संशोधन

बुद्धांची भिक्खूविषयी संकल्पना

बुद्धांची भिक्खूविषयी संकल्पना

भगवान बुद्धांची शिकवण

*भिक्खू आणि त्यांच्या प्रतिज्ञा*

1) उपासक आणि श्रामणेर शीलप्रतिपालनाच्या अटीने आपणाला बांधून घेतो.
भिक्खू शील ग्रहण करतो ते व्रत म्हणून. शीलव्रताचे उल्लंघन करणार नाही अशी त्याला प्रतिज्ञा करावी लागते. उल्लंघन झाल्यास तो शिक्षेस पात्र ठरतो.
भिक्खू ब्रम्हचर्याची प्रतिज्ञा करतो.
भिक्खू चोरी न करण्याची प्रतिज्ञा करतो.
भिक्खू वृथा वल्गना न करण्याची प्रतिज्ञा करतो.
भिक्खू जीवहत्त्या न करण्याची प्रतिज्ञा करतो.
नियम ज्याची अनुज्ञा देत नाही त्या वस्तू जवळ न बाळगण्याची भिक्खू प्रतिज्ञा करतो.
भिक्खूंना पुढील आठ वस्तू फक्त जवळ बाळगता येतात.
(1) शरीर आच्छदनासाठी तीन चीवरे; ती म्हणजे i) कंबरेस गुंडाळण्याचे आंतरवासक, ii) अंगावर घ्यावयाचे उत्तरासंग आणि iii) थंडीवाऱ्यापासून रक्षण करण्यासाठी संघाटी हे वस्त्र.
(2)कमरपट्टा (करगोटा)
(3) भिक्षापात्र
(4) वस्तरा
(5) सुई धागा
(6) पाणी गाळण्याचा कपडा.
भिक्खू निर्धन राहण्याची प्रतिज्ञा करतो. अन्नासाठी त्याने भिक्षा मागितली पाहिजे. भिक्षेवरच त्याने आपली उपजीविका केली पाहिजे. दिवसातून एकच वेळ त्याने भोजन घेतले पाहिजे. ज्या ठिकाणी संघासाठी विहार बांधला नसेल त्या ठिकाणी त्याने झाडाखाली राहिले पाहिजे.
आपल्याहून श्रेष्ठाचा मान राखणे, औपचारिक नम्रता दाखविणे, ह्या गोष्टी श्रमणेराकडून अपेक्षित असतात.

