तथागत गौतम बुध्द : राष्ट्रसंतांच्या दृष्टीतून
तथागत गौतम बुध्द : राष्ट्रसंतांच्या दृष्टीतून
भारतीय जनजीवनावर मोठ्या प्रमाणात कृषी संस्कृतीचा प्रभाव आहे. कॄषी संस्कृती म्हणजे श्रमणांची संस्कृती, भगवान बुद्धाच्या काळात श्रमण संस्कृतीचा सन्मान वाढला. सम्राट अशोकांच्या काळापर्यंत तो सन्मान टीकून होता. भगवान बुध्दांचा विचार सर्वदूर पर्यंत पसरला होता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेत ‘प्रचारमहिमा’ लिहतांना म्हणतात,
हाती न घेता तरवार । बुध्द राज्य करी जगावर ।
त्यासि कारण एक प्रचार । प्रभावशाली ॥४०॥ ग्रा.अ. ८
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनाचा अभ्यास केला तर भगवान बुध्दांच्या विचारांसोबतच इतर मानवतावादी विचारांचा प्रभाव त्यांच्या जीवनात जाणवतो. राष्ट्रसंत तुकडोजींच बालपणीच नाव माणिक होते. मराठी चवथा वर्ग शिक्षणही त्यांच पूर्ण झाले नव्हते. कारण गरीबीने आणि जातीव्यवस्थेच्या सामाजीक परीस्थीतीने त्यांना खुप छळले होते. बालवयातच त्यांच्यामधील सामाजीक जाणीवा वीस्तारल्या होत्या. देव जर खरच असेल तर तो हा उच्चनीचतेचा मानवी भेद का निर्माण करतो ? या व्यथा राष्ट्रसंतांनी ‘माझी आत्मकथा’ यात मांडल्या आहेत.
माझी जन्म-यात्रा ऐकताना कोणी। हासतील मनी नवलावाने ॥
हीन मी जातीचा, भाटगा कुळीचा । घरीचा मुळीचा भिकारी मी॥
घरी पिता करी काम शिंपियाचे। त्यावरी आमुचे पोट चाले ॥
तुकड्यादास म्हणे शिकलोसे जरा । मराठी तिसरा-चौथा वर्ग॥
धावोनिया जाई बैसाया कीर्तनी । बसू देना कोणी लोकांमध्ये ॥
तुकड्यादास म्हणे मी बैसे कैचणी । लोकांच्या वाहाणी पडती जेथे॥
हीनतेच्या सामाजीक वागणुकीचे चटके माणिकने बालपणीच सहण केले होते. त्यांनी बालवयातच वैदेही संत आडकोजी महाराज यांना गुरूस्थानी माणलं. आपल्याकडे गुरूच स्तोम माजवीण्याचा प्रघात आहे. एखाद व्यक्तीमहत्व प्रसीध्दीस आले की त्यामागे त्याच्या गुरूचा प्रभाव सांगत गुरू उच्चवर्णी सांगीतल्या जातो. राष्ट्रसंतांच्या बाबतीतही असाच गुरूंचा प्रभाव सांगण्याचा प्रयत्न नेहमीच होतो. कारण एक अल्प शिक्षीत एवढ काव्य ,साहित्य कसे लिहतो? पण राष्ट्रसंतांनी स्वतःच त्याचा वेळोवेळी आपल्या साहित्यातून खुलासा केला. ते ग्रामगीतेत आडकोजी महाराजां संबंधात लिहतात-
बहीरंग बोध नाही केला । स्वयेची श्रध्दाभावे घेतला ।
अहंकार न हो म्हणोनि पूजिला । सद्गुरूराजा ॥७२॥ ग्रा.अ. ३७
माणिक बालपणीच अनेक संतांचे काव्य म्हणायचा. लोक त्याची कधी चेष्टा करीत त्याला संतांचे अभंग, भजन म्हणायला लावायचे. वाळला तरी भाकर कुटका खायला मीळावा म्हणून, माणिक लोकांची चेष्टा सहण करीत अभंग, भजने गायचा. एकदा आडकोजी महाराज सहज म्हणाले, ” तुका म्हणे, तुका म्हणे, का म्हणत बे, तू काय म्हणत ते सांग. ” ही गुरू आज्ञा समजून माणीक ‘तुकड्यादास’ नावाने काव्य निर्मीती करून भजन रूपाने गायला लागले. हजारोंचा जनसमुदाय त्यांच्या भजनांना ऐकायला जमायचा. माणिक कालांतराणे ‘तुकडोजी महाराज’ नावाने जनमाणसात प्रचलीत झाले.
