जो परीस्थितीशी संघर्ष करतो तोच टिकतो हा डार्विनचा सिद्धांत तू अडाणी तरी तुला कसाकाय कळलाय बा ..?
एका प्राध्यापकाने वडिलांच्या आठवणीत मन मोकळं केलेली दाहकता..
जो परीस्थितीशी संघर्ष करतो तोच टिकतो हा डार्विनचा सिद्धांत तू अडाणी तरी तुला कसाकाय कळलाय बाबा..?
एका प्राध्यापकाने वडिलांच्या आठवणीत मन मोकळं केलेली दाहकता..
वय वर्ष आठ ते ऐंशी वर्षे गुराखी, शेतावर राबणारा सालगडी, शेतमजूर, हमाल, दारोदारी जाऊन डोक्यावर फळभाजी विकून हडाची काड आणि देहाचे चिपाड होईपर्यंत काबाड कष्ट करून मुलांना उच्चशिक्षित करण्यासाठी आयुष्य समर्पित करणारे शिक्षण प्रेमी, गावातील होतकरू गरजू विद्यार्थ्याना शिक्षणासाठी मदत करणारे, सामाजिक कार्यासाठी नेहमीच सढळ हाताने मदत करणारे श्रमजीवी समाजसेवक माझे बाबा श्रमिक लिंबाजी चिमाजी पवार यांच्या तिसऱ्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या संघर्षमय जीवनाचे शब्दांकन करण्याचा हा प्रयत्न….
बाबा तुम्ही जाऊन आज तीन वर्ष झाले, पण अजूनही वाटत नाही की तुम्ही हे सर्व जग सोडून गेलात. तुम्हा आडणी माय बापाच्या पोटी जनमुन आज मी प्राध्यापक झालो, शुद्ध मराठी बोलायला शिकलो, इंग्रजी ही जगाची भाषा आज मी मुलांना शिकवतो पण आज जे काय मी लिव्हणार हाय ते सारं आपल्या गावाकडच्या घरच्याच भाषेत लिव्हनार हाय. या पूढ तुम्ही नमनता तू म्हणूनच लिव्हणार हाय. त्याशिवाय भावनेला वाट मिळणार न्हायी अन् मन मोकळ होणार नाही.
बाबा तू जाऊन आज तीन वर्षे झाले, तरी असे वाटते की आमचा बाबा बाजारला फळभाजी ईकायला गेलाय अन संध्याकाळी येणार हाय. पण बाबा तू जाताना आम्हाला काहीही कळू दिलं नाही. आम्हाला असं कधीही वाटल नाही की आमचा बाबा एवढ्या लवकर जाणार. कारण तुझा कणखर देह, सदा हसरा चेहरा सतत काही तरी तुझी खटपट बघून वाटल नाही की, तू लगेच निघून जाणार. तसा तु कुठल्या गोष्टीला येळ करतच नव्हतास. तुमचा दिवस साऱ्या गावाच्या आदी सुरू होत व्हता.
तसी बुद्धाघरी जाण्याचीही एकाच रात्रीत तू तयारी केली.
तु लहान असताना तुझा बाप चीमनाक तुझ्यावर चील्या पिल्याचा तुमच्या चार पाच भावंडांच्या बाजार सोडून गेला. म्हारा घरी जनमल्यामूळ ना शेती ना बाडी, रोजमजुराचं जीवन म्हणजे हातावरच पोट, हाताला काम भेटलं तर पोटाला भाकर मिळणार असा तो काळ, तु नेहमी म्हणायचास की कामगाराला भाया( बाहू) झिजवल्या शिवाय भाकर मिळत नाही म्हणून भाया शाबूत ठेवा रे लेकरांनो ! म्हंजे तब्येत चांगली ठेवा. तशी तुझी तब्येत लई कणखर, मला कळते तस कधी बिमार पडला आन काम सोडून घरी राहायला अस झालं नाही. वाडवडलाचं गुंटाभर शेत नव्हत, मात्र तु खरा अस्सल शेतकरी. वयाच्या ऐंशीव्या वर्षी तुला गावातील बडे शेतकरी पेरायला बोलवित. तू कितेक शिवार नांगरली, कितेक शिवार पेरली, कितेक झाडे तोडले, पाच – दहा बैल जोडयांसोबत तुझ आयुष्य रानात राबण्यात गेलं. तू तसा जनावरानवर लय प्रेम करायचास, म्हणूनच जांबाडीतल्या जागलीवर रात्री बेरात्री बाजाऱ्हून तु आल्याची चाहूल लागली की आपली गाय हंबरायची… दिवसा रात्री फळ भाजीचं ओझ वाहून तुझे हाड लई झिजले तरी पण तू कधी थकला नाही शेवटपर्यंत कामात राहिला.
