काळाराम मंदिर सत्याग्रह आणि स्वसन्मान चळवळ
काळाराम मंदिर सत्याग्रह आणि स्वसन्मान चळवळ
*अनिल वैद्य*
*माजी न्यायाधीश*
(२मार्च काळाराम मंदिर सत्याग्रह दिना निमित्त)
आपल्या देशातील अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समूहांना स्वतःचे आत्मभान नव्हते.आपल्याला मानवी हक्क आहेत हेच या मानवाला माहीत नव्हते.अंधश्रद्धा व दैववादी भूमिकेतून तो स्वतः कडे बघत होता , अस्पृश्य जातीत देवाने जन्मास घातले असा समज त्यांनी करून घेतला होता.ही बाब महान दूरदर्शी क्रांतिकारक नेते डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखली होती.
अस्पृश्यांची ही मानसिकता बदलविने सहज सोपे काम नव्हते पण ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी करून दाखविले.
आजही ओबीसी व बहुजन समाज चातुर्वर्ण्य व्यवस्था
मान्य करून घेत आहे.ते चार वर्गापैकी कनिष्ठ श्रेणीत येतात . त्यांनी चवथा वर्ण मान्य केला आहे.त्यात त्यांना काहीच खंत वाटत नाही. अंधभक्ती सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे.ही परिस्थिती बद लविण्या साठी काम करणाऱ्या समाज धुरिणांना
हा इतिहास दिशा दर्शक ठरणारा आहे. ओबीसी व समस्त बहुजन समाज मोठ्या संख्येने जागृत करण्या साठी अशा आत्मभान निर्माण करणाऱ्या चळवळीची गरज आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अशा चळवळी केल्या की ज्या मुळे संपूर्ण समाज जागृत झाला व त्यांच्या दिशेने गेला.हे बहुजन ओबीसी चळवळी साठीही अभ्यासनीय आहे.यातून बोध घेवून त्यांनी आत्मभान जागृत करण्याचे कार्य केल्यास येथे समता व विज्ञानवादी समाज निर्माण होईल. गुलामगिरी नष्ट होईल.बहुजनांना जागृत करण्यासाठी म.जोतिबा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहला .
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्र पूर्वी कोण?हा ग्रंथ डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजनांना जागृत करण्यासाठी लिहला आहे.
असे म्हणतात ज्यांना इतिहास घडवायचा आहे त्यांनी आपला इतिहास विसरू नये.त्याच प्रमाणे इतिहासातून धडा गिरवला जातोय.
डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात समता वाद्याचे ध्येय समानता प्रस्थापित करणे आहे.म्हणून
काळाराम मन्दिर प्रवेश दिनानिमित्त
या सत्याग्रहावर संक्षिप्त लिहत आहे.
२ मार्च १९३० ही काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाची तारीख ठरविण्यात आली.
सत्याग्रह कमिटीचे अध्यक्ष म्हणून केशव नारायण ऊर्फ वर्धेकर बुवा (पतितपावनदास) ची निवड करण्यात आली तर सत्याग्रह कमिटीचे सेक्रेटरी म्हणून दादासाहेब गायकवाड होते.
२ मार्च १९३० ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुशल नेतृत्वाखाली काळाराम’ मंदिरप्रवेश सत्याग्रहाला सुरुवात झाली. त्याचवेळी रामकुंडात प्रवेश करून बाटवण्याचाही अस्पृश्य सत्याग्रहींनी सत्याग्रह केला. त्या सत्याग्रहात श्री शंकर श्रावण यकवाड यांनी विशेष असे क्रांतीकारक कार्य केले.
अमेरिकेन राज्य क्रांती १८ व्या शतकात झाली. तेथील विचारवंत थॉमस पेन,जेफर्सन यांच्या विचारातून मानवी स्वातंत्र्याच्या जाहिरनामा प्रसिद्ध झाला. जगातील नागरिकांना आपल्या हक्काची माहिती व अन्याया विरोधात लढण्याचा हक्क आहे याची जाणीव झाली परंतु भारतातील अस्पृश्य समाजाला या जागतिक घडामोडीची काही माहिती नव्हती. २० व्या शतकात भारतात ही जाणीव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी करून देण्यासाठी चळवळ केली.हिंदू धर्मात अस्पृश्य जातींना स्पर्श करण्यासाठी मज्जाव होता आणि अस्पृश्य समाजाला हजारो वर्षांपासून मानवी हक्कांची जाणीव सुद्धा नव्हती, त्याला वाटायचे की ,सार्वजनिक ठिकाणी पाण्याला स्पर्श करण्याचा हक्क नाही किवा मंदिरात प्रवेश करण्याचा जो हक्क नाही तो आपणास जन्मतः नाही त्यावर आपला हक्क नाहीच कारण आपण अस्पृश्य आहोत अशी मानसिकता होती. त्या साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आधी ही जी अस्पृश्यांची मृतप्राय मानसिकता होती ती नष्ट करण्यासाठी जागृती करावी लागली, थोडक्यात मेलेल्या माणसाला जिवंत करावे लागले. आत्मभान निर्माण केले.
