वंचितांची राजकीय कोंडी

*वंचितांची राजकीय कोंडी*
————————————-
डॉ. मनोहर नाईक, नागपूर
९४२३६१६८२०
भारतातील २०२४ ची लोकसभा निवडणूक अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण होती.सत्ताधाऱ्यांच्या धोरणांना,कार्यपद्धतीला आणि प्रवृत्तीला सर्वसामान्य लोक कंटाळले होते. हुकुमशाही वृत्तीचे सरकार जावे;आणि लोकशाही प्रवृत्तीचे सरकार देशात स्थापन व्हावे,अशी बहुसंख्य लोकांची इच्छा होती.परंतु ही इच्छा पूर्ण होवू शकली नाही. एनडीए तील घटक पक्षांच्या पाठिंब्याने पुन्हा संघ-भाजपाचेच सरकार सत्तारूढ झाले आहे. ‘एनडीए महायुती’ला सत्तेबाहेर ठेवता यावे म्हणून राष्ट्रीय पातळीवर काँग्रेससह अनेक पक्षांच्या सहभागातून ‘इंडिया आघाडी ’ स्थापन करण्यात आली. खरं म्हणजे बिहार मधील जनता दल युनायटेडचे प्रमुख नितीशकुमार यांच्या पुढाकाराने ही ‘इंडिया आघाडी’अस्तित्वात आली. मात्र काँग्रेसच्या अहंकारी वृत्तीमुळे नितीशकुमार इंडिया आघाडीतून बाहेर पडले.ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय राजकारण संविधानविरोधी व संविधानवादी अशा दोन गटांत विभागल्या गेले. भारताने बहुपक्षीय पद्धती स्वीकारली असतानाही बहुतेक पक्ष ‘एनडीए महायुती’आणि ‘इंडिया आघाडी ‘ या दोन छावण्यात दाखल झाले. संघ-भाजपा आणि काँग्रेस हे दोन्ही राजकीय पक्ष तसे येथील प्रस्थापितांचेच पक्ष आहेत. संघ-भाजपाने दबक्या आवाजात संविधान हटावचा सूर लावला. आणि काँग्रेसने कंठारव करीत संविधान बचावचा पवित्रा घेतला ! संविधान बचावची हाक देवून काँग्रेसने अनेक पक्ष इंडिया आघाडीशी जोडले. मात्र आंबेडकरी विचारांच्या खऱ्या संविधानवादी पक्षांना इंडिया आघाडीत सामील करून घेण्याचे टाळले. यावरून काँग्रेसचे बेगडी संविधानप्रेम ढळढळीतपणे उघडे पडले आहे.काँग्रेसचे संविधानप्रेम केवळ मतदारांना आकृष्ट करण्यासाठीच आहे, हे आता सिद्ध झाले आहे. काँग्रेसच्या मनात भारतीय संविधानाविषयी खरचं अपार निष्ठा असती तर, काँग्रेसने वडिलधाऱ्यासारखे वागून उदार भूमिका घेतली असती. इंडिया आघाडीत सर्व छोट्यामोठ्या संविधाननिष्ठ पक्ष-संघटनांना प्राधान्याने सामील करून घेतले असते. आणि एकास एक उमेदवार देवून संविधानाचा विजय निश्चित केला असता.परंतु काँग्रेसने हे केले नाही. कारण काँग्रेसच्या मनात संविधानाविषयी आणि संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी म्हणावी तेवढी पूर्वीपासूनच आस्था नाही. ही बाब एकदा नव्हे, अनेकदा स्पष्ट झाली आहे.
