सामाजिक

मन मनाचे आजार : भुताने झपाटणे, देवीचे अंगात येणे

मन मनाचे आजार : भुताने झपाटणे, देवीचे अंगात येणे

मनाबाबत फ्रॉईड यांचे मत

विविध मानसिक प्रक्रिया समजून घेण्यासाठी मनाच्या रचनेविषयी आधुनिकमानसशास्त्राचा जनक म्हणून ज्यांना मानले जाते त्या डॉ. सिग्मंड फ्राईड यांनी दोन विचार मांडले.

१ प्रत्येक व्यक्तीच्या मनाच्या खोल तळात मूळ नैसर्गिक प्रेरणा जशाच्या तशा – ‘आदि’ (Primitive) अवस्थेत असतात. त्यांना बेसिक इंस्टिक्ट असे म्हणतात. त्यांमधून ‘इद’ (ID) नावाचा मनाचा गाभा बनलेला असतो. भूक, लैंगिक भावना, आक्रमण, स्वसंरक्षण या त्या आदिप्रेरणा आहेत. माणूस हा समाजात राहणारा सुसंस्कृत प्राणी आहे. त्यामुळे या आदिप्रेरणा – भूक, लैंगिक भावना, आक्रमकता जशाच्या तशा स्वरूपात प्राणिमात्रासारख्या त्याला स्वीकारता येणे अशक्य असते, परंतु या प्रेरणांचा दबाव त्याच्या मनात मोठ्या प्रमाणावर असतो; कारण त्या नैसर्गिक प्रेरणा असतात.

व्यक्ती कुटुंबात वावरते. लहानाची मोठी होत असताना आजूबाजूच्या वातावरणातून माणसाने कसे वागावे आणि वागू नये यांविषयीचे काही नीति- नियम ती व्यक्ती स्वतःसाठी अंगीकृत करते. हे नियम त्याच्या वर्तणुकीचा / व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा भाग बनतात. असा जो माणसाच्या मनाचा भाग असतो, त्याला सुपर इगो (super ego) असे म्हटले जाते. म्हणजेच ‘इद’ आणि ‘सुपर इगो’ हे सर्वसाधारणपणे भिन्नच नव्हे तर विरोधी दिशांना वाहणारे प्रभावी प्रवाह आहेत. स्वाभाविकच यामुळे व्यक्तिमत्त्वाची ओढाताण होते. परंतु असा सततचा संघर्ष हा परवडणारा नसतो. यामुळे या दोन प्रवृत्तींचे जास्तीत जास्त समाधान होईल; त्या कमीत कमी दुखावल्या जातील असा तोडगा काढण्याची जबाबदारी, समन्वयाची जबाबदारी मनाच्या एका भागाला करावीच लागते. हा समन्वय साधता साधताच हा मधला भाग ज्याला इगो (ego) म्हणतात तो विकसित होऊ लागतो. हा इगो, इद आणि सुपर इगो या दोघांना कमीत कमी दुखावून जास्तीत जास्त समाधान देण्यासाठी अनेक खेळी करतो. त्या सकारात्मक असू शकतात किंवा नकारात्मकही असू शकतात. या संरक्षक खेळीच्या गोळा बेरजेतून व्यक्तिमत्त्व बनवण्याची महत्त्वाची प्रक्रिया घडते.

