सामाजिक

विद्यार्थी कसा असावा?

विद्यार्थी कसा असावा?
-भिमराव परघरमोल

जगभरात अनेक महापुरुषांचे जन्म-मृत्यू दिवस हे सन्माननीय नावाने तथा उत्सव रूपाने साजरे केले जातात. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन तथा व्यक्तिमत्वपैलूंच्या स्मृती प्रित्यर्थ विविध दिनोत्सव जगभर साजरे केले जातात. जसे त्यांची जयंती ज्ञानदीन, वकिली व्यवसाय सुरू केला तो दिवस, (लॉयर डे) वकील दिन, संविधान स्वीकृतीचा संविधान दिन. तसेच त्यांनी ७ नोव्हेंबर १९०० रोजी साताऱ्याच्या प्रतापसिंग हायस्कूलमध्ये प्रथम प्रवेश घेतला तो दिवस सगळीकडे विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो.
जगामाजी या विविध दिवसांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण त्या दिवशी लोक त्या-त्या महापुरुषांना आठवण करून त्यांच्या ठायी नतमस्तक होतात. त्यांचा त्याग, कष्ट, समर्पणाप्रती कृतज्ञता व्यक्त करून प्रेरणा घेतात. काही लोक तर त्या दिवशी अंतर्मुख होऊन आपल्यातील गुण-दोषांची पडताळणी करून गुणांच्या भरभराटीस्तव आणि अवगुणांना निरस्तीकरणाच्या दिशेने संकल्पही करतात.
महापुरुषांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करताना वरील बाबींची आवश्यकता तर आहेच. परंतु त्यांचे अपूर्ण राहिलेले कार्य कोणते? ते पूर्ण करण्याच्या दिशेने कूच करून, त्यांना सहकार्य करणारांप्रति सहानुभूती, तर विरोधकांच्या पिलावळीपासून सावधानताही क्रमप्राप्त ठरते.
त्याच दृष्टीकोनातुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विद्यार्थी दिवस हा अतिशय महत्त्वाचा ठरतो. कारण तो दिवस विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असतो. विद्यार्थी हे देशाचे भावी नागरिक असल्यामुळे ते राष्ट्राचा आधारस्तंभ असतात. त्यांच्या भवितव्यावर समर्थ राष्ट्राचा डोलारा उभा राहणार असतो. म्हणून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे सर्वगुणसंपन्न असावे. त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्ती ओतप्रोत भरलेली असावी. दहा नैतिक मूल्यांसह चार महान मानवी मूल्यांनी त्यांचे व्यक्तिमत्व उभरलेले असावे. शेतीप्रधान देशामध्ये कष्टाला महत्त्व देणारे ते असावे. त्यासाठी श्रमप्रतिष्ठा, वैज्ञानिक दृष्टिकोन, स्त्री-पुरुष समानता ही मूल्य त्यांच्या ठाई ठाई दिसावे. असे झाले नाही तर तरुणाई बेलगाम बेफाम होऊन राष्ट्र अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही. आणि अधोगतीला गेलेले राष्ट्र कुणाचे तरी गुलाम होऊन आपले स्वातंत्र्य अबाधित राखण्यास असमर्थ ठरते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतःला आजन्म विद्यार्थी समजत होते. एखाद्याने आयुष्यभर जरी विद्येची उपासना केली, तरी तो मनुष्य ज्ञानसागराच्या गुडघाभर पाण्यातच उतरू शकतो. एवढी ज्ञानाची अथांगता आहे. म्हणून प्रत्येक मनुष्य हा आजन्म विद्यार्थीच असला पाहिजे. विद्येची, ज्ञानाची उपासना करताना १२ डिसेंबर १९३८ ला मुंबई येथे अस्पृश्य विद्यार्थी संमेलनामध्ये विद्यार्थ्यांसमोर अतिशय वस्तुनिष्ठ आणि समाज प्रचलित उदाहरण देताना ते म्हणतात की, “दारूचे व्यसन लागल्यानंतर जसं ते मरेपर्यंत सोडून जात नाही, तसं ज्ञानोपासणेच व्यसन जडलं पाहिजे. परगावातील एखाद्या प्रेयसीला भेटायला जाताना एखादा मनुष्य वेळ-काळाचे भान न ठेवता रस्त्यात येणाऱ्या संकटांना मात देतो. कोणतीही आडवाट त्याला थांबवू शकत नाही. जंगली श्वापदांची हिंस्र पशूंची त्याला भीती वाटत नाही, त्याप्रमाणे विद्येवर प्रेम केलं पाहिजे. जेणेकरून तीही तुमच्या प्रेमात पडेल.”
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात तीन महापुरुषांना गुरुस्थान देऊन तीन दैवतांची उपासना केली. ज्यामुळे त्यांना एका युरोपियन व्यक्तीने जगातील सहा विद्वानांमध्ये स्थान दिलं. त्यांचे तीन गुरु म्हणजे तथागत गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा ज्योतिराव फुले. हे तीनही गुरु त्यांचे समकालीन नसून त्यांच्यासोबत त्यांचा जात, धर्म, पंथ असा कुठलाही तीळमात्र, काडीचाही संबंध नव्हता. तरीही आयुष्यभर ते त्यांच्याच वाटेवरील वाटसरू म्हणून जगले. कारण तथागत गौतम बुद्धाने मानवी मूल्यांची (समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता) प्रसव केली. तर त्या मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी इतरांनी आपली हयात खर्ची घातली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तीन उपास्य दैवतं म्हणजे विद्या, स्वाभिमान आणि शील. ज्यामुळे त्यांचा समाजात नैतिक धबधबा निर्माण झाला. विद्येच्या संदर्भात बोलताना ते म्हणतात की, “मनुष्याला अन्नाप्रमाणे शिक्षणाची ही गरज असते. ज्ञानाशिवाय काहीही होऊ शकत नाही. परंतु आमच्यासाठी धर्माने ज्ञानाचे सर्व दरवाजे बंद केलेले होते.