क्रांतीची दिशा त्यांनीं निश्चित केली होती .ही आहे आत्मसन्मान चळवळ तिला आजकाल स्वसन्मान चळवळ असे म्हणतात.दोन शब्दात काहीच फरक नाही.
त्या साठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक १९ व २० मार्च १९२० ला महाड येथे चवदार तळ्याचे आंदोलन केले, त्यावेळी डॉ. बाबासाहेब म्हणाले,” “स्वातंत्र्याचे हक्क भीक मागून मिळत नसतात ते स्व- सामर्थ्याने मिळवायचे असतात देणगी म्हणून लाभत नाही ”
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची महाड येथिल आत्मसन्मान चळवळ म्हणजे अस्पृशांच्या पाण्याच्या स्पर्शाच्या आंदोलना नंतर त्यांनी मंदीर प्रवेश आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू केला . अमरावतीत अंबादेवी मंदिर सत्याग्रह तर पुणे येथे १३ ऑक्टोबर१९२९ ला पर्वती मंदिर प्रवशासाठी
सत्याग्रह झाले
तेही महत्वाचे आहेत परंतु नाशिक येथील काळाराम मंदिर आंदोलन हे ऐतिहासिक ठरले.
ते दीर्घ काळ चालले.
नाशिक येथे सुप्रसिद्ध असे पंचवटी भागात काळाराम मंदिर व रामकुंड आहे म्हणजे या रामकुंडात पाणी असून तेथे स्नान केल्यास पावित्र्य मिळते अशी श्रद्धा आहे.
भव्य काळाराम मंदिर १७७२ ला सरदार रंगराव ओढेकर यांनी बांधले . रामायण नुसार प्रभू श्री राम१४ वर्षाच्या
वनवासात असतांना दहाव्या वर्षी लक्ष्मण व सीता यांच्यासह अडीच वर्ष नाशिकला राहिले त्याच जाग्यावर हे मंदिर बांधले आहे ,अशी भाविकांची श्रद्धा आहे.येथे श्रीरामाची सोन्याची मूर्ती आहे. मंदिरात रथ आहे. दर रामनवमीला लाखो भाविक जमतात व रथ यात्रा शहरात काढली जाते.
१९२९ मध्ये मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर प्रवेश आंदोलनाची योजना आखली .नाशिकयेथे या आंदोलनासाठी समिती स्थापन केली .मंदिर प्रवेश समितीचे अध्यक्ष पतितपावनदास वर्धेकर, सचिव कर्मवीर दादासाहेब गायकवाड सोबत इतर १० सदस्य होते.
समितीने खेडोपाडी जाऊन महाराष्ट्रभर प्रचार केला होता.ठरल्याप्रमाणे २ मार्च १९३० ला कोकण,विदर्भ,मराठवाडा आणि कर्नाटकातील अस्पृश्य सुद्धा हजारो च्या संख्येने नाशिक मधे जमा झाले.
नाशिक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आर .जी. गार्डन यांनी आठ हजार महार लोक नाशिकच्या महारवाड्यात जमा झाल्याचे आपल्या वरिष्ठ आयुक्तांना कळविले होते.
अस्पृशांनी काढलेली जंगी मिरवणूक शांततेने पार पडल्याचेही गार्डनने कळविले होते.
मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मंदिराच्या पंच कमेटिला समितीने अर्ज देऊन मंदिर प्रवेशासाठी विनंती केली होती परंतु पुज्याऱ्यांनी
विरोध दर्शविला .मंदिरांचे सर्व दरवाजे बंद करुन ठेवले होते.त्या मुळे सत्याग्रही प्रवेश करू शकले नाही .म्हणून सुमारे १५ हजार अस्पृशांची जंगी जाहीर सभा झाली .सर्व म्हणजे १५ हजार स्त्याग्रहींना दररोज जेवणाची व्यवस्था आयोजक भीमसैनिक नाशिककर करीत होते.
