बुद्धाची सम्यक वाणी आणि आजचे वाचाळवीर!

बुद्धाची सम्यक वाणी आणि आजचे वाचाळवीर!
(भिमराव परघरमोल)
तथागत भगवान बुद्धाचा धम्म म्हणजेच त्यांचे तत्त्वज्ञान, हे ईश्वर, आत्मा, कर्मकांड, पुनर्जन्म तथा मरणोत्तर जीवनापासून पूर्णपणे अलिप्त आहे. माणसाने जन्म ते मरणापर्यंत सुखमय जीवन जगण्यासाठी व माणसाने माणसाशी या जगातील नाते कसे जोपासावे याचेच तो मार्गदर्शन करतो. म्हणूनच बुद्ध धम्माचा केंद्रबिंदू इतर काहीही नसून फक्त माणूस आहे. तोच माणूस जर दुःखात, दैन्यात, दारिद्र्यात जीवन जगत असेल तर त्याला दुःखमुक्त करणे हा धम्माचा उद्देश आहे. याचा अर्थ धम्म म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून, दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे, हाच धम्माचा पाया असून तोच मुख्य प्रश्न आहे.
दुःखमुक्त जीवन जगण्यासाठी भगवान बुद्धाने तीन मार्ग प्रतिपादन केलेले आहेत १) पावित्र्याचा मार्ग, म्हणजे पंचशील २) सदाचरणाचा मार्ग, म्हणजे अष्टांगिक मार्ग ३) शीलमार्ग, म्हणजे दहा पारमिता. या मार्गाचा अवलंब केल्यास जगातील कोणताही मनुष्य दुःखमुक्त होऊन सुखमय जीवन जगू शकतो. त्यासाठी वर्ण, जात, पोटाजात, धर्म, पंथ, लिंग, संप्रदाय यापैकी कशाचीच अट नाही.
धम्माच्या तीन मार्गाचे २३ तत्त्वपैलू आहेत. त्या प्रत्येकावर प्रकाश टाकणे शक्य नाही. ते समजून घ्यायचे असतील तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथातील दुसऱ्या खंडातील भाग-दोन वाचावा.
मग प्रश्न असा की, या लेखाचा उद्देश काय? तर आजच्या वाचाळवीरांना बुद्धाच्या मार्गातील सम्मा वाणीचे (सम्यक वाचा) आकलन करून देणे होय.
काही मोघवाणीचे लोक समाजामध्ये वास करतात. ते आपल्या कुत्सित तथा विखार वाणीने ओळखले जातात. त्यांना समाजामध्ये शांतता नको असते. त्यांच्या ठाई-ठाई असामाजिकता भरलेली असते. त्यांना समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्व ही महान मानवी तथा संविधानिक मूल्य मान्य नाहीत. कारण त्यांना विषमतावादी, मनुवादी धर्मग्रंथांवर आधारलेली असमान, गुलाम, गैरबराबरीची, अन्यायी तथा एकाधिकारशाहीवादी समाजव्यवस्था आणि शासन-प्रशासन प्रणाली अपेक्षित आहे. ज्याप्रमाणे त्यांच्या अल्पसंख्य पूर्वजांनी ८५ टक्के बहुजनांवर अनियंत्रित सत्ता गाजवली. तिचेच डोहाळे त्यांना आज लागलेले आहेत. म्हणून ते कधी संविधानाच्या विरोधात, तर कधी महापुरुषांच्या विरोधात गरळ ओकताना दिसतात. कारण संविधानामुळे त्यांना त्यांचा एककल्ली कार्यक्रम राबवता येत नाही. त्यामुळे त्यांचं कधी-कधी ओठातलं पोटात येऊन ते आपल्या नरकवाणीचे दर्शन समाजाला घडवत असतात.
