देश

ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नामकरण होतात, पण..

ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नामकरण होतात, पण..

मुंबईची जीवन वाहिनी म्हणून उपनगरीय रेल्वेची ओळख असून, ते ब्रिटिशकाळात अस्तित्वात आलेलं अत्यंत महत्त्वाचे प्रवासाचे साधन आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने २८ डिसेंबर १९६० रोजी ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याच्या केलेल्या कायद्याची, सन १९८० मध्ये रेल्वे बोर्डाने नियमावली तयार केली. तसा अधिकारही राज्य सरकारला देण्यात आला. राज्य सरकार तसा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मंजूर करुन केंद्र सरकारकडे पाठवू शकते. त्याच आधारे, गेल्या काही वर्षात ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांचे नामकरण करण्यात येत असून, सन १९९५ साली शिवसेना भाजपा सरकार सत्तेवर आल्यानंतर मराठी भाषेचा मुद्दा प्रकर्षाने पुढे येऊ लागला. त्याच अनुषंगाने व्हिक्टोरिया टर्मिनसचे छत्रपती शिवाजी टर्मिनस असे नामकरण केले. नंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी सुधारणा करण्यात आली.

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात ब्रिटिश कालीन रेल्वे स्थानकांच्या नामकरणाचा प्रस्ताव सभागृहासमोर ठेवल्यानंतर त्याला मंजुरी मिळाली. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर ही रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यात येतील. यामध्ये मध्य रेल्वे मार्गावरील २, पश्चिम रेल्वे मार्गावरील २ तर, हार्बर रेल्वे मार्गावरील ३ स्थानकांचा समावेश आहे. इंग्रजी नावे जाऊन यापुढे करी रोड’चे लालबाग, सँडहर्स्ट रोड’चे डोंगरी, मरीन लाईन्स’चे मुंबादेवी, चर्नीरोड’चे गिरगांव, कॉटनग्रीन’चे काळाचौकी, डॉकयार्ड रोड’चे माझगाव तर किंग्ज सर्कल’चे तीर्थकर पार्श्वनाथ रेल्वे स्टेशन अशी मुंबई उपनगरातील रेल्वे स्थानकांना नवी ओळख मिळणार आहे. यावेळी काँग्रेस नेते, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोट्यावधी अनुयायांच्या मागणीनुसार दादर स्थानकाचे नामांतर चैत्यभूमी करावे व यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली.

विकास कामात, प्रगतीमध्ये बदल अत्यंत महत्वाचा असल्याने स्थानिक पातळीवर लोकांची भावना, मागणी असेल तर त्यानुसार ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांच्या नावात बदल व्हायलाच पाहिजे. तसेच प्रत्येक रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छ प्रसाधन गृह, प्राथमिक प्रथमोपचार, आसन व्यवस्था अशा अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करुन, वाढणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी काही उपाययोजनाही झाल्या पाहिजेत. ४ मे १९९५ रोजी बॉम्बेच मुंबई करुन रेल्वे स्थानकाचेही मुंबई सेंट्रल असे नामकरण करण्यात आले होते. मग, ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांचे नामकरण करतांना मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचे नाना जगन्नाथ शंकरशेठ अशी नामकरण करण्याची नामुष्की वेळ का ओढवली ? मुंबईच्या जडणघडणीत नाना जगन्नाथ शंकरशेठ यांच योगदान फार मोठ आहे हे कोणी नाकारु शकणार नाही. म्हणून, महाराष्ट्राच्या राजधानीत उपनगरीय रेल्वे स्थानकाला असलेली ‘मुंबई’ या नावाची ओळखच मिटवून टाकायची का ? मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाऐवजी चर्चगेट रेल्वे स्थानकाला नाना जगन्नाथ शंकरशेठ यांच्या नाव देता येणार नाही का ?

ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नावे इतिहासजमा होत असतांना मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक नामकरणाचा प्रस्ताव तयार होत असेल तर, दादर रेल्वे स्थानकाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अथवा चैत्यभूमी असा नामकरण प्रस्ताव का तयार होत नाही ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर अथवा चैत्यभूमी हे नाव दादर रेल्वे स्थानकाला द्यावे ही आंबेडकरी जनतेची, विविध संघटनांची गेल्या अनेक वर्षाची प्रलंबित आग्रहाची मागणी का दुर्लक्षित केली जात आहे ? भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भीम आर्मीने अनेक आंदोलने केली, तीन/चार वेळा तर प्रतिकात्मक नामकरणही केले, रेल्वे मंत्र्यांच्या नावे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनेही दिली तर, गेल्या वर्षी मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड यांनीही राज्य सरकारने एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे नाव प्रभादेवी करण्यासाठी केंद्र सरकारने पाठपुरावा करुन स्थानकाचे नामांतर केले, त्याच धर्तीवर दादर स्थानकाचे नामांतर चैत्यभूमी असे करावे अशी चैत्यभूमीवरुन मागणीही केली होती.

