प्रकाश नाकारणारे अंधारयात्री
प्रकाश नाकारणारे अंधारयात्री
—————————————
डॉ. मनोहर नाईक,नागपूर
९४२३६१६८२०
ॲड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांची राजकीय भूमिका विद्यमान भारतीय राजकारणात केंद्रवर्ती ठरावी एवढी महत्त्वपूर्ण आहे. ते विचाराने स्पष्ट आणि चारित्र्याने स्वच्छ आहेत. सभोवतीच्या गलिच्छ राजकारणात एवढ्या स्पष्ट आणि स्वच्छ प्रतिमेचे नेतृत्व शोधूनही सापडणार नाही. बाळासाहेबांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचाच नाही तर, विचारांचाही भक्कम वारसा लाभला आहे.आणि तो वारसा ते निर्धारपूर्वक व निष्ठेने जपत आहेत. त्यांची एकूणच राजकीय भूमिका हा वारसा अधिक व्यापक व उन्नत करणारी आहे. स्वतंत्र भारतात कायम सत्ता वंचित राहिलेला, छोट्या छोट्या दुर्बल जातिपातीत विभागलेला बहुजन वर्ग राजकीय सत्तेत भागिदार झाला पाहिजे.त्यालाही त्याच्या सर्वांगीण विकासाच्या योजना आखता आल्या पाहिजेत.हा प्रामाणिक उद्देश घेवून राजकारण करणारा सद्यःस्थितीत हा एकमेव नेता आहे.उपेक्षित,वंचितांना सत्तेत सहभागी करण्यासाठीच ‘वंचित बहुजन आघाडी ’च्या माध्यामातून बाळासाहेबांची धडपड सुरू आहे.
# २०१४ पासून देशात धर्मांध शक्तीने आणि भांडवली व्यवस्थेने धुमाकुळ घातला आहे. शिक्षित, उच्चशिक्षित लोकं देखील धर्माच्या नशेने गुंग झाली आहेत ! दिवसेंदिवस धर्मद्वेष,जातिभेद वाढतो आहे.
समाजस्वास्थ्य बिघडत चालले आहे. कष्टकऱ्यांचे, कामगारांचे शोषण वाढले आहे.अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. उच्चशिक्षित युवकांचे,नोकरीपात्र तरुणांचे तांडे रस्तोरस्ती भटकत आहेत.सर्व तरुणांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे.सर्वसामान्यांचे सर्व बाजूंनी बेसुमार शोषण सुरू आहे. संविधान नाकारून आणि लोकशाही संपवून या देशातील सर्व शोषीत,वंचितांना पुन्हा धर्माच्या कैदखान्यात बंदिस्त करायचे, हे संघ-भाजपाचे अंतिम ध्येय आहे .हे ध्येय गाठण्यासाठी त्यांनी सुरुवातीपासूनच सर्व राज्यातील छोट्यामोठ्या पक्ष-संघटनांशी युती केली आणि सत्ता हस्तगत केली. प्रदीर्घ काळ सत्तेत बसलेल्या काँग्रेसला सत्तेबाहेर केले. पहिल्या पाच वर्षांतच संघ -भाजपाने आपले खरे रूप दाखवणे सुरू केले. संविधानापुढे व लोकशाहीपुढे अनेक आव्हाने उभी केली. अनेकांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आणले. सामाजिक चळवळीतील अनेकांचे जीवन उद्ध्वस्त केले. सी.ए.ए., एन.आर.सी.ने अनेकांना भयग्रस्त केले…
# अशा बिकट परिस्थितीत २०१९ ची लोकसभा निवडणूक जाहीर झाली.संघ-भाजपाने पुन्हा नगण्य पक्ष आणि निरुपयोगी नेत्यांची मोट बांधून सत्ता बळकावली.आणि कायम सत्तास्थानी राहिलेली कॉंग्रेस अहंकाराच्या गर्तेत खोल गाडल्या गेली. संघ-भाजपा जर सत्ताप्राप्तीसाठी छोट्यामोठ्या घटक पक्षांशी व फारसा जनाधार नसलेल्या नेत्यांशी युती करू शकते. तर,काँग्रेस आपला अहंकार गुंडाळून सर्व संविधाननिष्ठ पक्ष-संघटनांना का एकत्र आणू शकत नाही ? इतकी वर्षे सत्तेची फळे चाखणारा पक्ष संविधान रक्षणाकरिता मनाचा मोठेपणा का दाखवित नाही ? आणि सर्व शोषीत,सत्ता वंचित समाजघटकांना सत्तेत सहभागी करून घेवून लोकशाही वाचविण्याचे उत्तरदायीत्व का स्वीकारत नाही ? संविधान वाचविण्याची जबाबदारी तुमची ; आणि सत्ता उपभोगण्याची मक्तेदारी आमची ही सत्तालोलूप भूमिका कॉंग्रेस कधी सोडणार आहे ? काँग्रेसच्या या सत्तांध भूमिकेमुळेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत लोकशाही समर्थक मतदारांचा पराभव झाला आहे. आणि कॉंग्रेस मात्र याला, त्याला भाजपाची ‘बी ’ टीम म्हणून आपला अहंकार गोंजारत बसली आहे. वास्तविक पाहता भाजपाची ‘ बी ’ टीम खऱ्या अर्थाने कोण आहे ? हे तपासून पाहण्याची वेळ आली आहे !
