सद्धम्म म्हणजे काय?
सद्धम्म म्हणजे काय?
*धम्माला सद्धम्मरूप येण्यासाठी त्याने सामाजिक भेदाने उत्पन्न झालेले निर्बंध नाहीसे केले पाहिजेत*
धम्माला सद्धम्मरुप प्राप्त होण्यासाठी माणसाची योग्यता त्याच्या जन्मावरुन नाही तर कार्यावरुन ठरविण्याची शिकवण धम्माने दिली पाहिजे.
ब्राम्हणप्रणित चातुर्वर्ण्याचा सिद्धांत जन्मावर आधारित होता.
‘ब्राम्हण’ म्हणजे ब्राम्हण आईवडिलांच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य. ‘वैश्य’ म्हणजे वैश्य आई वडिलांच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य. ‘शूद्र’ म्हणजे शूद्र आई वडिलांच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य. ब्राम्हणांच्या मते माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मापेक्षा दुसऱ्या कशावरही अवलंबून नाही. चातुर्वर्ण्याप्रमाणे हा सिद्धांतही तथागतांना घृणास्पद वाटत असे.
भगवान बुद्धांचा सिद्धांत ब्राम्हणी सिद्धांताच्या अगदी विरूद्ध होता. त्यांच्या सिद्धांताप्रमाणे माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावर अवलंबून नसून त्यांच्या अंगच्या योग्यतेवर अवलंबून आहे.
*धम्माला सद्धम्मरूप येण्यासाठी त्याने सामाजिक भेदाने उत्पन्न झालेले निर्बंध नाहीसे केले पाहिजेत.*
धम्माला सद्धम्मरुप प्राप्त होण्यासाठी माणसामाणसांमधील समतेच्या भावनेची अभिवृद्धी केली पाहिजे. जन्माने माणसे विषम असतात. काही बळकट तर काही दुबळी असतात. काहींना अधिक बुद्धी असते, तर काहींच्या अंगी थोडी अथवा मुळीच नसते. काहींच्या अंगी थोर कर्तृत्वशक्ती, क्षमता असते तर काहीच्या अंगी ती फारच थोड्या प्रमाणात असते. काही सधन असतात तर काही दरिद्री असतात. या सर्व प्रकारच्या माणसांना जीवनसंघर्षात प्रवेश करायचा असतो. (struggle for existence)
या जीवनसंघर्षात विषमता ही स्वाभाविक स्थिती आहे असे मानले तर दुबळ्यांची स्थिती असहाय्य होईल.
विषमता हा जीवनाचा नियम धरुन चालेल काय? या नियमांचा परिणाम म्हणजे जीवन संघर्षात जे योग्यतम ते टिकतील (survival of the fittest) असा असल्यामुळे, काही लोक वरील प्रश्नाचे होकारार्थी उत्तर देतात. परंतु असा प्रश्न आहे की, संघर्षात जे योग्यतम ते समाजाच्या दृष्टीने श्रेष्ठतम ठरतात काय? याला कोणीही होकारार्थी उत्तर देऊ शकणार नाही. याच कारणास्तव धर्म समता शिकवतो. जरी श्रेष्ठतम मनुष्य योग्यतम नसला तरी समाजात समतेस मान्यता दिल्यास तो जगू शकेल.
समाजाला जर कोणाची गरज असेल तर ती श्रेष्ठतम पुरुषाची, योग्यतम पुरुषांची नव्हे.
याच कारणास्तव मुख्यत: धम्म समतेच्या तत्वाच्या पुरस्कार करतो. हा बुद्धांचा दृष्टीकोन आहे. यास्तव जो धर्म समता शिकवित नाही, तो स्विकारणीय नाही असे त्यांचे म्हणणे होते.
स्वतःला सुखी करण्यासाठी दुसऱ्याला दुःखी करा. अथवा दुसऱ्याला सुखी करण्यासाठी स्वतःला दुःखी करा अथवा स्वतःला आणि दुसऱ्याला दुःखी करा. अशा तऱ्हेच्या कर्माचा उपदेश करणाऱ्या धर्मावर तुम्ही विश्वास ठेवाल काय? जो धर्म आपल्या सुखाबरोबरच दुसऱ्याच्या सुखाची वाढ करण्याचा आणि कोणताही अत्याचार सहन न करण्याचा उपदेश करतो तो श्रेष्ठतम धर्म नव्हे काय? जे ब्राम्हण समतेच्या तत्त्वाला विरोध करीत त्यांना हे आणि अशासारखे मोठे खोचक प्रश्न बुद्ध विचारीत असत.
तथागत बुद्धांचा धम्म म्हणजे माणसाच्या सत्प्रवृत्तीतून उद्भवणारा अत्यंत न्यायप्रधान असा धर्म आहे.
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.२१.२.२०२४
(संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ तृतीय खंड भाग पाचवा)