मातीचा देह :सृजनत्वाचे अक्षरलेणे
मातीचा देह : सृजनत्वाचे अक्षरलेणे
– संदीप गायकवाड.
मानवी जीवनाची सुरुवात ही मातेच्या उदरातील गर्भातूनच होते. तेव्हा त्याला विश्वाचे ज्ञान नसते. पण तो जेव्हा मातेच्या उदरातून जन्म घेतो आणि जगात येतो तेव्हा त्याला जगाची ओळख होते, त्याच्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो. तो अर्थ चांगला किंवा वाईट असू शकतो. पण मनुष्य हा चांगला होण्यासाठी झटपटणारा प्राणी आहे.
माणूस हा या पृथ्वीतलावरील सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. त्याच्या अगम्य चिंतनशीलतेतून नव्या विश्वाची निर्मिती झाली असे म्हणणे अतीशयोक्ती ठरणार नाही. पण माणसाच्या जीवनाला भ्रष्ट करणाऱ्या परंपराही मोठ्या प्रमाणात आहेत. माणसाचे माणूसपण नाकरणाऱ्या विकृत व्यवस्था येथे निर्माण झाल्या. भारतीय संविधानाने याच विकृत व्यवस्था नाकारून मानवतावादी विचाराचा प्रकाशपुंज दिला आहे. त्या प्रकाशपुंजातून सृजनत्वाला आविष्कार देणाऱ्या सुनंदा बोरकर जुलमे यांनी आपल्या ‘मातीचा देह’ या कलाकृतीतून मानवी भावविश्वाचे प्रतिबिंब रेखाटले आहे. त्यांचा ‘मातीचा देह’ हा पहिलाच काव्यसग्रह असला तरी त्या कवितासंग्रहातील माणूसमयता वाचकाला अंतर्भूत करायला लावणारी आहे. त्यांच्या ओल्याचिंब मनातील भावचिंतनाचा मोहळ त्यांनी अधोरेखीत केलेला आहे.
या कवितासंग्रहाच्या प्रस्तावनेत डॉ. यशवंत मनोहर म्हणतात की, “सुनंदाताईची कविता म्हणजे त्यांच्या स्वतःच्या शोधाचीच त्यांच्या स्वायत्तेच्या आणि त्याच्या स्वातंत्र्याच्या प्राप्तीची कविता आहे. या स्वातंत्र्याचा उत्सव त्याच्या कवितेत आहे. या मुक्तीलढ्यात कविता या कवयित्रीसोबत सैनिकाची भूमिका करीत आहे.” ही त्यांची भूमिका अत्यंत रास्तच आहे.
कविता ही माणसाच्या उत्स्फूर्त भावनेचा अविष्कार असतो. ज्या कवितेचे झरे हृदयातून उचंबळून येतात तीच खरी कविता असते. अनेक कविता वास्तवाच्या दूर जाऊन कल्पनेच्या मनोशैलीतून निर्मित झालेल्या असतात, त्या कविता वाचकावर फारसा प्रभाव पाडताना दिसत नाही. पांढरपेशीय विश्वाची कविता कधीचीच लुप्त झाली आहे. आज फुले, शाहू, आंबेडकर विचारांची नवी कविता मराठी काव्य प्रांतात स्वतःचे भक्कम स्थान मांडून उभी आहे. त्याच्यामध्ये असलेली माणूसमयता हाच आंबेडकरी कवितेचा श्वास आहे. ह्या आंबेडकरी जाणिवांची कविता म्हणजेच ‘मातीचा देह ‘हा कवितासंग्रह होय.