१९४२ च्या क्रांती पर्वात भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात तुकडोजींच्या भजनांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. महात्मा गांधी म्हणायचे, ” विदर्भ मध्यप्रांतमें मुझसेभी जादा तुकडो महाराज आपके विचारोंका प्रभाव जनमाणसपें है” एका श्लोकात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिहतात-
अंग्रेज राजा के बखत । अफसर कई थे अड गये ।
भगवान की बेहद कृपा से । सबही नीचे पड गये ॥
ब्यालिस साल में मुझे भी । जेल सहनाही पडा ।
क्रांती हुई बडी जोर की । आवाज मुझ से ही बढा ॥
भारतीय स्वातंत्र्यानंतर स्वराज्याच सूराज्य व्हावे म्हणून हा संत गावा गावात लोकजागृती करीत लोकांना राष्ट्रधर्माचा विचार सांगत होता. भारताचे पाहिले केंद्रीय अर्थमंत्री सी.डी. देशमुख पहिल्या पंचवार्षीक योजनेवर बोलतांना मार्च १९५६ च्या लोकसभेत म्हणाले,
“हल्ली गामसुधारणांबाबत सरकार अधिकाधिक लक्ष घालीत असून त्यासाठी बराच पैसा खर्च केला जात आहे. हेच कार्य बिनसरकारीरित्या श्रीसंत तुकडोजी महाराजांनी मध्यप्रदेशात व हैद्राबाद राज्यात चालविलं असून त्यांचे प्रयत्न गौरवार्ह आहेत. लोकांच्या हृदयात आत्मोध्दाराची प्रेरणा निर्माण करून, संघटीतपणे त्यांना ग्रामसुधारणेच्या कामास लावणे हे कार्य खरोखरच राष्ट्रोन्नतीच्या दृष्टीने अत्यंत हिताचे व महत्वाचे आहे. त्यासाठी त्यांनी मराठी भाषेत ‘ग्रामगीता’ नावाचा ग्रंथ लिहला असून तो प्रत्येक गावागावातून वाचला जाणे जरूरीचे आहे. ”
असा हा संत १९५५ मध्ये जपान येथे झालेल्या विश्वशांती व विश्वधर्म परिषदेत भारताचे प्रतीनीधीत्व करतो. स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री पं. जवाहरलाल नेहरूंनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना जपानमधे आपण भारताचे प्रतीनीधी म्हणून जावे असे पत्र पाठवले. राष्ट्रसंत भारतातून जपानमध्ये गेलेल्या प्रतीनीधी मंडळाचे प्रमुख होते. या प्रवासात राष्ट्रसंतांनी अनेक देशांना भेटी दील्या. यावीषयी राष्ट्रसंतांनी ‘मेरी जपान यात्रा’ या ग्रंथात सविस्थर लिहले. माझ्या ‘हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर’ या पुस्तकात काही प्रसंग मी लिहले आहे.
“२३ जुलै १९५५ जपान देशातील शिमिशु शहरात ‘विश्वधर्म परिषद’ चे आयोजन त्याच देशातील अनानाइक्यो धर्म संस्थेद्वारा करण्यात आले होते.
विश्वधर्म परिषदेच्या उद्घघाटनाचा मान एका भारतीयाला मिळाला होता. त्याचे नाव होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. मराठी चार वर्ग शिक्षणही पूर्ण न झालेला हा महात्मा सुटाबुटातील २८ देशांच्या प्रतिनिधींच्या समोर संमेलनाचे उध्दघाटन करतांना, त्याने सर्वप्रथम आपल्या खंजिरीला था मारली.
हर देश में तू हर भेष में तू , तेरे नाम अनेक तू एकही है।
ह्या भजनाने परिषदेला सुरूवात झाली. सारा जन समुदाय भजनाने भारावला. उद्घघाटनीय भाषणात राष्ट्रसंतांनी खऱ्या धर्माची व्याख्या सांगत मानवता धर्माचा विचार हाच सर्व धर्माचा सार असावा ते म्हणतात-
” मेरे विश्वप्रेमी सज्जनो, आपको तो चाहिये कि आप निर्मल और विशाल दृष्टिसे ही धर्म का विचार, आचार और प्रचार करें. यदी धर्मवादी पुरुषोने धर्मके बंधन मानवतावादी दृष्टिकोन से व्यवहार में नही लाये तो धर्म ‘धर्म’ रह न सकेगा. एक धर्म ने दुसरे धर्म पर आक्रमण करने की प्रवृत्ती धर्म की नही- अधर्म की है. एक मनुष्य का पाँव जोडणे के लिए दुसरे मनुष्य का पाँव काटना जितना अन्याय है, उतनाही दुसरे धर्म पर किया गया आक्रमण अन्याय होगा. ” हे सविस्तर भाषण आपल्याला अभ्यासता येईल. याच परिषदेतला शेवटचा प्रसंग अभ्यासना सारखा आहे. राष्ट्रसंतांनी ‘मेरी जपान यात्रा’ मध्ये लिहले आहे.
“खुला अधिवेशन था . काफी प्रस्तावों के बाद, आचार्य नामक कार्यकर्ताने पंडित जवारहरलाल नेहरूजींने भारत की ओरसे भेजा पंचशील का प्रस्ताव रखा. उसके विरोध में दो-चार ही व्यक्ति थे; बडा सताया उन्होंने. प्रस्ताव पास नही होने देते थे.
