सामाजिक

संघर्ष मानवी मुलभूत हक्कांचा..

. संघर्ष मानवी मुलभूत हक्कांचा..

सन २०२१ मध्ये मंदिरात पाणी पिण्यासाठी गेला म्हणून गाझियाबादमध्ये एका १३ वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ पाहून, माणसामध्ये माणूस आहे हे समजविण्यात धर्म सपशेल अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले हे लक्षात आले. अशा किती तरी घटना नेहमीचं आजूबाजूला सतत घडत असतात पण, त्या समोर येत नाहीत. जिथे जात, धर्म, चमत्कार आणि श्रध्दा निकामी ठरते तिथे माणसातील माणूसकीचं कामी येते हे कोरोनांने जगाला दाखवून दिले असतांना, एक १३ वर्षाचा मुलगा मंदिरात जाऊन पाणी पितो म्हणून त्याला बेदम मारहाण करणारे तुम्ही धर्माचे ठेकेदार आहात का असा मनात प्रश्न निर्माण झाला. अरे, कोरोनापासून बचाव करण्यासाठी गोमुत्र, शेण तुम्हाला चालते पण, माणसासारखा माणूस तुम्हाला का चालत नाही ? तुम्हाला इतर जाती, धर्माच्या लोकांना मारहाण, अन्याय अत्याचार, शोषण करण्याचा कोणी अधिकार दिला आहे की प्रमाणपत्र ? अरे, कोरोनांने तर सर्वांच्याच मर्यादा स्पष्ट केल्या असतांना, जाती धर्माचा एवढा माज का ? अशा रानटी विकृत मानसिकतेमुळेचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना २० मार्च १९२७ रोजी, महाड मुक्कामी अस्पृश्यांना पाणी पिण्याचा हक्क प्रस्थापीत करण्यासाठी चवदार तळ्याचा सत्याग्रह करुन, सामाजिक क्रांती करावी लागली होती. पाण्यासाठी करावा लागलेला जगातील पहिला सत्याग्रह, भारतातील सामाजिक क्रांतीची पहिली पायरी म्हणजे महाड क्रांतीभूमी चवदार तळे सत्याग्रह क्रांती दिन. तुमच्या कपड्यात, राहणीमानात, विचारत बदल झाला पण, ९७ वर्षानंतरही तुमच्या दळभद्री, सडक्या मानसिकतेत बदल, परिवर्तन झालेला दिसून येत नाही ही मानवतेची मोठीचं शोकांतिका आहे. आजही विषमता तसेच वेगवेगळ्या पातळ्यांवर, वेगवेगळ्या प्रकारे अन्याय अत्याचार, शोषण होतच आहे. म्हणूनच, जगापुढे जातीयता उघडी पडल्याचेचं मोठं दुःख वाटतेय.

आधुनिक अखंड भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवी मुलभूत हक्कांसाठी चवदार तळे सत्याग्रह आणि काळाराम मंदिर सत्याग्रह केला होता. महाड चवदार तळे सत्याग्रह हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नव्हता तर तो मानवी मुलभूत हक्कांसाठी संघर्ष होता. बाबासाहेबांनाही जातीयतेचे अनेकदा चटके सहन करावे लागले. पाण्यासारख्या मुलभूत प्रश्नी सुध्दा इथे अमानवी व्यवस्थेविरोधात त्यांना वैचारीक संघर्ष करावा लागला होता. बाबासाहेब अमेरिकेतून उच्च शिक्षण घेऊन आल्यावर देखील बडोदा संस्थानातील कार्यालयात त्यांना पाण्याचा वेगळा माठ असायचा, पनवेलच्या नाक्यावरील हॉटेल मालकांने ते बॅरिस्टर असतांनाही पाणी द्यायला नकार दिला होता. अरे, ज्या धर्मात गायीला भाकर आणि मुंगीला साखर दिली जाते, पण माणसाला पाणी दिले जात नाही. ज्या ठिकाणी कुत्री, मांजरे व अन्य पशू देखील बिनधास्त पाणी पिऊ शकतात अशा ठिकाणी मात्र तुमच्याकडून माणसासारख्या माणसालाच पाणी पिण्यास मज्जाव, उचनिचता केली जात असेल इतर, तुम्हांला माणूस तरी म्हणता येईल का ? म्हणूनचं, बाबासाहेबांनी २० मार्च १९२७ रोजी भारतीय सामाजिक क्रांतीचा पहिला सुरुंग महाड येथील चवदार तळ्याचं पाणी चाखून लावला. पाण्यासारखा धर्म नाही असे तुम्हीचं म्हणतात ना ? मग, पाण्यासाठी मारहाण करणारा हा तुमचा धर्म कोणता ?