# काँग्रेस हा दीर्घकाळ सत्तास्थानी राहिलेला राजकीय पक्ष आहे. त्यामुळे या पक्षाची जबाबदारी सुद्धा मोठी आहे. परंतु कॉंग्रेस पक्षाची सरकारे केवळ सत्तामग्न वृत्तीने वागली आहेत. काँग्रेसच्या राजवटीतील सरकारांनी पूर्वीपासूनच धर्मश्रद्ध समाजमनाला संविधानसाक्षर करण्याची जबाबदारी घेण्याचे टाळले आहे. एवढेच नाही तर, काँग्रेस राजवटीने संविधाननिष्ठ पक्ष-संघटनांना संपविण्याचे आणि संविधानविरोधी शक्तींना बळ पुरविण्याचे काम केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ,भाजपा, शिवसेना अशा अनेक लोकशाहीविरोधी पक्ष- संघटनांचा उदय आणि विस्तार काँग्रेसच्या राजवटीतच झाला आहे. सामाजिक,आर्थिक समतेसाठी व न्यायासाठी जेवढ्याही पक्ष-संघटना अस्तित्वात आल्या त्या कशा खिळखिळ्या करता येतील ; आणि त्या कशा अल्पजीवी ठरतील याचे सर्वतोपरी प्रयत्न काँग्रेसच्या राजवटीत झाले आहेत. कॅम्युनिस्टांच्या चळवळीची सूत्रे उच्चवर्णीयांच्या हाती असल्यामुळे त्यांच्या पक्ष-संघटना आजही टिकून आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी आणि त्यांच्या विचारांशी कॉंग्रेसचे पूर्वीपासूनच वैर आहे. त्यांच्या बौद्धिक सामर्थ्यामुळे आणि तत्कालीन राजकीय परिस्थितीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीत व मंत्रिमंडळात घेणे काँग्रेसला अपरिहार्य वाटले. परंतु त्यांची उपयोगिता संपताच त्यांना बाजूला सारले. ही कॉंग्रेसची वृत्ती आहे .काँग्रेस हा मुळात भांडवलदारांचा,जमिनदारांचा, संस्थानिकांचा, उच्चवर्णियांचा आणि जातियवाद्यांचाच पक्ष आहे. स्वातंत्र्य चळवळीमुळे काँग्रेस सर्वसमावेशक झाली. परंतु ती शोषित,पीडितांची झाली नाही; आणि ती होवू शकणार नाही. याची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पूर्ण कल्पना होती. म्हणूनच त्यांनी शोषित, पीडितांच्या,उपेक्षित,वंचितांच्या राजकीय अस्तित्वासाठी ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ‘ ची संकल्पना मांडली. सत्ताधारी राजकीय पक्षापुढे शक्तिशाली राजकीय पर्याय उभा राहावा ही त्यांची या संकल्पनेमागील भूमिका होती.परंतु आकस्मिक महापरिनिर्वाणामुळे हा व्यापक राजकीय संकल्प त्यांच्या हयातीत साकार होवू शकला नाही. पुढे
‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ’ या संकल्पनेची आंबेडकरी पुढाऱ्यांनीच वाताहत केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ’
या नावाची ऐतिहासिक ओढाताण पाहिली. बाबासाहेबांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन हे नाव सोडून त्यांनी बाबासाहेबांच्या विचारासह स्वतंत्र राजकीय वाटचाल सुरू केली.
# ॲड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर हे विद्यमान भारतीय राजकारणातील अभ्यासू, स्पष्ट , स्वच्छ आणि स्वाभिमानी नेतृत्व आहे. ते केवळ रक्ताने नव्हे तर, विचाराने परिपूर्ण आंबेडकरवादी आहेत. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा रक्तवारसा आणि विचारवारसा घेवून राजकारणात पदार्पण केले आहे. इतर नेत्यांच्या तुलनेत त्यांच्या अंगी असलेल्या नेतृत्वगुणांमुळे त्यांनी राजकीय क्षेत्रात स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. मा. व्ही.पी. सिंग यांच्या प्रधानमंत्री पदाच्या अल्पकाळात त्यांनी मंत्रीपद नाकारून आणि आपली राजकीय प्रतिष्ठा व प्रगल्भता वापरून जी ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली ते त्यांच्या संयमी व दूरदर्शी वृत्तीचे निदर्शक आहे. राजकारणात त्यांना अनेकदा सर्वोच्च पदाची प्रलोभने देण्यात आली. ‘आंबेडकर’ या नावाचे भांडवल करून त्यांना कायम सन्मानाचे व लाभाचे पद मिळवणे सहज शक्य होते.परंतु त्यांनी आंबेडकर या नावाची निष्कलंकता अबाधित राखली आहे. त्यांनी पद,पैसा आणि खोट्या प्रतिष्ठेपेक्षा विचाराला,
समाजहिताला आणि निष्ठेला प्राधान्य दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन विचार त्यांनी भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडी च्या नावाने समाजमनात रुजविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अथक परिश्रमामुळे आणि निष्कलंक वृत्तीमुळे ते किनवट पॅटर्न व अकोला पॅटर्न राबविण्यात यशस्वी झाले. त्यांची वाढती राजकीय शक्ती प्रस्थापितांना आव्हानात्मक वाटली. म्हणूनच बाळासाहेब आंबेडकरांनी स्वबळावर निवडून आणलेले उमेदवार पळवून काँग्रेसने त्यांचे राजकीय खच्चीकरण करण्याचा अनेकदा प्रयत्न केला आहे. आंबेडकरी राजकारणाचे स्वतंत्र अस्तित्व पुसून टाकण्यात काँग्रेस नेहमी अग्रेसर राहिली आहे. संघ-भाजपा हा विरोधी विचार घेवून मैदानात उतरलेला उघड शत्रू आहे. तर, कॉंग्रेस हा चेहरा लपवून वार करणारा छुपा शत्रू आहे, याचा प्रत्यय २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा आला आहे.
