समता आणि समान व्यवहार
समता आणि समान व्यवहार
तथागतांनी भिक्खूसंघासाठी जितके नियम तयार केले होते, त्यांचा त्यांनी स्वखुशीने स्वतःही स्वीकार केला होता व ते स्वतःलाही बंधनकारक मानले होते.
आपण संघाचे प्रमुख आहोत आणि आपल्यावरील असीम प्रेमाने आणि आदराने नियमपालनाबाबत स्वतःस सहज सवलती मिळू शकतील अशी परिस्थिती असतानाही तथागतांनी काही खास सवलती किंवा नियम-विमुक्ति हक्काने उपभोगिल्या नाहीत.
भिक्खू दिवसातून फक्त एकदाच अन्नाशन करतात हा भिक्खुवर्गासाठी केलेला नियम तथागतांनीही स्वीकृत केला आणि त्याचे पालनही केले.
भिक्खूची काही खाजगी मालमत्ता असता कामा नये हा नियमही तथागतांनी स्वीकृत केला आणि त्याचे पालन केले.
भिक्खूपाशी फक्त तीनच चीवरे असली पाहिजेत हा नियमही सर्व भिक्खूंप्रमाने तथागतांनी स्वीकृत केला व त्याचे पालनही केले.
एकदा भगवान बुद्ध शाक्यदेशात कपिलवस्तूमधील वटवाटिकेत राहात होते त्या वेळी तथागतांची मावशी प्रजापती गौतमी स्वतः हाताने कातलेली व जाण व संवेदना*
नवीन वस्त्रजोड़ी घेऊन आली व तिचा स्वीकार करण्याची तिने तथागतांना विनंती केली.
तथागतांनी तिला सांगितले, “प्रजापती, ती संघाला अर्पण कर.”
तिने दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा पुन्हा तशी विनंती केली आणि तिला तेच उत्तर मिळाले.
नंतर आनंदाने आग्रह केला. “भगवान, गौतमीने आणलेल्या वस्त्रांचा आपण स्वीकार करावा. आपल्या मातेच्या निधनानंतर प्रजापती गौतमीनेच दाई आणि दत्तक माता होऊन आपली फार सेवा केली होती.” पण वस्त्रे संघालाच अर्पण करण्यात यावी हा आपला आग्रह तथागतांनी सोडला नाही.
प्रारंभी भिक्खुसंघाचा असा नियम होता की भिक्खूंची वस्त्रे उकिरड्यावर पडलेल्या चिंध्यांतूनच तयार करण्यात यावीत. धनिक लोकांना संघाचे सदस्य होण्यापासून परावृत्त करता येईल म्हणून हा नियम केला होता.
एकदा जीवकाने नव्या कापडाचे तयार केलेले चीवर स्वीकारण्याचा तथागतांना आग्रह केला. तथागतांनी त्या चीवराचा स्वीकार करून त्यांनी मूळ नियमात तसा बदल केला आणि भिक्खूंनाही ती सवलत जाहीर केली.
*बुद्धांना दारिद्र्य नापसंत होते*
एकदा भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये अनाथपिण्डिकाच्या जेतवनारामात राहात होते. त्या वेळी गृहस्थ उपासक अनाथपिण्डिक त्यांच्या दर्शनासाठी आला व तथागतांना अभिवादन करून एकीकडे बसला. नंतर त्याने तथागतांना विचारले की, “मानवाने धनार्जन कां करावे?”
“तू मला विचारतोस म्हणून तुला मी सांगतो.”
“ज्याने मेहनतीने धन मिळवले आहे, ज्याने हातांनी कष्ट करून धन मिळवले आहे, ज्याने घाम गाळून धन मिळवले आहे; तसेच ज्याने न्याय्य मार्गाने धन कमावले आहे अशा धनामुळे तो स्वतः सुखी व आनंदी होतो आणि ते सुख व आनंद तो टिकवू शकतो. तो आपल्या मातापित्यांना सुखी व आनंदी करतो, आणि त्यांना नेहमी तसे आनंदी ठेवतो; त्याप्रमाणेच आपली पत्नी, मुले, दास व कामगार ह्यांनाही आनंदी ठेवतो. धन प्राप्त करण्याचा हा पहिला हेतू आहे.”
“अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर तो आपल्या स्नेह्यासोबत्यांना सुख आणि आनंद देतो. तसेच सुखी आणि आनंदी राखतो (टिकवून ठेवतो). हे दुसरे कारण आहे.”
“अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर अग्नी व पाणी, राजा तसेच चोर, शत्रू आणि वारस ह्यांपासून होणारी हानी तो टाळू शकतो. तो आपली मालमत्ता सुरक्षित ठेवू शकतो. हा तिसरा हेतू.”
“अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर तो पाच प्रकारचे दान अर्पण करू शकतो. स्वतःचे कूळ, अतिथि, पितृ, राजा, व देव (ज्ञानी) असे पाच मार्गाने दातृत्व करू शकतो. हा धन प्राप्त करण्याचा चौथा हेतू.”
“अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर तो गृहपती उच्च हेतूचे, स्वर्गीय सुखाप्रत नेणारे असे दान ‘अहंकार व आळस ह्यांपासून मुक्त असलेल्या, सर्व गोष्टी धीराने व विनम्रतेने सहन करणाऱ्या, स्वतंत्र, शांत व परीपूर्ण होण्याचा यत्न करणाऱ्या सर्व श्रमणांना आणि संतजनांना’ देतो. हा धन प्राप्त करण्याचा पाचवा हेतू.”
अनाथपिण्डिकाला समजले की, तथागतांनी गरिबीचा गौरव करून गरीबांचे सांत्वन केले नाही किंवा मानवाने प्राप्त करावी अशी सुखी जीवनवृत्ती म्हणून गरीबीला श्रेष्ठत्वही दिले नाही.
(संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड-सहा)
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.१७.३.२०२४
मो.९३२६४५०५०६