पुढील रणनीती ठरविण्यात आली. ब्रिटिश अधिकारी गार्डन या नाशिक जिल्हा
कलेक्टरने भादवी कलम १४४ लागू करून ३ पेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमू नये व मंदिर प्रवेश करू नये असा हुकूम जारी केला होता.
कलेक्टर गार्डनने वरिष्ठांना कळविले ते असे ,
‘”डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तीनशे सत्याग्रह्यांचे पथक होते. जोपर्यंत देवळाचे दरवाजे बंद आहेत तोपर्यंत सत्याग्रही दरवाजाजवळ ठाण मांडून बसतील असे डॉ. आंबेडकरांनी मला सांगितले. कोणी दरवाजातून आत जाण्याचा प्रयत्न केला तर रांगेत जो पहिला त्याने आधी जावे. या नियमानुसार सत्याग्रही आपल्या आधी देवळात शिरू पाहणाऱ्या इसमास प्रतिबंध करतील आणि शांततापूर्ण रीतीने घुसतील असेही ते म्हणाले. इतरांना रोखणे आणि त्यांना मंदिरात जाऊ न देणे हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा होत नाही काय असे मी म्हणताच तसे करणे म्हणजे फौजदारी स्वरूपाचा गुन्हा करणे होय हे त्यांनी मान्य केले. मी भारतीय दंडसंहितेच्या १४४ कलमाखाली हुकूम दिला आणि महारांना तेथे बसण्यास मनाई केली तर काय कराल ?असे मी डॉ. आंबेडकरांना विचारले तेव्हा आपण व आपले सहकारी असा हुकूम पाळणार नाही असे ते म्हणाले.”
हे गार्डन यांचे वरिष्ठांना लिहलेले पत्र आहे.
या वरून न्याय हक्का साठी कायद्याची भीती बाळगायची नाही असाच डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा निर्धार दिसून येतो.
मंदिराच्या चारही दरवाजावर रात्री ११ वाजे पर्यन्त सुध्दा सत्याग्रही बसले होते.१२५ पुरुष व २५ स्त्रियां होत्या .
ते नियोजन डॉ. बाबासाहेबांनी करून दिले होते.जसाही दरवाजा उघडल्या जाईल तसाच प्रवेश करायचा असे त्यांना सांगण्यात आले होते.
दरवाजे उघडले जात नव्हते.अशातच एप्रिल १९३० ला रामनवमी आली. त्या दिवशी स्पृश्य व अस्पृश्य दोन्हीही बाजूचे लोक राम रथ शहरात ओढण्याची जुनी प्रथा होती .परंतु अस्पृशांना कळू नये अशा रीतीने रथ बाहेर काढण्यात आला .
प्रथे प्रमाणे अस्पृशांनी रामरथास स्पर्श करताच विरोध झाला. जबर हाणामारी सुरू झाली. हाणामारीचे रुपांतर प्रचंड दंगलीत झाले. तेथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते.दगडफेकीत त्यांना मार लागू नये म्हणून अस्पृश्य स्वयंसेवक छत्री घेऊन कडे करून होते.तरी त्यांनाही जखमा झाल्या.
हजारो आंदोलक होते.जखमी झाले.
रात्रीची रणनीती वेगळी होती.
मंदिराच्या चारही दरवाजावर रात्री सुध्दा सत्याग्रही बसले होते. पुरुष व स्त्रियां होत्या
दबा धरून संधी शोधत होते .दरवाजा उघडताच प्रवेश करायचा अशी योजना होती.
परंतुदरवाजे उघडले जात नव्हते.
सत्याग्रही तीन तीनच्या तुकडीने मंदिर प्रवेशासाठी जात असताना त्यांना अडवून पोलीस व सनातनी मंडळी मारहाण करीत होती .पोलीस पकडुन नेत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन थांबवावे असे ब्रिटिश अधिकाऱ्यां कडून प्रयत्न सुरू होते परंतु त्यांनी आंदोलन मागे घेतले नाही. अशातच डॉ बाबासाहेबांना गोलमेज परिषदे साठी लंडनला जावे लागले. आंदोलनाची जबाबदारी नाशिकचे अस्पृश्य पुढारी दादासाहेब उर्फ भाऊराव गायकवाड आणि कार्यकर्त्यांनी सांभाळली.
गावोगावी सभा आयोजित केल्या होत्या.
