मिलिंदास पत्र…
मिलिंदास पत्र…
प्रती,
प्रिय, मिलिंद….
सविनय जयभीम..
तथा भावोत्कट आंतरिक ओलावा ….
मिलिंदा तू कसा आहेस ? आणि कुठे आहेस ? बरेच दिवसा पासून मनात सलत होतं. आज ना उद्या तुझे पत्र येईल, फोन येईल, मेल येईल, नाही तर कुणाकडे खुशालीचा तरी निरोप येईल. येवढी तुझी आम्ही चातका सारखी आतुरतेने वाट पहात आहे. पण तसं काहीच झाले नाही. म्हणून मीच तूला आता समाजाचं मन डोळ्यासमोर ठेऊन पत्र लिहण्याचं ठरवलं, तू जीथे असशिल तीथे पत्र समजून घे आणि ये आपल्या बाबासाहेबांच्या बोटाच्या दिशेने…
©©
मिलिंद , मोठ्या कष्टाने प्रचंड संघषर्षातून अनेक संकटांना टक्कर देऊन घरादाराची आणि स्वताःच्या जीवाची पर्वा न करता दिवस रात्र एक करून, आपण स्वाभीमानाने माणूस म्हणून जगलो पाहीजे हा विचार डोळ्या समोर ठेवून तळागाळातील माणसांसाठी आपल्या बाबासाहेबांनी पीपल्स एज्यूकेशन सोसायटी’ ची स्थापना केली. मुंबईचं सिध्दार्थ महाविदयालय आणि औरंगाबादचं मिलिंद महाविदयालय आज ही साक्षीला आहे. हिमालया सारखं तटस्थ उभं …
©©
मिलिंद, गावकुसा बाहेरून जेव्हा तू नागसेनवनात आला होतास तेव्हा कसा होतास? हे आता तुझे तुलाच ठाऊक आहे. तुझे राहणीमान, तुझा पेहराव आणि गावातील घराचे अठराविश्व दारिद्रय, धर्मांध जातीयतेचा हा हा कार, माणसाला माणूस् न म्हणणारी समाज व्यवस्था काळीज चिरुन जात होती. एक वेळचे ढोर मेहनत करुनच खायला मिळेल यातच समाधान वाटायचे, कधी – कशी उपाशी पोटी झोपायची घरातील सगळी माणसं, गावातील पाटलाच्या वावरात काम करुन माय बापाचं सर्व आंग ठण ठण दुःखायचं, बहीण भाऊ, काका, काकी अख्खं घर खंटीच्या कामावर जायचे, तेव्हा घामाच्या धारा आणि आसवांच्या धारा एकमेकांत मिसळून बाप ओला व्हायचा अंर्तमनात्. या ही परिस्थितित तू डगमगला नाहीस, कारण बा भीमाचे विचार तूला प्रेरणा देत होते. नव्या युगाच्या निर्मितीसाठी. ” या परिसरातील विद्यार्थी मिलिंद व्हावा आणि शिक्षक नागसेन” तू मिलिंद झाला आणि मी ही नागसेन पण दोघांतील संवाद हरपल्याने आता हताश वाटते कधी-कधी, शिक्षण हे वाघीनीचे दूध आहे. म्हणून तू शिकत राहीलास इथल्या निच व्यवस्थेवर डरकाळी फोडण्यासाठी आणि पिढ्यान पिढीचा अंधार दूर करण्यासाठी,
©©
मिलिंद तू नागसेनवनात येताच फाटलेले आभाळ आणि उसवलेली समाज व्यवस्था जोडल्या सारखी झाली. आणि तूझ्यातील भीम विचार जागृत होऊन तू हिमालया सारखा उंच आणि महासागरा सारखा अथांग झाला आमच्यासह देशासाठी. फुले, शाहु आणि बाबासाहेब यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन इथल्या प्रत्येक संघर्षाच्या वळणावर तू अग्रभागी होता, आहे आणि राहशिल कारण आंबेडकरी विचार माणसाला माणूसपण शिकवितात…
नामांतर लढा, रिडल्स् चं प्रकरण, गायरान जमिनिचा प्रश्न, शिष्यवृत्तीचा प्रश्न, गावकुसात होणाऱ्या अन्याय अत्याचाराचं निवारण अश्या एक ना अनेक घटनां साठी आंदोलन केली, मोर्चे काढले समाजाला सावरण्या साठी, जातीय वादयांच्या कपट कारस्थांनाना लगेच हेरुन तू व्यवस्थेशी लढत राहीला… लढता लढता शिकत गेला ध्येया पर्यंत पँथर सारखा , याचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे. आणि शेवट पर्यंत राहील.