# काँग्रेसच्या राजवटीने शोषित,पीडित,उपेक्षितांना लोकशाही मार्गाने सर्वांगीण विकासाची संधी उपलब्ध करून दिली. स्वतंत्र, स्वाभिमानी व सुरक्षित जगण्याचा मार्ग प्रशस्त केला. हे मान्यच आहे.परंतु काँग्रेसने शोषित,वंचितांना योग्य प्रमाणात सत्तेत सहभागी करून घेतले नाही. त्यांचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व आकारास येवू दिले नाही. त्यांचे नेतृत्व उभे होवू दिले नाही. शोषित,वंचितांच्या राजकीय अस्तित्वाच्या रिकाम्या पोकळीत त्यांनी संघ- भाजपाच्या वाढिला बळ पुरविले. त्यामुळेच संघ-भाजपा बलदंड झाली. आणि आज सत्तेत ठाण मांडून बसली आहे. संघ-भाजपा सुरुवातीपासूनच संविधान विरोधी भूमिका घेत घेत आपली राजकीय शक्ती वाढवित गेली. आणि काँग्रेसच्या हाती अगदी सुरुवातीपासून देशाची सत्तासूत्रे होती. तरीही काँग्रेसने समाजमनात संविधानाविषयीची आस्था व निष्ठा रुजविण्यात कुचराई केली, हे संविधाननिष्ठ प्रत्येक भारतीय नागरिकाला खुल्या मनाने मान्य करावेच लागेल ! काँग्रेस पक्ष या देशातील दलित,शोषित,आदिवासी,भटके विमुक्त,मुस्लिम इत्यादी समाजघटकांना कायम गृहीत धरीत आला आहे. त्यांच्या मतांवर सत्ता उपभोगत आला आहे. या सर्व सत्तावंचित घटकांमध्ये आंबेडकरी समाज हा अनेकार्थाने पृथगात्म आहे. लोकशाही मूल्ये जपणारा आणि डॉ. आंबेडकरांची विचारधारा अंगिकारून मार्गक्रमण करणारा हा समाज आहे. आंबेडकरवाद हा सर्वार्थाने या देशातील प्रखर संविधाननिष्ठ व लोकशाहीवादी विचार आहे. परंतु काँग्रेसने डॉ. आंबेडकरांचा आणि आंबेडकरवादाचा अगदी सुरुवातीपासूनच दुस्वास केला आहे. काँग्रेस पक्ष संघ-भाजपाला नव्हे तर,आंबेडकरवादी विचारसरणीला कायम शत्रू समजत आला आहे. हा विचार समाजमनात रुजू नये. आणि या विचाराचे राजकीय अस्तित्व निर्माण होवू नये.याची या सत्ताभोगी पक्षाने कायम काळजी घेतली. याची अनेक उदाहरणे आपल्याला भूतकाळात आणि वर्तमानात सापडतील !
# भारतात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले.आणि राजकीय क्षितिजावर एकीकडे महायुतीचे तर, दुसरीकडे ‘ इंडिया आघाडी ’ चे ढग जमू लागले. संघ-भाजपा या धर्मांध व संविधानविरोधी शक्तीला पराभूत करण्यासाठी देशभरातील छोट्यामोठ्या पक्षांना ‘ इंडिया आघाडी’ त सहभागी करून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या.अर्थातच ही आघाडी राष्ट्रीय स्तरावर आकार घेवू लागली. यात अनेक दखलपात्र नसणाऱ्या पक्ष व नेत्यांनाही स्थान देण्यात आले. काही संदिग्ध भूमिका असणारे नेतेही यात सहभागी झाले. नुकतेच जन्मास आलेले पक्ष जसे- शिवसेना (उबाठा) , राष्ट्रवादी-शरद पवार (शपग) अशा पक्षांनाही ‘ इंडिया आघाडी’ त प्राधान्याने सामील करून घेण्यात आले. मात्र महाराष्ट्रात नवी शक्ती म्हणून उदयास आलेल्या, लाखोंच्या उत्स्फूर्त सभा घेणाऱ्या, वाढता जनाधार असलेल्या आणि संविधान रक्षणासाठी प्रतिबद्ध असणाऱ्या ‘ वंचित बहुजन आघाडी ’ ला ताटकळत ठेवण्यात आले. संविधान रक्षणाच्या व लोकशाही वाचविण्याच्या या राष्ट्रीय मोहिमेत सामील होण्याची इच्छा ‘ वंचित बहुजन आघाडी ‘ कडून ‘ इंडिया आघाडी ’ ला कळविण्यात आली. इंडिया आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण मिळावे यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यावर ‘ निमंत्रण द्यायला ही काय सत्यनारायणाची पूजा आहे काय ? … ’ (विजय वडेट्टीवार) असे उद्धट व मग्रुरीचे उत्तर काँग्रेस नेत्याकडून देण्यात आले. मध्यंतरी बऱ्याच घडामोडी घडल्या. वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीत समावेश व्हावा. या प्रामाणिक हेतूने काँग्रेस पक्ष नेतृत्वाकडे पत्रव्यवहार करण्यात आला .
