देशाची अर्धी लोकसंख्या राजकारणापासून अलिप्त
देशाची अर्धी लोकसंख्या राजकारणापासून अलिप्त
✍???? प्रेमकुमार बोके
संपूर्ण भारत देश सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दंग झालेला आहे.अशावेळी देशाची अर्धी लोकसंख्या असलेल्या आमच्या महिला भगिनी मात्र या निवडणुकीच्या राजकारणापासून जवळपास अलिप्त आहे.भारताने लोकशाही स्वीकारलेली असल्यामुळे देशात वेगवेगळे राजकीय पक्ष निवडणुका लढत असतात.या वेगवेगळ्या राजकीय पक्षांची वेगवेगळी निवडणूक चिन्हे असतात. प्रत्येक पक्षाचा वेगळा जाहीरनामा असतो.प्रत्येक पक्षाची प्रचार करण्याची पद्धती सुद्धा वेगळी असते. निवडणुका हा लोकशाही मधील महायज्ञ असतो.त्यामध्ये देशातील सगळ्या जनतेने उत्साहाने आणि आवडीने सहभागी होणे गरजेचे असते.परंतु पाच दहा टक्के अपवाद वगळता देशातील बहुतांश महिला राजकारणापासून स्वतःला अलिप्त ठेवतात.आपल्याला निवडणुका आणि राजकारण यांच्याशी काही घेणे देणे नाही, त्याच्याशी आपला काय संबंध आहे अशा प्रकारची भावना देशातील बहुतांश महिलांच्या मनात असते. मतदान करताना सुद्धा स्वतःच्या मेंदूच्या वापर न करता आपल्या घरातील पुरुषाने सांगितलेल्या व्यक्तीला त्या मतदान करतात. स्वतःला सुशिक्षित समजणाऱ्या महिला तर मतदानाच्या दिवशी सहलीवर जातात व मतदान करणे टाळतात.एवढी उदासीनता निवडणुक व राजकीय क्षेत्राच्या बाबतीत महिलांमध्ये दिसून येते.
त्यामुळे राजकीय पक्ष महिलांच्या या राजकीय अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना भावनिक दृष्ट्या ब्लॅकमेल करतात आणि त्यांची मते आपल्या पारड्यात पाडून घेतात. कारण महिलांना राजकीय पक्षाच्या विचारधारेचा, ध्येयधोरणाचा, तत्व प्रणालीचा बारीक अभ्यास नसतो. घरातील माणसाने सांगितल्यानुसार आणि ऐकीव माहितीवर त्या निर्णय घेतात.त्यामुळे अनेकदा चुकीची माणसे निवडून येतात.देशात महिलांची संख्या जवळपास ५० टक्के आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये ही संख्या निर्णायक ठरते आणि या निर्णायक ठरणाऱ्या संख्येने जर अभ्यास आणि विचार करून मतदान केले नाही तर चुकीच्या माणसांना आपले मत जाऊन ते मत वाया तर जातेच परंतु महिलांच्या मतांवर निवडून येणारे लोकप्रतिनिधी उन्मत्त बनवून आपली दादागिरी सुरू करतात.आपण लोकांना सहज मूर्ख बनवू शकतो आणि त्यात महिलांना तर सहज आपल्या दावणीला बांधू शकतो अशी त्यांची भावना होऊन जाते. त्यामुळे महिलांनी राजकारणामध्ये आवड निर्माण करून राजकीय प्रक्रियेत सहभागी होणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या राज्याची, देशाची निवडणूक प्रक्रिया कशी चालते,राजकीय पक्ष निवडणुका कशा लढतात, निवडणुकीचे स्वरूप कसे असते, प्रचार यंत्रणा कशी राबवल्या जाते, भाषणांमधून आपापल्या पक्षाचा प्रचार कोणत्या पद्धतीने केला जातो, लोकप्रतिनिधी लोकांवर आपला प्रभाव कसा निर्माण करतात या सगळ्या गोष्टी देशातील महिलांनी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.परंतु महिला मात्र या सर्व गोष्टींपासून खूप लांब आहे,अनभिज्ञ आहे व त्यांना ही राजकीय प्रक्रिया जाणून घेण्यामध्ये आवड सुद्धा नाही हे दिसून येते.
