राजे तुम्ही आज हवे होता.

● राजे तुम्ही आज हवे होता.
बहुजन प्रतिपालक !
कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज
तुम्ही ऑक्सिजन आहात !
दिन दुबळ्या बहुजनांचा
इथला माणूस जिवंत राहण्यासाठी
खरा इतिहास लिहिणाऱ्या
इतिहासकाराच्या पेनाने सांगितलय
संविधानाला साक्ष ठेऊन …
पुढील पिढया आनंदाने जगण्यासाठी
इथली जुलमी अस्मानी सत्ता
उध्वस्त करण्यासाठी …..
राजे तुम्ही आज हवे होता .
तुमच्या नावाने इथे उभारले जातात
माणसं तोडण्याचे इमले
तलवारीचा ही होतोय दुरुपयोग
भगवा फडफडतोय दांड्या सह
समता , स्वातंत्र्य , बंधुत्व आणि न्यायाला आवाज देऊन
दंगल ,बॉम्बस्फोट , अन्याय अत्याचार अन जातीयवाद
सुगीच्या पिका सारखा वाढतोय ..
याला संपविण्यासाठी आणि तुडविण्यासाठी
बहुजनाला बहुजनत्व प्राप्त करून देण्यासाठी
राजे तुम्ही आज हवे होता …
इथे रोजच होतात गुप्त सभा आणि बैठका
इतिहासाची मोडतोड करण्यासाठी ….
आणि त्यांना हव्या असणाऱ्या स्वार्थासाठी
त्यांच्याच सोईने घडविले जातात दंगे …..
आणि लिहिला जातो इतिहास
माणसं तोडण्या साठी..
रानातील झाडे कापतात तशी
कापली जातात माणसं —
जय भवानी , जय शिवाजी च्या गजराने
करतात दगडफेक ……
काडी काडी ने विणलेला खोपा
उध्वस्त करतात क्षणार्धात
निष्पाप बहुजनांच्या अंगावर आणि घरावर
फिरविली जातात धर्मांध बुलडोझर ….
माती मोल करतात गरिबांना
तेव्हा तुम्ही आठवता राजे
अन्याय अत्याचाराशी प्रतिकार करतांना
आपल्या शिवशाहीत ……
जगला पाहिजे निसर्गासह माणूस
म्हणूनच तुम्ही होते
बहुजनांचे प्रतिपालक —
आजच्या झुंडशाहीला लगाम लावण्यासाठी
राजे तुम्ही आज हवे होता ….
इथं जातीय मार्तंडाचा उत आलाय
माणसाच्या रक्ता रक्तात
पेरलं जातंय विषमतेचं विष
बेरोजगारी दारिद्र्याच्या घोड्याचा सुटला लगाम !
जगाचा पोशिंदा घेतोय फाशी
पण खाणारा आज ही खातो तुपाशी ..
म्हणून आठवतात तुमचे शब्द
” शेतकऱ्याने पिकविलेल्या पिकाच्या देठालाही हात लावू नका ”
पण इथली व्यवस्था ….
शेतकऱ्यांच्याच जीवावर उठली
यांना वठणीवर आणण्यासाठी
शेतकऱ्यांना सावरण्यासाठी
राजे तुम्ही आज हवे होता ….
भोंगळ कपाळाने कष्टणाऱ्या आया
दिसतात अवती भवती
आणि मन सुन्न होते ….
माणसा माणसात विष कालवण्याचं
कार्य आज गतिमान होतय …
जात्यंध्याच्या स्वार्थासाठी
रोजच होतात बलात्कार
चिरडल्या आणि चुरगळल्या जातात
मुली फुला सारख्या …
असल्या घाणेरड्या वृत्तीमुळे
वर्तमान पत्राचाही येतोय वास
वासनांध डोमकावळे ….
आप आपल्या सोयीनेच वागतात
तेव्हा तुम्ही आठवता एका वळणावर
“पर स्रि माते समान असते ”
मातेला माता म्हणण्यासाठी
राजे तुम्ही आज हवे होता …
राजे आम्हाला माफ करा
आम्ही नाही समजू शकलो
आज पर्यंत तुमचं धोरण
तुमचं धोरण आमचं मरण वाचवतय
म्हणून आता आम्ही निर्धार केलाय
निळा , भगवा ,हिरवा ,पिवळा आणि लाल
यांना एक करून गडद व्हायचंय माणसासाठी
आम्ही माणूस म्हणून जन्मलो
माणूस म्हणूनच मरणार आहो
नाही पाळणार कधी वर्ण ,वर्ग भेद
हिंदू , मुस्लिम ,बौद्ध , शिख , जैन
इसाई , ख्रिश्चन आम्ही सर्व एक
तुमचं धोरण म्हणजे ?
महात्मा फुलेंचा विचार
तुमचं धोरण म्हणजे ?
छत्रपती शाहू महाराजांचा विचार
तुमचं धोरण म्हणजे ?
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विचार
तुम्ही तर आमच्या गुरूंचे गुरू आहात
तुम्हाला विसरून कसे चालणार
म्हणून आता आम्ही चालणार
शिव भीम मार्गाने ……..
बहुजन हिताय बहुजन सुखाय
हा समज आमच्यात येण्यासाठी
आणि माणसातील जिव्हाळ्यासह
माणसातील माणुसकी वाचविण्यासाठी
राजे तुम्ही आज हवे होता ….
———–
■ प्रा.देवानंद पवार
बोला : 9158359628