भगवान बुद्धाच्या मते समाजात वावरणारा प्रत्येक व्यक्ती हा सदाचरणी असावा. त्यासाठी अष्टांगिक मार्गाचे शोधन बुद्धाने केलेले आहे. त्यामधील सम्मा वाणी म्हणजे सम्यक वाचा हे महत्त्वाचे अंग आहे. भाषा ही संवादाचे, भावना व्यक्त करण्याचे महत्त्वाचे साधन आहे. सजीव सृष्टीमध्ये वाचा ही मानवासाठी निसर्गाचे खूप मोठे वरदान ठरलेले आहे. त्यामुळे त्याने एकमेकांशी संवाद साधून, भावना व्यक्त करून, गरजेनुरूप निर्णय घेत प्रगतीच्या पंखांनी आकाश कवेत घेतले आहे.
सम्यक वाणीच्या संदर्भात बौद्ध साहित्यातील अनेक ग्रंथांमध्ये बुद्धाने उपदेश केल्याचे संदर्भ दिसून येतात. सम्यक वाणी कशी असावी यासंदर्भात ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथामध्ये विश्लेषण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिहितात, की भगवान बुद्धाच्या मते सम्यक वाणी म्हणजे सत्य तेच बोलून असत्य बोलू नये. दुसऱ्या विषयी वाईट बोलू नये. दुसऱ्याची निंदानालिस्ती करू नये. आपल्या लोकांविषयी रागाची अथवा शिवीगाळीची भाषा वापरू नये. सर्वांशी सौजन्याने व आपुलकीने बोलावे. अर्थहीन मूर्खपणाची बडबड करू नये. बोलणे हे समंजसपणाचे व मुद्देसूद असावे.
त्यापुढे ते म्हणतात, की सम्यक वाणीचे पालन हे भीतीमुळे किंवा पक्षपाताने नसावे. वरिष्ठांना काय वाटेल, आपला काही तोटा होईल काय, याच्याशी त्याचा काहीही संबंध नाही. म्हणजेच वरिष्ठांची आज्ञा किंवा वैयक्तिक फायदा हे सम्यक वाणिचे परिमान नाही.
‘सर्वोत्तम भूमिपुत्र, गौतम बुद्ध’ या ग्रंथामध्ये डॉ. आ. ह. साळुंके म्हणतात, की बुद्धाच्या मते जगामध्ये गुथवाणी, पुष्पवाणी आणि मधुवाणी असे तीन प्रकारची वाणी बोलणारे लोक असतात. एखादा मनुष्य सभेत, परिषदेत, जातीबांधवात, राजदरबारात किंवा साक्ष देताना जे ऐकले नाही, पाहिले नाही, जे जाणत नाही, ते पाहिले, ते ऐकले किंवा ते जाणले असे सांगतो. तर जे पाहिले, जे ऐकले, जे जाणले, ते नाही म्हणून सांगतो. स्वतःसाठी, दुसऱ्यासाठी किंवा कसल्यातरी लाभासाठी तो जाणून बुजून खोटे बोलतो. असा माणूस गुथवाणी म्हटला जातो. याउलट जे आहे ते जसेच्या तसे, होय असेल तर होय, नाही असेल तर नाही. कोणत्याही लाभासाठी खोटे बोलत नाही. त्याला पुष्पवाणी म्हटले जाते. जो मनुष्य कठोरवानीचा त्याग करून निर्दोष, कर्णमधुर, प्रेमळ, हृदयंगम, सुसंस्कृत आणि बहुजनांना कमनीय व प्रिय वाटणारी अशी भाषा बोलतो तो मधुवानी होय. त्यामुळे प्रत्येक सदाचारी माणसाने पुष्पवाणी व मधुवाणी असावे असे अपेक्षित आहे.
भाषा चांगली, गोड, पुष्पवाणी, व मधुवाणी असूनच चालत नाही, तर ती कृती विपरीत असू नये. असे असल्यास ती फसवणूक ठरते. स्वाभाविकच तो परिणामी अपायकारक होतो. म्हणून कधी-कधी गोड बोलणारांपेक्षा कठोर बोलणारे लोक परवडतात, असे म्हणण्याची वेळ येते. बोलण्यातील गोडव्याला महत्त्व आहेच पण आचरण व कृती निर्मळ तसेच बोलण्याला साजेशी असणे खूप महत्त्वाचे आहे.