पत्रकार परिषदांमधून जाहीर भूमिका मांडून एकत्रित लढण्याचे आवाहन करण्यात आले. तेव्हा कुठे हालचाली सुरू झाल्या. वंचित बहुजन आघाडीला ‘ इंडिया आघाडी ’ त नाही तर, महाराष्ट्राच्या ‘ महाविकास आघाडी ’ त सामील करून घेण्याची तयारी दाखविण्यात आली. पुढील बोलणी करण्याची जबाबदारी काँग्रेसने नाना पटोले आणि अशोक चव्हाण या नेत्यांवर सोपविली. मुळात हे दोन्ही नेते संघी मनोवृत्तीचे असल्यामुळे ‘ मविआ ’ सशक्त होणे यांना न पटणारे आणि न परडणारे होते. भविष्यात महाराष्ट्रातील काँग्रेस भाजपाकरिता आव्हानात्मक ठरू नये, या दूरदृष्टीनेच नाना पटोले यांना भाजपाने
काँग्रेसमध्ये पाठविले असण्याची दाट शक्यता आहे. आणि पटोलेंची काँग्रेसमधील एकूणच भूमिका तपासून बघता ही शंका घ्यायला पुरेसा वाव आहे . कारण नाना पटोलेंनी महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष पद सोडणे हाच महाविकास आघाडी सरकार ( सेना, राकॉ , इंकॉ ) कोसळण्याचा प्रारंभबिंदू आहे , हे आपण याप्रसंगी लक्षात घेणे आवश्यक आहे ! आणि अशोक चव्हाण यांनी तर,भाजपात प्रवेश करून आपली संघशरणता सिद्धच केली आहे ! या दोन काँग्रेसी (?) नेत्यांनी ‘ वंचित बहुजन आघाडी ’ चा मविआ मध्ये समावेश होवू नये यासाठी आपले पूर्ण राजकीय कसब पणाला लावले आहे.
# शरद पवार यांना बऱ्या-वाईट अर्थाने भारतीय राजकारणातील वजनदार नेता समजले जाते. सुरुवातीला त्यांनी ‘ वंचित बहुजन आघाडी ’ संबंधी मौन धारण केले. नंतर ते मौन सोडून अनुकूल बोलायला लागले. तेव्हा महाराष्ट्रातील महाविकास आघाडी खऱ्या अर्थाने मजबूत होईल ; आणि भाजपाला भुईसपाट करेल असे वाटू लागले होते. मुंबईतील पंचतारांकीत हॉटेलमध्ये मविआची बैठक आयोजित करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीला सन्मानपूर्वक बैठकीचे निमंत्रण देण्यात आले. आणि उपस्थित झालेल्या वंचितच्या प्रतिनिधीला बैठकीबाहेर बसवून अपमानित करण्यात आले. इथूनच मविआ विषयी मनात शंकेची पाल चुकचुकायला लागली. पुढे संजय राऊत आणि शरद पवार यांच्याकडून पत्रकार परिषदांमधून वंचितला तीन-चार जागा देता येईल,असे परस्पर वक्तव्य करणे सुरू झाले. परंतु कोणत्या जागा द्यायच्या ? , नेमक्या किती द्यायच्या ?, कशाच्या आधारावर द्यायच्या ? , किमान समान कार्यक्रम कोणता ठरवायचा ?, फाटाफुटीचा इतिहास बघता आपल्यापैकी कुणीही भाजपात जाणार नाही,याची हमी कशी घ्यायची ? याबाबत सगळेच तोंडात गुळणी धरून बसले. आणि परस्पर उमेदवार जाहीर करणे सुरू केले.
# महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. केंद्रात सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र हे महत्त्वाचे राज्य आहे. याचे सर्वच संविधाननिष्ठ पक्षांनी भान ठेवायला हवे होते. वंचित बहुजन आघाडीशी जुळलेले छोटेछोटे समाजघटक बघता वंचित आघाडीला महाविकास आघाडीत सामील करून घेणे फार आवश्यक होते. परस्परांच्या भूमिकांचा आणि क्षमतांचा गांभीरपणे विचार करणे फार गरजेचे होते.वंचित बहुजन आघाडीसह
‘महाविकास आघाडी ’ आकारास आली असती तर, ४० ते ४५ उमेदवार निवडून आणणे सहज शक्य झाले असते. वंचितच्या वाढत्या जनाधाराची ताकद संघ-भाजपालाही माहिती होती. म्हणूनच त्यांनी वंचितला ‘महाविकास आघाडी’ त सामील करून घेवू नये, यासाठी ‘ जाणता राजा ’ हाताशी धरला असण्याची दाट शक्यता आहे .त्यांचे संघ-भाजपाशी घरोब्याचे संबंध बघता, ही शक्यता नाकारता येणेही अशक्य आहे !
# महाराष्ट्र अनेकार्थाने महान आहे. महाराष्ट्राने देशाचे सांस्कृतिक नेतृत्व केलेले आहे. फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र अशी या राज्याची जगभर कीर्ती आहे…परंतु अलीकडचे राजकारण महाराष्ट्राची ही कीर्तिध्वजा पायदळी तुडविणारे आहे. एकूणच देशाच्या राजकारणात कोण कोणत्या पक्षात आहे ? कोण कुणाशी जुळलेला आहे ? कुणाचे हितसंबंध कुणाशी आहेत ? कुणाचा नेमका काय हेतू आहे ? हे सांगणे अवघड झाले आहे. राजकारणातील बहुतेकांनी कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळले आहे. सत्तेसाठी सर्वांनीच तत्त्वाला तिलांजली दिलेली आहे. अशाही स्थितीत तत्त्वाचं राजकारण करणारे जे मोजके नेते आहेत, त्यात ॲड. प्रकाश आंबेडकर हे फार महत्त्वाचं नाव आहे .
# डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजकारणासाठी राजकारण केले. समाजकारणाआड येणाऱ्या राजकारणापासून ते कायम दूर राहिले. राजकारणात मिळालेल्या पदांचा व अधिकारांचा वापर त्यांनी समाजोत्थानासाठी केला. लोकशाही शासन प्रणालीकडून त्यांना फार वेगळ्या अपेक्षा होत्या. भारतातील अमानुष धर्मव्यवस्थेने ज्या छोट्याछोट्या समाजघटकांना मूलभूत अधिकारांपासून कायम वंचित ठेवले होते. ते सर्व जातिपातीत विखुरलेले समाजघटक एकत्र यावेत. या देशाची सत्तासूत्रे त्यांच्या हातात यावी. अशा दूरदर्शी विचारांचा अंतर्भाव त्यांनी भारतीय संविधानात केला. हजारो जातीत विभागलेल्या बहुजनांना त्यांनी एस.सी.,एस.टी., एन.टी., ओ.बी.सी.अशा मोजक्या प्रवर्गात संघटित करून राजकीय सत्तेचा मार्ग दाखविला. परंतु अजूनही बहुजनांना हा सत्तेचा मार्ग गवसत नाही, हे खेदाने नमूद करावे लागते.
