वैचारिक
Trending

प्रतित्यसमुत्पादाचा सिध्दांत

प्रतित्यसमुत्पादाचा सिध्दांत

दु:ख, अनित्यता, अनात्मता आणि निर्वाण हे बुध्द धम्माचे मूलभूत सिध्दांत आहेत. हे चारही सिध्दांत प्रतित्यसमुत्पादावर आधारित आहेत. त्यांचा उगम प्रतित्यसमुत्पादापासून झाला आहे. हा सिध्दांत इतका महत्त्वाचा आहे की, जो प्रतित्यसमुत्पादाला जाणतो तो धम्माला जाणतो आणि जो धम्माला जाणतो तो प्रतित्यसमुत्पादाला जाणतो असे भगवान बुध्द म्हणतात. या सिध्दांताच्या आधारे भगवान बुध्दाने पुन्हा पुन्हा जन्म घेणे व पुन्हा पुन्हा मरणावस्था प्राप्त करणे अशा या संपूर्ण भवचक्राचा उलगडा केला आहे. जन्म आणि मरणाचा हा क्रम अनादिकाळापासून एखाद्या चक्राप्रमाणे अखंड गतीने चालत आलेला आहे. अशा या जन्म आणि मरणाच्या रहस्यावर भगवान बुध्दाने प्रतित्यसमुत्पाद या सिध्दांताच्या आधारे प्रकाश टाकून भवचक्राच्या प्रवृती व निवृतीच्या मुळाशी असलेल्या कारणाचे दिग्दर्शन केले आहे.
भगवान बुध्दांनी प्रतित्यसमुत्पाद म्हणजे काय ते ‘मझिमनिकायातील चूलसकुलदायिसुत्तात’ असे सांगितले-
‘इमस्मिं सति इदं होति ।
इमस्सुप्पादा इदं उपज्जति ॥
इमस्मिंअसति इदं न होति ।
इमस्स निरोधा इदं निरुज्जति ॥’
‘ह्याच्या होण्यामुळे हे होत असते.
ह्याच्या न होण्यामुळे हे होत नसते.
ह्याचा उत्पन्न होण्यामुळे हे उत्पन्न होत असते.
ह्याचा निरोध केल्याने ह्याचा निरोध होत असतो.’
पंचवर्गीय भिक्खूंपैकी स्थविर अश्वजित यांनी सारीपुत्तांना भगवान बुध्दांचा धम्म संक्षेपाने सांगितला-
‘ये धम्मा हेतुप्पभवा, हेतुं तेसं तथागतो आह ।
तेसंच यो निरोधो, एवं वादी महासमणो ॥’
‘जी दु:खे, ज्या गोष्टी (धम्म) कारणांपासून उत्पन्न होतात, त्यांची कारणे तथागतांनी सांगितली आहेत आणि त्यांचा निरोध कसा करावा हे त्यांनी सांगितले आहे. हेच महाश्रमणांचे मत आहे.’
यावरुन हे स्पष्ट होते की, अगदी सुरुवातीपासूनच भगवान बुध्दांच्या धम्माचा पाया प्रतित्यसमुत्पादाच्या सिध्दांतावर आधारलेला होता.
संयुक्‍त निकायात नमुद केल्याप्रमाणे भगवान बुध्द भिक्खु आनंदाशी संवाद करीत असताना म्हणाले की, ‘प्रतित्यसमुत्पाद हा सिध्दांत फार गंभीर आहे. गूढ आहे. या धर्माला योग्य प्रकारे न जाणल्यामुळे आणि न समजल्यामुळे प्रजा गुंता झालेल्या धाग्याच्या गुंडीसारखी, गाठी पडलेल्या दोरीसारखी आणि गोळा झालेल्या मुंजाच्या गवतासारखी होऊन, अपायात पडून दुर्गतीला प्राप्‍त होत आहे.’
महापधान सुत्तात भगवान बुध्द म्हणतात की, ‘आसक्‍तीत पडलेल्या, आसक्‍तीत रममाण असलेल्या आणि आसक्‍तीत आनंद मानणार्‍या सामान्य लोकांसाठी हे कठीण आहे की कार्यकारणासंबंधी प्रतित्यसमुत्पादाला ते समजून घेतील.’ सर्वसामान्य लोक ईश्वर, देवदेवता, दैववाद, कर्मकांड, आत्मा इत्यादी संबंधीत मिथ्यादृष्टीत गूंतले होते. त्या प्रवाहाच्या विरोधात जाणारा प्रतित्यसमुत्पादाचा सिध्दांत त्यांना समजेल की नाही याबाबत भगवान बुध्दांना शंका वाटत होती. परंतु महाकारुणिकांच्या असिम मैत्री, करुणा, मुदिता व उपेक्षा या ब्रम्हविहाराच्या भावनेने त्यांना प्रवृत केले की जगातील काहीतरी लोक हा धम्म समजू शकतील. त्यानंतरच त्यांनी आपल्या सिध्दांताची शिकवण जगाला देण्याचा निश्चय केला.
