कर्म’ हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे हे मानणे म्हणजे धम्म
‘कर्म’ हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे हे मानणे म्हणजे धम्म
ह्या भौतिक जगात एक प्रकारची सुव्यवस्था (an order) आहे. खालील घटनांनी ती सिद्ध होते.
आकाशातील ग्रहगोलांच्या चलनवलनात–गतीत–एक प्रकारची सुव्यवस्था आहे.
ऋतुचक्रामध्येही सुव्यवस्था आहे. नियमित क्रमाने ऋतू येतात आणि जातात.
काही विशिष्ट व्यवस्थेनुसार बीजांचे वृक्ष होतात. वृक्षांपासून फळ उत्पन्न होते आणि फळापासून परत ‘बीज’ निर्माण होते.
बौद्ध परिभाषेत या व्यवस्थेला ‘नियम’ म्हणतात. एकामागून एक सुव्यवस्थित क्रम दर्शविणाऱ्या नियमांना ‘ऋतुनियम, बीजनियम’ असे संबोधितात.
समाजामध्येही याच प्रकारचा ‘नैतिक क्रम’ आहे.
जे ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात. ते म्हणतात, “विश्वाचा नैतिक क्रम हा ईश्वराच्या इच्छेचा परिणाम आहे. ईश्वराने विश्व निर्माण केले आहे आणि ‘ईश्वर’ हाच या विश्वाचा कर्ता, धर्ता आहे. तोच भौतिक आणि नैतिक नियमांचा कर्ता आहे.” त्यांच्या मते नैतिक नियम माणसांच्या भल्यासाठी असतात; कारण ते ईश्वरी आज्ञास्वरूप आहेत. आपल्या निर्मात्या ईश्वराची आज्ञा पाळणे त्यांना क्रमप्राप्त आहे. आणि ईश्वराच्या आज्ञेच्या परिपालनाने हा नैतिक क्रम चालू राहतो.
जे नैतिक व्यवस्था ही ईश्वरी इच्छेचा परिणाम आहे असे मानतात त्यांचे विचार वरील प्रमाणे असतात.
ही व्याख्या मुळीच समाधानकारक नाही. कारण ईश्वर हा नैतिक नियमांचा जनक असेल, ह्या नैतिक नियमांचा आरंभ आणि अंत तोच असेल आणि माणसाला ईश्वराची आज्ञा पाळण्यापासून सुटका नसेल तर ह्या संसारात इतकी नैतिक अव्यवस्था का आढळते? ह्या ईश्वरी नियमाच्या मागे असा कोणता अधिकार (authority) आहे? ईश्वरी नियमांचा व्यक्तीवर काय अधिकार आहे? हे संयुक्तिक प्रश्न आहेत. परंतु जे लोक नैतिक व्यवस्था ही ईश्वरी इच्छेचा परिणाम आहे असे मानतात, त्यांच्याजवळ या प्रश्नांना उत्तर नाही.
सृष्टीत नैतिक क्रम कसा राखला जातो, या प्रश्नाला भगवान बुद्धाने दिलेले उत्तर अगदी भिन्न आहे.
तथागतांचे उत्तर सोपे आहे. ते असे- नैतिक व्यवस्था ही ईश्वर सांभाळीत नसून ती कम्म (कर्म) नियमाप्रमाणे सांभाळली जाते. सृष्टीची नैतिक व्यवस्था (moral order of the universe) चांगली असेल अथवा वाईट असेल, परंतु तथागतांच्या मते ती माणसावर सोपविलेली आहे. इतर कोणावर नाही.
‘कम्म’ (कर्म) म्हणजे मनुष्याकडून केले जाते ते कार्य (man’s action) आणि विपाक म्हणजे त्याचा परिणाम (effect). जर नैतिक व्यवस्था वाईट असेल तर त्याचे कारण मनुष्य अकुशल कम्म करतो हे आहे. नैतिक व्यवस्था चांगली असेल तर त्याचा अर्थ इतकाच की, मनुष्य कुशल कम्म (सत्कर्म) करीत आहे.
भगवान बुद्ध केवळ कर्मासंबंधीच बोलत नाहीत. ते ज्यांना कम्मनियम म्हणून ओळखतात त्या कम्माच्या नियमांचेही विवेचन करतात.
कम्मनियमाचा बुद्धप्रणीत अभिप्राय असा की, ज्याप्रमाणे दिवसामागून रात्र येते त्याप्रमाणेच कर्मामागून त्याचा परिणाम येतो. हा एक नियम आहे. कुशल कर्मापासून होणारा लाभ प्रत्येक कुशल कर्म करणाराला मिळतो आणि अकुशल कर्माचा दुष्परिणाम टाळता येत नाही.
म्हणून भगवान बुद्धाचा उपदेश असा:
“असे कुशल कर्म करा म्हणजे मानवतेला चांगल्या नैतिक व्यवस्थेचा लाभ होईल. कारण कुशल कम्मानेच नैतिक व्यवस्था राखली जाते. अकुशल कम्म करू नका, कारण त्यामुळे नैतिक व्यवस्थेची हानी होते आणि मानवता दुःखी, त्रस्त होते.”
हे शक्य आहे की, कम्म आणि कम्माचा होणारा परिणाम, या दोहोंमध्ये काही कालांतर असेल. असे बहुधा घडते.
या दृष्टीने कम्माचे तीन विभाग करता येतात:
(१) दिट्ठधम्म वेदनीय कम्म (तात्काळ फल देणारे कम्म),
(२) उपपज्जवेदनीय कम्म (ज्याचा परिणाम फार कालांतराने होतो ते कम्म),
(३) अपरापरियवेदनीय कम्म (आनिश्चित काळाने फळ देणारे कम्म).
कम्म हे कधी कधी ‘अहोसी’ कम्म होऊ शकते, म्हणजे त्याचा काहीच परिणाम होत नाही. अहोसी कम्मामध्ये ज्या कम्मांचा त्यांच्या अंगच्या दुर्बलतेमुळे विपाक अथवा परिणाम होत नाही, किंवा जी कम्मे अन्य सबळ कम्मामुळे बाद होतात त्यांचा समावेश होतो.
कम्माचा विपाक फक्त कर्त्याला भोगावा लागतो. असे जरी असले तरी कधी कधी एकाच्या कम्माचा त्याच्याऐवजी दुसऱ्यालाच परिणाम भोगावा लागतो; तथापि हे सर्व कम्म नियमाचेच परिणाम आहेत, कारण तोच कम्मनियम नैतिक व्यवस्था सांभाळतो किंवा मोडतो.
व्यक्ती येतात, जातात; पण विश्वाची नैतिक व्यवस्था कायम राहते आणि त्याप्रमाणेच ही व्यवस्था बनविणारा कम्मनियमही अप्रतिहत राहतो.
याच कारणास्तव भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये अन्य धर्मात ईश्वराला जे स्थान दिले आहे ते नीतीला प्राप्त झाले आहे.
कम्मनियमाचा संबंध केवळ सर्वसाधारण नैतिक व्यवस्थेशी आहे. व्यक्तीच्या सद्भाग्याशी किंवा दुर्भाग्याशी त्याचा संबंध नाही.
त्याचे प्रयोजन विश्वातील नैतिक व्यवस्था राखणे हे आहे.
ह्या कारणास्तव ‘कम्मनियम’ हे धम्माचे एक अंग आहे.
संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ तृतीय खंड भाग तिसरा
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.१२.२.२०२४