंथात वंशात विभागली जाऊ नये. निषेध नोंदवण्यापेक्षा आता तिला स्वायत्त सशस्त्र प्रशिक्षणाचे धडे देण्यासाठी समाजाला काय करता येईल याकडे लक्ष देणे सर्वात महत्वाचे आहे. मणिपूरच्या महिलांच्या जागी आपली आई, बहिण, मुलगी, बायको आहे किंवा असती तर मी, आम्ही, आपण काय केले असते? असा प्रश्न प्रत्येक भारतीयाने स्वतः ला विचारुन व्यक्त व्हावे. आपल्या पक्षाच्या किंवा नेत्याच्या कट्टर भक्तीपोटी किंवा एखाद्या धर्माच्या द्वेषापोटी किंवा अन्य कोणत्याही कारणाने तुम्ही जर मणिपूरच्या घटनेचे प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष समर्थन करत असाल, तर तुम्ही मानसिक आजाराने ग्रस्त झालेले आहात, तुमचा आजार गंभीर स्वरूपाचा आहे. महंत बाबा बापू महाराज बलात्कारी- खूनी भोंदू बाबांचे समर्थन करणाऱ्या भक्तांसारखे तुम्ही आहात..
कधी टिकली तर कधी बुरखा यासाठी महिलांवर बंधने घालणारे व या महीलांच्या सुरक्षेची काळजी असणारे लोक मणिपूरमध्ये बहिणींच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली तरी काहीच बोलत नाहीत. ज्या व्यवस्थेत नारीचा अपमान होतो, विटंबना होते ती व्यवस्था रसातळाला जातेच,याची खूप उदाहरण आहेत इतिहासात, पण ज्यांनी स्त्रीचा सन्मान केला त्यांचे नाव हे चंद्र सूर्य असे पर्यंत तळपणारच.. एकमेव, अद्वितय छत्रपती शिवाजी महाराज..आज ही त्यांच्या आदर्श शिवाय पर्याय नाही, राजमाता जिजाऊ माॕसाहेबांनी किती उपकार केलेत या महाराष्ट्रावर त्याची परतफेड कधीच होऊ शकत नाही.मी माझ्या देशाचे रक्षण परकीय शत्रूंपासून केलं, पण मी माझ्या देशात स्वतःच्या पत्नीची अब्रू वाचवू शकलो नाही. हे शब्द आहेत मनिपूर हिंसाचारात नग्न धिंड काढून लैंगिक अत्याचार करण्यात आलेल्या महिलेच्या भारतीय सैनिक असलेल्या पतीचे. कोणासाठी लढायचं या जवानांनी? उठसुठ देशभक्तीची सर्टिफिकेट वाटणारे भक्त कुठे आहेत? तुम्ही ठरवणार ते देशभक्त, तुम्ही ठरवणार ते देशद्रोही? सरेआम भारत मातेच्या लेकींची नग्न करुन धिंड काढण्यात आली, सामुहिक लैंगिक अत्याचार करण्यात आले. यावर तुम्ही ज्या नेत्याची रात्रंदिवस भक्ती करता त्याची आणि तुमची प्रतिक्रिया काय? कुठंय तुमचं हिंदुत्व? याचाच अर्थ तुम्ही आणि तुमचा नेता बोगस आहात. तुमचं हिंदुत्व बोगस आहे आणि भारतमातेबद्दल तुम्ही दाखवत असलेलं प्रेम खोटं आहे. खरे देशद्रोही तुम्ही आणि तुमचा नेता आहे. इतिहास तुम्हांला कधीच माफ करणार नाही.. आणि तुमची लायकीच नव्हती त्यामुळे तुम्हांला ७० वर्ष सत्ते बाहेर ठेवले धन्य ते जुने माणंसे..मणिपूर भारतात आहे ना?कुकी स्त्रिया भारताच्या नागरिक आहेत ना?त्यांची नग्न धिंड काढली जातेय. त्यांच्या गुप्तांगांची, त्यांच्या सन्मानाची विटंबना केली जात आहे. ते दाखवणारा व्हिडिओ, त्याचे फोटो आज समाज माध्यमांवर फिरत आहे. सगळे तथाकथित राष्ट्रप्रेमी गप्प का? द्रौपदी वस्त्रहरणाची परंपरा रस्त्यावर आणली जातेय. टिकली, साडी वरुन व्याकूळ होणारे संस्कृतीरक्षक गप्प आहेत.