संशोधन

प्रजाहितदक्ष सम्राटांचे शिलालेख

प्रजाहितदक्ष सम्राटांचे शिलालेख

सम्राट अशोक यांचे वर्णन अनेक अभ्यासकांनी एक मुत्सद्दी, प्रजाहितदक्ष, दूरदृष्टी, अतिमहत्त्वाकांशी, तीक्ष्ण बुद्धिमत्ता, इतिहासकार, प्रचंड सामर्थ्य आणि प्रशासकीय पकड असलेला सम्राट म्हणून केली आहे. त्याचबरोबर सम्राट अशोक हे अभ्यासू, चिंतनशील आणि प्रॅक्टिकल ‘धम्मदायाद’ होते.

१९व्या शतकापूर्वी, प्राचीन भारताचा इतिहास हा केवळ ऐकीव आणि काल्पनिक मिथकांचा आधारे मांडला गेला होता, मात्र जेव्हा सम्राटांच्या शिलालेखांचे वाचन झाले, त्यावेळेस भारताचा प्राचीन इतिहास खऱ्या अर्थाने उजेडात आला! दगडात कोरलेले हे शिलालेख अनेक अर्थाने महत्त्वाचे ठरले. भारताची सर्वात प्राचीन बोलली जाणारी भाषा आणि तिची लिपी, सामाजिक संस्कृती, त्याकाळातील राज्यांची व राजांची नांवे, शेजारच्या राष्ट्रांची सीमारेषा व तेथील राजांची नांवे, प्रशासकीय किंवा सैन्याची, युद्धाची तसेच व्यापार, शेती, आर्थिक उलाढालीची माहिती या शिलालेखांमुळे कळाली. सम्राट अशोकांच्या काळी प्रस्तर कला भरभराटीला आली. सम्राट अशोकांनी दिलेल्या आदेशानुसार दगडात लेणीं कोरणे, शिलालेख लिहिणे तसेच अनेक स्तूप निर्मिती यांमुळे दगडात काम करणाऱ्या कारागिरांना मुबलक काम मिळू लागले. शिलालेख लिहिताना आधी दगड गुळगुळीत केला जायचा आणि मग त्याच्यावर सम्राटाचा संदेश लिहिला जायचा. हे सर्व शिलालेख सम्राट अशोक यांच्या राज्याच्या सीमेवर दगडांवर किंवा स्तंभावर लिहिले गेले आहेत.

गेल्या ५०-६० वर्षांत सम्राट अशोक यांचे अनेक शिलालेख सापडले आहेत. दगडावर संदेश का कोरून ठेवले याचे स्पष्टीकरण देताना सम्राट अशोक यांनी दीर्घ स्तंभ लेख क्र.२ मध्ये लिहिले आहे कि “अठाये इयं धम्मलिपि लिखापिता हेवं अनुपटिपजंतु चिलंथितिका च होतु तीति ये च हेवं संपटिपजीसति सुकट कछती ति” म्हणजेच मी हे धम्मलिपी मध्ये लिहून ठेवले जेणेंकरून लोक त्याचे अनुसरण करतील आणि (हे शिलालेख) अनंत काळ टिकतील आणि लोक त्यांचे आयुष्य सुकृत करतील. म्हणजेच शिलालेख कोरून घेणे हा सम्राट अशोक यांचा अत्यंत दूरदृष्टीपणा म्हणावा लागेल.

स्वातंत्र्यपूर्व काळात शोधलेले सम्राट अशोक यांच्या शिलालेखात गेल्या ६० वर्षांमध्ये नवीन भर पडली आहे. आजमितीस त्यांचे दहा दीर्घ प्रस्तरलेख, बावीस लघु प्रस्तरलेख, सात दीर्घ स्तंभलेख, पाच लघु स्तंभलेख आणि तीन लेणीं शिलालेख संशोधित असून त्यातून त्याकाळातील सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि धार्मिक इतिहास कळायला मदत होते. भारतातील सर्व शिलालेख हे पालि प्राकृत भाषा आणि धम्मलिपित लिहिले असून, पाकिस्तान येथील मनशेरा शिलालेख खरोष्ठी लिपित तर गांधार, अफगाणिस्तान येथील शिलालेख ग्रीक आणि अरमायिक लिपि मध्ये लिहिले आहेत. सम्राट अशोक यांचे १४ लेखांचा समूह असलेले दीर्घ प्रस्तरलेख दहा ठिकाणी कोरलेला असून त्यात गिरनार (गुजरात), कालसी (उत्तराखंड), धौली, जौगढ (उडीसा), सोपारा (महाराष्ट्र), येर्रागुडी (आंध्रप्रदेश), सन्नती (कर्नाटक), खंदाहर (अफगाणिस्तान) आणि शाहबाझगढी, मनशेरा (पाकिस्तान). लघु प्रस्तर लेख वीस ठिकाणी कोरण्यात आले असून त्यात ससाराम (बिहार), रुपनाथ, गुजर्रा, (मध्यप्रदेश), सारू मारू (छत्तीगढ), ब्रह्मगिरी, सिद्धपूर, जटिन्ग रामेश्वर, मस्की, पालकीगुंडा, गाविमठ, उद्देगोळा, नित्तूर (कर्नाटक), येर्रागुडी, राजुला मंडगीरी (आंध्रप्रदेश), भाब्रु (राजस्थान), बैराट (कलकत्ता), धौली, जौगढ (उडीसा), बहापूर (दिल्ली), लाघमान (अफगाणिस्तान) आणि महास्थानगढ (बांगलादेश) या ठिकाणी पाहायला मिळतात. सात लेखांचा समूह असलेले दीर्घ स्तंभलेख हे टोपरा, मेरठ (दिल्ली), अलाहाबाद (उत्तरप्रदेश), लौरिया नंदनगढ, लौरिया अराराज, रामपूरवा (बिहार) आणि खंदाहर (अफगाणिस्तान) येथे आहेत तर लघु स्तंभलेख हे सारनाथ, अलाहाबाद (उत्तरप्रदेश), सांची (मध्यप्रदेश), रुम्मनदेई, निगलवी (नेपाळ) येथे आहेत. या व्यतिरिक्त बराबर लेणीं समूहात तीन ठिकाणी शिलालेख कोरलेले आहेत.