# या देशातील दलित, आदिवासी,भटके-विमुक्त, शेतकरी, कष्टकरी,अल्पसंख्यांक यांच्या बळावर कॉंग्रेस पक्षाने दीर्घकाळ सत्ता उपभोगली. हा बहुसंख्य वर्ग काँग्रेसचा दीर्घकाळ मतदार राहिला. परंतु काँग्रेसने या वर्गाला कधीच सत्तेचा अधिकार मिळू दिला नाही. भारतातील हा मोठ्ठा वर्ग शाश्वत विकासापासून आणि सत्तेपासून कायम वंचित राहिला. दरम्यानच्या काळात काँग्रेसच्याच छत्रछायेखाली या देशातील धर्मांध पक्ष-संघटनांनी आपला विषारी विचार देशभर पसरवला. संघ-भाजपाने संविधान विरोधी, राष्ट्रद्रोही कृत्ये करून आपली शक्ती वाढवली.आणि बघता बघता लोकशाही मार्गानेच या देशाची सत्तासूत्रे आपल्या ताब्यात घेतली.संघ-भाजपा नावाचा विषारी नाग कॉंग्रेसच्याच दुधावर पोसल्या गेला आहे. आता हा विषारी नाग आणि काँग्रेस नामक साप यामध्ये स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष सुरू आहे.हा साप सत्तासनावर दीर्घकाळ कुंडली मारून बसला होता. त्यामुळे त्याला सत्तारूढ होण्याची फार घाई नाही.फक्त स्वतःचे अस्तित्व टिकावे यासाठीच तो धडपडतो आहे.आपल्याच प्रवर्गातला नाग शिकारीवर तुटून पडला याचा त्याला मनातून आनंदच आहे. दहा वर्षाच्या संघ-भाजपाच्या दमनकारी सत्ताकाळात जनआंदोलन उभे करण्याचे अनेक प्रसंग आले.परंतु आंदोलनाचा इतिहास असणाऱ्या काँग्रेसने संघ-भाजपाविरुद्ध राष्ट्रव्यापी आंदोलन उभे करण्याचे टाळले. आंदोलन करणे म्हणजे आव्हान देणे. आणि यात्रा, रॅली काढणे म्हणजे शक्तिप्रदर्शन करणे. दहा वर्षांत काँग्रेसने संघ-भाजपाच्या सत्तेला कधीच आव्हान दिले नाही. केवळ शक्तिप्रदर्शन केले !
# २०२४ ची लोकसभा निवडणूक या देशाच्या भविष्यासाठी आशेचे किरण होती.भारतातील बहुसंख्य शोषित,पीडित,शेतकरी, कष्टकरी,कामगार,कर्मचारी, छोटे व्यापारी,आदिवासी,भटके- विमुक्त,अल्पसंख्यांक,युवक, विद्यार्थी,महिला,सर्व संविधाननिष्ठ,लोकशाहीवादी नागरिक सत्ता परिवर्तनासाठी आसुसले होते. सत्तापरिवर्तन व्हावे ही खुद्द देशाचीच इच्छा होती. तसे वातावरण देशात तयार झाले होते.अशावेळी अनुभवी व राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसची जबाबदारी मोठी होती. काँग्रेसही तसा पत व जनाधार गमावून बसलेलाच पक्ष होता. अनेक आरोपात अडकलेला आणि अनेक नेते गमावलेला पक्ष होता. काँग्रेसला गमावलेला जनाधार मिळवण्याची आणि बिघडलेली प्रतिमा सुधारण्याची नामी संधी होती. छोट्यामोठ्या प्रादेशिक पक्षांमध्ये विखुरलेले जनमत ‘इंडिया आघाडी ’च्या माध्यमातून एकत्र करणे आणि केंद्रात सत्ता स्थापन करणे काँग्रेसला सहज शक्य होते. परंतु कॉंग्रेसने त्या दिशेने पावले उचलली नाहीत ,असे काँग्रेसच्या अनेक राज्यातील भूमिकेवरून दिसते. मध्यप्रदेश, गुजरात, ओडिसा, दिल्ली, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये तर, काँग्रेसचे निवडणूक लढणे हे संघ-भाजपाला मदत करणारे ठरले आहे. याचे सूक्ष्म आणि स्वतंत्र विश्लेषण होणे आवश्यक आहे.
