सद्धम्म म्हणजे काय?
मनाची मलिनता दूर करणे म्हणजे सद्धम्म.
“मन सर्वांचे मूळ आहे, मन हे स्वामी आहे. मन हे कारण आहे. मनात दुष्ट, चुकीचे विचार असतील तर माणसाचे विचार, माणसाचे शब्द आणि कार्ये ही वाईट बनतात. पापोद्भव दुःखे, ज्याप्रमाणे रथाची चाके रथाच्या घोड्यामागे जातात त्याप्रमाणे त्याचा पाठपुरावा करीत असतात. मन हे सर्वांचे मूळ आहे. तेच आज्ञा करते आणि तेच घटना घडवून आणते. मनात सद्विचार असतील तर त्या माणसाचे शब्द आणि कार्ये दोन्हीही चांगली असतात, आणि अशा सदाचारापासून उद्भवणारे सुख, पदार्थाच्या सावलीप्रमाणे सदोदित त्या माणसामागे जात असते.”
*जग हे धम्मराज्य बनविणे*
धम्माचे प्रयोजन काय? याची भिन्न धर्मांनी भिन्न भिन्न उत्तरे दिली आहेत. माणसाला ईश्वरप्राप्तीच्या मार्गी लावून त्याला आपल्या आत्म्याच्या मोक्षाचे महत्त्व शिकविणे, हे सामान्यतः वरील प्रश्नाला उत्तर येते.
बहुतेक धर्म तीन प्रकारच्या राज्यासंबंधी बोलतात.
एकाला स्वर्गाचे राज्य म्हणतात, दुसऱ्याला पृथ्वीवरील (इहलोकीचे) राज्य म्हणतात आणि तिसऱ्याला नरकाचे राज्य म्हणतात. असे म्हणतात की, स्वर्ग-राज्यात देवांचे शासन चालते. नरक-राज्यात दुष्टांचे राज्य चालते. इहलोकीच्या राज्यासंबंधी वाद आहेत. ते सैतानाच्या मांडलिकत्वाखाली नसते, त्याप्रमाणेच देवांचे सार्वभौमत्वही त्यावर पसरलेले नसते. एक दिवस ते पसरेल, अशी अपेक्षा मात्र असते. काही धर्मांमध्ये स्वर्गराज्य प्रत्यक्ष ईश्वराच्या शासनाखाली असल्याने तेथे सदाचाराचे धर्मराज्य असते. इतर काही धर्मांत स्वर्गराज्य हे पृथ्वीवर असत नाही. ते फक्त स्वर्गाचेच दुसरे नाव आहे. जो कोणी ईश्वर आणि त्याच्या प्रेषितावर श्रद्धा ठेवील त्यालाच तेथे पोहचता येते. स्वर्गलोकी पोहचल्यावर त्या धर्मनिष्ठांना जीवनातील सर्व भोगविलास तेथे लाभतात.
सर्व धर्म असे उपदेशितात की, ह्या स्वर्गराज्याची प्राप्ती हे प्रत्येक माणसाचे साध्य असावे; आणि ते कसे साधावे हे सांगणे त्या सर्व धर्माचे कार्य असावे.
“धर्माचा उद्देश काय?” या प्रश्नाला तथागतांचे उत्तर अगदी वेगळे होते.
जीवनाचा उद्देश काही तरी काल्पनिक स्वर्गाची प्राप्ती आहे, असे त्यांनी लोकांना सांगितले नाही. त्यांचे म्हणणे असे की, धर्माचे, सदाचाराचे राज्य पृथ्वीवरच आहे आणि त्याची प्राप्ती उत्तम आचरणानेच घडते.
त्यांनी असे सांगितले आहे की, “दुःख निराकरणासाठी प्रत्येक माणसाने दुसऱ्या प्रत्येक माणसाशी सदाचारानेच वागले पाहिजे; आणि अशा व्यवहारानेच पृथ्वीवर नीतीमान राज्य (Kingdom of Righteousness) स्थापन केले पाहिजे.”
