डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीतून ज्ञानाची भूक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीतून ज्ञानाची भूक
हंसराज कांबळे ✍️
८६२६०२१५२०
नागपूर.
आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार सरणीनुसार खरच प्रत्येक माणसाला पोटाच्या भुकेनंतर ज्ञानाची भूक आवश्यक आहे. प्रत्येकाला वाचन करण्याची आवड लागली पाहिजे. हेही तितकेच खरे आहे.*निव्वळ पुस्तक वाचले म्हणजे वाचले असे न करता पुस्तकातील सार , रसग्रहण करण्याची शक्ती ही जागृत असायला हवी. सिद्धांताचा परिपोष करता आला पाहिजे हेच खरे वाचन* !
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या हयातीत जे यातनामय जीवन भोगले आणि त्यांनी दूरदृष्टीपणा ठेवून माझ्या पुढील समाज वारसाला माझ्या इतके यातनामय जीवन भोगावे लागणार नाही , लागू नये यासाठी त्यांनी *मनुस्मृती जाळून त्याऐवजी ” भारतीय संविधान ” लिहून विचार स्वातंत्र्य , अभिव्यक्ती स्वातंत्र्य , समानता , बंधूभाव व न्याय , ह्याची सांगड घालून आणि बुद्धाच्या तत्व प्रणाली प्रमाणे ” निर्दोष जीवन ” जगण्याची शैली दिली* .एवढ कोणी करू शकत का ? म्हणून आपण सगळेजण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणी आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची पायमल्ली होऊ नये व आपला जीवनाचा मार्ग सुकर व्हावा फक्त एवढेच करणे आहे. तेही होताना दिसत नाही. फार मोठी शोकांतिका आहे.
म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके वाचून , ज्ञान संपादन करून बधिर , ठिसूळ झालेला मेंदू योग्य मार्ग पथावर नेऊन ठेवेल. याविषयी ते म्हणतात –
*तुम्ही भरपूर वाचन केले पाहिजे रोज एक अर्धे पुस्तक संपवण्याचा सराव केला पाहिजे. शिक्षण व विद्या या गोष्टी शिवाय आपला उद्धार होणार नाही*.
संदर्भ – खंड.१८ भाग – ३ . पृष्ठ. क्र.८६.पैरा – पहिली ओळ.
तसेच ते पुढे म्हणतात –
*विद्या , शील , करुणा , मैत्री या चार पारमिता असल्या पाहिजे. विद्येबरोबरच मानवाजवळ जर करुणा नसली तर तो कसाई आहे, असे मी समजतो. करुणा म्हणजे माणसा माणसा वरच प्रेम ! याच्यापुढेही मनुष्य गेला पाहिजे व त्याने मैत्री संपादन केली पाहिजे. ही विचारसरणी जर कोणी मांडली असेल तर ती भगवान बुद्धांनीच होय. मी माझ्या सारखा विद्वान या भारत वर्षात पाहू इच्छितो येतो*.
संदर्भ – उपरोक्त. पृष्ठ. क्र.४५८.
यात डॉ.बाबासाहेबांनी त्यांच्यासारखा विद्वान असावा अशी अपेक्षा केली होती. ह्यासाठी त्यांनी २०- २० तास उपाशीपोटी राहून अभ्यास केला होता. ही जाण आपल्या समाजातील लोकांमध्ये असायला हवी. प्रत्येक माणसाने आपल्या ज्ञानाच्या कक्षा उंचावल्या पाहिजे याविषयी ते म्हणतात –
*प्रत्येक व्यक्तीला केवळ एकदाच हे जीवन जगण्याची संधी मिळत असल्यामुळे त्याला त्याच्या सुप्त गुणाची वाढ करण्यास पुरेपूर संधी मिळाली पाहिजे*
संदर्भ – खंड.१८ भाग – १. पृष्ठ. क्र.१९८ . चार ते सहा ओळी.
