राष्ट्रमाता महाराणी अहिल्याई यांचे लोककल्याणकारी कार्य

राष्ट्रमाता महाराणी अहिल्याई यांचे लोककल्याणकारी कार्य
लेखक: होमेश भुजाडे
——————————-
भारतात ज्या अनेक महान रत्नांनी जन्म घेतला त्यातीलच एक महान स्त्रीरत्न म्हणजे राष्ट्रमाता महाराणी अहिल्याई होळकर होय.
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुका स्थित चौंडी या छोट्याश्या गावी ३१ मे १७२५ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेली लोककल्याणकारी कार्य तथा पुरूषप्रधान संस्कृतीवर मात करून एका विधवा स्त्रीने केलेला राज्यकारभार या बाबी महाराष्ट्रीय जनतेसाठी प्रचंड भुषणावह व फार अभिमानास्पद आहे.
शरीफभाई या मुस्लिम शूरवीरास सेनापती पदी नियुक्त केले. चंद्रवतांचा बिमोड करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्याच्यावर सोपवली. त्यांनी विजयश्री प्राप्त केल्यानंतर त्यांचा यथोचित सन्मान व सत्कार करून गुणगौरव केला. अहिल्याईच्या भोजन पंगतीत भोजन करण्याचा ज्या महत्त्वपूर्ण व्यक्तींना मान मिळायचा त्यात शरीफभाईचे स्थान होते.
सोमनाथ मंदिर व काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोध्दार करतांना मंदिर – मस्जिद वाद निर्माण करून सनातनी वैदिकांनी मस्जिद तोडून मंदिर बांधण्याचा प्रयत्न चालवला असता अहिल्याईने त्यात हस्तक्षेप करून मस्जिद कायम ठेऊन मंदिर बांधून दिले. राष्ट्रमाता महाराणीचे हे धर्मनिरपेक्षतेचे मूर्तीमंत उदाहरण होय.
प्रजेला नियमित काम मिळावे व कलावंतांच्या वास्तुकला जिवंत राहाव्यात यासाठी सर्वधर्मसमभावाचा आदर्श गिरवीत मस्जिद, दर्गा, पीर यांचा जीर्णोद्धारास व निर्मितीस आर्थिक सहाय्य केले. खडेपीर, चांदवड येथील नानावली दर्गा, बुखारी बाबांचा दर्गा, चांदशहा दर्गा व अनेक पीर, मशिदी बांधल्यात. मंदिरांची निर्मिती व जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला. या सर्वांच्या देखरेखीसाठी कायमस्वरूपाच्या नेमणुका करून दिल्यात.
लोककलांना व कारागिरांना प्रोत्साहन दिले. होळकर साम्राज्यात व्यापार – व्यवसाय आणि दळणवळण यांच्या भरभराटसाठी पक्के रस्ते बांधलेत. भारतभर रस्ते, पुल, वास्तू यांचे बांधकाम केले. लोकांना नियमित कामं मिळावीत म्हणून भारतभर सतत बांधकामं चालत असत. ज्यामुळे लोकांना सतत रोजगार मिळत असे. ग्रामोद्योगांना प्रोत्साहन देऊन बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिलेत. सर्व जाती धर्माच्या लोकांना समान न्याय तथा रोजगार दिला. बेकारांना काम व श्रमांना योग्य दाम दिलेत.
हिवाळ्यात गोरगरीब प्रजेला गरम वस्त्रांचे वाटप केले. प्रवाशांसाठी मार्गावर अरण्यमय प्रदेशातही आमराई, बगिचे निर्माण केले. दलित, आदिवासी, भटके, विमुक्त, ओबीसी, मुस्लीम, या समाजातील लोकांना शेती करण्यास जमिनी दिल्यात. गोरगरिबांकरिता औषधोपचारासाठी मोफत दवाखान्याच्या सोयी केल्यात. दीनदुबळे, अनाथ, विधवा, अपंग यांसारख्या असहाय लोकांचे पुनर्वसन केले. त्यांच्यासाठी अन्नछत्रे व सदावर्ते चालविली. धर्मशाळा बांधून त्यांची राहण्याची नि:शुल्क व्यवस्था केली.