यामुळेच त्यांचा धर्म इतर धर्मापासून वेगळा पडतो.
त्यांचा धर्म पंचशील, अष्टांगमार्ग आणि पारमिता यावर भर देतो.
तथागत बुद्धांनी या त्रयीवरच आपला धर्म का आधारला? कारण जीवन-मार्गाचे हे तीन घटक असून त्यांच्या योगानेच मनुष्य सदाचारी बनू शकतो.
माणसाचे दुःख हे माणसा-माणसातील अनुचित व्यवहाराचाच परिणाम आहे.
हा अनुचित व्यवहार आणि त्यापासून उद्भवणारी दुःखे ही नीतीमानता व सदाचरण यांनीच नाहीशी होऊ शकतात. म्हणूनच धर्माने नुसता उपदेश करून भागणार नाही. तर त्याने माणसाला आपल्या व्यवहारात सदाचाराची किती आवश्यकता आहे, हे त्याच्या मनावर पूर्णपणे ठसविले पाहिजे. ही सदाचाराची आवश्यकता माणसाच्या मनावर ठसविण्यासाठी धर्माला इतरही काही कार्ये करावी लागतात, असे ते म्हणतात.
धर्माने माणसाला आचरण्यास योग्य कुशल कर्म कोणते हे ओळखण्याचे आणि त्याआधारे आचरण करण्याचे शिकविले पाहिजे.
धर्माने आचरण्यास अयोग्य (अकुशल) कर्म कोणते हे ओळखण्याचे आणि ते टाळण्याचे शिकविले पाहिजे.
ह्याशिवाय अतिशय महत्त्वपूर्ण असे मानलेले धम्माचे दोन उपदेश तथागतांनी शिकविले.
धर्माचा पहिला उद्देश म्हणजे माणसाला प्रार्थना, धार्मिक विधी, यज्ञयाजन शिकवण्याऐवजी त्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीला वळण लावणे, म्हणजे सुसंस्कृत करणे. देवदह सूत्रात, जैन धर्माची चर्चा करताना तथागत बुद्धांनी हा उद्देश स्पष्ट केला आहे. जैन धर्माचे संस्थापक असे मानीत असत की, सर्व वैयक्तिक सुखकर अथवा दुःखकर अनुभव हे गतजन्मी केलेल्या कर्मांचे फळ आहे. असे असल्यामुळे गतजन्मीच्या दुष्कर्मांचे, चुकांचे (misdeeds) विरेचन केले असता, आणि नवी दुष्कर्मे न केल्यास भविष्यकाळात भोगायचे काहीच राहात नाही. भविष्यकाळात भोगायला लावणारे दुष्कर्माचे परिणाम उरले नाहीत की दुष्कर्म क्षय पावते, आणि दुष्कर्म क्षय पावले की दुःखाचा क्षय होतो, आणि सर्व दुःखाचेच मुळापासून उच्चाटन होते. असा जैन धर्माचा दृष्टीकोन आहे.
यावर तथागतांनी असा प्रश्न केला: “तुम्हांला असे सांगता येईल का? -की, या इथे आता चुकीच्या वृत्तीचा (wrong dispositions) उच्छेद केला की त्या क्षणी तिथे सत्प्रवृत्तीची स्थापना होते?” याचे उत्तर ‘नाही’ असेच आले.
तेव्हा तथागतांनी विचारले, “जोपर्यंत तुम्ही अकुशल वृत्तीचा त्याग करून सत्प्रवृत्तीचा अंगिकार करण्याचे मनास शिक्षण दिले नाही, तोपर्यंत गत दुष्कर्माचे विरेचन आणि नव्या दुष्कर्माचा प्रारंभ न करणे या क्रियांना काय अर्थ आहे?” तथागतांच्या मते, हा त्या धर्मातील एक गंभीर दोष होता. सत्प्रवृत्ती हीच चिरस्थायी चांगुलपणाचे अधिष्ठान आणि हमी आहे.
म्हणूनच तथागत बुद्धांनी चित्ताच्या साधनेला म्हणजेच माणसाच्या वृत्तीला सुसंस्काराने वळण लावण्याला अगदी पहिले स्थान दिले आहे.