पहा, वरील संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी *सुप्त गुणाची वाढ करण्यास पुरेपूर संधी मिळाली पाहिजे , डोळे मिटून नाहीं तर अध्ययन करून समजून घेतले पाहिजे* हे वाक्य त्यांनी लिखित स्वरुपात का लिहून ठेवले असेल यावर विचारपूर्वक सगळ्यांनी प्रकाश टाकून आचरण करायला हवे. तरच आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची खरी विचार प्रणाली समजून येईल . आणि समाजाविषयीची तळमळ , कनवळा दिसून येईल. शिक्षण व पुस्तक वाचन न केल्यामुळे माणसाला काय परिणाम भोगावे लागतात याविषयी ते म्हणतात –
*शिक्षण नसल्यामुळे जीवनाच्या शर्यतीत पुढे जाता येत नाही व त्यामुळे इतर समाजाकडून गळचेपी , मानहानी व विटंबना होते*
संदर्भ – खंड.१९.पृष्ठ.क्र.३८३.पैरा – १.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नेहमी म्हणत मी आजन्म विद्यार्थी आहो आणि राहील. त्यांच्या ज्ञानाची भूक ही कशी होती हे त्यांच्याच शब्दात जाणून घेऊ ते म्हणतात –
*माझे सर्व आयुष्य विद्यार्थी म्हणून जावे अशी माझी इच्छा होती. ज्ञानाची भूक लागावी म्हणून मी पोटाची भूक मारून अनेक ग्रंथ खरेदी केले. एखादी प्राध्यापकाची नोकरी पत्करून ग्रंथ वाचण्यात सुखाने काळ कंठावा अशी माझी पहिली इच्छा होती. परंतु सुदैवाने म्हणा अगर सुद्धा दुर्दैवाने म्हणा , मला अस्पृश्यांच्या चळवळीत पडावे लागले. ना पैसा , ना माणूस ना बुद्धिमत्ता अशी या समाजाची परिस्थिती असता या समाजाचे काम करणे मोठे कठीण आहे. व्यवहार दृष्टीने या प्रश्नाकडे पाहिले तर उच्च शिक्षण , उच्च अधिकार पदे आणि उदरनिर्वाहाचे उत्तम मार्ग यांच्या लाभांमुळेच त्यांची खरी उन्नती होईल*.
संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र. लेखक धनंजय किर. पृष्ठ. क्र.२६५ आणि २५६. अनुक्रमे.
जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पोटाची भूक मारून ग्रंथ खरेदी केले नसते आणि सम्यक संबोधी प्राप्त करण्यासाठी एखाद्या जंगलात जाऊन तपश्चर्य केली असती तर कल्पना करा आज आपली अवस्था कशी असती.? पण तसे न करता त्यांनी उच्च कोटीचे ज्ञान आंतरराष्ट्रीय विद्यापीठातून संपादन करून , सर्वसामान्य लोकांनाही तसेच ज्ञान प्राप्त करण्यासाठी सांगीतले आणि बोट बुद्धाच्या मार्गपथावर आणून ठेवले. बुद्धाच्या मूळ विचारसरणी काय होती आणि बुद्ध धम्मच स्वीकारण्याचे कारण काय याविषयी ते म्हणतात –
*समता , प्रेम, बंधुभाव या सर्व गोष्टी जगाच्या उद्धाराकर्ता आवश्यक असतील तर त्या बुद्ध धर्मातच सापडतील , मी आज वीस वर्षे प्रत्येक धर्माचा अभ्यास केला आहे. सर्वधर्माचा अभ्यास केल्यावर जगाला बौद्ध धर्म स्वीकारायला पाहिजे असे माझे मत आहे*.
संदर्भ – खंड.१८ भाग – ३ पृष्ठ. क्र.२२९.
म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देव , भक्ती मार्गाकडे न वळवता , भक्ती बाबत ते म्हणतात – *भक्ती मार्गाने गेल्यास माणसाचा मेंदू हा ठिसूळ होतो* ( हा संदर्भ माझ्या वाचनात गेला पण संदर्भ दिसत नाही . माफी असावी ????) म्हणूनच आपणा सर्वांना बुद्ध धम्माची *धम्मदीक्षा* देऊन आणि न्याय , हक्क , विचार स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी *भारतीय संविधाना* ची निर्मिती करुन उन्नतीचा मार्ग आपणास दिला आहे.
दिनांक.
22 नोव्हेंबर 23.