# महाराष्ट्र हे केंद्रातील सत्ताप्राप्तीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण राज्य आहे. महाराष्ट्र स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र राहिले आहे. महाराष्ट्र फुले-शाहू-आंबेडकरांची क्रांतीभूमी आहे. इथेच रा.स्व. संघाच्या प्रतिक्रांतीचे उगमस्थान आहे. महाराष्ट्र वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ आणि दिशादर्शक आहे. महाराष्ट्राला फुले-शाहू-आंबेडकरांच्या वैचारिक,सामाजिक आणि राजकीय चळवळीची पार्श्वभूमी आहे. महाराष्ट्रात अगदी सुरुवातीपासून आंबेडकरी राजकीय चळवळ अस्तित्वात आहे. मध्यंतरीच्या काळात ती अनेक गटातटात विभागली असली तरी,अलीकडच्या काळात ती ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात एकवटली आहे. वंचित बहुजन आघाडीशी केवळ आंबेडकरी समाजच नव्हे तर, बहुजन समाजातील अनेक वंचित समाजघटक या पक्षाशी जुळले आहेत. जुळत आहेत.ॲड बाळासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व बहुजन समाजातील अनेक छोटेमोठे वंचित समाजघटक स्वीकारू लागले आहेत. याची स्पष्ट जाणीव २०१९ च्या लोकसभा निवडणुकीने प्रस्थापित पक्षांना करून दिली. आणि प्रस्थापित पक्षांच्या व पक्षनेतृत्वांच्या मनात चलबिचल सुरू झाली. वंचित बहुजन आघाडी बहुजन समाजातील वंचित समाजघटकांच्या मनात सत्ताप्राप्तीचे स्वप्न जागवण्यात यशस्वी झाली तर, इतक्या वर्षांपासूनचा आपला हक्काचा मतदार दुरावला जाईल. महाराष्ट्रात फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचे राजकारण यशस्वी होईल ; आणि वंचित बहुजन आघाडी सत्तेची दावेदार होईल. या शक्यतेने सर्वच प्रस्थापित पक्ष अस्वस्थ झाले. भाजपाची ‘ बी ’
टीम म्हणून बदनामी करतानाच ते वंचित बहुजन आघाडीची वाढती शक्ती मनोमन मान्य करू लागले.
# संघ-भाजपा सरकारच्या एकाधिकारशाही विरुद्ध वातावरण तापू लागले. लोक सरकारच्या जनविरोधी धोरणांसंबंधी उघडउघड बोलू लागले;आणि अशातच देशात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले. संघ-भाजपा सत्ताधारी असूनही त्यांनी छोट्यामोठ्या ३८ पक्षांना एकत्र केले. ‘एनडीए महायुती ’ ला अधिक व्यापक रूप दिले. आणि मागील दहा वर्षांपासून सत्तेबाहेर असूनही संघ-भाजपाला मदत करण्याच्या हेतूने काँग्रेसने ‘ इंडिया आघाडी ’ ला सुरुवातीपासूनच कमकुवत ठेवण्याचे डावपेच आखले. टीएमसी,आप, बीजेडी, बसपा, वंचित बहुजन आघाडी अशा अनेक पक्षांना ‘इंडिया आघाडी ’ बाहेर ठेवून काँग्रेसने मतविभाजनास पूरक भूमिका घेतली. एकीकडे राज ठाकरे सारखा जनाधार नसलेला नेता संघ-भाजपाला युतीसाठी महत्त्वाचा वाटू शकतो. मात्र लाखोंच्या उत्स्फूर्त जाहीर सभा घेणारे ॲड. प्रकाश आंबेडकर कॉंग्रेसला चालत नाही. यावरून कॉंग्रेसचे राजकारण कुणाला फायदेशीर ठरणारे आहे, हे सूज्ञास सांगणे न लगे !
# आंबेडकर हा एक ब्रँड आहे. आंबेडकर हे नाव चलनी नाणं आहे.ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या रूपात हे खणखणीत नाणं वापरण्याची ‘ इंडिया आघाडी ’ ला नामी संधी होती. परंतु काँग्रेसच्याच मनात खोट असल्यामुळे काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत सामील करून घेण्याचे टाळले. महाराष्ट्र स्तरावरील ‘ महाविकास आघाडी ’ मध्ये घेणार म्हणून बराच काळ झुलवत ठेवले. वंचित बहुजन आघाडीकडून केलेल्या पत्रव्यवहाराला कॉंग्रेसने उत्तर देण्याचे टाळले. मविआच्या संयुक्त बैठकीला बोलवून वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधीला अपमानास्पद पद्धतीने वागवले. प्रत्यक्ष बैठकीत दोन जागा देण्याची तयारी दाखवायची; आणि मिडीयाच्या प्रतिनिधींसमोर चार-पाच जागा सोडण्याची भाषा बोलायची.अशी घातक खेळी मविआ कडून खेळल्या गेली. ‘ वंचित बहुजन आघाडी आम्हाला मविआ मध्ये नकोच होती , त्यामुळे आम्हाला हे जाणीवपूर्वक करावे लागले ’ अशी कबुली आता त्यांच्याच आतील गोटातून समाजमाध्यमांवर प्रसारीत होवू लागली आहे .हा अतिशय निंदनीय आणि घृणास्पद प्रकार आहे.आंबेडकरी चळवळीची चहुबाजूंनी कोंडी करणारा आणि अंतर्गत कलहाच्या आगीत चळवळ जाळणारा हा पाताळयंत्रीपणा आहे. चळवळीच्या मुळाशी सुरुंग लावण्याचा हा प्रकार आहे. पुणे कराराच्या वेळी कॉंग्रेसची जी मानसिकता होती तीच मानसिकता आजही कायम असल्याचे हे लक्षण आहे .
# डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन फार व्यापक होता. त्यांनी केलेले राजकारण हे केवळ सत्ताप्राप्तीसाठी नव्हते तर, ते समाज परिवर्तनासाठी होते. बाबासाहेबांची हीच राजकीय भूमिका घेवून ॲड. बाळासाहेब आंबेडकर राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. भारतीय समाज व्यवस्थेतील जे समाजघटक राजकीय सत्तेपासून आणि सत्तेच्या अधिकारांपासून शतकानुशतके वंचित आहेत, त्यांना सत्तेचा वाटेकरी बनवणे हे बाळासाहेब आंबेडकरांचे राजकीय उद्दिष्ट आहे. वैदिक धर्मव्यवस्थेने शुद्रातिशूद्र ठरविलेला बहुजनवर्ग स्वातंत्र्योत्तर भारतात केवळ मतदार म्हणून वापरला जातो आहे. शुद्रांमधील काही धनदांडगे घराणे आणि काही संधीसाधू कुटूंबे सोडली तर,फार मोठा वर्ग अतिशय सामान्य जीवन जगतो आहे. खेड्यापाड्यात राहणे, काबाडकष्ट करणे.शेती कसणे, ‘ जीवाची माती करणे. कारखान्यात,वखारीत, खाणीत, घाणीत काम करणे. सतत चिंतेत, विवंचनेत जीवन जगणे. स्वतःच्या दुःखांची पर्वा न करता वरिष्ठांच्या सुखाची पालखी वाहणे.आपल्या आयुष्याची आहुती देऊन प्रस्थापितांच्या सुखाचे मळे फुलवणे. असे सुख समृद्धी पासून, सोयी सुविधांपासून, हक्क , अधिकारांपासून, सत्ता ,संपत्ती पासून वंचित असलेले या देशात अनेक समाजघटक आहेत. एकीकडे राष्ट्रीय संपत्तीचा अवैध वापर करून या देशात भांडवलदार, मोठमोठे उद्योगपती,व्यापारी सामान्यांचे शोषण करून दिवसेंदिवस अधिक श्रीमंत होवू लागले आहेत. दुसरीकडे सहकार क्षेत्राच्या नावावर अनेक धनदांडग्यांनी साखर कारखाने, दूध डेअऱ्या, सुत गिरण्या, पतसंस्था,को-आपरेटिव्ह बँका, शिक्षणसंस्था इत्यादींच्या माध्यमातून शोषणाची केंद्रे उभी केली आहेत.तर काही मस्तवाल, संधीसाधू व सत्तापिपासू राजकारण्यांनी पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, महानगरपालिका,विधानसभा आणि लोकसभा कायम आपल्या व आपल्या घराण्याच्या ताब्यात ठेवून वंचित समाजघटकांचे जगणे बेदखल केले आहे.ज्या कामगार,शेतकरी आणि कष्टकरी वर्गाने या देशाच्या विकासासाठी खऱ्या अर्थाने घाम गाळला आणि रक्त आटवले त्याच सर्वसामान्य जनतेला इथे राष्ट्रीय संपत्तीपासून व संसाधनांपासून वंचित ठेवल्या जात आहे. हा विकासाच्या व अधिकारांच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवल्या गेलेला बहुजन समाजातील वंचित समाजघटक मुख्य प्रवाहात यावा. देशाच्या राजकीय सत्तेत समान वाटेकरी व्हावा. यासाठी मा. बाळासाहेब आंबेडकर सुरुवातीपासून निस्वार्थी,निर्भीड आणि तत्त्वनिष्ठ वृत्तीने राजकारणात उतरले आहेत .