२५ ऑक्टोबर १९३१ ला मुंबईत अस्पृश्य स्त्रियांची सभा झाली .त्या सभेला माता रमाबाई आंबेडकर हजर होत्या. नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रहाला सभेत पाठींबा देण्याचा ठराव मंजूर केला.३१ ऑक्टोबर १९३१ च्या जनता पत्रात ही बातमी प्रकाशित झाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर गोलमेज परिषदेसाठी लंडनला गेल्यावर खुद्द रमाईने चळवळीत भाग घेतला .या वृत्तांने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना स्फुरण आले.दिनांक ६ नोव्हेंबर १९३१ ला अस्पृश्य सत्याग्रही *सीताराम काळू हाटे* यांनी अचानक मंदिरात प्रवेश केला व आंदोलक डॉ.बाबासाहेब आंबेडकर की जय! चा जयजयकार करू लागले तोच सनातनी .भीमसैनिक सीताराम हाटे भगवान रामाचे दर्शन घेणार तोच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.दर्शन घेऊ दिले नाही.
दरवाजा उघडताच आंदोलक प्रवेश करायचे त्यांना पोलीस अटक करायचे. सत्याग्रहीना अटक करून नेले. आंदोलकांना १ महिना तुरुंगावासाची शिक्षा दिली.
काळाराम मन्दिर ज्या परिसरात आहे त्या परिसराला पंचवटी म्हणतात तेथे रामकुंड आहे .तेथे भाविक पवित्र्यासाठी स्नान करतात परन्तु अस्पृशांना स्नान करण्यासाठी मनाई होती.मंदिर प्रवेश सत्याग्रही अस्पृश्यलोक स्नान करतील म्हणून कडेकोट बंदोबस्त केला होता याच वेळी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह चालू होता. सत्याग्रहाचे लोण संबंध महाराष्ट्रभर पसरलेले होते. सत्याग्रहींचे लोंढेच्या लोंढे नाशिकला सत्याग्रहात भाग घेण्यासाठी येत होते. याचवेळी अस्पृश्य सत्याग्रहींनी गोदावरीच्या पात्रातील रामकुंडावर सत्याग्रह करण्याचा दृढ निश्चय केला होता. अस्पृश्य सत्याग्रही रामकुंडाच्या एका तीरावर जमा होऊन सत्याग्रहासाठी सज्ज झाले होते. तर दुसऱ्या तीरावर सत्याग्रहींना अडविण्यासाठी पावित्रा घेवून उभे होते. स्पृश्यवर्गीयांनी दलित सत्याग्रहींना अडविण्यासाठी हातात लाठ्या काठ्या धारण केल्या होत्या. सत्याग्रहींनी कोणत्याही परिस्थितीत रामकुंडात प्रवेश करू नये म्हणून ते डोळ्यात तेल घालून दक्ष होते.
इकडे महार वस्ती म्हणजे मोठ्या राजवाड्यातील सत्याग्रही वीर शंकर श्रावण गायकवाड यांनी रामकुंडावर सत्याग्रह करण्यासाठी वेगळाच पवित्रा घेतला होता. त्यांनी स्पृश्यवर्गीयांना चकविण्यासाठी ब्राह्मणवेश धारण करून सत्याग्रहात भाग घेण्याचा संकल्प सोडला होता. त्याप्रमाणे त्यांनी अंगात अंगरखा, कमरेला धोतर, डोक्यावर ब्राह्मणी पगडी, पायात पुणेरी जोडा, खांद्यावर पंचा, कपाळावर गंधाचे तीन आडवे पट्टे व मधोमध लाल रंगाचा गोल कुंकवासारखा टीळा असा ब्राह्मणी वेश धारण केला होता, घराबाहेर पडण्याच्या वेळी त्यांनी आपली पत्नी यशोदाबाई शंकर गायकवाड यांच्या कपाळावरील कुंकु स्वहस्ताने पुसून टाकले आणि ते ब्राह्मणी वेशात एकटेच रामकुंडावर निघण्यासाठी घराबाहेर पडले.