# भारताने सांसदीय लोकशाही पद्धती स्वीकारली. भारतातील एकूणच विविधता लक्षात घेऊन बहुपक्ष पद्धती अंगिकारण्यात आली. काँग्रेसच्या एकूणच इतिहासाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना सखोल अभ्यास होता. काँग्रेसचे अंतर्बाह्य रूप त्यांनी जवळून पाहिले होते. अनुभवले होते. तत्कालीन स्थिती आणि मंत्रिपदाची सामाजिक व राष्ट्रीय उपयोगिता लक्षात घेऊन ते काँग्रेसच्या मंत्रिमंडळात सामील झाले होते.देशात विरोधी भूमिकेत वावरणाऱ्या आणि भविष्यात सत्तेत येवू शकणाऱ्या धर्मांध शक्तीचाही त्यांनी अचूक अंदाज घेतला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,हिंदू महासभा अशा स्वरूपाच्या पक्ष-संघटनांचा धोकाही त्यांच्या लक्षात आला होता. सत्ताधारी काँग्रेसपुढे आणि टपून बसलेल्या धर्मशक्तीपुढे भारतीय राजकारणात पर्याय उभा करता यावा. शिक्षण,संपत्ती,प्रतिष्ठा व सत्तेपासून कायम वंचित राहिलेल्या समाजघटकांना सत्तेत सहभागी करता यावे. या व्यापक व दूरदर्शी विचारातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात ‘ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ’ चा विचार मूळ धरू लागला. यासाठी त्यांनी धर्मशक्तीच्या आणि प्रस्थापित राजकीय व्यवस्थेच्या (कॉंग्रेस) बाहेर असणाऱ्या छोट्याछोट्या पक्षांना व पुढाऱ्यांना एकत्रित करण्याकरिता पत्रव्यवहार सुरू केला. या ब्राह्मो-भांडवली व्यवस्थेच्या विरुद्ध व्यापक व सर्वसमावेशक राजकीय पक्ष स्थापन व्हावा, असा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रामाणिक उद्देश होता. परंतु त्यांच्या आकस्मिक महापरिनिर्वाणामुळे ते शक्य झाले नाही.
# डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यापक व सर्वसमावेशक संकल्पनेची संकुचित व सुमार बुद्धीच्या रिपब्लिकन पुढाऱ्यांनी पार वाट लावली.ते रिपब्लिकनचा अर्थच नीट समजून घेवू शकले नाही . त्यांनी बौद्ध समाजापुरताच रिपब्लिकनचा अर्थ सीमित केला. मर्यादीत स्वरूपात का असे ना, परंतु रिपब्लिकन पार्टीने राजकारणात आपले राजकीय अस्तित्व निर्माण केले. हे मर्यादीत अस्तित्व सुद्धा सत्ताधारी काँग्रेसला सहन झाले नाही. काँग्रेसने आपल्या राजकीय मुत्सद्देगिरीचा कुशलतेने वापर करून रिपब्लिकन पक्षाची शकले केली. रिपब्लिकन चळवळ दुबळी केली.आणि संघ-भाजपा व शिवसेनेसारख्या धर्मांध शक्तीच्या वाढीस खतपाणी घातले, हे सत्य कोणताही सूज्ञ व्यक्ती नाकारू शकत नाही. या धर्मांध व संविधानविरोधी शक्तीला कॉंग्रेसच्या सत्ताकाळात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहकार्य मिळाले नसते तर, आज भारतीय लोकशाहीपुढे गंभीर संकट उभे ठाकले नसते. संघ-भाजपाचे लोकशाही गिळंकृत करू पाहणारे संकट हे काही रात्रीतून उभे झालेले नाही. काँग्रेसने सुरुवातीपासूनच संविधाननिष्ठ व लोकशाहीवादी छोट्यामोठ्या पक्ष- संघटनांच्या वाढीस अवकाश मोकळा करून दिला असता तर,भारतीय लोकशाहीची अधिक निकोप वाढ झाली असती. संविधान अधिक प्रभावी आणि लोकशाही अधिक प्रबळ व परिणामकारक ठरली असती. परंतु काँग्रेसमध्ये सुरुवातीपासूनच ठाण मांडून बसलेल्या काही संघी मानसिकतेच्या नेत्यांमुळे ( उदा.पी.व्ही.नरसिंहराव, प्रणव मुखर्जी इ.) कॉंग्रेसची भूमिका संघग्रस्त होत गेली.आज घडीला
काही ठळक मुद्दे सोडले तर, भाजपा आणि काँग्रेस या पक्षांमध्ये फार मूलभूत स्वरूपाचा फरक असल्याचे दिसत नाही . सूक्ष्म दृष्टीने बघितल्यास दोन्ही राष्ट्रीय पक्ष आज ब्राह्मोभांडवली स्वरूपाचे झाले आहेत .