# धर्मांध आणि स्वार्थांध वातावरणात तत्त्वाधिष्ठित व ध्येयप्रेरित राजकारण करणे हा अवघड मार्ग असतो. या मार्गावर पावलोपावली अडथळे असतात. या मार्गावर बाह्यशत्रू तर दबा धरून बसलेले असतातच.परंतु अंतर्गत शत्रूही जिव्हारी घाव घालायला टपून असतात. याचा प्रत्यय आपल्याला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने घेता आला. भारतीय संविधानाच्या व लोकशाहीच्या जीवावर उठलेल्या संघ-भाजपा या शत्रूला तर,ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी खुले आव्हान दिलेच होते.भागवत,मोदी,शहा यांचे खुलेआम नाव घेवून ते त्यांना ललकारत होते. यांच्या विरुद्ध एकजुटीने लढता यावे म्हणून ते इंडिया आघाडीत सहभागी होण्यासाठी सतत धडपडत होते .परंतु इंडिया आघाडीला संघ-भाजपा विरुद्ध खऱ्या अर्थाने लढायचेच नव्हते! आणि काँग्रेसला यावेळेला सत्ताही नको होती, केवळ विरोधी पक्षनेतेपद हवे होते. उच्चस्तरावरून त्यांच्यात तशी तडजोड झाली असावी. त्यामुळेच कॉंग्रेसने ‘ इंडिया आघाडी ’ ची ताकद मर्यादीत ठेवली ;आणि एनडीए महायुतीच्या सत्ताप्राप्तीचा मार्ग मोकळा केला. ही बाब राजकारणाची साधी ओळख असणाऱ्या सामान्य माणसालाही कळेल !
# महाराष्ट्रातील ‘महाविकास आघाडी’तील काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट ) आणि शिवसेना (उबाठा) हे तीनही घटक पक्ष ऐन निवडणुकीच्या तोंडावर अंतर्गत फुटीने शक्तिहीन झाले होते. मतदार या पक्षांपासून दुरावले आणि विभागले जावू लागले होते.अशा स्थितीत सर्वसमावेशक,निर्भीड आणि स्पष्ट भूमिकेमुळे बहुजन समाजातील अनेक वंचित घटक ‘ वंचित बहुजन आघाडी ’ कडे वळू लागले होते. दिवसेंदिवस वंचित बहुजन आघाडीचे बळ वाढू लागले होते. जाहीर सभांना विराट रूप येवू लागले होते.ॲड. प्रकाश आंबेडकरांना ‘ मविआ ‘ मध्ये सामील करून घेतले तर,आपण नक्कीच लोकसभेच्या ४०-४२ जागा जिंकू शकतो. याची जाणीव मविआतील पक्षनेतृत्वांना झाली होती. मविआतील ‘जाणता राजा ’ तर, हे चांगलचं जाणून होता. तात्कालिक दृष्ट्या ते त्यांच्या हिताचेही होते. परंतु पुढील राजकारणाच्या दृष्टीने त्यांना ते अडचणीचे वाटू लागले होते. प्रकाश आंबेडकरांना सोबत घेतले तर,आता मविआची शक्ती निश्चितच वाढेल.परंतु भविष्यातील राजकारण वंचित बहुजन आघाडीच्या हातात जाईल.आणि आपल्या पिढ्यानपिढ्यांच्या राजकारणाला धोका उत्पन्न होईल.या भीतीने मविआ मनोमन कमालीची अस्वस्थ झाली होती . प्रकाश आंबेडकरांना मविआत घेतले तर,आताच आपल्याला ‘भाजपात जाणार नाही ‘ असे लिहून द्यावे लागेल;आणि आपला भाजपात जाण्याचा मार्ग बंद होईल. दुसरी महत्वाची बाब म्हणजे आपली घराणेशाही धोक्यात येईल ! एकाच घरातील मुलगी, सून, नातू ,पुतण्या यांना राजकारणात स्थीर करणे कठीण जाईल. अशा अनेक शक्यता लक्षात घेऊन त्यांनी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना
‘महाविकास आघाडी ’ मध्ये घेण्याचे पद्धतशीरपणे टाळले .
# काँग्रेसी राजकारण्यांना अगदी सुरुवातीपासूनच उपेक्षित , वंचितांची, दलितांची, बौद्धांची मते हवी आहेत. मात्र यांच्यातून आलेले स्वतंत्र नेतृत्व नको आहे. ही एकूणच प्रस्थापितांच्या राजकारणाची रीत आहे. त्यामुळेच स्वच्छ विचार, स्पष्ट भूमिका, कणखर वृत्ती, दूरदर्शीपणा व स्वाभिमानी बाणा हे नेतृत्वगुण अंगी असलेला ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्यासारखा वरचढ ठरणारा नेता ‘मविआ’ च्या पचनी पडणे शक्य नव्हते. आपल्याला वंचितांचे नेतृत्व नाकारून मते कशी मिळवता येतील याबाबत ‘मविआ’ रणनीती आखू लागली. त्यासाठी त्यांनी ‘ संविधान बचाव ’ चा देखावा निर्माण केला . संविधान हा दलित, शोषितांच्या , वंचितांच्या आणि विशेष म्हणजे बौद्धांच्या आस्थेचा व अस्मितेचा विषय आहे. हे त्यांनी नेमकेपणाने हेरले.संविधान घोक्यात आहे. ते वाचवणे आवश्यक आहे.आणि ते केवळ ‘ मविआ’ च वाचवू शकते. ही बाब त्यांनी प्रसारमाध्यमांद्वारे आणि समाजमाध्यमांद्वारे मतदारांपर्यंत पद्धतशीरपणे पोहचवली. प्रचलीत माध्यमांचा आणि पुरोगामी विचारवंतांचा अतिशय खुबीने वापर करून त्यांनी वंचित समाजघटकांना ‘वंचित बहुजन आघाडी ’ पासून व प्रकाश आंबेडकर यांच्यापासून तोडले. ते त्यांची राजकीय खेळी खेळण्यात पूर्णपणे यशस्वी झाले.