ब्राह्मणी वेश करून श्री. शंकर श्रावण गायकवाड हे गोदावरी तीरावर आले तेथे ते बघतात तो काय? एका तीरावर सत्याग्रह करण्यासाठी सत्याग्रही सज्ज बसले होते तर त्यांना अडविण्यासाठी स्पृश्यवर्गीय लोक दुसऱ्या तीरावर उभे होते. ब्रीटिश पोलीस हातात रायफली घेऊन मोठ्या सावधगिरीने पहारा देत होते. वातावरण तंग होते, कधी काय घडेल याचा नेम नव्हता.! दोन्हीही बाजूंकडून ठिणगी जरी पडली तरी मोठा भडका उडणार होता. अशा आणीबाणीच्या प्रसंगी त्यांनी गनिमी कावा केला. त्यांनी ब्राह्मणी वेश केला होता .शंकर गायकवाड यांचे गोदावरीच्या परिसरात आगमन झाले होते. ते – पोलीस अधिकाऱ्यांजवळ गेले आणि ते ब्राह्मणी पद्धतीने त्यांच्याशी संभाषण करू लागले. ते पोलीस ऑफिसरांना म्हणाले: “महारडी ही जात फारच विचित्र आहे. तुम्ही रामकुंडाकडे सरकू देऊ नका.” असे बोलून आणि स्वतः ब्राह्मण असल्याचे
भासवून ते पोलीस ऑफीसर्स समवेत बोलत बोलत रामकुंडाकडे सरकू लागले. त्यांच्या या वेशांतर करून रामकुंडाकडे जाण्याच्या हालचालीकडे त्यांच्या सहकारी मित्रांचे लक्ष होते पण त्यांनी ही घटना इतर सत्याग्रहीपर्यंत जाऊ दिली नाही. त्यामुळे ती घटना कोणालाच शेवटपर्यंत समजली नाही.
हा वेशांतर करून रामकुंडाच्या सत्याग्रहात सहभागी झालेला सत्याग्रहीवीर भीम सैनिक शंकर गायकवाड बेलमास्तर हे रामकुंडाजवळ येऊन पोहोचले. दलित सत्याग्रही हे रामकुंडात उड्या टाकून सत्याग्रह करणार आहोत ही बातमी सवर्ण हिंदूना अगोदरच समजली होती.
अस्पृश्यांनी राम कुंडाचे पाणी अपवित्र करू नये
म्हणून त्यांनी रामकुंडात दगड, काचा, साबरकाठ्या, बाभळीच्या फाट्या टाकून ठेवलेल्या होत्या व रामकुंडाचे पाणी आटवले होते. परंतु सत्याग्रहाच्या आदल्या दिवशी पाऊस पडल्याने गोदावरीचे पात्र तुडुंब भरून वाहत होते.
रामकुंडाच्या काठावर ब्राह्मण मंडळी पूजा अर्चा आणि होम हवण करण्यात दंग होती. सत्याग्रही ब्राह्मण वेशधारी शंकर गायकवाड हे त्या पूजा अर्चा करणाऱ्या ब्राह्मण मंडळींजवळ आले. त्यांच्या ब्राह्मणी वेशामुळे त्यांना कोणी ओळखले नाही की कोणाला त्यांचा संशयही आला नाही. इतकेच नव्हे तर त्यांना ज्या मित्रांनी ओळखले होते त्यांनादेखील आता हे शंकर गायकवाड पुढे काय करणार आहेत हे माहित नव्हते. त्यांनीदेखील ब्राह्मणांप्रमाणे पूजा अर्चा होम हवन करण्याचे सोंग केले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या अंगावरील ब्राह्मणी गणवेश उतरविला आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय’ अशी मोठ्याने घोषणा करून रामकुंडात डोळ्याचे पाते लवते न
लक्ते तोच उडी घेतली. शंकर गायकवाड या दलित सत्याग्रहीवीराने रामकुंडात उडी पेताच सगळीकडे हाहा:कार उडाला. पोलिसांची पांदल उडाली. ब्रिटिश पोलिसानी शंकर गायकवाड यांना रामकुंडातून खेचून बाहेर काढले. आणि त्यांना काठीने खूप मारपीट केली. या अमानुष मारामुळे शंकर श्रावण गायकवाड यांचे समोरचे चार दात पडले. ही घटना जेव्हा दलित सत्याग्रहींना समजली तेव्हा त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सत्याग्रही वीर शंकर श्रावण गायकवाड यांचा जयजयकार केला. तर सवर्ण हिंदू, दलित सत्याग्रहींचा विजय व आनंदोत्सव पाहून दातओठ खात बघत राहिले. पोलिसांनी दलित सत्याग्रहींना मारपीट सुरू केली.