२) आपल्या मनात काय काय घडत असते ते सगळे आपल्याला सतत जाणवत नसते. आपल्या मनातील ज्या घडामोडींची जाणीव आपल्याला असते, त्या मनाच्या भागाला जागृत मन असे म्हणतात. जागृत मनातील विचार, आठवणी, भावना यांची आपल्याला सहजगत्या जाणीव असते. परंतु मनाचा आणखी खोलवर एक भाग असतो. मनातील या भागातील घडामोडीचा आपल्याला थांगपत्ताही नसतो. या थराला अजागृत मन (unconscious mind) असे म्हणतात. या अजागृत मनात खूप आठवणी, तीव्र भावनांचा कल्लोळ साचलेला असतो. हिमनगाचे रूपक घेतले तर ही बाब अधिक नेमकेपणाने समजेल. हिमनगाचा एक अष्टमांश भाग पाण्याच्यावर असतो व सात अष्टमांश भाग पाण्याच्या खाली असतो. त्याचप्रमाणे बाह्य मन, प्रगट मन, व्यक्त जाणीव ही त्या हिमनगाच्यावरील एक अष्टमांश भागासारखी असते आणि अप्रगट, अजागृत अंतर्मन हे हिमनगाच्या सात अष्टमांश भागासारखे असते. अर्थात हे रूपक आहे. प्रत्यक्षात मेंदूच्या रचनेमध्ये अशा स्वरूपाचे दोन विभाग दिसत नाहीत. परंतु व्यवहारात त्याचा पडताळा येतो. जसे, आपल्याला रस्त्यावरून चाललेली एक व्यक्ती दिसते. त्या व्यक्तीला गेल्या २० वर्षांत पाहिलेले नसते, त्याचा फोटो पाहिलेला नसतो, त्याचा आवाजही ऐकलेला नसतो, त्याचे पत्रही आपल्याला आलेले नसते. परंतु समोरची व्यक्ती पाहणाऱ्याला तो आपला शाळेतील बालमित्र आहे हे आठवते. आता गेल्या २० वर्षांत कसलाच संपर्क नसलेल्या या मित्राची वा मैत्रिणीची आठवण झाली, याचा अर्थ ती आठवण त्या व्यक्तीच्या अंतर्मनात सुरक्षित होती. जागृत मनाला, समोर संबंधित व्यक्ती दिसताच अंतर्मनाच्या गोदामातील ती आठवण अचूकपणे काढून त्याची जाणीव त्याने व्यक्तीला करून दिली. याचा अर्थ असाही होतो की, अंतर्मनाचे गोदाम नीटपणे लावलेले आहे. त्याबरोबरच त्या गोदामाचा रखवालदार म्हणजेच बाह्य अथवा जागृत मन कार्यक्षम आहे. या गोदामात काय साठवलेले नसते ? आपण जन्माला आल्यापासून या क्षणापर्यंतच्या अनेक भावभावना, यश-अपयश, सुख-दुःख, आशा-निराशा हे सगळे मनाच्या गोदामरूपी अंतर्मनात साठलेले असते अथवा साठवलेले असते. इच्छा होती तसे शिक्षण मिळत नाही, नोकरी लाभत नाही. जीवनसाथी भेटत नाही. नोकरीच्या ठिकाणी सतत वाद चालू असतात. या सर्व गोष्टी अनेकदा कोणालाही न सांगता फक्त सहन कराव्या लागतात. त्यामुळे अंतर्मनाच्या गोदामात बंदिस्त कराव्या लागतात. हीच उपमा पुढे चालवायची तर असे म्हणता येईल की, कोणत्याही गोदामात असलेला माल तोपर्यंतच नीट राहतो, जोपर्यंत तो संख्येने, आकाराने गोदामाच्या क्षमतेपेक्षा जास्त ठरत नाही; किंवा असेही म्हणता येईल की, माल स्फोटक असेल तर क्षुल्लक कारणानेही त्याचा स्फोट होऊ शकतो.

अंतर्मनाचे हे गोदाम अनेकविध ताणतणावांमुळे प्रमाणाबाहेर भरत जाणे ही बाब भारतीय समाजात महिला वर्गाबद्दल खूप जास्त प्रमाणात घडते. घरात मोठे भांडण होणे, कुणाचा तरी मृत्यू होणे, इस्टेट अचानक जाणे, जीवघेणा अपघात होणे यामुळे मनावर प्रचंड ताण येतो. स्त्रियांना घरात व समाजात दुय्यमत्व दिलेले असते. मुळातच मानसिक कोंडमारा असतो. त्यामध्येच अनेकविध आघात लागोपाठ आले
तर ते सोसण्याची ताकद, क्षमता अंतर्मनात राहत नाही. ज्या व्यक्ती दुसऱ्यांच्या कलाने वागणाऱ्या असतात; स्वतःचे निर्णय ज्यांना स्वतः घेता येत नाहीत; दुसऱ्यांनी दिलेल्या सूचना ज्या व्यक्ती पटकन स्वीकारतात, अशा व्यक्तींच्या मनावर झालेल्या आघातांतून आंतरिक मनाचे गोदाम व्यथावेदनेने लवकर भरते. काही उपाय करून अंतर्मनातील ताणाचा निचरा करणे ही गरज बनते. काही वेळा मात्र असेही घडते की, कोणतेही बाह्य तणावाचे कारण नसतानाही व्यक्ती झपाटल्यासारखी वागू लागते. म्हणजेच तिचे बाह्य मन व अंतर्मन यांतील सुसंवादित्व संपुष्टात येते. असे घडलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात. आवाज बदलतो. डोळे मिटून ती गिरक्या घ्यावयास लागते. हातात हात गुंफून घुमायला लागते. ‘उदे ग अंबाबाई’ असे ओरडायला लागते. काही काळापुरती ती जणू दुसरी व्यक्तीच बनते. तिला स्वतःच्या कपड्यांची शुद्ध राहत नाही. आजूबाजूच्या वास्तवाचे भान उरत नाही. हे असे का घडते याची कल्पना बहुतेकांना नसते. व्यक्तीमध्ये देवीचा संचार होतो अथवा तिला भुताने झपाटले व त्यामुळे ती असे विक्षिप्त वर्तन करते, या पारंपरिक विचारांचा पगडा असल्याने अशा वर्तनाला भुताचे झपाटणे वा देवीचे अंगात येणे मानले जाते.

(*डाॅ.नरेंद्र दाभोळकर* लिखित व राजहंस प्रकाशन प्रकाशित *तिमिरातूनी तेजाकडे* या पुस्तकातील *मन मनाचे आजारः भूताने झपाटणे,देवीचे अंगात येणे* या प्रकरणातून साभार.टायपिंग सहकार्य – रमेश माने ८२७५९२४१७२)

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button