या दोन कादंबऱ्यावर आधारित असलेली ही अजरामर सिनेकलाकृती काळ बदलला तरी तितकीच वास्तविकता सिद्ध करते
या दोन कादंबऱ्यावर आधारित असलेली ही अजरामर सिनेकलाकृती काळ बदलला तरी तितकीच वास्तविकता सिद्ध करते
साहित्यिक अरुण साधू यांनी लिहिलेल्या ‘सिंहासन’, आणि ‘मुंबई दिनांक’ या कादंबऱ्यांवर आधारित चित्रपट म्हणजे ‘सिंहासन’ हा होय.
मुख्यमंत्री पदासाठीचे राजकरण, त्यापायी खेळले जाणारे राजकीय डावपेच या कादंबरीमधून मांडले आहेत. ‘सिंहासन’ म्हणजे सत्तेचे आसन, या आसनाभोवतीचं राजकारण मांडले आहे. ‘मुंबई दिनांक’ मधून हे कथानक मुंबई महानगराच्या पार्श्वभूमीवर मांडले आहे. भ्रष्ट राजकारणाभोवती असलेले अनेक घटक यामध्ये मांडले आहेत. वैयक्तिक आयुष्यातील भानगडी, गुंडांचा घेतलेला आधार, गुन्हेगारी जग, वेगवेगळ्या वस्तू स्मगल करणारे स्मगलर्स, या सर्वाशी संबंध ठेवणारे राजकारणी आणि राजकारणातील असंतुष्ट गट या साऱ्यांचे एकत्रित चित्रण कादंबरीत मांडले आहे. याशिवाय या कादंबरीत मुंबई महानगरातील गंभीर प्रश्न, झोपडपट्टीतले प्रश्न, पाणी सांडपाणी, आरोग्याचे प्रश्न मांडले आहेत. आमदार त्यांचे बंगले, मंत्रालय, तेथील वातावरण राजकारण या कादंबरीत मांडले आहे. तर ‘मुंबई दिनांक’ या कादंबरीत वेगवेगळी पात्रे आली आहेत. पानिटकर, अय्यर, डी-कास्टा, किशोर आणि शिंदे या व्यक्तीरेषांच्या माध्यमातून कादंबरीचा आशय व्यक्त झाला आहे. मुंबईमधील कनिष्ठ नोकरदारवर्ग, चंगळवादी वृत्तीने जगणारी माणसे, पदाला चिकटून जगणारी स्वार्थी माणसे यामधून होणारे विविध घोटाळे संधिसाधूपणा करणारे स्वार्थी राजकारणी यामध्ये बरबटलेले राजकारण या कादंबऱ्यांमधून मांडले आहे. या दोन कादंबऱ्यांवर आधारित ‘सिंहासन’ हा चित्रपट निर्माण करण्यात आला आहे.
अरुण साधू यांच्या कादंबऱ्या नेमका कोणता आशय व्यक्त करतात ? हे समीक्षक चंद्रकांत बांदिवडेकर यांनी मार्मिक शब्दात नोंदविले आहे, “राजकीय कादंबरी वाचताना एकमोठा प्रश्न अरुण साधू ध्वनित करतात. तो म्हणजे सामान्य जनता आणि राजकारणी यांच्यातील तफावतीचा, स्वातंत्र्योत्तर काळात सत्ता लोकशाहीच्या मार्गाने मिळविली जात असली तरी, ती प्रत्यक्षपणे हाती येते श्रीमंत बागाईतदारांच्या, श्रीमंत शेतकऱ्यांच्या हाती”. १५ या भेदक वास्तवाकडे समाजाचे लक्ष वेधले आहे.
या कादंबरीवर आधारित चित्रपट ‘सिंहासन’ या नावाने निर्माण करण्यात आला होता. या चित्रपटाचे रसग्रहण करताना मंदार जोशी म्हणतात, ‘सिंहासन’ हा चित्रपट म्हणजे महाराष्ट्रातील भ्रष्ट, संधीसाधू, कुटिल राजकारणाचं अगदी जळजळीत वास्तव रुप आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला (२०१२ साली) तीस वर्ष झाली. परंतु त्यातले जवळपास सगळेच राजकीय संदर्भ आजच्या काळातही लागू आहेत. अरुण साधू यांच्या ‘मुंबई दिनांक’ आणि ‘सिंहासन’ या दोन कादंबऱ्यांचं हे चित्ररूप होतं. कादंबऱ्याचं चित्रपट रूपांतर सर्वसाधारणपणे फसतं. परंतु हा चित्रपट त्याला अपवाद ठरला. डॉ. जब्बार पटेल, अरुण साधू, विजय तेंडुलकर आणि पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्यासारखी चार दिग्गज मंडळी एकत्र आल्यानंतर जो चमत्कार अपेक्षित होता तो या चित्रपटानं घडविला.” डॉ. जब्बार पटेलांसारखा सामाजिक प्रश्नांचा अभ्यास असणारा दिग्दर्शक असल्यामुळे कादंबरीचा आशय चित्रपटाच्या भाषेतून समर्थपणे व्यक्त केला गेला. या चित्रपटामध्ये अरुण सरनाईक, डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, मधुकर तोरडमल, सतीश दुभाषी, श्रीकांत मोघे, रिमा लागू हे दिग्गज कलावंत होते. या कसलेल्या अभिनेत्यांनी, अभिनेत्रिनी चित्रपटातील आशयाला उंचीवर नेले आहे. या सर्व कलावंतांची अभिनयक्षमता लक्षात घेऊन त्यांना भूमिका देण्यात आल्या आहेत. हे कसब दिग्दर्शक जब्बार पटेल यांच होतं. मुख्यमंत्र्यांची भूमिका अरुण सरनाईक यांनी केली होती. अर्थमंत्री विश्वासराव दाभाडे ऊर्फ आप्पासाहेब ही भूमिका डॉ. श्रीराम लागूंनी वठवली होती.
चौकस आणि सतत बातमीच्या शोधात असलेल्या पत्रकाराची
भूमिका निळू फुले यांनी केली होती. पक्षातील एक नेते ही भूमिका श्रीकांत मोघे यांनी चोख बजावली होती, मुख्यमंत्र्याच्या मिसेस, वेश्या वस्तीत रुग्णालयात खिळलेली शांता, दिनू या व्यक्तीरेखाही कथानकात महत्त्वाच्या आहेत. डि-कास्टा ची भूमिका सतीश दुभाषींनी अत्यंत प्रभावीपणे साकार केली आहे. या चित्रपटाला प्रसिध्द कवी गझलकार सुरेश भट यांनी गीते लिहिली आहेत. त्यांचे उष:काल होता-होता, काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली.’ या गीताने चित्रपटाचा आशय अत्यंत टोकदारपणे व्यक्त होण्यास मदत झाली आहे. पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीतामुळे आणि काव्याच्या जाणीवेमुळे शक्य झाले आहे. पार्श्वसंगीतामुळे या प्रसंगातील घटना प्रसंगांना उठाव दिला आहे. अशाप्रकारे अरुण साधुंच्या या दोन्ही कादंबऱ्यांचा आशय चित्रपटातूनही तितक्याच ताकदीने व्यक्त झाला आहे.