आयुष्भर काळ्या मातीत कष्ट करून आणि उन्हात तान्हात रापलेला तुझा काळसर पडलेला चेहरा सदा हसरा बघून आम्ही पण तुझ्याकडे हासत जगायला शिकलो. कारण तु आयुष्यात गरिबी, दारिद्र्य, परिस्थिती याचं रडगाणं कधीच मांडला नाही. तुझा विश्वास होता फक्त काष्टावर. तु अशिक्षित होता पण तुकोबांचे अभंग पुटपुटत असायचा. कष्टाविना फळ नाही. कष्टाची भाकर गोड हा विचार तु आमच्यात पेरला. सतत संघर्ष आणी प्रचंड आशावाद हेच तुझ्या आयुष्याचं सार. म्हणूनच आज आम्ही त्याच संघर्षाच्या वाटेवरून चालत आहोत अगदी हासत हासत, तुझी आठवण सोबत घेऊन.
तुझा बाप चीमनाक साथीच्या रोगाने वारला आणि लहान बहीण भाऊ यांच्या पालन पोषणाची जबाबदारी तुझ्यावर पडली. वयाच्या आठव्या वर्षी तु गुरु -ढोरं चारायला लागला, फक्त दोन वळेच्या भाकरी साठी. आठव्या वर्षी माय बापाच्या आंगा-कांद्यावर खेलायचं तुझ वय, गोड-धोड खाण्यासाठी, खेळणी मागण्यासाठी हट्ट करण्याच तुझ ते वय पण या निरागस वयात तु जुंपला राबायला ते आयुष्यभरासाठीच. पडत्या पावसात काट्याकुट्याच्या पांधन रस्त्यांनी चिखलाची वाट तुडवत गाई वासरांना रानात चारायला घेऊन जाणारे तुझे अनवाणी नाजूक पाय त्यात रुतलेला काटा आणि सांडलेले लाल रक्त आणि तुझ्या बाल मनाला झालेली वेदना आज माझं हृदय पिळवटून टाकते. असे तुझे बाल वयातील पहिले दोन वर्षे तु तुझ्या भावंडांच्या भुकेसाठी पोटार्थी घातले. आज मी बुध्द-फुले-शाहु-आंबेडकर -कर्मवीर आण्णांच्या कर्तृत्वामुळे महिना लाखभर पगार सुखाने खातो. पण तू देश प्रातंत्र्यात असताना जन्मला म्हणून कसली काय शाळा अन् कुठले शिक्षण, सारे जगण्याचे वांदे. पूर्वी लाई दुष्काळ होता अस तुम्ही सांगायचे ते आज आम्ही पुस्तकात वाचतो लोक भाकरीला मोताज होते.
लोक अन्न अन्न म्हणून उपासमारीने मरायचे तसा तो काळ होता. आम्ही पण तो दुष्काळ अनुभवलाय तुझ्या धोतराच्या चाळात ज्वारी आणली तरच आपली चूल पेटायची, गावत आपल्याला शेत नाही म्हणून कोण कुणबी भाऊकी आपल्याला आदीनडीला पायलीभर ज्वारी द्यायला तयार नसत.
