खरीप पूर्व हंगामासाठी प्रशासन सज्ज ; आवश्यक प्रमाणात बियाणे,खते उपलब्ध -जिल्हाधिकारी अभिजात राऊत
भरारी पथक बोगस बियाण्यांवर ठेवणार निगराणी
पुढचा दीड महिना जलसंधारणाच्या कामांची मोहीम राबवा : जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
· खरीप पूर्व हंगामासाठी प्रशासन सज्ज ; आवश्यक प्रमाणात बियाणे,खते उपलब्ध
· यावर्षीही भरारी पथक बोगस बियाण्यांवर ठेवणार निगराणी
· बियाण्यांची सर्व माहिती देणारे पत्रक दर्शनी लावण्याचे निर्देश
नांदेड दि. 2 मे :- नांदेड जिल्ह्यामध्ये यावर्षी मान्सूनची सुरुवात दहा दिवस उशिरा होण्याची शक्यता आहे.खरीप पूर्व हंगामासाठी प्रशासन सज्ज झाले असून आवश्यक प्रमाणात खते बियाण्यांची उपलब्धता करण्यात येत आहे. तथापि, पुढील दीड महिना जलसंधारणाची कामे राबविण्यात यावी. यावर्षी मोठ्या प्रमाणात जलसाठे निर्माण होतील,यासाठी नियोजन करण्याचे, निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भावनांमध्ये आज खरीप हंगाम 2024 पूर्व तयारी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा अधीषक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, कृषी विकास अधिकारी विजय बेतिवार, यांच्यासह कृषी, जलसंधारण,पणन, खते, बियाणे, कृषी आधारित व पूरक उद्योग, पशुसंवर्धन, मत्स, दुग्ध व्यवसाय, रेशीम व अन्य विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
आजच्या बैठकीमध्ये खरीप हंगामा संदर्भात जिल्हा प्रशासनाच्या तयारीचा आढावा सादर करण्यात आला.आचारसंहितेमुळे या बैठकीला लोकप्रतिनिधी उपस्थित नव्हते. तथापि, गेल्यावेळी लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी झाल्याचे सभेमध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा राहणार आहे. जवळपास 7 लक्ष 74 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर खरिपाची लागवड होणार असून ऊस, हळद,केळी व इतर भाजीपाला फळपीके लक्षात घेता 8 लक्ष 38 हजार 5OO क्षेत्र लागवडीखाली येणार आहे. सोयाबीन पाठोपाठ कापूस,तूर,ज्वारी पिकाची लागवड केली जाणार आहे.हवामान खात्याने यावर्षी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.जून महिन्यात मध्यापर्यंत पाऊस पडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मृगाच्या सुरुवातीला 7 जून पासून पेरणी न करता पंधरा दिवस उशिरा पेरणी करावी अशी सूचना कृषी विभागाने केली आहे.
या बैठकीला कृषी केंद्राच्या प्रतिनिधींनाही बोलवण्यात आले होते. कोणत्याही परिस्थितीत बोगस बियाणे शेतकऱ्यांपर्यंत जाणार नाही, याची काळजी घेण्याची ताकीद आज या बैठकीत देण्यात आली.जे बियाणे विकण्यात येणार आहेत, त्याबाबतची संपूर्ण माहिती दर्शनी भागात लावण्यात यावी. नफेखोरीसाठी कोणत्याही अनोळखी बियाण्याची विक्री जिल्ह्यात होणार नाही, याची काळजी घ्यावी तसेच भरारी पथकांनी आकस्मिक तपासणी करावी, असे निर्देशही आजच्या बैठकीत देण्यात आले.
शेतकऱ्यांनी कोणत्याही कृषी केंद्राच्या अनोळखी वाणाच्या संदर्भात कृषी विभागाकडून खातरजमा केल्याशिवाय नवीन वाणाचे बियाणे घेऊ नये, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. गेल्या वर्षी बोगस बियाणे विक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती ही आजच्या बैठकीत देण्यात आली.
जिल्ह्यात बियाण्यांसोबतच खतांची, कीटकनाशकांची उपलब्धता आवश्यक प्रमाणात आहे. शेतकऱ्यांनी खूप साठा करण्याची गरज नाही. यासंदर्भात ऐन वेळेवर अधिक खत पुरवठा लागल्यास रेल्वेच्या दळणवळणाच्या सर्व सुविधा उपलब्ध राहतील, याबाबतची तपासणी आजच्या बैठकीत करण्यात आली.
जिल्ह्यामध्ये गुण नियंत्रक निरीक्षकांची एकूण संख्या 44 आहे. जिल्हास्तरावर एक भरारी पथक, तर तालुकास्तरावर 16 भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. यावर १६ तालुका कृषी अधिकारी, तसेच १६ पंचायत समिती कार्यालयातून निगराणी असणार आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यामध्ये धडक कारवाई करण्यात आली होती 12 बियाणे विक्रेते, 16 रासायनिक खते विक्रेते, पाच कीटकनाशक विक्रेते अशा एकूण 33 जणांचे परवाने निलंबित करण्यात आले होते. दहा जणांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले. 51 लोकांवर विक्री बंद आदेश बजावण्यात आला, तर दोन लोकांवर पोलीस तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कृषी विभागामार्फत येणाऱ्या वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच गेल्या वर्षभरात केलेल्या कार्याचा आढावा सादर केला.
जलसंधारणाची कामे राबवा…
मराठवाड्याच्या अन्य जिल्ह्याप्रमाणे यावर्षी देखील नांदेडमध्ये काही गावात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. पावसाचे पाणी न अडविणे यामुळे आपले जलस्त्रोत उन्हाळ्यात कोरडे होतात. त्यामुळे पुढील दीड महिन्यात लोकसहभागातून गावतलाव खोलीकरण करण्यावर भर द्यावा. तसेच आचारसंहितेपूर्वी सुरू झालेली नाला रुंदीकरण, खोलीकरण ही सर्व कामे पूर्ण करावी. लोकसहभागाच्या कामाला आचारसंहितेची अडचण नाही. लोकसहभागातून जास्तीत जास्त कामे 15 जून पूर्वी पूर्ण करावीत, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.
00000