डॉ. आंबेडकर : ज्योतीवर पेटलेली एकच ज्योत…
*डॉ. आंबेडकर : ज्योतीवर पेटलेली एकच ज्योत…*
ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांच्या जीवनाचा विचार केला तर आपणास दिसून येईल की, हे दोघेही लोकोत्तर पुरुष समकालीन नव्हते; पण जन्म आणि मृत्यूच्या बाबतीत ते अगदी जवळचे होते. फुले यांचा जन्म ११ एप्रिलला तर बाबासाहेबाचा जन्म १४ एप्रिलला… फुले यांचा मृत्यू २८ नोव्हेंबरला तर बाबासाहेबांचा मृत्यू ६ डिसेंबरला… किती योगायोग आहे हा!
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त तीनच गुरु मान्य केलेत. त्यांच्या वैचारिक आणि भावमय जीवनात ते तिघे म्हणजे तथागत गौतम बुद्ध, कबीर आणि ज्योतिबा फुले….
आधुनिक भारतामध्ये ज्योतिबा फुल्यांखेरीज बाबासाहेब आंबेडकरांना दुसरा कोणताही स्फूर्तिदाता द्रष्टा किंवा नेता आढळला नाही. ऐतिहासिक काळातही तर नाहीच नाही, फार काय, मराठी संत कवीच्या दैदिप्यमान श्रुंखलेत कोणीही बाबासाहेबांना स्फूर्ती देऊ शकला नाही. संतमालीकेत त्यांना एकच संत आढळला; तो उत्तरेमधला; न हिंदू न मुसलमान असा संत कबीर ! आणि अखेर बाबासाहेबांनी सर्वार्थाने आपला मानला तो गौतम बुद्ध – अवैदिक, निरीश्वरवादी, अनात्मवादी, मध्यममार्गी, समतावादी… बाबासाहेबांना आधुनिक भारतामध्ये ज्योतिबा फुल्यांखेरीज दुसरे कोणतेही स्फूर्तीस्थान आढळू नये, ही गोष्ट ज्योतिबांच्या अपूर्व महात्मतेचा जसा गौरव करणारी आहे; त्याचप्रमाणे ती बाबासाहेबांच्या एकूण वैचारिक – भावनिक जीवनावर प्रकाश टाकणारी आहे.
अस्पृश्यांसाठी पहिली शाळा काढण्याची कल्पना फक्त ज्योतिबांचे ठायी संभवली. इतिहासात त्याला तोड नाही. जन्मजात चातुर्वर्ण्यांविरुद्ध आणि वर्णव्यवस्थेविरुद्ध सर्वकष युद्ध पुकारणारे फक्त ज्योतिबा फुलेच निघाले; हे पण इतिहासाने बघितले आहे. शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रियांची बाजू घेऊन ब्राह्मणी संस्कृतीच्या विरूद्ध प्राणप्रणाने लढण्याची हाक दिली ती फक्त फुल्यांनीच. या आपल्या सर्वकष बंडखोरीच्या आयुष्यात कधीही-एकदा सुद्धा ज्यांनी तडजोड केली नाही, माघार घेतली नाही, हे करताना कधीही ज्यांना व्यवहार आठवला नाही, असा कृतिशील विचारवंत एकच होऊन गेला आणि तो म्हणजे ज्योतिबा फुले. अशा ज्योतिबा फुल्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्फूर्ती दिली आणि आंबेडकरांनी त्यांचे ऋण सर्वाथाने आणि कृतज्ञतेने मान्य केले. हा बाबासाहेबांचा मोठेपणा कधीही विसरता येणार नाही.
असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्योतिबा फुले यांचे अतूट नाते…
बाबासाहेब आंबेडकरांच्या हाती फुल्यांच्या प्रेरणाचा मूळ अगदी अस्सल गाभा लागला. त्यांच्या तळमळीची आच आंबेडकरांच्या धगधगत्या जीवनकुंडात सतत प्रज्वलित राहिली. फुल्यांच्या ज्योतीवर खऱ्या अर्थाने आंबेडकरांची एकच ज्योत पेटली आणि तिने कोट्यावधी मनातील ज्योती पेटविण्याचे सामर्थ्य दिले.