त्याकाळी तू आठ वर्षाचा पोरगा तुला जनावरं वळायला दोन वेळची भाकरी तरी मिळाली ही पण मोठी गोष्ट होती अस तू म्हणायचास. मिळणाऱ्या दोन भाकरीतील एक भाकरी तू भावंडासाठी घरी घेऊन येत होता. आपल्या भावंडाना अधिकची भाकरी मिळावी यासाठी रानातूनच शेंगा छन्या चार-बोर खाऊन येत होतास आणि तुझ्या हिष्याची भाकरी आपल्या लहान भवंडास द्यायचास. पुढे तू सालगडी म्हणुन वर्षाला एकशे पंचवीस रुपये पगार
म्हणून कामाला सुरुवात केली. आज माझा मुलगा सम्यक चालत-चालत खेळणी घेण्यासाठी 125 रुपये नाहीतर 500 रुपये सहज खिशातून काढतो. जरी तुझा खिसा लहान असला तरी तुझे मन फार मोठे होते तू पण आमच्यासाठी खिश्यात हात घालायला मागे पुढे बघितला नाहीस.
जसी तुला त्या लहान वयात तुझा भुकेल्या भावंडांची काळजी होती त्याही पेक्षा तुला आमची काळजी होती. तुझ्या भावंडासाठी
तू तुझ बालपण कमला जंपलस, त्या बालवयातही तुला जबाबदारीच किती भान होत हे आज मला आठवते. आज समाजात मी बरेच बेजबाबदार वडील बघतो त्यावेळी मी मात्र स्वतःला खूप भाग्यवान समजतो. मला तुझ्यासारखा कर्तव्यदक्ष बाप मिळाला. तू आम्हा भावंडांना लहानाचं मोठं करण्यासाठी हाडाची काड केली; देहाच चिपाड होईपर्यंत लोकांच्या शेतात राबला मोलमजुरी केली पण आम्हाला उच्चशिक्षित करण्याचा ध्यास घेऊनच जगला. 24 वर्षे सालगडी म्हणून दुसऱ्याच्या शेतात राबला, जिथं काम मिळेल तिथं गाव घर सोडून गेला, विटभट्टीवर, ऊसतोडणी, मिरची, मूग, ज्वारी, गहू, भुईमूग, भाताच्या या सगळ्या सुगीसाठी संसार डोक्यावर घेऊन कधी या जिल्ह्यात तर कधी त्या जिल्ह्यात कधी गाव घर सोडून तेलंगनात जाऊन रानावनात उघड्यावर राहून सुगी केली. रोजगार हमीच्या कामावर जाऊन परिसरातील तळे, कॅनॉल, शेतीचे बंडींग खोदले, रस्ते बांधले, खडी फोडली लोकांची घर, बंगले, वाडे बांधण्यासाठी रात्रं दिवस राबला, पाटलाच्या जनवरांच शेंन काढून जगला. पडत्या पावसात मयताचे सांगावे घेऊन रातोरात वीस तीस कोस चालत गेला. मिळेल त्या शेरभर ज्वारीसाठी दिवसभर स्मशानात मयताचे खड्डे खोदले, दिवसभर लाकड फोडले. तो काळ होता म्हारकी सुटली नव्हती तेंव्हाचा. पुढं काळ बदलला तरी कामगारच जीवन बदललं नाही.जगण्याची मारामार सुरूच होती. शहरात येऊन पोट भरायाच प्रयत्न केला. शहरातील बकाल झोपडपटटीत राहूनही मुलांना शिकविण्याचा ध्यास सोडला नाही.नांदेड एम.आय.डी.सी.