*बुद्धांची सौंदर्याची आवड*
भगवान बुद्धांना सौंदर्याची (beautiful) एवढी आवड होती की, त्यांना सुंदरताप्रिय बुद्ध असे म्हटले तर अधिक शोभून दिसेल.
त्यांनी आपल्या अनुयायांना सांगितले होते की, सुंदरतेच्या सहवासात राहा.
भिक्खूंना उपदेश करताना ते म्हणाले,
“भिक्खूहो, चांगल्या स्थितीचा उदय किंवा वाईट गोष्टींचा लोप करण्यास समर्थ ठरेल अशी सुंदरतेच्या मैत्रीइतकी दुसरी कोणतीही गोष्ट नाही.”
“जो सुंदरतेचा स्नेही आहे त्याच्या ठायी चांगल्या अवस्थांचा उदय होतो आणि दुष्ट भावनांचा लोप होतो. दुष्टपणा आणि वाईटाची भक्ती लोप पावते, कुशल कर्मांबाबत नावड नाहीशी होते, कुशल गोष्टी व त्यांची आवड, समर्पण निर्माण होते; दुष्टत्वाबद्दल नावड वाढत जाते.”
“भिक्खूहो, ज्ञानशाखेचा उदय न व्हावा म्हणून किंवा उदय झालेल्या ज्ञानशाखा पूर्णत्वाप्रत जाऊ नये म्हणून उपयुक्त ठरणारी बेशिस्त दृष्टी (मिथ्या दृष्टी) unsystematic attention ही अशी गोष्ट आहे, की ज्ञानाचा, शहाणपणाचा उदय होऊ देत नाही व ज्ञानाचा उदय झालेला असल्यास त्याची मशागत व वृद्धी होऊन ज्ञान पूर्णत्वास जाऊ देत नाही. याबाबत दुसरी समर्थ गोष्ट मला माहीत नाही.”
“भिक्खूहो, ज्याची दृष्टी बेशिस्त (मिथ्या) आहे त्याच्या ठायी अनुदित ज्ञानशाखा उदित होत नाहीत आणि जर उदित झाल्या तर त्यांची योग्य जोपासना न झाल्यामुळे पूर्णत्वास पोचत नाहीत.”
“भिक्खूहो, सग्यासोयऱ्यांचे नसणे, ही हानी म्हणजे क्षुल्लक गोष्ट आहे. पण प्रज्ञेचा नाश (loss of wisdom) ही मात्र फार हानिकारक, दुःखद गोष्ट आहे.”
“भिक्खूहो, सग्यासोयऱ्यांची वृद्धी ही क्षुल्लक गोष्ट आहे, पण प्रज्ञेची वृद्धी, विकास ही मात्र सर्वोच्च महत्त्वाची गोष्ट आहे.”
“भिक्खूहो, म्हणून तुम्ही अशी शिकवण अंगी बाणली पाहिजे की, ‘आम्ही प्रज्ञेचा विकास करू’. ती प्राप्त करण्यासाठी तुम्ही प्रयत्नपूर्वक प्रशिक्षित झाले पाहिजे.”
“भिक्खूहो, धनवृद्धी ही क्षुल्लक गोष्ट आहे. सर्व वृद्धींमध्ये श्रेष्ठ म्हणजे प्रज्ञावृद्धी. म्हणून तुम्ही अशी वृत्ती बाळगली पाहिजे की, ‘आम्ही प्रज्ञेचा विकास करू.’ ती प्राप्त करण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न व अभ्यास केला पाहिजे.”
“कीर्तीचा (reputation) लोप ही क्षुल्लक गोष्ट आहे, पण प्रज्ञेचा नाश ही खरोखरीच दुःखद गोष्ट आहे.”
*बुद्धांचे सुंदरतेबद्दलचे प्रेम*
एकदा शाक्य देशातील सक्कर ह्या नगरात तथागतांचे वास्तव्य होते.
त्या समयी तथागत स्थविर आनंदाशी बोलले,
“आनंद, सुंदरतेशी मैत्री, सहवास व निकट स्नेह ह्यांचे जीवनात सर्वस्वी महत्त्व आहे.
“जो सुंदरतेचा कल्याण-मित्र, सहवासी आणि निकट परिचित आहे अशा भिक्खूकडून अशी अपेक्षा आहे की, तो आर्य-अष्टांगिक मार्गाचा विकास करील. तो आर्य-अष्टांगिक मार्गाचा जास्तीत जास्त लाभ घेईल. तो सम्यक् दृष्टी प्राप्त करील; जी त्याग, विराग, विराम ह्यांवर आधारित असून जिची परिणती आत्मसमर्पणात होते. तो सम्यक् संकल्प, सम्यक् वाणी, सम्यक् कर्मान्त, सम्यक् आजीविका, सम्यक् व्यायाम, सम्यक् स्मृती, तसेच सम्यक समाधी याची प्राप्ती करील, ज्यांची परिणती आत्मसमर्पणात होते.”
“आनंद, जो भिक्खू सुंदरतेचा कल्याण-मित्र, सहवासी आणि दाट स्नेही आहे तो अशा रीतीने आर्य-अष्टांगिक मार्गाचा विकास करतो आणि त्यापासून जास्तीत जास्त लाभ घेतो.”
“सुंदरतेशी मैत्री, सहवास आणि निकट स्नेह ह्यांचे जीवनात सर्वस्वी महत्त्व कसे आहे हे तुला समजण्यास आनंद, हाच मार्ग आहे.”
“आनंद, खरोखर जे प्राणी नाशवंत, मर्त्य, दुःख, शोक व आपत्तीग्रस्त आहेत त्यांना सुंदरतेशी, सुसंगतीशी मैत्री केल्याने मुक्ती मिळू शकते.
“आनंदा, सुसंगतीशी, सुंदरतेशी मैत्री, सहवास व निकट स्नेह ह्यांचे जीवनात कसे सर्वस्वी महत्त्व आहे ते तुला आता समजू शकेल.
(संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड-सहा)
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.१९.३.२०२४
मो.९३२६४५०५०६