भगवान बुद्ध एकदा भिक्खूंना म्हणतात की, तथागत जसे बोलतो तसे करतो, आणि जसे करतो तसे बोलतो. तो यथावादी तथाकारी, यथाकारी तथावादी आहे. म्हणून तो तथागत म्हटला जातो.
आज समाजात काही लोक मोठमोठी तत्त्वे सांगून, सिद्धांत मांडून आशा निर्माण करणारी आश्वासने देतात. वेळप्रसंगी या सर्वांचा त्यांना विसर पडतो किंवा ते लोकांना फसवण्यासाठी ती भाषा वापरतात. अशावेळी त्यांच्या कथनी आणि करनी मधील विसंगती समोर येते. कधीकधी आपल्या कृतीवर पांघरून घातले जाईल अशी भाषा लोकांपुढे सादर केली जाते. त्यांना सत्यापासून दूर ठेवले जाते. अशी भाषा माणसा-माणसात दुरावा निर्माण करते, म्हणून वाणी आणि आचरण यामध्ये सुसंगती असावी. त्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात.
*बोले तैसा चाले, त्याची वंदीन पाऊले।*
मिलिंद प्रश्न या ग्रंथामध्ये ग्रीक राजा मिनांडरला (मिलिंद) एका प्रश्नाचे उत्तर देताना भंते नागसेन म्हणतात, की हेतूपुरस्सर खोटे बोलणाराला पराजिता दोष लागतो. पराजिता दोष म्हणजे भिक्षूचे भिक्षुपण, म्हणजेच सर्वस्व हिरावून घेतल्या जाते. आज मात्र अनेकांनी खोटं बोलण्याच्या कंपन्या उघडल्या आहेत. सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत पावलो-पावली खोटं बोलताना, त्यांना जनाची तर नाहीच, पण मनाचीही वाटत नाही. अशा फेकूंच्या बद्दल म्हणावेसे वाटते की,
*बोले तैसा थोडा-थोडाही न चाले, त्याची छाटावी पाऊले।*
त्रिपिटकाच्या सुत्तपिटकातील खुदकनिकाय भागातील सुत्तनिपात या ग्रंथातील उल्लेखाप्रमाणे, भगवान बुद्ध एकदा श्रावस्ती येथील जेतवन विहारात असताना, तेथे एक देवतास्वरूप व्यक्ती संपूर्ण विहार प्रकाशमान करून बुद्धाला वंदून विचारतो की, या जगामध्ये सर्वोत्तम काय आहे? जे मानव हिताचे असून स्वीकारण्यास योग्य आहे. कृपया ते आपण आम्हाला विस्ताराने कथन करावे. तेव्हा तथागत भगवान बुद्धांनी मानवी हितासाठी ३८ प्रकारचे उत्तम मंगल (सर्वश्रेष्ठ) सांगितले. त्यापैकी एक म्हणजे,
*सुभासिता च या वाचा, एतं मंगलमुत्तमं।*
अशाप्रकारे चांगली वाणी हे सर्वश्रेष्ठ मंगल आहे. या बुद्धाच्या उपदेशाप्रमाणे ज्याला मांगल्याच्या, कल्याणाच्या, आनंद तथा स्वानंदाच्या, परोपकाराच्या, मानवहिताच्या एवढेच नव्हे, तर मानवी मूल्यांच्या मार्गावर अश्वविहार करायचा असेल, तर त्याच्या सोबतीला सम्यक वाणी कल्याणमित्र ठरते, यात तीळ मात्र शंका नाही.
भिमराव परघरमोल
व्याख्याता तथा अभ्यासक
फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारा
तेल्हारा जि. अकोला
मो.९६०४०५६१०४
Show quoted text