महाड चवदार तळे सत्याग्रहाला संबोधीत करतांना बाबासाहेब म्हणतात, “हा केवळ पाणी प्राशन करण्याचा माझा हेतू नाही तर समाजातील सर्वचं माणसे सारखीचं आहेत. अमुक वरच्या जातीचा, तमूक खालच्या जातीचा असा जातीभेद कशाला ? हा संगर केवळ पाण्यासाठी नसून तो मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे. चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने आम्ही अमर होऊ अशातला भाग नाही. आज पावेतो चवदार तळ्याचे पाणी प्यायलो नव्हतो तर तुम्ही आम्ही काही मेले नव्हतो. चवदार तळ्यावर जावयाचे ते केवळ त्या तळ्याचे पाणी पिण्याकरीता जावयाचे नाही. तर इतरांप्रमाणे आम्हीही या समाजातील माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरीताचं त्या तळ्यावर आपणास जावयाचे आहे.” चवदार तळ्याचं पाणी पिऊन बाबासाहेबांना अमर व्हायच नव्हत किंवा काळाराम मंदिर सत्याग्रह करुन त्यांना काळारामाचं भक्तही व्हायचे नव्हते. म्हणून तुम्हाला फक्त एकचं प्रश्न आहे, तुम्ही माणसासारखे कधी वागणार आहात ?

बाबासाहेबांनी चवदार तळ्याचं पाणी प्राशन केल्याने तळे अपवित्र झाले हे रुढीवादी जातीय व्यवस्थेला सहन झाले नाही. त्यांनी हजारों अस्पृश्यांवर लाठ्या काठ्यांनी हल्ला केला, त्यांच्या जेवणात माती मिसळली आणि तळे बाटले म्हणून तळ्यात दही, शेण व गोमुत्र टाकून तळ्याचे शुद्धीकरण करण्यात आले. म्हणजे माणसांनी तळ्याचं पाणी प्राशन केले म्हणून तळे बाटले होते. मात्र, तेचं तळे दही, शेण आणि गोमुत्रांने पवित्र कसे होऊ शकते ? १९२३ च्या एका कायद्यानुसार सार्वजनिक तलाव आणि विहिरी अस्पृश्यांसाठी खुले करायचा महाड नगर परिषदेने १९२६ मध्ये घेतलेल्या निर्णयाला जातीयवादी उच्चवर्णीयांनी कडाडून विरोध केला जातो. अशा दळभद्री, मनुवादी विकृत मानसिकतेला काय म्हणावे ? महाड नगर परिषदेने १९२६ मध्ये जरी सार्वजनिक तलाव आणि विहिरी अस्पृश्यांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला तरी, अस्पृश्यांना मनाईचं होती. म्हणजे, नैसर्गिक साधन संपत्तीवरही तुमचीचं मालकी ? माणसांने पाण्याला स्पर्श केला म्हणून ते अपवित्र झाले, बाटले गेले आणि प्राण्यांचे मुत्र, शेणांपासून ते पवित्र होत असेल तर अशा लोकांमध्ये व रानटी प्राण्यांमध्ये काय फरक असू शकेल ? आजही जाती धर्माच्या नावाखाली माणूस माणसावरचं अन्याय अत्याचार करीत आहेत, शोषण करीत आहेत. त्यामुळे, तुमच्यात सुधारणा होत नाही तोपर्यंत तुमच्या मनुवादी व्यवस्थेविरुध्द मानवी मुलभूत हक्कांचा संघर्ष आजही चालू आहे आणि तो पुढेही निरंतर चालूचं राहणार..

*- मिलिंद कांबळे, चिंचवलकर* *९८९२४८५३४९*

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button