पतीच्या मरणोपरांत विधवा महिलांना वारस म्हणून मुलगा नसेल किंवा ती निपुत्रिक असेल तर अशा स्त्रीच्या पतीची संपत्ती राजे ,महाराजे, संस्थानिक जप्त करत. त्यामुळे अशा विधवा स्त्रियांची जगण्याची आबाळ होत असे. महिलांना सन्मानाने जगता यावे; आपल्या पतीच्या संपत्तीचा उपभोग घेता यावा; याकरिता अहिल्याईंनी विधवांना व निपूत्रीक महिलांना मूलदत्तक वारसा हक्क दिला. अशा विधवा महिलांनी कोणत्याही मुलास दत्तक घेऊन आपल्या पतीच्या संपत्तीचा ऐथेच्छ उपभोग घेण्याचा अधिकार ‘मूलदत्तक वारसा’ अंतर्गत स्त्रियांना बहाल करणारी तत्कालीन अहिल्याई अद्वितीय अशी एकमेव महाराणी होती.
स्वराज्यात अस्पृश्यतेचे उच्चाटन केले. वैदिकांच्या सनातनी सतीप्रथेस व अंधश्रद्धेस विरोध केला. राज्यात दारूबंदी व हूंडाबंदीचा कायदा केला. चूल आणि मूल हेच महिलांचे जीवन असणाऱ्या काळात महिलांचे सैन्य पथक उभारून त्यांच्यात वीरत्वाचा आत्मभान जागवला. स्वराज्यातून भ्रष्टाचाराचे निर्मूलन केले.
व्यापारी, प्रवासी, पर्यटक, यात्रेकरू, सावकार, जमीनदार, सामान्य जनता, यांना वाटमारी करून लुटमार करणाऱ्या काही भिल्ल आदिवासी जमातीच्या टोळ्यांनी होळकर साम्राज्यात दहशत बसवली होती. अहिल्याईंनी राज्यात दवंडी पिटवून या दहशतवाद्यांचा पराभव करून योग्य बंदोबस्त करणाऱ्या शूरवीराशी स्वतःच्या एकुलत्या एक राजकुमारीचा विवाह लावून देण्याची घोषणा केली. हा पण जिंकणारा व्यक्ती कोणत्याही जाती – धर्माचा असू शकला असता. राजकुमारी मुक्ता पेक्षा तो वयाने कितीतरी मोठा असू शकला असता. दारिद्रयात जगणारा असू शकला असता. जात – धर्म, आर्थिक स्थिती यापलीकडे जाऊन जनतेच्या संरक्षणासाठी एकूलती एक राजकुमारी असणाऱ्या मुलीस पणाला लावले.
यशवंत फणसे या सामान्य तरूणाने हा पण जिंकला. त्याचा यथोचित सन्मान व सत्कार करून गुणगौरव करत अहिल्याईने यशवंत सोबत राजकुमारीचा विवाह लावून दिला.
बंदी बणवलेल्या टोळ्यांच्या प्रमुखांकडून दहशतवादी कृत्य करण्यामागील अहिल्याईंनी कारण जाणून घेतले. गरिबी, बेरोजगारी या कृत्या मागील प्रमुख कारण असल्याचे लक्षात येताच भक्षकांकडेच रक्षकाचे काम सोपवून मुख्य प्रवाहात त्यांना आणले. अशाप्रकारे स्वराज्यातून राज्यातील दहशतवाद संपवला.
राज्यात दारूबंदी व हूंडाबंदीचा कायदा केला. भ्रष्टाचाराचे उच्चाटन केले. अनिष्ट चालीरिती व रुढी परंपरांना विरोध केला.