एका सत्याग्रहीने रामकुंडात उडी घेतल्याची बातमी सगळीकडे पसरली. ही बातमी त्यावेळेच्या नाशिकच्या बिटिश कलेक्टरला कळताच ते तातडीने रामकुंडावर आले. कलेक्टर येईपर्यंत पोलीस हे सत्याग्रहींवर लाठीचार्ज करीत होते. कलेक्टर रामकुंडावर येताच कलेक्टरच्या आदेशानुसार पोलिसांनी लाठीचार्ज थांबविला. सत्याग्रहींचा आदेश आणि सत्याग्रह करण्याचा दृढ निश्चय पाहून कलेक्टरने रामुकुंडआणि राम मंदिर अस्पृश्यांना खुले करण्याचे जाहीर केले. बेलमास्टर नावाच्या या आंदोलकांनी ,”डॉ बाबासाहेब आंबेडकर की जय! “म्हणत रामकुंडात उडी घेतली.ते बघून सनातनी खवळले ,त्याला लाथा बुक्यांनी झोडपले. त्याच्या डोक्यातून भळाभळा रक्त वाहत होते.सनातनी मारत होते. शंकर श्रावण गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली .न्यायालयाने त्यांना ७ दिवसाची तुरुंगाची शिक्षा दिली
या देशाच्या इतिहासात शेकडो वर्षांपासून पहिल्यांदा सीताराम हाटे या अस्पृश्य व्यक्तीने पहिल्यांदा मंदिर प्रवेश केला, शंकर श्रावण गायकवाड या अस्पृश्य व्यक्तीने शेकडो वर्षानंतर रामकुंडात उडी घेतली.
तेही स्पृश्य किंवा सनातनी लोकांचा कडवा विरोध पत्करून.हे मानवी हक्क मागितले होते परंतु त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली होती.किती क्रूर समाज व्यवस्था होती ?
अस्पृश्यांना हजारो वर्ष मंदिर प्रवेश नव्हता परंतु क्रांतिकारी प्रवेश करून नवा इतिहास रचला गेला.
काळाराम मन्दिर आंदोलन सतत ५ वर्ष सुरू होते.शेकडो आंदोलकांना तुरुंगात ठेवले होते. त्यांना शिक्षा
झाली होती.
५ वर्ष सत्याग्रह होता.
त्यावेळेस अस्पृश्यता पाळने या साठी अट्रोसिटी किंवा नागरी हक्क संरक्षण सारखा कायदा नव्हता.
ते हक्क व संरक्षण शेवटी भारतीय स्वातंत्र्या नंतरच मिळाले तेही डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मिळून दिले . संविधानात अनुच्छेद १७ नुसार
अस्पृश्यता नष्ट केली.
मंदिरात प्रवेश मिळवून काही देव पावनार नव्हता तर माणुसकीचा हक्क प्राप्त करण्यासाठी
हा लढा होता.स्वसन्मान चळवळीचा महत्वाचा टप्पा होता.त्या काळात
आज जी स्वसन्मानाची जाणीव पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समाजाला झाली आहे,आज जी बौद्ध समूहाला
हक्काची जाणीव निर्माण झाली. ती खस्ता खाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तत्कालीन तमाम कार्यकर्ते यांच्या त्यागामुळे झाली आहे.
विशेष उल्लेखनीय असे की काही स्पृश्य पुढाऱ्यांनी सुद्धा या आंदोलनास पाठिंबा दिला होता.पांडुरंग जिवाजी सबनीस हे ब्राम्हण समाजाचे पुढारी होते त्यांचे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या समितीच्या सदस्या सोबत छायाचित्र आहे. काँग्रेसचे सुधारणावादी स्पृश्य हिंदु पुढारी रघुनाथराव गद्रे,गोविंदराव देशपांडे आणि बाळकृष्णपंत मराठे यांचा सत्याग्रहास पाठिंबा होता.आठशे शीख यात्रेकरू सत्याग्रहात सामील झाले होते.
१९३६ सालच्या रामनवमी पासून मंदिराचे दरवाजे खुले झाले.
आंदोलनाचा हेतू
मंदिरात प्रवेश करून देवाची पूजा करून इच्छाप्राप्ती करणे हा हेतू मुळीच नव्हता तर
अस्पृश्यांना आपल्या हक्काची जाणीव करून देणे हे आत्मभान जागविणारे आंदोलन होते. नाशिक येथिल काळाराम मंदिर सत्याग्रह दिनानिमित्ताने
सर्व सत्याग्रहींना विनम्र अभिवादन!
*अनिल वैद्य*
माजी न्यायाधीश
२ मार्च २०२४
✍️✍️✍️