तब मैने आचार्य से कहा, एक तो प्रस्ताव रखना नही था, और रखा तो अब वापस लेना ही नही. वह पंडित नेहरूजी की बात नही, हमारे देश की बात रहेंगी. ”
विश्वात भगवान गौतम बुद्धाच्या पंचशीलाने शांती प्रस्थापीत होऊ शकते हा प्रस्ताव भारताकडून मांडण्यात आला होता. राष्ट्रसंत पुढे लिहतात-
“इस विषय पर एक घंटा बडी खलबली मची. तब हमने सभापती को समझाया, राजनीती की दृष्टि छोडकर पंचशील तत्वों को मान्यता देने में हमारी सभा धार्मिकताकाही रक्षण करती है. इस बात पर मैने जोर दिया. पंचशील सिद्धांत में बताई गई हर बात में विश्वशांन्ति की दृष्टि है. और हमारी सभा भी यही चाहती है. पंचशील पंडितजी का नही, विश्व का है. अतः वह सही सभा का भी विषय हो सकता है. … ”
समारोप करने के लिए अध्यक्ष ने मुझे कहा. पहले मेरा परिचय दिया गया.. जब मैं खडा हुआ तब मेरी भी वही हालत हुई जैसे विवेकानंद की होती है. मेरे भाषण का जोश बडा, तालीपर ताली पडी. लोंगो के दिल खुल गए.
वह भाषण सुनकर सभा के अध्यक्षने कहा, “हम लोगो ने जो भाषण अभी सुना है वही इस परिषद का सार है. हमारे दिल पर गहरा असर हुआ है.” ग्रीस के प्रतिनिधी ने कहा, “यही है सच्चा भाषण, सच्चे विचार इन्ही को कहते है. ”
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जपान वरून भारतात परत आल्यावर त्यांचा एकमेव जाहिर सत्कार आंबेडकरी लोकांनी केला. त्याविषयी वामनराव गोडबोले आपल्या ‘बोधिसत्व डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षेचा अविस्मरणीय इतिहास’ या ग्रंथात लिहतात-
“त्या सुमारास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जपानच्या विश्वशांती परिषदेमध्ये भाग घेऊन भारतात परतले होते. जपान इत्यादी बौध्द राष्ट्रांचा दौरा केल्यामुळे ते आपल्या भाषणात बौद्ध धर्माची वारेमाप स्तुती करतांना मी त्यांना पाहिले. तेव्हा मला असे वाटले की तुकडोजी महाराजांना याच विषयावर बोलण्याकरिता आपल्या संस्थेद्वारे आयोजित कार्यक्रमामध्ये आमंत्रित करावे. ”
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांनतरा आधीचा १८ सप्टेंबर १९५५ हा प्रसंग अभ्यासकांनी अभ्यासावा.
२५०० वी बुद्ध जयंती ‘समयदान यज्ञ’
भगवान गौतम बुध्दांच्या २५०० व्या जयंतीनिमित्त १९५६ साली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एक कोटी तासाचा ‘समयदान यज्ञाचा’ संकल्प घेतला होता. “ज्याला जे काही चांगलं येत असेल ते त्यांनी इतरांना कुठलाही आर्थीक मोबदला न घेता शिकवावे. कलावंतांनी कला शिकवावी . भजन गाणाऱ्यांनी समाज जागृतीचे भजन शीकवावे. कोणी व्यायाम शिकवावं नि मुलांमध्ये सेवेचा उत्साह भरावा. डाॅक्टरांनी रोग्यांना आजारी पडाणारच नाही असा सदुपदेश द्यावा. काहीच येत नसेल तर त्यांनी निदान एक तास श्रमदान करावं असा ‘समयदान यज्ञ’ केला. या ‘समयदान यज्ञावर ‘ राष्ट्रसंतांनी भजन लिहले-
समयदान दे दो हमको, एकही कलाक चाहे ।
आरजू हमारी सुनिये, देश को जगाना है ॥टेक॥
या तो किसोको सिखाओ, या तो सिख जाओ कोई ।
गिरा हुआ धर्म जिसको, फेरसे उठाना है ॥१॥
एक एक भीख मंगा, घरमें पालकरके अपने ।
जिंदगी बसाओ उनकी, उद्यमी बनाना है॥२॥
जिसे जिसे जो है आता, जीवनकी ऊँची बाता I
कला हा या औद्योगिता, सभीको दिलाना है॥४॥
एकही कलाक दे दो, रोज रोज सेवा भर दो ।
कहे दास तुकड्या इसको ‘बुद्ध’ को चढाना है ॥
अस ५कडव्याच्या भजनातून त्यांनी ‘समयदान यज्ञाच’ आव्हान केले होते. राष्ट्रसंतांचा हा यज्ञ अग्नीत तेल- तुप- राळ जाळणारा नव्हता. यज्ञाची नवी संकल्पनाच या यज्ञात होती. या समयादान महायज्ञाचा समारोप २५०० व्या बौध्द जयंतीला चिमूर, जि. चंद्रपूरच्या सभोवताल १०० खेड्यांना आदर्शाची दिशा देऊन केला होता. भगवान बुद्धाच्या पंचशीलाच्या विचारांना आनंदी जीवन जगण्याचा मार्ग बनवू यां.
: ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक
अभ्यासक राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा
9823966282