राजकीय

उज्वल निकम सर, आपण निवडलेला मार्ग चुकीचा !

उज्वल निकम सर, आपण निवडलेला मार्ग चुकीचा !

✍???? प्रेमकुमार बोके

मा. निकम सर,
भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन.आतापर्यंत काळा कोट घालून न्यायालयामध्ये वकिली करणारे एक हुशार वकील म्हणून आपण जनतेला ज्ञात होता.अनेक मोठमोठ्या केसेस लढविल्यामुळे आपली लोकप्रियता शिखरावर होती.कोणीही आपल्या विरोधात बोलण्यास धजावत नव्हते.परंतु आता मात्र आपण राजकारणात प्रवेश केल्यामुळे आपल्याविषयी कधीही बाहेर न आलेले अनेक किस्से जाहीरपणे बाहेर यायला लागले आहेत.आपल्या वकील मित्रांनी समाजातील आपल्या तथाकथित प्रतिष्ठेला धक्का पोहोचू नये म्हणून या गोष्टी कधी उघड केल्या नव्हत्या.परंतु देश धोक्यात असताना,देशात अदृश्य स्वरूपाची हुकूमशाही लागू झालेली असताना,ज्या क्षेत्रात आपण आतापर्यंत काम केले आहे त्या क्षेत्रातील वकील आणि न्यायाधीशांनाही जीवघेण्या धमक्या मिळत असताना व सोशल मीडियावर त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे विकृतपणे ट्रोलिंग सुरू असताना आपण मात्र ही सगळी निषिद्ध कृत्ये करणाऱ्या लोकांच्या बाजूने निवडणूक लढवित आहात याचा आम्हास खेद वाटतो.आपल्या या कृत्यामुळे इतक्या वर्षापासून जनतेच्या मनात असलेला आपल्याविषयीचा आदर व सन्मान एका क्षणात आपण गमावलेला आहे.

सर,भारतीय संविधानाने प्रत्येकाला आपला राजकीय पक्ष आणि विचारधारा निवडण्याचे स्वातंत्र्य दिले असल्यामुळे आपणासही ते स्वातंत्र्य आहेच.परंतु जी विचारधारा या देशात सातत्याने विषमता,धर्मांधता, जातीयता,स्त्री-पुरुष असमानता, संविधान विरोध निर्माण करण्यासाठी लोकांना सतत पेटवत राहते; त्या विचारधारेच्या बाजूने आपल्यासारख्या माणसाने निवडणूक लढविणे हे सर्वसामान्य माणसांना अजिबातही आवडलेले नाही.जे लोक आजपर्यंत आपल्या विरोधात एक शब्दही बोलत नव्हते,आज तेच लोक उघडपणे आपल्या विरोधात बोलायला लागले आहे.याचाच अर्थ आपण निवडलेला मार्ग चुकीचा आहे असे आपल्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य लोकांना वाटत आहे.एकीकडे या देशातील हजारो वकील, निवृत्त न्यायाधीश,पत्रकार,साहित्यिक, विचारवंत,प्रबोधनकार,व्याख्याते, कीर्तनकार या देशाचे संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा विरोध पत्करून रात्रंदिवस जीवाचा आटापिटा करीत असताना, आपण मात्र या देशप्रेमी लोकांच्या प्रामाणिक प्रयत्नांकडे दुर्लक्ष करून संविधान विरोधी लोकांच्या सोबत हातमिळवणी करणे हे अतिशय दुर्दैवी आणि आतापर्यंत आपल्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या लोकांच्या हृदयाला यातना देणारे आहे.