# काँग्रेसने आपल्या राजवटीत संविधानात अनेक आवश्यक, अनावश्यक दुरुस्त्या केल्या. परंतु संविधानाच्या चौकटीत राज्यकारभार केला, हे अगदी खरे आहे. मात्र सत्तेत असताना काँग्रेसने संविधानाचा गौरव केला,सन्मान केला,असे कधीच दिसले नाही.अलीकडे संघ-भाजपाच्या काळात दिल्लीत जंतरमंतरवर संविधानाची होळी करण्यात आली.तेव्हा काँग्रेसने राष्ट्रव्यापी आंदोलन उभे करायला पाहिजे होते.या जनआंदोलनाच्या मुद्यासह रस्त्यावर उतरून आपली संविधाननिष्ठा सिद्ध करायला हवी होती. परंतु ही बाब देखील काँग्रेस करू शकली नाही.आणि २०२४ ची लोकसभा निवडणूक तोंडावर येताच ‘ संविधान बचाव ’ च्या भूमिकेत कॉंग्रेस पुढे आली.त्यातून ‘ इंडिया आघाडी ’ स्थापन झाली. काँग्रेस हा गौरवशाली इतिहास असलेला पक्ष आहे .अनेक वर्षांचा सत्तेचा अनुभव गाठीशी असणारा पक्ष आहे.अजूनही हा पक्ष खेड्यापाडयात अस्तित्व राखून आहे. हे सर्व ठीक आहे . परंतु सद्यस्थितीत काँग्रेस बलशाली राहिलेली नाही, हेही मान्य करावे लागेल ! काँग्रेसने जनाधार गमावलेला आहे. काँग्रेस विरोधी पक्षाचा दर्जा देखील राखू शकला नाही. मागील काही वर्षांत अनेक महत्त्वाचे नेते काँग्रेसला सोडून गेले आहेत. काही राज्यांमध्ये काँग्रेस अस्तित्वहीन झाली आहे . गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्यात काँग्रेसचा केवळ एक खासदार निवडून आला.या सर्व बाबींचा विचार करून काँग्रेसने पुढील रणनीती आखणे आवश्यक होते.संविधानाच्या व लोकशाहीच्या रक्षणासाठी कटिबद्ध असणाऱ्या छोट्यामोठ्या पक्षांना आणि नेत्यांना काँग्रेसने ‘इंडिया आघाडी ’ प्राधान्याने सामावून घ्यायला हवे होते.‘वंचित बहुजन आघाडी’ ला महाराष्ट्रापुरत्या ‘महाविकास आघाडी ’त नाही
तर,इंडिया आघाडीत स्थान देणे काँग्रेसच्या दृष्टीने अधिक फायदेशीर ठरणारे होते.यातून इंडिया आघाडी अधिक मजबूत झाली असती ;आणि प्रचाराकरिता मा.प्रकाश आंबेडकरांचा वापर राष्ट्रीय पातळीवर करता आला असता. खुद्द भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा नातू आमच्या सोबत आहे, हे काँग्रेसला गौरवाने सांगता आले असते. मुख्य म्हणजे काँग्रेसने महात्मा गांधींचा नातू तुषार गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा नातू प्रकाश आंबेडकर आणि जवाहरलाल नेहरू यांचा नातू राहूल गांधी या थोर वारसा लाभलेल्या नव्या पिढीतील नेत्यांना एकत्र आणायला पाहिजे होते.आणि संघ-भाजपाच्या लोकशाही विरोधी धोरणाविरुद्ध रान उठवायला पाहिजे होते. यातून जनसामान्यांपर्यंत वेगळा संदेश गेला असता.जनमत ‘ इंडिया आघाडी’ च्या बाजूने वळविण्यात याचा फार मोठा उपयोग झाला असता .परंतु कॉंग्रेस अजूनही आपल्या गतवैभवी मानसिकतेतून बाहेर पडायला तयार नाही.सत्तेत इतरांना वाटा द्यायला तयार नाही.तुम्ही केवळ मते द्या,आम्ही वाटा देणार नाही. ही भूमिका खरचं ‘संविधान बचाव ’ करणारी आहे का ? याचाही लोकशाहीवादी सूज्ञजनांनी विचार केला पाहिजे !
# केवळ ‘ संविधान बचाव … संविधान बचाव … ’
म्हटल्याने काही होणार नाही.आणि संविधानाविषयी
ज्यांच्या निष्ठा डळमळीत आहेत त्यांनी तरी, बाळासाहेब आंबेडकरांविषयी वेगवेगळ्या शंका उपस्थित करून त्यांना ‘ ए ’ टीम ‘ बी ’ टीम म्हणण्याचा भंपकपणा करण्यात काही अर्थ नाही ! ‘ इंडिया आघाडी ’ मजबूत व्हावी. सर्वांनी एकत्रितपणे निवडणूक लढवावी. ही प्रकाश आंबेडकर यांची सुरुवातीपासूनच प्रामाणिक भूमिका होती. त्यासाठी त्यांनी प्रसारमाध्यमांतून, पत्रकार परिषदांमधून आणि पत्र व्यवहारातून इंडिया आघाडीला वेळोवेळी आपली भूमिका कळवली. इंडिया आघाडीत सामील होण्याची अनेकदा इच्छा व्यक्त केली.राहूल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे ’च्या मुंबई येथील समापन सभेत हजेरी लावली. तिथेही आपले स्पष्ट विचार व्यक्त केले.काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना स्नेहभोजना करिता ‘राजगृह ’ येथे निमंत्रित केले. परंतु ‘इंडिया आघाडी’ कडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. ‘ मविआ ’ ने जाणीवपूर्वक जागावाटपाकरिता विलंब केला. जागावाटपाचे कोणतेही सूत्र ठरविले नाही. कॉंग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस (शपग) आणि शिवसेना ( उबाठा) हे तिघेच शेवटपर्यंत एक एका जागेसाठी आपआपसात भांडत राहिले. हे अख्ख्या महाराष्ट्राने उघडया डोळ्यांनी पाहिले आहे. याचा अर्थ तुम्हीच संघ- भाजपाशी एकजुटीने आणि पूर्ण ताकदीनिशी लढायला तयार नाही,असा आहे.