याचा परिणाम असा होतो की राजकीय पक्ष महिलांना तिकिटे देताना खूप विचार करतात.पन्नास टक्के तिकिटे महिलांना लोकसंख्येनुसार मिळायला पाहिजे असताना दहा-बारा टक्केच महिला राज्याच्या किंवा देशाच्या सभागृहात आपल्याला दिसून येतात.याचे कारण असे आहे की महिला निवडणूक प्रक्रियेत समोर येण्यास हिम्मत करत नाही. राजकारणामध्ये भाग घेत नाही. राजकीय विषय समजून घेण्यास टाळाटाळ करतात ही अतिशय चुकीची बाब आहे.आपल्या देशात ज्या महिलांनी राजकारणामध्ये भाग घेतला आणि ताकदीने राजकारण करत राहिल्या त्या महिला पुरुषांपेक्षा सुद्धा राजकारणात पुढे जाऊन खूप मोठ्या पदावर पोहोचलेल्या आपणास पाहायला मिळतात.इंदिरा गांधी सारख्या महिलेने संपूर्ण देशाचे राजकारण अनेक वर्षपर्यंत आपल्या प्रभावाखाली ठेवलेले आपण पहिले आहे.प्रतिभाताई पाटील आणि द्रौपदी मुर्मू या महिला देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचतात.बऱ्याच महिला मुख्यमंत्रीपदावर सुद्धा विराजमान झालेल्या आहेत. हे सर्व यश त्यांनी राजकारणात दाखवलेल्या आवडीमुळे आणि केलेल्या प्रयत्नामुळे त्यांना मिळाले.चांगल्या पद्धतीचे राजकारण केले तर लोकांमध्ये चांगली प्रतिष्ठा प्राप्त होते. समाजामध्ये मानसन्मान वाढतो.कोणत्याही क्षेत्रापेक्षा या क्षेत्रात सर्वात जास्त प्रसिद्धी सुद्धा प्राप्त होते.
त्यामुळे राजकीय क्षेत्र हे महिलांसाठी एक नाव गाव प्रसिद्दी मिळविण्यासाठी चांगले क्षेत्र आहे असे वाटते.राजकारणामध्ये काही वाईट प्रवृत्ती घुसलेल्या आहे हे मान्य आहे परंतु सर्वच राजकारणी वाईट नसतात हे सुद्धा आपण समजून घेतले पाहिजे. राजकारण स्वच्छ करायचे असेल तर हुशार,बुद्धिमान महिलांनी राजकीय प्रक्रियेमध्ये निदान आवड निर्माण करणे गरजेचे आहे.राजकारणाशी आम्हाला काही घेणे देणे नाही या नकारात्मक भूमिकेत वावरू नये. कारण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्ट राजकीय लोक आणि राजकीय व्यवस्था नियंत्रित करत असते. त्यामुळे राजकारणापासून स्वतःला दूर ठेवणे म्हणजे राजकीय व्यवस्थेमधील लोकांना भ्रष्टाचार आणि वाईट गोष्टी करण्यासाठी कुरण मोकळे सोडणे होय.असे जर होऊ द्यायचे नसेल तर देशातील सर्व महिलांनी हळूहळू का होईना राजकारणात रस घेतला पाहिजे. देशाची राजकीय व्यवस्था समजून घेतली पाहिजे, राजकारणातला अभ्यास वाढवला पाहिजे आणि दररोज आपल्या कुटुंबात,मैत्रिणींमध्ये,सार्वजनिक कार्यक्रमात राजकीय चर्चा केली पाहिजे.आपल्या चर्चेचे, संवादाचे विषय बदलवून आता राजकीय विषयांवर महिलांनी चर्चा केली पाहिजे. त्या माध्यमातून आपल्या ज्ञानात भर पडू शकते. तसेच राजकारणामधील महिलांचा टक्का वाढू शकतो व राजकीय निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांची संख्या वाढू शकते आणि ही संख्या जर वाढली तर महिलांच्या हिताचे निर्णय राज्याच्या आणि देशाच्या सभागृहात घेतल्या जाऊ शकतात व महिलांच्या प्रगतीला मोठा हातभार लागू शकतो. त्यामुळे महिलांनी राजकारणात सक्रिय सहभागी होणे ही गोष्ट महिलांसाठी आणि देशासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे.
प्रेमकुमार बोके
अंजनगाव सुर्जी