या सर्व शिलालेखाचा अभ्यास केला तर आपल्याला सम्राट अशोक यांची नीतिपर शिकवण वाचायला मिळते. बुद्ध विचारांचा प्रभाव त्यांच्यावर आधीपासून होता, मात्र राज्याच्या प्राबल्यासाठी त्यांना युद्ध करणे देखील गरजेचे होते म्हणून त्यांनी राज्याच्या सुरक्षितेसाठी कलिंग युद्ध केले, मात्र युद्धातील हानी पाहिल्यानंतर, त्यांना बुद्धविचारांची प्रचंड जाणीव झाली आणि इथून पुढे ‘प्रेम आणि मैत्रीचे युद्ध’ करायचे असा निश्चय त्यांच्या १३व्या शिलालेखात दिसतो. सण, उत्सव, मेळा किंवा होम मध्ये प्राण्यांची हिंसा करू नये असे सांगतानाच ते स्वतःचे उदाहरण देतात आणि प्राणी हिंसा थांबविण्याचे आवाहन करतात. लोकांनी प्राणी हिंसा थांबवावी म्हणून सम्राट अशोक टोपरा येथील शिलालेखांत पूर्णिमा, अमावस्या, अष्टमी आणि चतुर्दशी या दिवशी मांसाहार टाळण्याचे आवाहन करतात. प्राण्यांना डागण्यात देखील येऊ नये असे ते स्पष्ट करतात. याही पुढे जाऊन दुसऱ्या दीर्घ प्रस्तर शिलालेखात ते लिहितात कि राज्यातील तसेच सीमेलगतची सर्व राष्ट्रांमध्ये ते मनुष्य आणि जनावरांसाठी दवाखाने, औषधालय, आरामगृह आणि पाणपोई सुरु केली आहे. विशेष म्हणजे औषधांसाठी लागणाऱ्या झाडांची लागवड प्रत्येक ठिकाणी केली आहे. रस्त्याच्या दुतर्फा मोठी झाडी लावली आहे जेणेंकरून प्रवास करताना मनुष्य आणि जनावरांना त्रास होऊ नये! सर्व मनुष्यांना त्यांचे धर्म जोपासण्याचे स्वातंत्र्य आहे हे मान्य करतानाच, इतर धर्माची तत्वे समजून घ्या, विचारांची आदान प्रदान करा, चर्चा करा, इतर धर्माची चांगली मते स्वीकार, तसेच सर्व धर्माची लोके यांनी एकत्र राहणे असे देखील सम्राट सुचवतात. यावरून हे लक्षात घेतले पाहिजे कि अशोकांनी जरी बौद्ध धम्म स्वीकारला असला तरी त्यांनी इतर संप्रदायावर अन्याय केला नाही, उलट एकमेकांना समजून घ्यायला सांगितले हे त्यांच्या ५व्या, ७व्या आणि १२व्या शिलालेखात वाचायला मिळते. लोकं सण, उत्सव, लग्न किंवा मेळे येथे वायफळ खर्च करतात, त्यापेक्षा त्यांनी कमी खर्च करून, बचत करावी असा सल्ला ९व्या शिलालेखांत देतात. लोकांनी वृद्ध व्यक्तींप्रती आदर राखावा, आईवडिलांची सेवा करावी, सेवकांशी योग्य वागावे, गुरूंबद्दल आदर असावा, प्राण्यांबद्दल करुणा असावी असेही सांगतात. ८व्या शिलालेखांत अशोक लिहितात कि पूर्वी राजे मृगांची शिकार करण्यासाठी वनविहार करीत, मात्र आता धम्मयात्रा करण्यासाठी राजा बाहेर पडतात. रुपनाथ आणि सासाराम येथील स्तंभलेखात सम्राट लिहितात कि प्रजेचे प्रश्न सोडविण्यासाठी ते गेली ‘२५६ रात्री’ राज्याच्या दौऱ्यावर आहेत!