तलाव व नदी काठावर गावातील स्त्रीया कपडे धुवायला जात. कित्येकदा त्या स्त्रियांना जलसमाधी प्राप्त होत असे. वैदिकांकरवी अनेक तलाव व नद्यांना धार्मिक महत्त्व देऊन यात्रा भरविल्या जात. त्यात शाहीस्नान करणारे अनेक भक्त कित्येकदा नदीच्या प्रवाहात वाहून जात. काही तलावात बुडूून मृत्यूमुखी पडत असत. भारतीयांचे हे दु:ख अहिल्याईंना पहावले जात नव्हते. म्हणून त्यांनी अशा अत्यंत महत्त्वाच्या धार्मिक स्थळी भारतभर तलाव व नदी किनारी घाट बांधलित. तीर्थस्थळी जत्रा भरत. तेथे अनेक भारतीय जात. ऊन, थंडी, वारा, पाऊस यामुळे त्यांचे हाल होत. प्रसंगी कित्येकांना आजारपण येई. मृत्यूही येत. हे दु:ख पहावल्या न गेल्यामुळे अहिल्याईंनी गोरगरीब यात्रेकरू भाविकांसाठी निवासाची सोय व्हावी म्हणून देशभर धर्मशाळा बांधल्यात. अन्नछत्रे चालवलीत. यासाठी त्यांनी केवळ स्वराज्याचा विचार न करता त्यापलीकडे जाऊन संपूर्ण भारतात लोकोपयोगी कार्य केले. या कामी राज्याचा कोष न वापरता आपल्या खाजगी कोषातून हे सर्व जनपयोगी कामे केलीत हे येथे लक्षात घेणे आवश्यक आहे.
पांथस्तांना, व्यापाऱ्यांना, भाविकांना व जनतेला पाणी सहज उपलब्ध व्हावे यासाठी भारतभर ठिकठिकाणी विहीरी, तलाव, बारव, टोप बावडी यांची निर्मिती केली. वाटसरू, प्रवासी, पांथस्त यांच्यासाठी पाणी पिण्याची सोय व्हावी म्हणून पाणपोई सुरू केल्यात.
गावाच्या ठिकाणी तसेच दुर्गम भागातही प्रवासी व यात्रेकरूंची पाण्याची सोय व्हावी यासाठी बारव, टोप बावडी व कुंडाची निर्मिती केली. नाशिक – मुंबई या महामार्गावरून जाता – येतांना कसारा घाटात मध्यभागी टोपलीच्या आकाराची टोपबावडी विहीर अहिल्याईंनी वाटसरुंना पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी बांधलेली होती. ती आजही पाहायला मिळते. इ. स. १८१८ मध्ये कँप्टन स्टुअर्ट केदारनाथ येथे गेले असता जेथे मनुष्य वस्तीचे चिन्ह नव्हते अशा ३००० फूट पेक्षाही जास्त उंचीवर दुर्गम भागात अहिल्याईंनी दगडी धर्मशाळा व पाण्याचे कुंड बांधलेले पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसलेला होता.
दिन, दुबळे, अनाथ, विधवा, अपंग यासारख्या असहाय्य लोकांचे पुनर्वसन केले. हिवाळ्यात गोरगोरिबांना गरम वस्त्रांचे वाटप करत. गोरगरिबांकरिता औषधोपचारासाठी मोफत दवाखान्याच्या सोयी केल्यात. अन्नछत्रे, धर्मशाळा, आरोग्यशाळा, पांथशाळा वाटसरूंसाठी विश्रांती ओटे इत्यादि सोयी केल्यात.
पर्यावरणाचा समतोल कायम राहावा म्हणून रस्त्याच्या दुतर्फा तसेच ओसाड, पडीक जमिनीवर व डोंगरावर झाडे लावून वृक्षरोपणासारखे उपक्रम राबवलेत. शेतकऱ्यांनी २० झाडे लावायचीत. त्याचेे संगोपन करून वाढवायचेत. त्यातील ११ झाडे शासकीय मालकीची व ९ झाडे शेतकऱ्यांच्या मालकीची असायचीत. ज्यातून सहज वृक्षारोपण होऊन जमिनीची धूप व पर्यावरणाचा समतोल सहज साधला जायचा. रस्त्यांच्या दुतर्फा ओसाड पडीक जमिनीवर व डोंगरांवर झाडे लावून वृक्षारोपणा सारखे उपक्रम राबवलेत. त्यामुळे पर्यावरणीय संमतोल सहज साधल्या गेला.