# ‘ मविआ ’ ला जे अपेक्षित परंतु मर्यादीत यश प्राप्त झाले, त्यात स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या विचारवंतांचा बऱ्यापैकी वाटा आहे. त्यांनी वेळोवेळी लेख लिहून,जाहीर वक्तव्य करून, मुलाखती देवून,जाहीर निवेदनांवर सह्या करून
‘मविआ’ ची बाजू बळकट करण्याचा प्रयत्न केला.आणि खऱ्या अर्थाने उपेक्षित, वंचितांच्या साकार होवू पाहणाऱ्या राजकारणाचा बळी दिल, ही सखेद नमूद करण्यासारखी बाब आहे ! हे बुद्धिवंत ,विचारवंत तटस्थ भूमिका घेवू शकले असते. किंवा समतोल भूमिकाही घेवू शकले असते. संविधान रक्षणासाठी ‘मविआ’शक्तिशाली होणे आवश्यक आहे ;आणि ‘वंचित बहुजन आघाडी’ शिवाय ‘मविआ ’ अधिक बळकट होणे अशक्य आहे. हा ‘ संविधान हिताय् ‘ विचार पुढे रेटण्यात विचारवंत का कमी पडले ? ‘ मविआ ’ च्या विस्ताराकरिता पुढाकार घेऊन विचारवंतांनी आपली वैचारिक कृतीशीलता का सिद्ध केली नाही ? की, विचारवंतही धोरणी व राजकारणी झाले आहेत ? असे अनेक गंभीर प्रश्न या निवडणुकीच्या निमित्ताने उपस्थित होवू लागले आहेत !
# प्रत्येक राजकीय पक्षाची विशिष्ट अशी भूमिका असते. भूमिकेनुसार राजकारणात शत्रूपक्ष मित्रपक्षही असतातच ! भारतातील बहुतेक राजकीय पक्ष हे सर्वसामान्यांच्या प्रश्नांचा जप करीत प्रस्थापितांच्या हिताचे राजकारण करताना दिसतात. प्रामाणिकपणे सर्वसामान्यांच्या हितासाठी लढणारे अगदी मोजके पक्ष आणि पक्षनेते अस्तित्वात आहेत. त्यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या ‘ वंचित बहुजन आघाडी ’या पक्षाचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. कारण हा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार व वारसा पुढे घेवून जाणारा पक्ष आहे. बहुजन समाजातील वंचित समाजघटकांना सत्तेचा वाटेकरी करणे हे या पक्षाचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे. यासाठी हा पक्ष नेटाने आणि एकाकीपणे लढतो आहे. प्रस्थापित पक्ष सर्वसामान्य नागरिकांना मतदार समजणारे आहेत. वंचित बहुजन आघाडी सर्वसामान्य नागरिकांना लोकशाहीचे हक्कदार समजत आहे. हा प्रस्थापितांच्या पक्षांमधील आणि वंचित बहुजन आघाडी मधील मुख्य फरक आहे. सत्ताधारी पक्ष उपेक्षित, वंचितांना पाच किलो धान्य देण्याची घोषणा करतो (भाजपा). तर, सत्तेबाहेरील पक्ष दहा किलो धान्य देण्याचे आश्वासन देतो (काँग्रेस).सत्ता वंचित समाजाला सत्तेत वाटा देण्याची भाषा कोणताच प्रस्थापित पक्ष करीत नाही. पाच किलो धान्य स्वीकारा किंवा दहा किलो धान्याच्या बाजूने कौल द्या ! परंतु मतदान आमच्यापैकी कुणा एकाच्या पारड्यात टाका . असा हा सगळा मामला आहे . म्हणजे प्रस्थापितांच्या पक्षांमध्येच ‘ सत्तेच्या आट्यापाट्या आणि वंचितांच्या हेलपाट्या ’ सुरू आहेत. प्रस्थापित पक्ष निवडणुकीत परस्परांविरूद्ध लढत असले तरी,वंचित बहुजन आघाडी सारख्या पक्षांविरुद्ध लढताना ते एकजुटीने लढतात. ही बाब २०२४ च्या लोकसभा निवडणुकीने जवळजवळ स्पष्ट झाली आहे.