आंबेडकरी चळवळीचे केंद्रबिंदू असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, बुध्दभूषण प्रिटिंग प्रेस, राजगृह, चैत्यभूमी अशा अनेक बाबासाहेबांच्या निगडीत स्मृती जगाला आठवण करुन देतात. महापरिनिर्वाण दिनी तर प्रतिवर्षी लाखो, करोडो आंबेडकरी, आंबेडकरवादी अनुयायी आपल्या लाडक्या नेत्याचे, दैदिप्यमान देशभक्ताचे, स्फुर्तीस्थानाचे, उध्दारकर्त्याचे, मुक्तीदात्याचे भावपुर्ण दर्शन घेण्यासाठी, त्यांच्या पवित्र स्मृती जागविण्यासाठी, आदरांजली, मानवंदना देण्यासाठी, विनम्र अभिवादन करण्यासाठी, नतमस्तक होण्यासाठी मोठ्या शिस्तीने, संयमाने चैत्यभूमीवर येत असतात. प्रतीवर्षी त्यांच्यात प्रचंड वाढ होत आहे आणि होतच राहणार. कारण, स्वयंस्फुर्तीने चैत्यभूमीवर येत असलेल्या अथांग जनसमुदयाची भव्यता अरबी समुद्रालाही लाजवेल अशीच असते.

तसे पाहिले तर, भारताच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा बाबासाहेबांच्या नावे आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. एवढे बाबासाहेबांचे या देशावर परोपकार आणि जडणघडणीत फारच मोठा वाटा आहे. देशाच्या प्रत्येक क्षेत्रात बाबासाहेबांचे फार मोठे योगदान असून, भारत देशासाठी दूरदृष्टी ठेवून अनेक अनमोल विकासात्मक भविष्यकालीन निःपक्षपाती यशस्वी धोरणे राबविली आहेत. मी प्रथम भारतीय अन् अंततःही भारतीय अशी प्रखर व्यापक राष्ट्रवादीची संकल्पना मांडणाऱ्या जागतिक विध्वता, जागतिक किर्तीच्या दिग्विजयी महान नेत्याच्या नावाचा दादर रेल्वे स्थानक नामांतराला काय हरकत आहे ?

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव दादर रेल्वे स्टेशनला दिले नाही म्हणून त्यांची जागतिक किर्ती, विध्वता कमी होणार नाही. परंतु त्यांच्या नावाला होणारा विरोध किंवा देण्यात येणारी कारणे, पर्याय योग्य आहेत का ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध जाती, धर्म, पंथ, संस्कृती असलेल्या भारत देशाला सक्षम संविधानाव्दारे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय व धर्मनिरपेक्षता या संविधानिक तत्वांवर देशाची एकता, अखंडता आणि राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे महान, अनमोल कार्य केले आहे. म्हणून आपला भारत देश अखंड, सार्वभौमत्व आहे. बाबासाहेबांनी आयुष्यात अनेक वेळा जातीयतेचे भयानक चटके अनुभवले, मात्र घटनेत त्याचा त्यांनी कुठेही परामर्श जाणवू दिला नाही. या युगपुरुषांने अस्पृश्यांनाचं नव्हे तर, स्पृश्यांनाही पुनीत केले. दादर रेल्वे स्टेशन नामांतरचं नव्हे तर, इंदू मिल आंतरराष्ट्रीय स्मारकाचीही मागणी कित्येक वर्षे दुर्लक्षित होती हे सर्वज्ञात आहे. त्यावेळीही काही राजकारण्यांनी क्लृषित वक्तव्ये केली होती.

अमेरिका, इंग्लंडसारख्या देशांनी आपल्या घटनाकारांची स्मारके निर्माण करुन त्यांचा यथोचित असा सन्मान केला आहे. बाबासाहेबांनी फक्त घटनाचं निर्माण केली नाही तर, भारत देशाच्या एकूण सर्वांगीण जडणघडणीत, भविष्यकालीन विकासात्मक वाटचालीत त्यांचे फार मोठे योगदान आहे. मराठवाडा विद्यापीठ नामांतर रक्तरंजीत लढा अनेकांचे संसार उध्वस्त करुन, प्राणांची आहुती दिल्यानंतर, प्रदिर्घ १४ वर्षानंतर नामविस्तारावर प्रश्न संपुष्टात आला. आंबेडकरी जनतेची कोणतीही मागणी असो, न्याय असो तो संघर्ष केल्याशिवाय, रस्त्यावर येऊन रक्त सांडल्याशिवाय कधीच, काही सहज मिळालेले नाही. म्हणजे विकसनशील आंबेडकरी समाजांने आपल्या मागण्यांसाठी, न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरुन हिंसक बनावे, रक्त सांडवावे किंवा आपल्या प्राणाची आहुती द्यावी असेच इथल्या तथाकथित व्यवस्थेला अभिप्रेत आहे का ? ज्या महापुरुषांने समस्त उपेक्षित समाजाला जातीयतेच्या, विषमतेच्या बेड्यांतून मुक्त केले, त्यांनाच तुम्ही जातीयतेच्या कक्षेत बंदिस्त करुन ठेवणार आहात का ? पण, बाबासाहेब हे कोणत्याही जाती, धर्म, राज्य, देश यांच्या कक्षेत सामावणारे व्यक्तिमत्त्व नाही हे विरोधकांनी आणि प्रस्थापित व्यवस्थेने लक्षात घेतल पाहिजे.