आधुनिक भारतात फुल्यांखेरीज आंबेडकरांना दुसरा कोणताही स्फुर्तीदाता मिळाला नाही, ही एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. बाबासाहेबांनी ज्योतीबांकडून स्फुर्ती घेतली, आच घेतली पण परिस्थितीनुसार त्यांना त्यांचाच मार्ग शोधून काढावा लागला. ज्योत फुल्यांची पण मार्ग मात्र आंबेडकरांचाच होता. ही वाट त्यांनी खोदून-खणून काढली आणि त्या वाटेने त्यांनी आपल्या अनुयायांना धरून-ओढून, कधी कधी अक्षरशः फरफटत सुद्धा नेले. हे करताना आंबेडकरांना सतत चटके बसत गेले आणि त्यांनी सतत सगळ्यांना चटके दिलेत.
त्यासाठी बाबासाहेबांना खूप कष्ट सोसावे लागले. हे सामर्थ्य मिळविण्यासाठी त्यांना देशातच नव्हे तर विदेशात साता समुद्राच्या पलिकडे जाऊन प्रचंड विद्वता संपादन करावी लागली.
ह्या गुरु-शिष्यांनी महाराष्टातच नव्हे तर संपूर्ण भारतात एक प्रकारचा झंझावात, वादळ निर्माण केले होते. संपूर्ण समाजमन त्यांनी ढवळून काढले होते.
खरं म्हणजे ही आंतरीक वेदना हीच फुल्यांची व बाबासाहेबांची खरीखुरी प्रेरणा होती. ज्या शूद्र आणि अतिशुद्रांशी फुले मनाने, विचाराने अगदी एकरूप झाले होते- त्याच अतिशूद्रांमधून आंबेडकर उदयाला आले. जी व्यथा-वेदना चिंतनाने, सहानुभूतीने, माणुसकीच्या खऱ्याखुऱ्या कळवळ्याने फुल्यांना तीव्रपणे जाणवली होती; तीच व्यथा-वेदना प्रत्यक्ष उरीपोटी घेऊनच डॉक्टर आंबेडकर जन्माला आले होते आणि ती जन्मजात व्यथाच त्यांच्या जीवनाची सर्वकष प्रेरणा ठरली. त्या व्यथेची जीवघेणी टोचणी जशी त्यांना प्रत्येक क्षणी भोगावी लागली, तशीच ती त्यांना त्यांच्या खडतर जीवनमार्गावर सदा प्रेरक मार्गदर्शक शक्तीही ठरली. शिवाय आंबेडकरांना वैयक्तिक कटू अनुभवाचे जहर क्षणोक्षणी पचवावे लागले. आणि ते जहर केवळ वैयक्तिक नव्हते तर हजारो वर्षे कोटी कोटी स्त्री-पुरुषांनी बाळगलेल्या, पचविलेल्या विषयाचा तो कटूतम अर्क होता. आंबेडकरांची व्यथा केवळ एका व्यक्तीची नव्हती; तर ती कोटी कोटी दलित मानवतेची होती. म्हणून त्यांचा त्वेष, द्वेष वैयक्तिक नव्हता तर जन्मजात विषमते विरुद्ध होता. पदोपदी आणि क्षणोक्षणी होणाऱ्या विषमतेच्या विविध विषारी अविष्कारांविरुद्ध होता.
एवढे मोठे बडोद्याचे उदार व पुरोगामी व्यक्तिमत्त्व- सयाजी महाराज गायकवाड, ज्यांनी आंबेडकरांना शिक्षणासाठी मदत केली, मोठी मानाची नोकरी देऊ केली, पण राहायला घर-जागा मात्र ते देऊ शकले नाहीत किंवा कार्यालयातील साध्या पट्टेवाल्यांचा उच्चवर्णीय उर्मटपणा ते सर्व सत्ताधीश असताना सुद्धा मोडून काढू शकले नाहीत. सर चिमणलाल सेटलवाडांसारखा उच्चवर्णीय तथाकथित उदारमतवादी उच्चभ्रू नेता आंबेडकरांच्या सत्काराचे जाहीर झालेली अध्यक्षस्थान ऐनवेळी सभेच्या क्षणी स्वीकारण्याचे टाळतो, कच खातो ही गोष्ट आंबेडकरांनी कशी काय विसरावी?
तथाकथित सुधारक सत्यशोधक किंवा पुरोगामी आणि खरेखुरे चटके खाऊन पोळणारे शूद्र-अतिशूद्र यामध्ये आंबेडकरांनी फरक केला, तर त्यात त्यांचे कुठे चुकले?