भारताच्या शासनव्यवस्थेत सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे केले जाते तेच काम शेकडो वर्षांपूर्वी राष्ट्रमाता अहिल्याईने केले. ‘प्रजा सुखी तर आपण सुखी,’ न्यायाला विलंब होणे म्हणजे न्याय नाकारणे होय. असे तत्त्व अहिल्याईचे होते. सामाजिक न्यायात समानतेचे आदर्श तत्त्व राष्ट्रमातेने अंगीकारले होते
“शासनकर्ता हा जनतेच्या पैशाचा मालक नसतो तर तो त्यांचा विश्वस्त असतो. त्या पैशाची उधळपट्टी करण्याचा त्यास काहीही अधिकार पोहचत नाही.” हे केवढे मोठे अहिल्याईचे तत्त्वज्ञान.
अहिल्याईच्या कार्याने प्रभावित झालेली परदेशी कवयित्री जोनाबेली यांनी इ.स. १८४९ मध्ये अहिल्याईवर काव्यरचना केली. सुप्रसिध्द कवी माधव ज्यूलियन व शाहिर प्रभाकर यांनाही अहिल्याईवर काव्य रचना करण्याची प्रेरणा लाभली.
सुप्रसिद्ध इतिहासकार सर जॉन माल्कम, व्हाईसराय लॉर्ड एलनबरो यांच्या सारख्या कितीतरी पाश्चिमात्य तथा स्वदेशी लेखकांनी सुद्धा अहिल्याईच्या आदर्श राज्यकारभारावर व जनकल्याणकारी कार्याबद्दल लेखन करतांना मुक्तकंठाने प्रशंसा केलेली आहे. पं. नेहरू, विनोबा भावे यांनी अहिल्याईच्या भारतभर केलेल्या लोककल्याणकारी कार्यांनी प्रभावीत झाले होते.
लॉरेन्स या ब्रिटीश लेखकाने रशियाची महाराणी एलिझाबेथ आणि डेन्मार्कची महाराणी मार्गारेट यांच्यापेक्षा महाराणी अहिल्याई जगात श्रेष्ठ होत्या असे म्हटलेले आहे.
गुणसंपन्न, ज्ञानसंपन्न आणि शिलसंपन्न ‘अहिल्याई ‘ बिकट प्रसंगी घोड्यावर बसून हातात तलवार घेणाऱ्या ‘रणरागिणी’ होत्या.
संकट समयी धैर्य राखणाऱ्या ‘वीरांगना’ होत्या.
राजसिंहासनावर बसून राज्य चालविणाऱ्या ‘महाराणी’ होत्या. लोक कल्याणासाठी राबणाऱ्या ‘लोकमाता’ होत्या. समस्त भारतीय प्रजेला पुत्रवत मानूण संपूर्ण भारत राष्ट्रात जनहिताचे कार्य करणाऱ्या ‘राष्ट्रामाता’ होत्या.
भारत देशाला गुलाम करू पाहणाऱ्या ब्रिटिशांविरूद्ध एल्गार पुकारणाऱ्या ‘देशभक्त’ होत्या.
जागतिक कीर्तीच्या राष्ट्रमातेने जात, धर्म , पंथ, संप्रदाय, राज्य, साम्राज्य यांच्या पलिकडे जाऊन समस्त भारतात जनकल्याणकारी कामे करून आदर्श राज्यकारभाराचे उदाहरण दिले.
जिला विश्वातील प्रथम आदर्श महिला प्रशासक म्हणून जगाने गौरविले अशा महाक्रांतीकारी, विश्वरत्नरूपी, ‘न भूतो न भविष्यती’ ठरलेल्या राष्ट्रमाता महाराणी अहिल्याईस २९९ व्या जयंती निमित्त कोटी – कोटी नमन!
होमेश भुजाडे
नागपूर