सहा महिन्यांपासून झोपेचं सोंग घेतलेला निर्लज्ज माणूस सर्वोच्च न्यायालयाने उद्विग्न होऊन ‘तुम्हाला नसेल जमत तर आम्ही बघू असं सांगितल्यावर जागा होतो आणि मनिपूर हिंसाचाराबाबत पहिल्यांदा बोलतो. त्यातही त्याला अत्याचार झालेल्या या महिलांच्या अब्रू पेक्षा स्वतःच्या अब्रूची जास्त पडलीय असं वाटणारं भाषण देतो. देशाचा प्रधानमंत्री म्हणून मोदीने वेळीच लक्ष दिलं असतं तर मनिपूरचा हिंसाचार महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यापर्यंत गेला नसता. या सर्व घटनेची जबाबदारी प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदीची आहे. असा व्यक्ती आमच्या देशाचा प्रधानमंत्री आहे याची लाज वाटतेय..।
आज तुम्ही शांत राहू नका.पुरुषांच्या जमावाने वेढलेल्या त्या निर्वस्त्र महिलांसाठी आज बोलावं लागेल. तुम्ही जिथे कुठेही असाल,बोला. बाजारात गेलात तर तिथे दुकानदाराशी बोला. रिक्षावाल्याशी बोला. ओला उबर कॅबच्या ड्रायव्हरशी बोला.. वर्गात असाल तर उभं राहून तुमच्या शिक्षकांशी बोला. बसमध्ये असाल, रेल्वेत असाल, विमानतळावर असाल तर तिथे सांगा की मणिपूर मध्ये असा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात जमाव महिलांना निर्वस्त्र करून त्यांच्या शरीराशी खेळत आहे. ही घटना अशा देशात घडली आहे जिथे आमच्या इथे महिलांना देवी समान वागणूक देऊन तिची पूजा केली जाते.हे खोटं वारंवार पसरवलं जातंय.. आज जर या जमावाच्या विरोधात तुम्ही बोलला नाहीत तर त्या महिलांचं शरीर आणि मन नेहमी करता नागडं होईल. तुमचं न बोलणं, याचा अर्थ तुम्ही त्या गर्दीत सामील होणं आहे. तुमचं बोलण्याने तुम्ही महिलांना नग्न करून त्यांच्या शरीराशी खेळणाऱ्या पशूंच्या जमावात सामील होता. म्हणून सोशल मिडियावर लिहा, सर्वाना सांगा की मणिपूरच्या महिलांच्या सोबत असं झालं. आम्ही याचा विरोध करतो. आमची मान शरमेने खाली जाते. मणिपूर मधील घटनेच्या विरोधात बोला. मला माहितीये की मणिपूर मधील त्या महिलांची असहाय्यता आणि लाचारी तुमच्या पर्यंत पोहचणार नाही, कारण तुम्ही त्यांची हाक ऐकण्याच्या लायक राहिलेले नाही आहात. तुम्ही जे वर्तमानपत्र वाचता, जे चॅनेल पाहता, त्यांनी तुमची संवेदनशीलता मारून टाकली आहे. तुमच्या आतला चांगुलपणा विद्रोही विचार त्यांनी संपवून टाकला आहे.. जात, धर्म, भाषा, प्रदेशाच्या अस्मितेच्या राजकारणाने माणसालाच माणुसघानं बनवलं आहे. मणिपूरच्या महिलांना घेरून नाचणारा पुरुषांचा जमाव तुमच्या आजूबाजूला सुद्धा तयार झाला आहे. असा लोकांपासून सावधान रहा. आपल्या घरात दिवस रात्र धार्मिक विष पेरणाऱ्या नातेवाईकांपासून सावधान रहा. त्या सर्वांना जाऊन सांगा की की अस्मिता आणि द्वेषाच्या राजकारणाने देशाच्या जनतेला कशाप्रकारे या जमावात सामील केलं आहे. त्या मणिपूरच्या महिला नाहीयेत. त्या फक्त महिला आहेत. जर ही घटना तुम्हांला अस्वस्थ करत नसेल, तुम्ही बोलत नसाल, याने तुमचं शरीर कंप पावत नसेल तर तुम्ही स्वतःला मृत घोषित करून टाका…
ज्या योनीतून झाला तुझा जन्म
ज्या स्तनातून दुध पिवून झालास माणूस
त्याच देहाचे लटके तोडतोस..
स्त्रियांची शरीरं म्हणजे
धर्मलंडांची रणभुमी
या देशात बाईपेक्षा
गाईचे भाग्य थोर….