# हा सगळा जागावाटपाचा घोळ बघता ‘वंचित बहुजन आघाडी ’ सारख्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत पक्षाला अधिक वेळ वाया घालवणे शक्य नव्हते. म्हणून वंचित आघाडीने टप्प्याटप्प्याने लोकसभेचे उमेदवार जाहीर करणे सुरू केले. त्यातही नागपूर , कोल्हापूर ,बारामती इत्यादी ठिकाणी ‘ मविआ ’ ला विनाशर्त समर्थन जाहीर केले. यातून वंचित बहुजन आघाडीची संघ-भाजपाविरुद्ध संघटितपणे लढण्याची प्रामाणिक भूमिका अधिक स्पष्ट होते. काँग्रेसने मात्र अकोला लोकसभा मतदार संघातून ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या विरुद्ध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला समर्पित असलेल्या कुटुंबातील डॉ. अभय पाटील हा उमेदवार उभा केला आहे. आणि तत्त्वशुद्धीच्या बाबतीत काँग्रेस आडवी झाली आहे. संघ-भाजपाविरुद्ध लढण्यास काँग्रेस खरचं प्रामाणिकपणे तयार आहे काय ? याबाबत काँग्रेस संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आणि संघ-भाजपाविरुद्ध प्रामाणिकपणे लढू इच्छिणारा संविधाननिष्ठ मतदार बिचारा ‘ इंडिया आघाडी … इंडिया आघाडी …’ चा जप करीत बसला आहे !
# ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे राजकारण आंबेडकरी समाजापुरते मर्यादित नाही. त्यांनी आपल्या राजकारणाला अधिक व्यापक करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिशानिर्देशित केलेल्या सर्वसमावेशक मार्गावर दमदार पाऊल टाकले आहे . सर्वसामान्य समाजघटकांतील सत्ता वंचितांना सत्तेशी जोडणे हा त्यांच्या राजकारणाचा मुख्य उद्देश आहे. आणि यात ते बऱ्यापैकी यशस्वी होत आहेत. या त्यांच्या यशस्वी वाटचालीमुळेच संघ-भाजपा, काँग्रेस, रा.कॉ, इत्यादी प्रस्थापित पक्ष सावध झाले आहेत. ‘वंचित बहुजन आघाडी’ ला सत्तेत बरोबरीचा भागिदार बनविले तर, ‘ अकोला पॅटर्न ’ विस्तारत जाईल ; आणि हा पक्ष अधिक बलवान होईल… आपला पिढ्यानपिढ्यांचा हक्काचा मतदार हिरावल्या जाईल . आपले राजकीय अस्तित्व धोक्यात येईल. एवढी समज या पक्षनेत्यांकडे आहे.परंतु एवढी समज अजूनपर्यंत आंबेडकरी समाजातील बुद्धिवंतांकडे आलेली नाही,असे दिसते. रिपब्लिकन पार्टीच्या नावावर आंबेडकरी समाजात अनेक सर्कशीचे तंबू उभे राहिले. भूछत्री सारखे अनेक नेते उगवले.राजकीय रंगमंचावर अनेक कसरती झाल्या. चळवळीचे गांभीर्य हरवले. मुळात समाजाने ज्यांना नेते मानले होते, ते नेते नव्हतेच. ते चांगले कार्यकर्ते आणि उत्तम संघटक होते. या स्वयंघोषित नेत्यांच्या भाऊगर्दित नेतृत्वगुण नाही , हे ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या लक्षात आले. ते रिपब्लिकन या नावाच्या मोहात न पडता त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटातटांशी नाते तोडले. आणि राजकीय पटलावर आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. सुईच्या अग्रावर राजकीय पक्षाचे नव्याने अस्तित्व निर्माण करणे सोपे नव्हते. रिपब्लिकन पक्षाच्या वेगवेगळ्या गटांकडून होणारा विरोध .वेगवेगळ्या पद्धतीने सुरू असलेल्या कुरघोड्या.प्रस्थापित पक्षांकडून केली जाणारी कोंडी.अस्तित्व संपविण्यासाठी आखलेले डावपेच. प्रसारमाध्यमांचा असहकार. टिकात्मक सूर. आर्थिक चणचण, पक्ष उभारणीत उद्भवणारे अनेक अडथळे. अशा विविध विरोधांचा व विरोधकांचा सामना करत स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण करणे ही सामान्य बाब नव्हे! परंतु बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्या नेतृत्वगुणाच्या बळावर ही असामान्य बाब साध्य करून दाखवली.आंबेडकरी समाजाला आणि बुद्धिवंतांना व विचारवंतांना राजकीय नेतृत्वाकडून आणखी कोणत्या अपेक्षा आहेत ? पूर्वीच्या स्वयंघोषित नेत्यांनी रिपब्लिकनच्या नावावर केवळ आंबेडकरी समाजापुरते राजकारण केले.बौद्धेतर एकही जातिसमूह ते आपल्या राजकीय पक्षाशी जोडू शकले नाही. बहुजन समाजाच्या नावावर राजकारण करणारी राष्ट्रीय स्तरावरची बसपा सुद्धा महाराष्ट्रात बौद्धांशिवाय इतर कुणाला संघटित करण्यात यशस्वी होवू शकली नाही. हे कुणीही छातीठोकपणे नाकारू शकणार नाही.मात्र बाळासाहेब आंबेडकरांनी ही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे . छोट्या छोट्या वंचित समाजघटकांना पक्षात स्थान दिलं आहे.शक्य तिथे त्यांना निवडून आणलं आहे .त्यांच्या मनात सत्ताप्राप्तीचा विश्वास जागवला आहे. प्रस्थापित पक्षांनी ज्यांची कधी दखल घेतली नाही.अशा वंचित घटकांतील व्यक्तींना त्यांनी उमेदवारी दिली आहे.पक्षाचे नाव ‘वंचित बहुजन आघाडी ’असले तरी, इथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ध्येयातील ‘ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ’आकारास येताना दिसत आहे .