च्या पायाभरणीमधे तुम्ही कितेक लिटर घाम वोतलेत, तसेच बड्या भांडवलदार लोकांकडून आपली शारीरिक पिळवणूक करून उभारलेल्या मोठं मोठ्या कारखान्याच्या पायाशी तुमचे अश्रू आणि लोखंड दगड लागून कितेक वेळा रक्त ही ओतलय तुम्ही. अर्थतज्ञ म्हणतात की भारतात पंडित नेहरूंनी औद्योगिकीकरण केलं. पण मी म्हणतो की कार्ल मार्क्स,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, आण्णा भाऊ साठे यांच्या विचारांच्या केंद्रस्थानी असलेल्या तुमच्या सारख्या घाम गाळणाऱ्या शेतकरी, कामगारांनी हे सर्व वैभव घाम, अश्रू रक्त ओतून ऊभ केलं आहे. हा मानवी समाज तुमच्या सारख्या कष्टाळू लोकांच्या श्रमतून उभारलेल आहे. जगात आयतखाऊ लोक वेद काळापासून चालत आलेले आहेत. पण तुम्ही जगण्यासाठी जो संघर्ष केला तो पुस्तकाच्या पानावर किंवा चित्रपटाच्या पडद्यावर दाखवणे शक्य नाही. कारण आरम हाराम हैं या वूक्ती प्रमाणे तूम्ही सतत श्रम करीत गेलात. वेळ पडली तर दुष्काळात मेलेल्या जनावरांची हाड वेचून तुम्ही आम्हाला जगवल.
या जगात प्रत्येकानाच आपले आईवडिल प्रिय वाटतात, आणि वाटलेच पाहिजेत. पण आज समाजात बरेच पालक आपल्या मुलांना कामाला जुंपून आपले पालकत्व झिडकारून देतात त्यामुळे बऱ्याच मुलांचे भविष्य अंधारात जाते, अशावेळी मात्र मला तुमची खूपखुप आठवण येते. तुमच्या सारखे कर्तव्यदक्ष आईवडील सर्वांना लाभावेत असे ही वाटते.
मी विद्यापीठात शिकून पुढे प्राध्यापक झाल्यानंतर तू गावातील, नात्यातील इतर मुलांच्या शिक्षणाचा ध्यास घेतला. फळ भाजिच्या व्यवसायातून चार लोकांना रोजगार दिला. शेवट पर्यंत तू कष्ट करत जगलास.
तुझे कष्ट आमच्या डोळ्यासमोर होते; म्हणून मी पण तुझ्याच कष्टाच्या वाटेवरून चालत आलो. गायी-म्हशी चारत, पडेल ती रोज मजुरी करून, सायकलवरून फळ विकून काही काळ सायकल रिक्षा चालवून, हॉटेलात काम करून शिक्षण घेतल. पण तू जसी जमेल तशी आमच्या शिक्षणला मदत केली. दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था केली. इतर आई वडीलांप्रमाने तुम्ही आम्हला सालगडी म्हणून ठवल नाही. ज्या वयात पाटी पुस्तकं हातात घ्यायला पाहिजे त्या वयात तुमचे हात जरी परिस्थितीने शेन काढायला जुंपले असेल तरीही तुम्ही परिस्थितीशी दोन हात करत आम्हला लहानच मोठ केलं. माय बाबा तुम्ही महात्मा फुलेंचा शिक्षणाचा संदेश कुणी सांगितला माहीत नाही. पण विद्येविना मती गेली हा विचार तुम्ही ओळखून हातात शेणाची पाटी ऐवजी तुम्ही अभ्यासाची पाटी दिली, पेन दिला. लोक म्हणायचे की तुझ्या घरी खायला दाणा नाही तू काय म्हणून एवढे कष्ट घेऊन मुलांना शाळा शकवतोस.