ज्या देशात निर्जीव मुर्तीरुपी
स्त्रिला पुजलं जातं तिथं मात्र
जिवंत स्त्रियांची नग्न धिंड काढली जाते…
गाईला माता म्हणणाऱ्या देशात
स्त्रीला नग्न करून धिंड काढली जाते
आणि संस्कृतीचे ठेकेदार गप्प…
दगडाच्या स्त्रीला नेसविली जाते साडी
आणि हाडा मासाच्या स्त्रीची फेडली
जाते साडी वारे वा तुमची संस्कृती..
ज्या स्त्री उदरातून मानवी नर देह जन्माला येतो, त्याच स्त्री देहाची नग्न धिंड काढताना कसला आलाय मर्दपणा. जिथे नारीची पुजा होते तिथे देव नांदतो हे म्हणन्या पुरतच आहे का? मणिपूर मधील महिलांची नग्न धिंड पाहता आपण भारत माता की जय म्हणण्याचे लायकीचे आहोत का? देशात असा मृत समाज असण्यापेक्षा नष्ट झालेला बरा.जिथे एकीकडे स्त्रीला देवीचा दर्जा देतात तिथेच घोळक्याने एका स्त्रीची नग्न धिंड काढतात.. इतकेच नाही तर खुल्लेआम तिच्या स्तन आणि गुप्तांगावर हात घातला जातो त्यात ही फोटो, व्हिडीओ असा दिखावा सुद्धा होतो. अशा झुंडी जर समाजात उपजत असतील तर तो समाज म्हणायच्या लायकीचा राहिला नाही.जर तुमच्यात जरा ही माणुसकी, लाज, कणव बाकी नाही तर या अमृत काळात अत्याधिक प्रमाणात माणसाची आधुनिक प्रगती झाली असे म्हटल्या जाते पण हे पूर्णपणे चुकीचे आहे.या विज्ञान तंत्रज्ञान युगात समाजात जगताना माणूस म्हणून माणसाची सर्वाधिक अधोगती झालेली आहे आणि त्याचाच हा परिणाम आहे. तुमच्या अशाप्रकारे वागण्यामुळे आता हा समाज जगण्यासाठी योग्य राहिलेला नाही. मुळात तुमची लायकीच नाहीय माणूस म्हणवून घ्यायची.. आग लागो अशा समाजाला आणि म्हणतात की देश सुरक्षित हाथो मे है. आपल्या देशातील मणिपूरच्या निमित्ताने सगळीकडे दुःख, संताप, शोक व्यक्त केला जात आहे. खासकरून समाज माध्यमांवर एक दिवस हळहळ व्यक्त केली जाईल. मात्र, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की उद्या आपण ही जात्यात असू, त्यावेळस इतरही लोकं अशीच हळहळ व्यक्त करतील. आपापल्या या कुवती प्रमाणे अशा गोष्टींचा निषेध आपण केलाच पाहिजे. मौन बाळगणं हे मेलेल्या माणसाचं लक्षण आहे. काही लोकांना मूळ मुद्दा गायब करण्याचं तंत्र त्यांना शिकवलेले आहे. कदाचित उद्या तुम्ही ही एखाद्या व्यवस्थेचे पिडीत व्हाल, तेव्हा आज तुमची साथ देणारे तुम्हांलाच आरोपी बनवतील. ही सिस्टीम माणूस पाहत नाही, ओळखत नाही. ही सिस्टीम केवळ सत्ता आणि सत्ताधाऱ्यांच्या आदेशाला बांधील आहे. त्यामुळे आपली विवेकबुद्धी जागृत ठेवा, देशा पेक्षा कोणीही मोठा नाही, आणि प्रश्न विचारणारा कोणीही छोटा नाही, समाजातील कुठलाही प्रश्न छोटा नाही.ज्या साहित्यीकांनी आपली लेखणी सरकारच्या चरणी गहाण टाकून लाचारी पत्करली असेल, ते साहित्यीक नसून दलाल आहेत… आणी मि आयुष्यात लढतच राहणार अन्याय अत्याचार, शोषण, अनिष्ट रुढी व जुल्मी व्यवस्थेविरुध्द कधी छत्रपती शिवरायांचा मावळा होवून तर कधी जगद्गुरू तुकोबारायांची गाथा, ज्योतिबांचा आसूड, आणि डॉ. आंबेडकरांचं संविधान घेऊन..।
✍️संतोष शकूंतला आत्माराम बादाडे
जिल्हाध्यक्ष पुणे- 9005546004
जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद,
महाराष्ट्र राज्य…
✍️????????????????????????????