प्रतित्य म्हणजे प्रत्यय किंवा कारण आणि समुत्पाद म्हणजे उत्पत्ती. अर्थात प्रतित्यसमुत्पाद म्हणजे हेतूमुळे किंवा कारणामुळे कार्याची उत्पत्ती होणे. ह्याच्या उत्पन होण्यामुळे हे उत्पन होत असते. यालाच कार्यकारणभाव (Cause and effect) असेही म्हटले जाते. प्रतित्यसमुत्पादाला प्रत्ययाकार किंवा पच्चयाकार निदान असेही म्हणतात. त्याचा संबंध अनित्यता आणि अनात्मता यांचेशी आहे. कोणताही पदार्थ शाश्वत नाही. सर्व संस्कारीत पदार्थ अनित्य आहेत, क्षेणैक आहेत आणि हेतुप्रत्ययजनित आहेत. प्रतित्यसमुत्पादाला ‘मध्यमावर्ग’ असेही म्हणतात. बुध्दधम्मात शाश्वत दृष्टी व उच्छेद दृष्टी यांना टोकाचे दोन मार्ग असे म्हटले आहे. महास्थविर बुध्दघोषांनी ‘प्रतीत्य’ शब्दात शाश्वत दृष्टी आणि ‘समुत्पाद’ शब्दात उच्छेदवादी दृष्टीचे खंडण केले असे सांगून प्रतित्यसमुत्पाद मध्यममार्गाचे तत्वज्ञान सांगतो असे म्हटले आहे.
आचार्य नागार्जुन यांनी प्रतित्यसमुत्पादाला आणि शून्यता यांना एकच मानले आहे. विग्रहव्यावर्तनीमध्ये नागार्जुन म्हणतात की, ज्यांनी शून्यतेला जाणले आहे त्यांनी सर्व लौकिक आणि लोकोत्तर अर्थाला सुध्दा जाणले आहे. कारण ज्यांनी शून्यतेला जाणले आहे, त्याने प्रतित्यसमुत्पादाला जाणले आहे. त्याने चार आर्यसत्यालाही जाणले आहे.
भगवान बुध्दांनी प्रतित्यसमुत्पाद हया सिध्दांताचा शोध लावून मानवाच्या दु:खाच्या निर्मितीची प्रक्रिया अतिशय सोप्या शब्दात आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून मांडली आहे. म्हणून त्यांचा प्रतित्यसमुत्पादाचा सिध्दांत हा एक अलौकीक शोध आहे. त्यावेळी जी समाजरचना होती, जी विचारधारा प्रचलीत होती, त्या प्रवाहाच्या विरोधात प्रतित्यसमुत्पादाद्वारे त्यांनी आपल्या एका नवीन धम्माची आणि तत्त्वज्ञानाची प्रतिष्ठापना केली.
प्रतित्यसमुत्पाद हा सिध्दांत केवळ दु:खापुरताच मर्यादित नाही, तर तो विश्वातील सर्व गोष्टींना लागू पडतो.
याच सिध्दांताच्या आधारे भगवान बुध्दाने सृष्टीचा निर्माता म्हणून ईश्वराला नाकारले. तसेच ईश्वराच्या अस्तित्वाला व आत्म्याच्या स्वतंत्र अस्तित्वाला सुध्दा नाकारले. कोणीही जग शून्यातून निर्माण करु शकत नाही व कोणतीही गोष्ट शून्यातून निर्माण होत नाही तर ती कारणाने निर्माण होत असते. त्यामुळे सृष्टीचा निर्माता ईश्वर, देव वगैरे सर्व कल्पना खोट्या आहे. सर्व विश्व प्रतित्यसमुत्पाद म्हणजे कार्यकारणभावाच्या सिध्दांतावर आधारलेले आहे.
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.२८.१२.२०२३
टीप- ‘भगवान बुद्धांची शिकवण’ हे माझं पुस्तक Amazon Kindle वर असून त्यावर आधारित ही लेखमाला सादर करीत आहे.

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button