©©
मिलिंद तू शिकत असतांना नागसेन वनातील महाविदयालयाचा परिसर हुंदळायचा चळवळीला मजबूत करण्यासाठी , महाविदयालयाचा परिसर आणि वर्गामध्ये विद्यार्थी भरगच्च भरलेले दिसायचे, महाविदयालयाच्या विविध सांस्कृतिक वैचारिक कार्यक्रमा मधून तूला आकार यायचा समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचा, मिलिंद वस्तीगृहातील दिवस आठवले की आज ही आठवणीने डोळे आणि हृदय भरूण येतात. गावा कडून मायने पाठविलेली शिदोरीतील भाकर सर्वजन मिळून मिसळून खायचे, एकमेकांचे कपडे घालायचे कसे असायचे ते दिवस याचा ही साक्षीदार तूच आहेस, मिलिंद आज तूला देशातील महत्वाच्या पदावर बसतांना पाहून अंतकरण भऊन येते रे… आता तर तुझी कीमयाच न्यारी आहे. बसायला गाडी रहायला माडी, हे सर्व बघतांना मन आनंदानं ओलं चिंब होऊन जाते बहरून आलेल्या हिरव्यागार बोधीवृक्षा सारखं.
©©
मिलिंदा तूला खरं सांगू का? तुझ्या शिवाय आज आम्ही अस्वस्थ आहोत. कधी-कधी एकदा तरी गावा कडे येत जा आज ही माय बाप वाट पाहतात चातका सारखी, भीम जयंतीला तू दिसत नाही म्हणून. घायाळ झाली घरातील माणसं तुझी वाट पाहून “तू जिकडे गेला तिकडचाच झालास ” असे म्हणतात गावातील माणसे …
मिलिंद ज्या नागसेनवनात तू शिकला सवरला तो परिसर बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. याचा आम्हाला खूप खूप अभिमान आणि गर्व आहे. पण आज ही आम्ही घायाळ आहोत रे ऽऽ इथल्या जातीयतेच्या धर्माध व्यवस्थेमुळे म्हणून तूला आम्ही शोधतोय संघर्षाच्या प्रत्येक वळणावर…. म्हणून तू येरे मिलिंदा आमच्यातील गट बाजी थांबविण्यासाठी राजकारण मरण झालं , आज आमचं इथल्या फितूर आणि स्वार्थी माणसामुळे, प्रबोधन करणारी माणसं मारली जातात चौका चौकात , आपली ही माणसं भांडतात आप आपसात , कसं जगावं ?
काय करावं? समजत नाही आता, खैरलांजी, जवरखेडा, सोनई सारखे प्रकार रोजच घडतात इथं, इतकी भयंकर परिस्थिती असतांना.
मिलिंद तू कुठं बसलास दडी मारून की ध्यानस्य बसला बोधीवृक्षा खाली…
मिलिंद तुला कसे सांगू ? किती सांगू आणि काय-काय सांगू? बेरोजगारीचा प्रश्न यमा सारखा वाटतोय, आताशा शिकलेली पोरं बेभान झाली आहेत. वाऱ्यासारखी. तरी ही तू दिसत नाहीस पहिल्या सारखा बाबासाहेबांच्या चळवळीत. म्हणून धास्थी वाटते. कुठे अंधारात जाऊन बसलासरे बाबा, आता तरी ये अंधार झालेल्या वस्तीत उजेडाचे गीत गाणाऱ्या प्रकाशाच्या चळवळीत आता तुझी साथ हवी आहे. देशाला आणि बहुजनाला सावरण्या साठी, मिलिंद तू जिथं असशिल तिथं पत्र ऐकताच गतीमान हो परिवर्तनाच्या परिवर्तनाला गतीमान करण्यासाठी कारण तूझ्या शिवाय पर्याय नाही. मिलिंद तू आपला होतास म्हणून खूप बोललो काही चुकले असेल तर समजून घे तूझ्यातील कार्य आणि कत्तृत्वाला निळा सलाम !
आपला
नागसेन
पत्र संवाद:
प्रा.देवानंद पवार
9158359628