त्यांचे विद्येचे वेड हे भयंकर होते त्यांच्या वैयक्तिक ग्रंथसंभारामध्ये अनेक दुर्मिळ हस्तलिखिते व संदर्भग्रंथांसह २० हजार पुस्तकांचा संग्रह होता.
त्यांचे दुसरे दैवत म्हणजे स्वाभिमान. आपल्या समाजात तो निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रथम प्राधान्य दिले. त्यांचे स्वतःचेही व्यक्तिमत्व स्वाभिमानाने ओत-प्रोत होते. त्यांच्या मते अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी विद्यार्थी हा स्वाभिमानी व स्वावलंबी असला पाहिजे. शेळी होऊन दीर्घायुषी होण्यापेक्षा वाघासारखे संघर्षरत अल्पायूषी होण्यास हरकत नाही. शिकलेला व्यक्ती जर स्वाभिमानी असेल तर तो स्वार्थापोटी कुठल्याही अमिषाला बळी न पडता आपल्या अंगीकृत कर्तव्यासाठी जागृत राहील. स्वावलंबी होण्यासाठी विद्यार्थ्यांने शिकून एखादी नोकरी मिळवणे हे वाईट नसलं, तरी त्यांच्यामध्ये काही दोष निर्माण होऊ नये. तो स्वार्थी बनू नये. आपणामध्ये जी लायकी निर्माण झाली, ती आपोआप झाली नसून त्यासाठी महापुरुषांनी खस्ता खाल्लेल्या आहेत. त्यामागे त्यांचा त्याग, कष्ट, समर्पण आहे. हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. त्या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, “शिकलेला व्यक्ती नोकरी मिळाल्यानंतर एवढा स्वार्थी बनतो, की समाजाकडे लक्ष द्यायला त्याला वेळच मिळत नाही. तो स्वार्थामध्ये एवढा गुरफटतो की स्वतःला शिक्षण प्रक्रियेमधून बाद करतो. त्याने तसं न करता क्षणाक्षणाला होणारे ज्ञान सतत वेचत राहिले पाहिजे. कोणी प्रवासात जरी असला तरी त्याच्याकडे चार-दोन पुस्तके व वर्तमानपत्र असली पाहिजे. अन्यथा कष्टाने मिळवलेले ज्ञान विकसित झालेल्या सर्व कलाकुसर, कौशल्य लोप पावण्यास वेळ लागणार नाही.” पाश्चात्य विचारवंत मॅझिनी म्हणतो की, लोकात पारतंत्र्य पसरले, मानसे शिकली तरी त्यांच्यात कर्तव्यापेक्षा हक्काची जाणीव जास्त उत्पन्न होते. आपले कर्तव्य कोणते याची जाणीव होत नाही हा मोठा दोष.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तिसरे दैवत म्हणजे शील होय. शील म्हणजे सदाचरण. कोणाशीही दगाबाजी, फसवणूक, आत्मसिद्धीसाठी पाप न करणे. शीलाच्या संदर्भात बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिमानाने सांगतात की, ” शील संवर्धन हा गुण माझ्यात मोठ्या प्रमाणात आहे. मी विलायतेला असताना दारू बीडीला हातही लावला नाही. मला कसलेही वेसन नाही.” शील संवर्धना संदर्भात आणखी एका ठिकाणी ते म्हणतात की,” मला माझे सर्व विरोधक घाबरतात. त्याचे कारण म्हणजे की मी खूप शिकलेला आहे, मी विद्वान आहे किंवा माझ्या मागे संपूर्ण अस्पृश्य समाज आहे असे नव्हे. तर मी शीलवान आहे. मी पराकोटीची गरिबी उपभोगली, तरी कोणासमोर हात पसरला नाही. मी कोणतेही पाप केल्याचे मला आठवत नाही.”
आजन्म विद्यार्थी असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून समस्त बहुजन समाजातील (एससी, एसटी, ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी) विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची, शिष्यवृत्तीची, नोकरीची आणि नोकरीनंतर बढतीची व्यवस्था निर्माण केली. सोबतच संविधानाच्या प्रकरण चार नीतीनिर्देशक तत्वाच्या अनुच्छेद ४६ नुसार दुर्बल वंचित घटकांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन करण्यासाठी राज्यांना जे काही करण्याची इच्छा असेल ते करण्यासाठी अधिकारीत केलेले आहे.
आजच्या विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू आपल्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग बनवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले पाहिजे. संविधानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिलेले कवच निकामी करून त्यांना ज्ञान आणि धनापासून वंचित ठेवून मनुस्मृतीचे राज्य आणण्यासाठी टपलेली व्यवस्था वेळीच ठेचून काढण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. त्यासाठी भारतीय संविधान प्रत्येकाने समजून घेऊन त्याचा सन्मान, सुरक्षा व संवर्धन करणे अगत्याचे आहे. असे करणे म्हणजेच विद्यार्थी दिनाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सच्चे अभिवादन करणे होय.

भिमराव परघरमोल
व्याख्याता तथा अभ्यासक
फुले शाहू आंबेडकरी विचारधारा
तेल्हारा जि. अकोला
मो.९६०४०५६१०४

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button