शरद पवार कुणाला कळत नाहीत ना त्यांना कोणी ओळखू शकले.. बाळासाहेब ठाकरेनी त्याचे वर्णन असे केले..

महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणातील बराच भूगोल आणि कालखंड व्यापून राहिलेल्या शरद पवार यांचे एक श्रेष्ठ वैशिष्ट्य म्हणजे ते कुणाला कळत नाहीत किंवा आम्ही त्यांना पूर्णपणे ओळखले, असा दावा कोणी करू शकत नाही. खरे तर, यालाही नेतृत्वाचा एक चांगला गुण म्हटला जातो. जे आपल्याला कळतच नाही, ते भारीच असते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एकदा त्यांचे वर्णन करण्याचा प्रयत्न करून पाहिला होता. तेल लावलेले पैलवान असे त्यांनी वर्णन केले होते. हे वर्णन थोडेफार जवळपास जाणारे होते. पण थोडाफार अन्यायही करणारे होते. राजकारणात अशा गोष्टींकडे न्याय-अन्याय पद्धतीने कोणी पाहत नाही. खिलाडू वृत्तीने पाहिले जाते. तेल लावलेल्या पैलवानाला कोणी कोणताही डाव करून किंवा कोणत्याही गुरूचे नाव घेऊन चितपट करता येत नाही. सामना कदाचित बरोबरीने होऊ शकतो. पण असा पैलवान कधी हरू शकत नाही. अनेक खेळांचे नेतृत्व केलेल्या पवार साहेबांना असे कोणी चितपट करू शकत नाही. कारण सगळ्या खेळांचे म्हणजे अगदी खो-खोपासून, कबड्डीपासून, कुस्तीपासून ते क्रिकेटपर्यंत सर्व खेळांतील डावपेचांबाबत ते स्वयंभू महागुरू आहेत. म्हणजे त्यांनी कोणाला गुरू करून घेतले नव्हते. स्वतःच गुरू असलेल्या या वस्तादाला शिष्य मात्र मोजता येणार नाहीत इतके आहेत. अर्थात, शिष्यांनी आपले शिष्यत्व जाहीर केले आहे. वस्तादाला ते मान्य आहेत की नाही, हा भाग वेगळा. भक्त, कार्यकर्ता, शिष्य, एकनिष्ठ, श्रद्धावान असे वेगवेगळ्या श्रेणीत कार्यकर्त्यांची विभागणी होत असते. शरद पवार स्वतःच्या शक्तीवर राजकारण करतात. एखादा पक्ष सोडताना, नवा काढताना, पुनर्प्रवेश करताना, डावपेच आखतानाही ते स्वतःची शक्ती आणि चातुर्य वापरतात. बहुतेक वेळा यशस्वी होतात. पाच-सात दशके भारतीय राजकारणात टिकूनही राहतात. अनेकांनी त्यांना महागुरूच्या रुपात बघितलेले असते. अनकजण त्याचा गंडा बांधून डोंगर नसेना का; पण टेकड्या तरी झालेले असतात. कोणी म्हणतील पवार साहेब म्हणजे भारतीय राजकारणातला एक चमत्कार. काही नसताना, वस्त्रानिशी मातृपक्ष सोडून स्वतःचा बलवान पक्ष तयार करण्यात आणि समविचारी पक्षांशी आणि विषम विचारी पक्षाशीही जोडून घेण्यात त्यांना अनेकदा यश आलं आहे. पुलोदमध्येही त्यांनी कोणाबरोबर मैत्री केली. काँग्रेस एस आणि एनसीपी निर्माण करून कोणाशी मैत्री केली, याचा इतिहास ताजा आहे. डावे असोत, आंबेडकरी असोत, जनसंघ असो, काँग्रेस असो, शेतकरी संघटना असो; शरद पवार हे सर्व लीलया कसे घडवतात यालाच चमत्कार मानला जातो.
संदर्भ-द पीपल्स पोस्ट