निकम सर, सरकारच्या वतीने आतंकवादी कसाबची केस लढवत असताना तुरुंगामध्ये कसाबच्या बिर्याणी खाण्याची खोटी कहाणी रचून आपण त्या वेळच्या काँग्रेस,राष्ट्रवादी सरकारच्या नेत्यांना जनतेच्या नजरेत पाडले होते.परंतु नंतर आपण स्वतःच कसाबने अशी कोणतीही मागणी केली नव्हती हे एका मुलाखतीत सांगितले.परंतु तोपर्यंत ज्यांचा काहीही गुन्हा नव्हता, त्या राजकीय नेत्यांची व्हायची ती बदनामी होऊन गेली होती.परंतु त्याबद्दल आपण कधी खेद व्यक्त केला नाही.टीव्हीवर आपल्याला पाहताना अनेकदा आपल्या बोलण्यातून अहंकार जाणवत होता.आपल्यामध्ये प्रसिद्धी लोलुपता खूप आहे हे सुद्धा दिसत होते.परंतु आपल्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचू नये म्हणून कोणी कधीही आपल्या विरोधात मत व्यक्त केले नाही.आज मात्र काळ्या कोटातील तुमचे सहकारीच तुमचे काळे कारनामे जगासमोर आणू लागले आहेत.त्यामुळे आपल्या तथाकथित प्रामाणिक चेहऱ्यामगील खरे रूप उघड झाले आहे.देशातील कित्येक संवेदनशील लोक मणिपूरची दुर्दैवी घटना,ऑलिंपिक महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण,पत्रकारांच्या,समाजसेवकांच्या, न्यायाधीशांच्या हत्या, सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून निरपराध लोकांना तुरुंगात डांबून ठेवणे यासारख्या वाईट घटनांबद्दल जाहीरपणे सरकार विरोधात आवाज उठवत असताना आपण मात्र चुपचाप का बसले होते याचा उलगडा आज देशातील जनतेला झालेला आहे. आपली ही चुप्पी या सगळ्या नालायकीला अप्रत्यक्षपणे समर्थन देणारी होती हे आता जनतेच्या लक्षात आले आहे.

सर, जे लोक जाहीरपणे संविधान बदलण्याच्या गोष्टी करत आहे,जे लोक या देशाच्या राष्ट्रपतीचा अपमान करायलाही मागेपुढे पाहत नाही,जे लोक महात्मा गांधींच्या मारेकऱ्यांचे खुलेआम गोडवे गातात, आतंकवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या हेमंत करकरे यांच्या विषयी जे लोक विकृतपणे बोलतात,पंडित नेहरूंच्या संपूर्ण कुटुंबाविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन जे लोक घाणेरडी टीकाटिपणी करतात, देशाच्या राजधानीत जे लोक जाहीरपणे संविधान जाळतात,जे लोक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी त्यांच्या मार्गात लोखंडी खिळ्यांचे आवरण उभे करतात ; त्या लोकांच्या कळपात आपण सामील होणे याचा अर्थ आपण सुद्धा या सर्व संतापजनक गोष्टींचे छुपे पाठीराखे आहात असे आमचे स्पष्ट मत आहे.त्यामुळे आतापर्यंत आपल्याविषयी असलेला आदर पूर्णपणे गळून पडला असून आपण धारण केलेला प्रतिष्ठेचा मुखवटा आज टराटरा फाटलेला आहे.आपल्या वकीली क्षेत्रातील बुद्धिमत्तेबद्दल आपला सन्मान करताना,दुसऱ्या बाजूने मात्र या बुद्धिमत्तेचा वापर आपण संविधान विरोधी,लोकशाही विरोधी लोकांसोबत काम करण्यासाठी जर करत असाल तर आपल्या या बुद्धिमत्तेपेक्षा आम्ही सर्वसामान्य माणसाला जास्त बुद्धिमान समजतो. देशात सर्वत्र अराजकतेचे आणि हुकूमशाहीचे वातावरण निर्माण झालेले असताना, अशावेळी आपल्यासारख्या प्रसिद्ध व्यक्तीकडून या विरोधात आवाज उठविणे अपेक्षित होते.परंतु आपण मात्र उलट भूमिका घेऊन चुकीचा मार्ग निवडला आहे.आतापर्यंत आपण टीव्हीवर एकटे बोलत होता आणि आम्ही ऐकत होतो.आता मात्र आपला सामना डायरेक्ट जनतेशी होणार आहे. त्यामुळे जनतेच्या न्यायालयात प्रश्नांची उत्तरे देताना आपली तारांबळ उडणार आहे हे मात्र नक्की.कारण भारतातील जनता एखाद्याला याप्रमाणे डोक्यावर घेऊन नाचते, त्याचप्रमाणे त्याला खाली उतरवून त्याची जागा कशी दाखवायची हे सुद्धा भारतीय जनतेला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. त्यामुळे सर, आपला मार्ग चुकला आहे एवढे मात्र नक्की !

प्रेमकुमार बोके
अंजनगाव सुर्जी

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button