# काल परवापर्यंत सर्व प्रस्थापित पक्ष आपल्याला गृहीत धरून चालत होते . आणि रिपब्लिकन नेतेही याच्या त्याच्या वळचणीला जाऊन उभे राहात होते.आज बाळासाहेबांच्या बेरजेच्या धोरणात्मक रणनितीमुळे प्रस्थापित नेत्यांनी कान टवकारले आहेत.ते ‘वंचित बहुजन आघाडी’ ची दखल घेवू लागले आहेत. परंतु दखलपात्र समजून जागावाटपात
बरोबरीचा दर्जा द्यायला लागलो तर,आपल्या राजकीय वर्चस्वापुढे आव्हान उभे होईल. या भीतीने प्रस्थापित पक्ष ग्रस्त आहेत.मागील निवडणुकीत ७ % टक्के मते मिळविणारा पक्ष ८% टक्क्यांच्या वर जाईल. किंवा लोकसभेत दोन पेक्षा अधिक उमेदवार निवडून आणले तर, निवडणूक आयोगाकडून हा पक्ष मान्यताप्राप्त होईल. या पक्षाला स्वतःचे निवडणूक चिन्ह मिळेल. आंबेडकरवादी राजकारणाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण होईल. त्यामुळे आपल्या वर्चस्ववादी राजकारणाला धोका उत्पन्न होईल. याची त्यांना पूर्ण जाणीव झाली आहे.आतापर्यंत आपण अनेक डावपेच आखून आंबेडकरवादी राजकारणाला भारतीय राजकारणात अवकाश (स्पेस) मिळू दिला नाही.परंतु इथून पुढे जर ,या पक्षाने भारतीय राजकारणात चंचुप्रवेश करून अस्तित्व निर्माण केले तर, भारतीय राजकारणाची दिशा बदलल्याशिवाय राहणार नाही . या संभाव्य धोक्याने प्रस्थापित पक्षांची व नेत्यांची झोप उडाली आहे.आणि त्यांनी ‘ वंचित बहुजन आघाडी ’ च्या वाढत्या शक्तीला थोपविण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर नाकेबंदी सुरू केली आहे.
# संघ-भाजपाच्या विरुद्ध उघड भूमिका घेणारा. मोदी,शहा,भागवताचं नाव घेवून खुलेआम ललकारणारा.यांना जेलमध्ये टाकण्याची निर्भीड भाषा बोलणारा.संघाच्या शस्त्रपूजनाला विरोध करणारा. संघाची नोंदणी आणि ऑडीट झाले पाहिजे,अशी प्रखर भूमिका घेणारा भारतातील एकमेव नेता म्हणजे ॲड. प्रकाश आंबेडकर होय.स्वतःला मुत्सद्दी,मुरब्बी म्हणवणारे नेतेही याबाबतीत प्रकाश आंबेडकरांची बरोबरी करू शकत नाही. ईडी, सीबीआय,आयटी च्या भितीने संघ-भाजपाला शिंगावर घेवू शकत नाही. प्रकाश आंबेडकरांच्या या निष्कलंक, निर्भिक आणि निर्भीड व्यक्तिमत्वामुळे संघ-भाजपा विरुद्धचा मतदार कौल ‘ वंचित बहुजन आघाडी ’च्या बाजूने एकवटेल या भितीने ‘ मविआ ’ तील मुख्य घटक पक्षांची गाळण उडाली आहे. त्यांनी मग निखिल वागळे, श्याम मानव, तुषार गांधी,रावसाहेब कसबे इत्यादी सुप्रसिद्ध नावांचा ‘ वंचित बहुजन आघाडी ’च्या विरुद्ध वापर करणे सुरू केले. या सुप्रतिष्ठित नावांनी मग आपल्या लेखनातून, भाषणांतून,पत्रकार परिषदांतून, मुलाखतींमधून संघ-भाजपा किती वाईट आहे.यांना पराभूत करणे कसे आवश्यक आहे. मविआला निवडून देणे किती गरजेचे आहे.‘वंचित बहुजन आघाडी’ मुळे ‘मविआ ’ चे कसे नुकसान होणार आहे ,वगैरे वगैरे संकीर्तन सुरू केले ! येथे प्रश्न असे उपस्थित होतात की, वंचितांच्या राजकारणा विषयी एवढी नकारात्मकता का ?, वंचितांनी कधी निवडणूक लढूच नये काय ?,सत्तेचा इतकी वर्षे मलिदा खाणारांनी वंचितांना कधी झुकते माप देवूच नये का ? आणि महत्त्वाचे म्हणजे मविआ मधील काही नेत्यांनी ‘मविआ ’ चे सरकार पाडून महाराष्ट्रात संघ-भाजपासह महायुतीचे सरकार स्थापन केले. तेव्हा ‘ मविआ ’ चा कैवार घेणारे हे बुद्धिवंत कुठे गेले होते ? तेव्हा यांनी आपल्या भाषणांतून व लेखनामधून यांच्याविरुध्द का रान उठवले नाही ? आजच कशी काय तुम्हाला ‘मविआ ’ संकटात सापडल्याची अनुभूती झाली ? आणि खरचं ‘मविआ ’संकटात आहे , याची तुम्हाला जाणीव झाली. तर, तुम्ही मविआच्या प्रमुख नेत्यांना भेटून ‘ वंचित आघाडी ’ च्या राजकीय ताकदीची जाणीव त्यांना का करून दिली नाही ? आपले कृतीशील विचारवंतपण का सिद्ध केले नाही ? बुद्धिवंतांनी नेमक्या निवडणुकीच्या तोंडावर घेतलेल्या या भूमिकेमागे फार मोठा ‘ अर्थ ’ दडलेला आहे, हे सूज्ञ जनांनी समजून घ्यावे !