बौद्ध धम्म स्वीकारल्याचे सम्राट खंदाहार येथील शिलालेखात स्पष्ट करतात तसेच लोकांनी मातापित्यांची सेवा करावी, सेवकांशी नीट वागावे, ब्राह्मण श्रमणांना दान द्यावे, प्राणी हिंसा करू नये असे नीतिपर शिकवण देतात. लोकांनी धम्म (शीलवान आचरण) करावे असेही आवाहन १०व्या शिलालेखांत दिसते तसेच धम्माचे पालन व कोणावर अन्याय होत नाही यासाठी सम्राट युक्त, रज्जुका आणि प्रादेशिक अधिकाऱ्यांची नियुक्ती करतात. तसेच त्यांनी दर पाच वर्षांनी त्यांच्या विभागाचा दौरा करून लोकांचे प्रश्न सोडवावे असा आदेश देतात. प्रजेच्या हितासाठी त्यांनी नेमलेले गुप्तचर, सम्राट कुठेही असताना, अगदी शयन कक्षेत असले तरीही, भेटण्याची परवानगी होती! सम्राट अशोक यांनी पालि त्रिपिटकाचा देखील अभ्यास केल्याचे दिसते. त्यांच्या बैराट येथील शिलालेखांत मुनिसुत्त, राहुलोवाद सुत्त, अनागतभय, उपतिष्य प्रश्न, मौनीय सुत्त, विनय समुकसा, अरियवसा अशा सुत्तांचा अभ्यास करण्यास भिक्खू भिक्खुणी संघाला आणि लोकांना सांगतात. येथेच ते बुद्ध, धम्म आणि संघाप्रती श्रद्धा देखील व्यक्त करतात. भ.बुद्धांचे जन्मस्थळ शोधून काढीत, सम्राट रुम्मनदेई (नेपाळ) येथे स्तंभ उभारतात आणि या गावाला संपूर्ण करमुक्त करतात. सर्वांनी धम्माचे (नीती) पालन करावे असे आग्रह करतानाच, माझी मुले, नातवंडे, परतुंडे हे सर्व विचार पुढे नेतील आणि ते अनंत काळ टिकावे म्हणून दगडात कोरून ठेवल्याचे स्पष्ट करतात. धम्म म्हणजे शील असे स्पष्ट करीत सम्राट ४थ्या शिलालेखांत लिहितात कि जे शीलाचे पालन करतील ते धम्माचे पालन करतील. अलाहाबाद येथील स्तंभलेखात (जो पूर्वी कोशाम्बी येथे होता) सम्राट लिहितात कि ज्या कैद्यांना देहदंडाची शिक्षा झाली आहे, त्यांना शिक्षे आधी तीन दिवसांची सवलत दिली जाईल, ज्यात ते आपल्या परिवाराला भेटू शकतील किंवा दंड भरून माफी मागू शकतील किंवा आपले निर्दोषत्व सिद्ध करू शकतील. रामपूरवा येथील स्तंभलेखात अशोक आपल्या राज्याभिषेकाच्या वर्धापनदिनी चांगली वागणूक असलेल्या अनेक कैद्यांची सुटका करीत आणि हे गेली २६ वर्षे करीत असल्याचे नमूद करतात. ६व्या शिलालेखांत सम्राट लिहितात कि “मी कितीही परिश्रम केले किंवा राजकार्य केले तरी माझे समाधान होत नाही….माझ्यावर जे प्रजेचे आणि प्राण्यांचे ऋण आहे त्यासाठी मी कार्य करतो” तर धौली येथील शिलालेखांत लिहितात “सर्व प्रजा माझी मुले आहेत आणि माझा प्रयत्न आहे कि माझी सर्व मुले सुखी आणि समाधानी होवोत”.

राज्याभिषेकाच्या ९व्या वर्षांपासून ते २७व्या वर्षांपर्यंत सम्राट अशोकांचे शिलालेख आपल्याला पाहायला मिळतात. त्यामधून प्राचीन भारताचा तसेच शेजारच्या राष्ट्रांचा संपूर्ण इतिहास आपल्यासमोर मांडला आहे. एक आदर्श राजा कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून सम्राट अशोक यांच्या शिलालेखांकडे पाहायला हवे.

अतुल मुरलीधर भोसेकर
संयुक्त लेणीं परिषद
९५४५२७७४१०

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button