# उपेक्षित,वंचितांना सत्तेचा वाटेकरी बनविण्याचे ध्येय बाळणारा ‘वंचित बहुजन आघाडी’ पक्ष सर्वच प्रस्थापित पक्षांच्या दृष्टीने शत्रुस्थानी आहे. उपेक्षित,वंचितांच्या हिताचे राजकारण करणाऱ्या पक्षाची प्रस्थापितांकडून कशी कोंडी केली जाते. त्या पक्षाला व पक्षनेतृत्वाला कसे बदनाम केले जाते.हे आपण या निवडणुकीच्या निमित्ताने अनुभवले आहे. संघ-भाजपा हा तर,वंचित बहुजन आघाडीचा जाहीर शत्रू आहेच.परंतु कॉंग्रेस नेतृत्वातील ‘ महाविकास आघाडी ’ सुद्धा मैत्रीचा हात पुढे करून उघड शत्रूपेक्षाही घातक पद्धतीने वागली आहे. संघ-भाजपा हा वंचित, बहुजनांच्या अधिकारांचा आणि आंबेडकरी विचारांचा उघड शत्रू आहेच.परंतु ‘ मविआ ’ नामक छुपा शत्रू हा वंचित बहुजनांच्या स्वतंत्र राजकीय अस्तित्वावर आणि आंबेडकरी चळवळीच्या मुळावरच उठला आहे. बहुजन समाजातील वंचित घटक व मुख्य म्हणजे आंबेडकरी समाज संभ्रमित झाला पाहिजे. कायम आपल्या अधिपत्त्याखाली राहिला पाहिजे. यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) ने प्रसारमाध्यमांना,काही विचारवंतांना, बुद्धिवंतांना, पत्रकारांना आणि काही घरभेदी बिभिषणांना हाताशी पकडून त्यांना वंचित बहुजन आघाडी व प्रकाश आंबेडकर यांची बदनामी करण्याची सुपारी दिली. हेतूपूर्वक बदनामी करून व संविधान बदलाची भीती दाखवून ‘वंचित बहुजन आघाडी ’ची पुरती कोंडी केली. राजकीय आखाड्यात तीन तीन आघाड्यांवर लढणारा हा एकमेव पक्ष आहे. एका बाजूला संघ-भाजपा, दुसऱ्या बाजूला ‘मविआ ’ तर,तिसऱ्या पातळीवर या पक्षाला समाजातील घरभेदी वृत्तीशी लढावे लागले आहे . पराभव होणे,मताधिक्य घटणे हे दुःखदायक आहेच. परंतु आंबेडकरी चळवळ धोक्यात येणे हे अधिक धक्कादायक आहे. आंबेडकरी चळवळ ही एकूणच या देशातील पुरोगामी व परिवर्तनवादी चळवळीचे प्रेरणास्थान आणि बलस्थान आहे.आंबेडकरवादी चळवळ ही संघ-भाजपाच्या दृष्टीने त्यांच्या मार्गातील मुख्य अडथळा आहे. आणि हा अडथळा दूर करण्याचे काम ‘मविआ’ करते आहे . म्हणजे खऱ्या अर्थाने संघ- भाजपाची ‘बी टीम ’ म्हणून ‘ इंडिया आघाडी ’ च काम करते आहे .ही बाब विचारी लोकांनी लक्षात घेण्याची फार गरज आहे !
# सद्यस्थितीत आंबेडकरी चळवळीत ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय अभ्यासू, दूरदर्शी , ध्येयवादी आणि स्वाभिमानी असा दुसरा नेता नाही.सभोवतीची परिस्थिती बघता नजीकच्या काळात असा नेता मिळेल अशी शक्यता नाही.या लाचारीच्या , मूल्यहीनतेच्या आणि स्वार्थाच्या अंधारयुगात निष्ठेचा, निस्वार्थीवृत्तीचा व स्वाभिमानाचा ‘प्रकाश ’ दाखविणारा नेता जपणे ही आंबेडकरी चळवळीची नितांत गरज आहे. आंबेडकरी विचारांची विखुरलेली किरणे पुन्हा एकत्र आली तर, हा ‘ प्रकाश ’ अधिक प्रखर होईल आणि या गडद होवू लागलेल्या अंधाराची कोंडी नक्की फुटेल …
सत्तावंचित समाजाचे भविष्य प्रकाशमान होईल !
असे आपण खात्रीपूर्वक म्हणू शकतो !
—————————————-