# बुद्धिवंतांच्या,विचारवंतांच्या शब्दांना फार मोल असते. त्यांच्या विचारांना एक दिशा असते. त्यांनी दाखविलेली दिशा समाजहिताची असते. आणि ती असलीच पाहिजे ! परंतु बद्धिवंत, विचारवंत जर कुठल्या मोहाला बळी पडून संभ्रमित झाला. तत्त्वापासून भरकटला तर, समाजाची दिशाभूल होण्याची फार मोठी शक्यता असते. हे समाजहिताच्या दृष्टीने मोठे नुकसानकारक असते.
कारण बुद्धिवंतांनी दाखविलेली दिशा सर्वसामान्यांना अनुकरणीय वाटते.आणि तिथेच समाजाची फसगत होते.अशीच फसगत आज समाजातील अनेकांची झाली आहे. काही लोक ‘मविआ’चे पेड वर्कर असल्यासारखे कामाला लागले आहेत.तिकडे संघ-भाजपाचे अंधभक्त आणि इकडे ‘मविआ ’ च्या घराणेशाहीचा व सरंजामशाहीचा अहंगंड चढलेले गंडभक्त अशी सद्याची स्थिती आहे.आंबेडकरी समाजात या गंडभक्तांच्या जोडीला एक जुनाच,परंतु नव्या दमाने पुढे आलेला भक्तिपंथ आहे. तो म्हणजे बोरकरपंथी हरिजन ! आंबेडकरद्वेष हे बोरकरपंथी हरिजनांचे प्रमुख लक्षण आहे. सूर्य उगवताच आंबेडकर द्वेषाची भूपाळी गाणे आणि पदरात पडेल ते बलुतं गोड मानून घेणे. ही या पंथीयांची पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे .
# कुणाला जाणीव असो की, नसो.परंतु डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे एकूणच बहुजन समाजाचे उद्धारकर्ते आहेत. त्यांच्या समतावादी जीवनदृष्टीमुळे सर्वांना समान अधिकार मिळाले आहेत.शोषित, पीडित,उपेक्षित, वंचितांच्या सर्वांगीण मुक्तीचे नावच आंबेडकर आहे! बाबासाहेब आंबेडकर म्हणजे असंख्य पिढ्या पुरून उरणारी शिदोरी आहे .त्यांनी आपल्या येणाऱ्या पिढ्यांच्या सुखासाठी सर्वस्वाचा त्याग केला आहे.पोटच्या पोरांपेक्षाही समाजावर माया केली आहे. समाजहिताचे रक्षण करण्यासाठी रात्रीचा दिवस केला आहे. समाजाच्या भविष्यातील चिंतेने ते अनेकदा ढसढसा रडले आहेत … डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आणि पर्यायाने त्यांच्या परिवाराचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. याचे तरी भान समाजाने ठेवले पाहिजे. आंबेडकरी समाज हा निष्ठावंत समाज म्हणून ओळखला जातो. निष्ठा हे आपले सर्वश्रेष्ठ भांडवल आहे.आपण या निष्ठेचे अमूल्य भांडवल जर प्रस्थापितांकडे गहाण टाकायला लागलो. तर, आपल्या इतके कंगाल भविष्यात कुणीही असणार नाही. हे लक्षात घेण्याची ही निर्णायक वेळ आहे.
# डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे सूर्यापेक्षाही तेजस्वी नाव आहे ! असे महातेजस्वी नेतृत्व लाभलेला हा आंबेडकरी समाज आहे. नंतरच्या काळात नेते म्हणून अनेक काजवे आले. आणि स्वार्थाच्या काळोखात गडप झालेत ! आता सभोवतीचा काळोख अधिक गडद होवू लागला आहे. धर्मांध श्वापदांनी लोकशाहीचे रान चौफेर घेरले आहे. धनदांडगे आणि धर्मलांडगे संविधानावर तुटून पडले आहेत. किर्र … काळोखातून धोक्याचे आवाज ऐकू येत आहेत. यापेक्षाही भयावह काळोख आपल्या पूर्वजांनी अनुभवला आहे. या कीर्र… काळोखाच्या खाईतून आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बाहेर काढले आहे. आंबेडकर हे नाव काळोखाशी लढायला बळ देणारं आहे. विश्वासपात्र आहे !
आज आपल्यासोबत महासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाहीत. परंतु या महासूर्याचा प्रकाश ( मा.ॲड. प्रकाश आंबेडकर)आपल्या सोबत आहे.आपल्या सहस्र हातांनी हा प्रकाश अधिक बलशाली आणि तेजोमय करण्याची गरज आहे. या प्रकाशाच्या सोबतीने आपण पुढे गेलो तर, सभोवतीचा अंधार उजळवून टाकणारे आपण प्रकाशयोध्दे होवू .आणि हा प्रकाश आपण अव्हेरणार असू ,नाकारणार असू तर, आपण प्रकाश टाळणारे अंधारयात्री होवू !
काय व्हायचे ते आपण विचारपूर्वक ठरवायला हवे … !
————————————————–