डाॅ.आंबेडकरांना अनुभवाने आणखी एक धक्का बसला. स्वतंत्र, स्वाभिमानी, स्वावलंबी आंदोलनात महाडचा किंवा काळाराम-पर्वती मंदिर प्रवेश सत्याग्रहाचा प्रश्न आला, तेव्हा तथाकथित ब्राम्हणेतर सत्यशोधकी पुढाऱ्यांनी कच खाल्ली. खरं म्हणजे जागृतीचे लोण हे शूद्र अतिशूद्रांपर्यंत पोहचत असल्याने सत्यशोधक चळवळीला बळ मिळाले असते.
वास्तविक फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीने एक नवीन उच्चतम पातळी गाठण्याची ऐतिहासिक संधी मिळाली होती, फुल्यांचे नाव सांगणाऱ्यांनी मात्र ती गमावली. जेधे-जवळकरांनी ब्राम्हणेतरांना स्वातंत्र्यलढ्यात सामील करून घेण्याच्या कार्यात बऱ्याच प्रमाणात यश मिळवले; पण सत्यशोधक चळवळीत त्यांना सामावून घेण्याचा कार्यात मात्र ते संपूर्णपणे अयशस्वी ठरले.
वस्तुस्थिती अशी आहे की उघड उघड फुल्यांचे नाव घेऊन, फुल्यांची परंपरा सांगून, फुल्यांचा वारसा घेऊनच आंबेडकर पुढे आले. डाॅ. आंबेडकरांना शिक्षणासाठी बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांनी मदत केली. शाहू महाराजांनी तर त्यांच्या भावी आंदोलनाचे मुक्त मनाने स्वागतच केले. पण आंबेडकरांची चळवळ जेव्हा जणआंदोलनाच्या पातळीवर पोहोचू लागली, तेव्हा त्याला फुल्यांची परंपरा सांगणाऱ्या काही उच्चवर्णीय, उच्चवर्गीय प्रतिष्ठितांकडून त्यांना सहकार्य मिळेनासे झाले. एवढेच नव्हे तर काही पुढाऱ्यांकडून तरी प्रत्यक्ष विरोध सुरू झाला. तुमची दया नको; आम्हाला न्याय पाहिजे; हक्क पाहिजे; हक्क नाकारण्याचा प्रयत्न केला तर तो आम्ही प्रत्यक्ष बजावू, अशा आंदोलनाचा पवित्र जेव्हा आंबेडकरांनी घेतला, तेव्हा अनेक ब्राह्मणेतर पुढारी गडबडून गेले. आंबेडकरांनी राजकारणात प्रारंभ करताच हे विरोध अधिकच स्पष्ट होऊ लागले. ब्राह्मणांची जोशीवतने नष्ट करण्याचा आग्रह धरणारे ब्राह्मणेतर पुढारी, आंबेडकरांनी पाटील व इतर व वतने नष्ट करतो म्हणताच, त्या मागणीला विरोध करायला पुढे सरसावले. जमिनीसंबंधी कोणतेही हक्क अस्पृश्यांनी मागणे म्हणजे तर त्यांच्या दृष्टीने अनर्थच झाला. अशा रीतीने आंबेडकर आणि ब्राह्मणेतर पुढारी यामधील दरी अधिकाधिक रुंदावत गेली. खरं म्हणजे यावेळी सत्यशोधक चळवळीने तरी आंबेडकरांचा भरभक्कम पाठपुरावा करणे आवश्यक होते.
अशा परिस्थितीत आंबेडकरांनी ब्राह्मणेतर चळवळीवर आणि तिच्या काही पुढाऱ्यांवर वेळोवेळी अत्यंत सडेतोड आणि तिखट-कळवट टीका केली होती आणि ती साहजिकच होती. वास्तविक आंबेडकरांनी फुल्यांना गुरु मानले होते. छत्रपती शाहू महाराजांबद्दल त्यांच्या मनात आदरभाव आणि कृतज्ञता होती. आंबेडकरांच्या चळवळीच्या प्रारंभीच्या काळात त्यांचे कौतुक करणारे, त्यांना सर्वोतोपरी उत्तेजन देणारे शाहू महाराजच होते. ब्राह्मणेतर आणि सत्यशोधक चळवळीने चालविलेल्या काही उपक्रमाकडे प्रारंभी तरी आंबेडकर काही आशेने-अपेक्षेने बघत होते.