धर्माचा जो दुसरा उद्देश तथागत आत्यंतिक महत्त्वाचा मानतात, तो म्हणजे एखादे तत्त्व उचित म्हणून समजल्यावर, जरी कोणी साथी नसला तरी धैर्याने तत्त्वाच्या मार्गापासून विचलित न होणे. सल्लेखसुत्तामध्ये तथागत बुद्धांनी या मुद्यावर भर दिला आहे.
तेथे ते म्हणतात, “जरी दुसरे लोक हानिकारक वर्तन करीत असले तरी मी काही हानिकारक कृत्य करणार नाही; अशा निश्चयाने तुम्ही आपले मन निर्मळ बनविले पाहिजे. जरी दुसरे लोक हत्या करीत असले तरी तुम्ही हत्या करता कामा नये. जरी दुसरे लोक चोरी करीत असले तरी तुम्ही चोरी करता कामा नये. दुसऱ्या लोकांचे जीवन श्रेष्ठ नसले तरी तुमचे जीवन श्रेष्ठच असले पाहिजे. दुसरे लोक खोटे बोलत असले, निंदा करीत असले, जोरजोराने निषेध करीत असले, बडबडत असले तरी तुम्ही तसे करता कामा नये. जरी दुसरे लोक लोभी असले तरी तुम्ही लोभी असता कामा नये. जरी दुसरे लोक द्वेष करीत असले तरी तुम्ही द्वेष करता कामा नये. जरी दुसरे लोक मिथ्या दृष्टीचे, मिथ्या संकल्पाचे, मिथ्या वाणीचे, मिथ्या क्रियेचे, मिथ्या समाधीचे असले तरी तुम्ही मात्र सम्यक् दृष्टी, सम्यक् संकल्प, सम्यक् वाणी, सम्यक् कर्म, सम्यक् आजीविका, सम्यक् व्यायाम, सम्यक् स्मृती आणि सम्यक् समाधी या अष्टांग मार्गापासून विचलित नाही झाले पाहिजे. जरी दुसरे सत्य आणि निर्वाण (Deliverance) याबाबत चुकत असले तरी तुम्ही सत्य आणि निर्वाण यांच्या मार्गापासून विचलित होता कामा नये. जरी दुसरे लोक आळस आणि तंद्री यांच्या आधीन असले तरी तुम्ही मात्र या दोषांपासून विमुक्त असले पाहिजे.जरी दुसरे लोक गर्विष्ठ असले तरी तुम्ही मात्र विनम्र असले पाहिजे. जरी दुसरे लोक शंकाकुल असेल तरी तुम्ही मात्र नि:शंक असले पाहिजे. जरी दुसरे लोक क्रोध, द्वेष, मत्सर, कृपणता, लोभ, ढोंग, कपट, निर्बुद्धपणा, उद्धटपणा, आगाऊपणा, वाईट संगत, आळशीपणा, अश्रद्धा, निर्लज्जपणा, सत्-असत् विवेकाचा अभाव, अडाणीपणा, निष्क्रियता, गोंधळ, शहाणपणाचा अभाव इ. दोषांनी युक्त असले तरी तुम्ही मात्र या दोषांच्या विरोधी असलेले गुण अंगी बाणविले पाहिजे. दुसरे लोक जरी लौकिक वस्तूंना चिकटून असले, त्यावरील आपली पकड सैल होऊ देत नसले तरी तुम्ही मात्र अशा वस्तूंना न चिकटता त्यागशील राहिले पाहिजे.”
चेतनाशक्ती विकसित झाल्याने वाणी आणि कर्मच काय तर समग्र विज्ञान (जाणीव) सुद्धा प्रभावित होते. म्हणून चेतनाशक्तीचा विकास केला पाहिजे.” तथागत बुद्धांच्या मतानुसार धम्माचा उद्देश हा असा आहे.
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.१८.२.२०२४
(संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ तृतीय खंड भाग पाचवा)