सन २०११ मध्ये चैत्यभूमी नामांतर पुढे आले. त्यावेळी काही राजकीय मंडळींनी चैत्यभूमी नामांतराला विरोध करुन, कोणत्याही नामांतराला माझा विरोध राहिल असे सांगितले. तर, त्यानंतर दसरा मेळाव्यात चैत्यभूमी ? छट्.. शब्दात चैत्यभूमी नामांतराला विरोध दर्शवून, नांव बदलून तुमच्या आयुष्यात काय फरक पडणार नाही, असल्या भलत्या सलत्या मागण्या करु नका असे ठणकावले होते. मात्र व्हिटी टर्मिनसचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कुर्ला टर्मिनसचे लोकमान्य टिळक टर्मिनस, शिव रेल्वे स्टेशन, राममंदिर रेल्वे स्टेशन आणि प्रभादेवी रेल्वे स्टेशन अशी अनेक नामांतरे झाली. उड्डाणपूलांची, महामार्गांची नामकरणे झाली, होत आहेत मात्र त्यावेळी त्या नामकरणाला कधी कोणी विरोध केला नाही. फक्त जाहीर सभांमध्ये बाबासाहेबांचे फोटो मांडायचे, सोयीच्या राजकारणासाठी सभांमध्ये त्यांचे संदर्भ द्यायचे आणि दुसरीकडे त्यांच्याचं नावाला विरोध करायचा किंवा दुर्लक्षित करायचे ही जातीय मानसिकता की संधीसाधू राजकारण ? तसं पाहिले तर, सर्वचं राजकीय पक्षांनी नेहमीचं बाबासाहेब आणि आंबेडकरी समाजाबद्दल अनास्था दाखवून दिलेली आहे. बाबासाहेब आणि त्यांच्या समाजाचा तोंडी लोणचे लावतात तसा आजतागायत फक्त वापरचं झालेला आहे. नाही तर बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाची मागणी असताना एवढी वर्षे लागली असती का ? चैत्यभूमीच्या नामांतराला विरोध करुन, इंदू मिलच्या जागेत नाना शंकर शेठ यांच्या स्मारकासाठी मागणी केली नसती. उड्डाण पूल, रस्ते, रुग्णालये अशा अनेक ठिकाणांची नामांतरे झाली आणि नविन होतं असतांना कोणाचाही कधी विरोध दिसून येत नाही आणि आंबेडकरी समाजांनेही कधी कोणत्याही नामांतराला विरोध केला नाही. मग, फक्त बाबासाहेबांचा विषय आला की त्यांनाचं विरोधाभास का ? खरचं, बाबासाहेबांच्या नावाला विरोध म्हणजे धर्मनिरपेक्ष भारत देशाचीचं घोर शोकांतीका तर नाही ना ? कारण, जगाच्या पाठीवर बाबासाहेब एकमेव असे अजरामर दिग्विजयी, जागतीक विध्वता लाभलेले महान नेते आहेत, त्यांच्या पश्चात त्यांचे वाढते प्राबल्य कोणत्याही राजकीय पक्षांना, नेत्याला किंवा समाजाला सहन होणार नाही हे ह्यावरुन स्पष्ट होते. म्हणजेचं अजूनही जातीय मानसिकता अस्तित्वात असून, ती देशाच्या अखंडतेला आणि एकात्मतेला घातक आहे. त्यातचं, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि जातीय मानसिकतेमुळेचं सातत्याने बाबासाहेबांच्या नावाला विरोध होत आहे हे स्पष्ट होते. आंबेडकरी जनतेच्या व भीम आर्मीच्या आग्रही मागणी नंतर माजी मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दादर रेल्वे स्थानकाचे नामांतर चैत्यभूमी असे करावे अशी केलेल्या मागणीला राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने आजतागायत कोणताही प्रतिसाद दिलेला नाही यावरुनच सर्व स्पष्ट होते.

*- मिलिंद कांबळे, चिंचवलकर*

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button