या कवितासंग्रहात एकूण ऐंशी कविता असून या कवितांमध्ये कवयित्रीच्या सूक्ष्म विचारांची स्पंदनं उजागर झाली आहेत. जीवनाच्या खडतर प्रवासात कवितेनं तिला महाऊर्जा दिली आहे. तथागत गौतम बुद्धांच्या अखंड संघर्षाची प्रेरणा ही कवियत्रीच्या मनाला नवनिर्मितीचा ध्यास देते. ‘बुध्दा!’ ही कवितासंग्रहातील पहिलीच कविता आहे. ही तथागत गौतम बुद्धाच्या सम्यक क्रांतीची आठवण करून देणारी आहे. त्या या कवितेत लिहितात की,
” हे बुद्धा
शांतिदूता
कठोर वचनांचे आघात
प्रत्याघात करतात म्हणून
तू दया करूणेचा उच्चार करतोस
बहुजन हिताय बहुजन सुखाय
तुझी धम्मवाणी
सर्वांसाठी सुखाचा
तूझा मध्यम मार्ग
आधी कल्याण मध्य कल्याण
अंतिम कल्याणाचा
तू मार्गदाता …” (पृ. ३)
गौतम बुद्धाचा धम्म हाच मानवाला नितिमान बनवू शकतो. हा सर्वंकष कल्याणाचा जीवनपथ आहे. माणूस हा पृथ्वीवरील सौंदर्य निर्मितीचा जनक आहे. नव्या निर्माणातून जग बदलणारा शिल्पकार आहे. पण माणसाला विकृत करणाऱ्या विचाराने माणूस माणसापासून दूर चालला आहे. धर्म, जात, भाषा, पंथ अशा भेदातून मानवांचे शोषण होत आहे. नव्या राजकीय गुन्हेगारी व्यवस्थेतून नवीन गुंडप्रवृती निर्माण होताना दिसत आहे. तेव्हा कवियत्रीला माणसातील माणूसपण कसे सुरक्षित राहील हीच चिंता लागलेली आहे. त्या ‘माणसाने माणूस व्हावे’ या कवितेत स्वतःच्या विचाराला वाट मोकळी करून देताना लिहितात की,
“माणसाने माणूस व्हावे
माणुसकीचे गीत व्हावे
हीनदीन दुर्बलांचे
हात आणि पाय व्हावे”….(पृ. ३७)
स्त्री ही जगनिर्मितीची जनक आहे. पण तिच्या वाटेला हालअपेष्टा आल्या आहेत. धर्माच्या रूढीजन्य परंपरांनी तिला अस्तित्वहीन केले होते. तिचा निसर्गदत्त अधिकार नाकारला होता. तिला अपवित्र समजून कनिष्ठ दर्जाची वागणूक दिली जात होती. स्त्री असण्याची नैसर्गिक प्रवृत्ती म्हणजे मासिकपाळी; पण यात तिच्यावर विटाळाची बंधने लादली गेली. या कवितासंग्रहातील ‘मासिकपाळी’ ही कविता ‘मातीच्या देहा’तील प्रखर वास्तवाची प्रगल्भ जाणीव आहे. त्या या कवितेत स्वतःच्या विचाराचे क्रांतीदर्शीत्व प्रकट करताना लिहतात की,
“मुली,
निसर्गाने दिला
हा तुला मान
अतिरिक्त हा तुझा सन्मान
सुरवंटाचे रूप त्यागून
फुलपाखरांचे पंख घे
स्त्रीत्वाच्या अभिमानाने
आरशात जरा निरखून घे
स्वच्छ रहा स्वस्थ रहा
जबाबदारीने सजग रहा
अडचण तिला समजू नको
अशुद्ध अपवित्र मानू नको
‘हॅपी टू ब्लीड’ अभिमानाने
सांग जरा
सृजनत्वाचा तुझ्या
साजरा कर सोहळा…” (पृ. २६)
या कवितासंग्रहातील ही एक अत्यंत महत्त्वाची कविता आहे.