दिनकरराव जवळकर यांच्या गाजलेल्या ‘देशाचे दुश्मन’ या पुस्तकावर ब्राह्मणी प्रेरणेने जेव्हा खटला झाला, तेव्हा जवळकरांच्या बाजूने वकीलपत्र घेऊन त्यांची निर्दोष सुटका करविणारे कायदेपंडित बॅरीस्टर आंबेडकर होते. पण आंबेडकरांच्या तेजस्वी स्वतंत्र विचारांची आणि त्यांच्या स्वतंत्र चळवळीची झेप जसजशी उंचावू लागली, तसतशी ब्राम्हणेतर पुढाऱ्यांचा त्यांना वेगळा अनुभव येऊ लागला. आंबेडकरांनी जन्मजात विषमतेच्या हिंदू आचारधर्माचे प्रतीक म्हणून ज्यावेळेस जाहीरपणे मनुस्मृती जाळली; तेव्हा ब्राह्मणेतर चळवळीचे एक अग्रगण्य नेते नामदार भास्करराव जाधव यांनी त्याबद्दल जाहीरपणे नापसंती व्यक्त केली. कारण म्हणजे मनुस्मृतीमध्ये वाईटापेक्षा चांगलेच जास्त असल्याचा साक्षात्कार त्यांना झाला. महाडला चवदार तळ्यावर सत्याग्रह करण्याची घोषणा आंबेडकरांनी केली आणि त्या चळवळीसाठी ब्राह्मणेतर पुढाऱ्यांचे सहकार्य मागितले. काही ब्राह्मणेतर पुढाऱ्यांनी सहकार्य देऊ केले; पण एक अट घातली. ती म्हणजे ब्राह्मणांना या चळवळीतून वगळणे. ही अट अर्थातच आंबेडकरांनी तडकाफडकी फेटाळून लावली. बाबासाहेबांचा ब्राह्मणांना विरोध नव्हता तर ब्राह्मण्यग्रस्तांना विरोध होता, हे तर सर्वश्रुतच आहे.
आंबेडकरांनी राजकारणात नंतर अधिकाधिक काँग्रेस विरोधी भूमिका घेतली. खुद्द महात्मा गांधींना आव्हान देण्याचे अपूर्व धाडस त्यांनी दाखवले. १९३२ मध्ये जातीय निवाड्याप्रमाणे अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ बहाल करण्यात आले. या प्रश्नावर तर गांधी विरुद्ध आंबेडकर असा सरळसरळ रोखठोक सामना भारतीय राजकारणात उभा राहिला. गांधींनी प्राणांतिक उपवास सुरू करून आपले प्राण पणाला लावले आणि लोकमताचे प्रचंड दडपण आंबेडकरांसमोर उभे केले. अशा दडपणाखाली नाखुशीने तडजोड झाली. पण स्पृश्य आणि अस्पृश्य, काँग्रेस आणि आंबेडकर यामध्ये दरी अधिकच रूंदावली.
याचा परिणाम असा झाला की आंबेडकरांचे सत्यशोधक चळवळीपासून झालेली फारकत महाराष्ट्र व देशाला फार महागात पडली. सत्यशोधक चळवळीला पुढील दिशा दाखविणारे, फुल्यांच्या मूळ प्रेरणांची आणि चळवळीची जरब त्यामुळे नाहीशी झाली. खरं म्हणजे ज्योतिबा फुले यांची व त्यांच्या मूलभूत प्रेरणांची विशेषतः शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया यांच्याशी इमान राखण्याची नितांत गरज होती. पण नेमकी त्याचवेळी ही फारकत अधिकच घट्ट झाली. परिणामी सत्यशोधक चळवळ म्हणून असणारा सामाजिक समतेचा दबाव समाजातील वेगवेगळ्या थरांपर्यंत पोहोचू शकला नाही. फुल्यांचे अनुयायी म्हणणारे सत्तेवर आले; पण दुसरीकडे फुल्यांच्या शिकवणीला विजनवासात जाण्याची पाळी आली. एकंदरीत फुल्यांचे पुतळे उभारणे, जन्मदिन साजरे करणे सत्ताधाऱ्यांना सोपे झालेत. एका क्रांतिकारकाला देव्हाऱ्यात बसवून त्याची प्रेरणा, शिकवण मात्र बासनात गुंडाळून ठेवण्याचे नेहमीचे तंत्र सत्ताधारी गटाने अत्यंत यशस्वीपणे आणि उजळ माथ्याने अमलात आणले. हीच शोकांतिका भारतीय राजकारणात झाली आहे.
आर.के.जुमळे
दि.१४.४.२०२४