*बुद्धांची भिक्खूविषयी संकल्पना*

भिक्खूकडून आपल्या काय अपेक्षा आहेत हे स्वतः बुद्धांनी भिक्खूंना सांगितले ते असे:-
“जो कोणी आपले वाईट विचार व कृती धुवून टाकल्याशिवाय, त्याप्रमाणेच सत्य आणि संयम यांचा मान न राखता काषायवस्त्रे धारण करण्याची इच्छा करतो, तो ती वस्त्रे परिधान करायला लायक नाही.”
“परंतु ज्याने चित्तमलाचे परिमार्जन केले आहे, ज्याच्या अंगी सदगुणांची वाढ झालेली आहे, जो सत्य आणि संयम पाळावयाला शिकला आहे तोच खरोखर काषायवस्त्रे धारण करण्यास योग्य आहे.”
“एखादा मनुष्य दुसऱ्याजवळ नेहमी भीक मागतो म्हणून तो काही भिक्खू होऊ शकत नाही. जो धम्माचे पालन करतो तोच भिक्खू होय. केवळ भिक्षा मागणारा भिक्खू ठरत नाही.”
“ज्याला दुष्टपणा स्पर्श करीत नाही, जो अव्यभिचारी आहे, जो सावधानपणे जगात परिभ्रमण करतो, तोच खरोखर भिक्खू होय.”
“सामान्यजनांना अप्राप्य असे मुक्तीसुख विनय, शील, पांडित्य, एकांतवास आणि ध्यान यामुळेच लाभत नसून, हे भिक्खू, ज्याने वासनांचा (desire) क्षय केला त्यालाच ते सुख संपादन करता येते, असे निश्चितपणे म्हणता येईल.”
“ज्याच्या वाणीत संयम आहे, जो विचारपूर्वक बोलतो, जो लीन आहे, जो धम्म स्पष्ट करतो, अशा भिक्खूचे भाषण मधूर असते.”
“धम्मात (law) आनंद मानणारा, धम्मात रममाण असणारा, धम्माचे चिंतन करणारा, धम्माचे सदैव स्मरण ठेवून त्याप्रमाणे वागणारा असा भिक्खू सद्धम्मापासून (true law) ढळणार नाही.”
“जे आपल्याला लाभले आहे त्याची अवहेलना करू नये. दुसऱ्याचा मत्सर करू नये. जो भिक्खू दुसऱ्याचा मत्सर करतो त्याला मानसिक समाधान लाभत नाही.”
“अल्पच का होईना, परंतु जे मिळाले आहे त्याचा जो अव्हेर करीत नाही, जो शुद्धजीवी आहे, प्रमादरहित आहे अशाची कर्म चांगली असतात.”
“जो आपले नामरूप म्हणजेच आपण असे समजत नाही आणि जो नष्ट झाले आहे त्याबद्दल दुःख करीत नाही त्यालाच खरोखर भिक्खू म्हणावे.”
“जो भिक्खू मैत्रीत रमलेला आहे, जो बुद्धशासनात प्रसन्न असतो तो स्वाभाविक विकारांच्या क्षयाने प्राप्त होणारे सुखमय शांतीपद-निब्बाण प्राप्त करतो.”
“हे भिक्खू, तू ही नाव रिकामी कर. रिकामी झाली म्हणजे ती हलकी होईल. राग आणि द्वेष यांचा नाश केलास तर तू निर्वाणाला जाशील.”
“हे भिक्खू, ध्यान कर. प्रमादात राहू नको. आपले चित्त कामोपभोगात रमू देऊ नकोस.”
“प्रज्ञेशिवाय ध्यान शक्य नाही. ध्यानाशिवाय प्रज्ञा नाही. ज्याच्याजवळ प्रज्ञा आणि ध्यान दोन्हीही आहेत असा पुरुष निर्वाणाच्या जवळ आहे.”
“ज्या भिक्खूने एकांतवास केला आहे, ज्याचे मन शांत आहे, त्याला धम्माचे सम्यक् आकलन झाले असता अलौकिक आनंद होतो.”
“प्रज्ञायुक्त भिक्खूच्या जीवनाला इंद्रियांवर ताबा ठेवणे, संतुष्ट असणे, धम्माने घालून दिलेल्या निर्बंधाचे (प्रतिमोक्षाचे) पालन करणे, ज्यांचे जीवन शुद्ध आहे, जे आलस्यरहित आहेत अशा थोर मित्रांची संगत ठेवणे यापासून प्रारंभ होतो.”
“आपली उपजीविका प्राप्त भिक्षेवर करील, आपली कर्तव्ये यथायोग्य पार पाडील तो आनंदभरात आपल्या दुःखाचा अंत करील.”
“स्वतःला स्वतःच जागे कर, स्वतःच स्वतःची परीक्षा कर, असा आत्मरक्षित आणि सावधान चित्त झाल्यावर हे भिक्खू, तू सुखाने राहशील.”
“कारण मनुष्य स्वतःच आपला स्वामी आहे. तो स्वतःच आपले शरणस्थान आहे. म्हणून ज्याप्रमाणे व्यापारी उमद्या घोड्याला आपल्या ताब्यात ठेवतो त्याप्रमाणे मनुष्याने आपले नियमन करावे.”
“जो भिक्खू अप्रमादी राहण्यात आनंद मानतो, जो अविकाराचे भय मानतो, तो आपले लहानमोठे बंध जाळून संचार करीत असतो.”
“जो भिक्खू चिंतनात आनंद मानतो, अविचाराचे भय मानतो, तो कधीही आपल्या पूर्ण अवस्थेपासून ढळत नाही, तो सदैव निब्बाण सानिध्य अनुभवतो.”
“बुद्धांचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार रात्रंदिवस बुद्धांचे ध्यान करतात.”
“बुद्धांचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार रात्रंदिवस संघावर, विहारात एकाग्र झालेले असतात.”
“बुद्धांचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार धम्माचे ध्यान रात्रंदिवस करतात.”
“बुद्धांचे शिष्य सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार स्वशरीराच्या सर्व क्रियांचे रात्रंदिवस ध्यान करतात.”
“बुद्धांचे शिष्य सदैव जागृत असतात आणि त्यांचे मन रात्रंदिवस करुणेत समाधान मानते.”
“बुद्धांचे शिष्य सदैव जागृत असतात. त्यांचे मन रात्रंदिवस चिंतनात आनंद मानते.”
“संसारत्याग बिकट आहे. संसारोपभोग बिकट आहे. विहारवास बिकट आहे. गृहवास दुःखदायक आहे. विहारात एकत्र राहणे आणि सर्व गोष्टी त्यांच्याबरोबर समानतेने वापरणे हे दुःखकर आहे. परिभ्रमण करणाऱ्या भिक्खूसमोर दुःखच वाढून ठेवलेले आहे.”
“ज्याच्या ठिकाणी श्रद्धा आहे, शील आणि यश यांनी जो ऐश्वर्यवान आहे तो कुठेही गेला तरी सर्वत्र आदरणीय ठरतो.”
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.२८.२.२०२४
(संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ खंड पाचवा)

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button