कवयित्रीचे मन कधी स्त्रीसुलभ भावनांनी ओथंबून वाहते. घर, कुटुंब, नातेसंबध, मैत्रीच्या भावभावनांचे विश्व त्यांच्या शब्दांतून व्यक्त होते. मैत्रीच्या सहवासात घालवलेल्या बालपणाची आठवण होते . हिंदोळ्यावर मन झुलत राहते. त्यांचे सामाजिक भानही जागे आहे. सावित्रीबाईंच्या कार्यकर्तृत्वाच्या त्यागाची त्यांना आठवण होते . आयुष्यातल्या टिंबा टिंबाच्या जागा भरताना कवितासखी कशी सोबत करते, मायेने जवळ घेते अशी विविध भावगर्भी जाणीव कवयित्रीच्या शब्दातून प्रकट होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शोषित, वंचितांच्या विश्वाचा ज्ञानसूर्य आहेत. मानवतेच्या समग्र लढण्याची खरे शिल्पकार आहेत. माणसाला माणूसपण मिळवून देणाऱ्या महायोद्ध्याचे नाव डॉ.बाबासाहेब आंबेडकर. कवयित्रीचा बाणा हा आंबेडकरवादी आहे. आंबेडकरांच्या विचारसंवेदनेतूनच तिला कविता गवसली आहे. म्हणून त्या ‘महामानव..!’ या कवितेत लिहितात –
” तू शिरलास
आमच्या कुजट झोपड्यात
आमच्या दुःखावर
मायेचे पांघरून घातलेस
आणि दिलीस आम्हाला
सुखाची निद्रा
बा भिमा…” (पृ. ४९)
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या ग्रंथासाठी घर बांधलं. ते म्हणजे राजगृह. पण या राजगृहावर एका विकृताने दगडफेक केली. तेव्हा त्या विकृतीचा मागे किती सैतानी विचार काम करत आहेत, आपण समजून घेतले पाहिजे. ज्यांनी भारतातील समग्र मानवाला समतेचे संविधान दिले. त्याच्या घरावर दगड भिरकावणे हे मनूव्यवस्थेची पिलावळ कशी माजली आहे याचा नमुना आहे. या मुलाला समजावून सांगताना ‘राजगृहावर दगड भिरकवणाऱ्यास’ या कवितेतून त्या संदेश देतात की –
राजगृह काय आहे समजून घे जरा
बाबासाहेबांच्या विचारांचे
चिंतन कर मुला
राजगृह आहे ज्ञानाचे भांडार
मानवी जीवनाच्या तत्त्वज्ञानाचे सार
हे आहे हजारो सूर्याच्या प्रकाशाचे घर…” (पृ. १२०)
‘मातीचा देह’ हा कवितासंग्रहात स्त्रीमनाचे विविध पैलू उलगडून दाखवणाऱ्या अनेक कविता आहेत. या कवितांचा पोत तलम आणि दर्जेदार आहे. आशयाने व विषयाने परिपूर्ण अशी जीवनाचे नवे गीत गाणारी ही कविता आहे. ‘मातीच्या देहा’तून नव्या अंकुराचा उदय होतो तसे विचारअंकूर वाचकाच्या मनात अंकुरीत करण्याचे सामर्थ्य या कवितेत आहे. सौंदर्याभीरूची वाढविण्याची मा कवितेची क्षमता कौतुकास्पद आहे.
वर्तमानाच्या अनागोंदी व गंभीर वातावणात या कवयित्रीने स्वतःच्या अभिव्यक्तीला उजागर केले आहे. अनेक लेखक व कवी राजकारणाच्या भीतीने न लिहिणाऱ्या काळात सुनंदा बोरकर जुलमे यांनी राजकारणावरही बोलण्याचे धारिष्ट्य केले आहे, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ‘मातीचा देह’ या कवितासंग्रहातील कविता साधी व सोपी आहे. कलात्मकतेच्या पातळीवर काही मर्यादा आहेत पण मानवी मनाला भावणाऱ्या कविता आहेत. आंबेडकरी विचारांची पेरणी या कविता करत आहेत. ‘मातीचा देह’ म्हणजे सृजनत्वाचे अक्षरलेणे आहे. त्याच्या या कवितासंग्रहातून परिवर्तनाची नवी दिशा वाचकाला मिळावी हीच अपेक्षा.
कवयित्रीला पुढील काव्यप्रवासाकरता सुयश चिंतितो….!
– संदीप गायकवाड
नागपूर
मो. 9637357400
कवितासंग्रह – मातीचा देह
कवयित्री – सुनंदा बोरकर जुलमे
प्रकाशन- ज्ञानपथ प्रकाशन, नागपूर
मुल्य – 230 ₹
मो . नं 8766422475.
*******************