शाळा शिकून तरी आज कुठे नोकऱ्या आहेत, नोकरीसाठी पैसा द्यावा लागतो,वशिला लागतो. मला तुम्ही हे बोलून पण दाखवायचास. पुढे अजून तुम्हीच म्हणायचास की चार अक्षरी शिकलास तर शहाणा होशील लोक तुला राबून घेणार नाहीत, हिशोब किताब कळेल. तुम्ही जरी शाळेत गेला नसला तरीही थोडेफार अक्षर ओळख होतीच, डंग्री शाळा तुमच्या काळात होती. सरकारने अडाणी अनपड लोकांना साक्षर करण्यासाठी डंगरी शाळा सुरु केली होती ,त्यात दिवसभर काम करून तुम्ही अबकड शिकलच थोडफार, आयुष्याच्या शाळेत माणूस भरपूर काही शिकवत असतो. मी पण फळ भाजी न चा व्यापार करत असताना हिंदी तेलगू या भाषा चांगल्याच शिकलात. म्हणून पुढं तुम्ही म्हणत होता की शिकलास तर इंग्लिश शिक पोटापाण्याला लागशील. तुम्हाला वाचता जरी येत नसले तरीही बाजारात फिरत आलेल्या विक्रेत्यांकडून इंग्रजी ची पुस्तके तुम्ही हमखास विकत आणत होता त्यातूनच मला इंग्रजीची आवड निर्माण झाली. तोच विचार घेऊन झोपडपट्टी ते युनिव्हर्सिटी हा खडतर प्रवास करत आलो, इंग्रजी शिकल्यामुळे लेबरअड्डा ते हवाई अड्डा असा प्रवास करण्याची संधी पण मिळाली. आज या स्पर्धेच्या युगात मी कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेत इंग्रजीचा प्राध्यापक झालो.
पण मुलगा प्राध्यापक झाला म्हणून तू आरामात पुढचे आयुष्य जगण्यापेक्षा गावातील, नात्यातील शिक्षण घेणाऱ्या मुलांना जमेल तशी आर्थिक मदत करणे हेच तुझ्या आयुष्याचे ध्येय ठरविले.
तुझ्या चार लेकरांमधे मी तसा लहानच. पण मी तुमच्या सहवासात जांबाडी, आमराई, फळभाजीचे मळे राखत राखत जास्त दिवस राहिलो. तसा तुमचा फार काही सहवास आम्हा भावंडाना मिळत नव्हताच कारण पोटासाठी तुला अन् माईला रानावनात गेल्या शिवाय चूल पेटत नव्हती. तुझे सुरुवातीचे आयुष्य साल गडी म्हणून दिवसरात्र रानातच गेले. पुढे मोलमजुरी आणि फळभाजी विकण्यासाठी गावोगावी फिरण्यात गेले. तरी पण फळ भाजी विकत असताना मी तुमच्या सोबत राहिलो. म्हणून माझा चारी भावंडात लाहान असलो तरी ती जबादारीची भावना आज मी जपण्याचा प्रयत्न करतो.
बाबा तू खरोखर आधुनिक विचाराचा अडाणी माणूस होतास. तू परिस्थितीशी दोन हात करीत तुझा बाप गेल्यापाठी तुझ्या चार भावंडाना आणि विधवा आईला प्रेमाने सांभाळला तसाच आमच्या चारही भावंडाना काबाडकष्ट करून लहानाचं मोठ केलास. मला झोपडपट्टीतून युनिव्हर्सिटीला पाठविणारा शिक्षण प्रेमी बाप म्हणजे लिंबाजी पवार ही ओळख परिसरात निर्माण केली. परीस्थितीशी संघर्ष करतो तोच टिकतो हा डार्विनचा सिद्धांत तुला कसाकाय कळला तू तर अडाणी पण खरा आधुनिक विचाराचा माणूस होतास. बाबा तुझं जीवन म्हणजेच संघर्षाची कहाणी. तू महामानवांनी दाखवलेल्या सम्यक जीवन मर्गवरून जीवन जगलास… तोच संघर्ष मी माझ्या आयुष्यात करीत राहील कधी स्वतःसाठी कधी समाजासाठी… हीच तुला खरी श्रद्धांजली वाहील…
-प्रा.केशव लिंबाजी पवार सातारा