चक्र: शोषितांचे दाहक वास्तव
चक्र: शोषितांचे दाहक वास्तव
मानवी संस्कृतीची वैशिष्ट्ये खूप आहेत. प्रत्येक कालखंडात या संस्कृतीचे अनेक प्रस्तर निर्माण झाले आहेत. अश्मयुगापासून ते आधुनिक वैज्ञानिक कालखंडापर्यंत अनेक परिवर्तने या संस्कृतिने बघितली. या सर्व बदलत्या व्यवस्थेत एकच समान धागा कायम राहिला. बलवानाने कमकुवत व्यक्तींचे शोषण करणे, शोषणाच्या या संस्कृतिने एक नवाच आयाम निर्माण केला. शोषणाच्या पध्दती कालमाना परत्वे बदलल्या असल्या तरीही शोषक आणि शोषितांची रुपे मात्र तीच आहेत. “दिग्दर्शक रवींद्र धर्मराज यांनी चक्र या चित्रपटात अशाच एका शोषित महिलेची व्यथा मांडली आहे.”बाई आणि तिचा पती एका खेडेगावात राहातात. या गावातील जमिनदाराचा बाईवर वाईट डोळा असतो. एके दिवशी बलात्काराचा प्रयत्न करतांना बाईच्या पतीच्या हातून जमिन दाराचा खून होतो. खूनाचे परिणाम काय होतील, या भितीने हादरलेले दोघेही नवरा-बायको रातोरात मुंबईला पलायन करतात.
मुंबईत एका झोपडपट्टीत आश्रय घेतल्यावर बाईचा पती दारूच्या गुत्यावर उदरनिर्वाहासाठी काम करतो. अचानक एके दिवशी या दारूच्या गुत्यावर पोलिस छापा घालतात. या वेळी झालेल्या गोळीबारात बाईचा पती मरण पावतो आणि बाईला जगण्यासाठी वेश्या व्यवसाय स्विकारावा लागतो. जीवनाचे एक भयाण वास्तव या चित्रपटातून मांडण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरले आहेत. एका बलात्कारातून वाचण्यासाठी गाव सोडणा-या बाईवर आता रोज बलात्कार होतात. हे चक्र अव्याहत ग्राम्य संस्कृती आणि नागरी संस्कृती यांचा संघर्ष, त्यातून सर्व सामान्य माणसाची होणारी घुसमट दिग्दर्शकाने जिवंतपणे मांडली आहे.”
स्मिता पाटील सारख्या अभिनय संपन्न अभिनेत्रीने आपल्या कसदार अभिनयाने या चित्रपटाला वेगळी उंची मिळवून दिली आहे. “घराच्या बाहेर उघडयावर आंघोळ करतांना होणारी घुसमट तसेच धान्याचा ट्रक उलटताच धान्य लुटण्यासाठी धावणारे लोक नैतिक-अनैतिकतेच्या पलीकडे जीवन जगण्यासाठी चाललेली धडपड या सा-यांचे जिवंत चित्रण या चित्रपटातून मांडण्यात आले आहे.
झोपडपट्टीतील एक दादा ‘लुख्खा’ हे पात्र समाजातील भीषण वास्तवतेचे प्रतिक आहे. या लुख्खाला अनेक ठिकाणी वेश्यागमन केल्यामुळे लैंगिक रोगाची लागण झाली आहे. “बाईजवळ आलेल्या लुख्खाने आपली व्यथा मांडतांना होणारे दुःख आणि त्याला बाईने दिलेले उत्तर हा चक्रचा परमोच्च बिंदू आहे. “२३
आपल्याला झालेल्या रोगाबद्दल लुख्खा बाईला सांगतो तेव्हा बाई त्याला आत्मीयतेने उत्तर देते. ‘माझ्याकडे तू आधीच का आला नाहीस?” बाईच्या या वाक्यात त्याच्याबद्दल गुन्हा नसून सहानुभूती आहे. स्त्री मनाचे विविध पैलू उलगडून दाखविण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे. भारतीय संस्कृतीत स्त्रीला मातृदेवता म्हणून गौरविले जाते आहे.
आपली आई वेश्या आहे याची तिळमात्र खंत नसलेला बेडवा आईला गि-हाईक आल्याची वर्दी देण्यासाठी धावत पळत येतो तेव्हा त्याची ‘आई’ या नात्याबद्दल काय भावना असावी या विचाराने प्रेक्षक अंतर्मुख होतो. चित्रपटाचा शेवटही परिणामकारक आहे. “झोपडपट्टी उठविण्यासाठी फिरणारा बुलडोझर जमिनदाराच्या वृत्तीचे भयानक दर्शन घडवितो. उध्वस्त झालेले लोक नवीन जागा बघतील, नवा संसार उभा करतील, त्यासाठी करावा लागणारा संघर्ष ही करतील, मात्र शोषणाचे हे चक्र असेच सुरू राहील. “शेवटच्या दृश्यात लुख्खा जीवनाला वैतागून म्हणतो, ‘पोट आणि पोटाच्या खालचा भाग नसताच तर जगणे किती सुलभ झाले असते’ ?”
लुख्खाच्या या वाक्यातून समाजाला शोषणाच्या या वेदना अजून किती काळ सोसाव्या लागतील असा प्रश्न उपस्थित ल्याशिवाय राहात नाही.
चक्र (१९८१)दिग्दर्शक रवींद्र धर्मराज